Tuesday, May 5, 2015

'सफारी इन अ सिटी'


कुठल्या विषयावर लिहावे हा प्रश्न जन्म पुण्यातला असल्याने काही अंशी तरी सुटला असे माझे हळू हळू मत बनत चालले आहे.कारण पु.लंच्या म्हणण्यानुसार (शक्यतो पु.लंचा संदर्भ दिला कि पुढे वाचण्याची उत्सुकता वाढते आणि संपूर्ण लेख वाचला जाईल याची शाश्वती असते) प्रत्येक गोष्टीवर पुणेकरांचे एक स्वतंत्र मत असले पाहिजे,याच अनुशंघाने एक तुलनात्मक वर्णन करण्याचा हा माझा प्रयत्न असावा.

भारतातील एखाद्या जंगलाचे व्यक्तीशः वर्णन याआधी करून झालेले आहे.जंगल हे अर्थातच सगळीकडचे सारखे नसते,त्यामुळे लिहायचे ठरवले तर प्रत्येक जंगलाचे स्वतंत्र लिखाण तयार होईल.पण सध्या तरी असा काही विचार नाहीये.याच जंगलात घडणार्या आणि मी अनुभवलेल्या हालचालींची तुलना दररोज अनुभवत असलेल्या पुण्याशी केली तर त्यातून काय निष्पन्न होईल हे आज मी कागदावर उतरविण्याचा प्रयत्न करतोय.

वास्तविक पाहता जंगल आणि पुणे शहर यात काडीमात्र साधर्म्य नाहीये.आणि का असावे ? जर का साधर्म्य असतेच तर जंगलालाच पुणे किव्वा पुण्याला जंगल म्हटले नसते काय ? वायफळ शाब्दिक कोटया म्हणायला जितक्या छान वाटतात तितक्या त्या वाचायला वाटत नाहीत हे मला समजलंय..असो..

तर सांगायचा मुद्दा असा कि दोन भिन्न गोष्टींची तुलना करताना आहेत तश्या गोष्टी जर कल्पकतेने तोलल्या तर लपलेले साधर्म्य मला कायम जाणवते.आणि म्हणूनच या दोन गोष्टींची तुलना करावी हा विचार डोक्यात आला असावा.

जंगलात एक सात आठ सफारी केल्यावर साधारण असं वाटायला लागतं कि मध्य भारतात असलेले Flaura आणि Fauna म्हणजे पुण्यात असलेल्या तीन किव्वा चार मजली इमारती.दुतर्फा असलेली घरे त्यात वाळत घातलेले कपडे आणि बाहेर पसरून लावलेल्या गाड्या.अर्थात पुणे हे साधारण सर्व पेठा,कोथरूड आणि डेक्कन परिसर या गोष्टींपुरतेच मर्यादित ठेवलं आहे कारण मुंबईच शांघाय करायचे जरी या लोकांचे मनसुबे असले तरी औंध,मगरपट्टा या ठिकाणांचे टोकियो यांनी आधीच करून ठेवले आहे..चालायचेच..प्रवाह विस्कळीत झाला कि पाणी मार्ग सोडून धावते..तसे नको व्हायला..

तर पुण्यातून फिरत असताना असे जाणवते कि आजूबाजूला चालत फिरणारी लोकं म्हणजे जंगलात ढिगानी दिसणारी हरणं आहेत.अगदी टीपीकल काका काकू आणि त्यांची मुलं हे दृश्य जसं पुण्याला नवीन नाही तसच दर दोन मिनिटाला दिसणारे हरणांचे कळप जंगलाला देखील नवीन नाहीत.

टिळक,शाहू किव्वा इतर कुठल्याही पोहोण्याच्या ठिकाणी उन्हाळ्याच्या सुट्टीत एखादी बॅच संपल्यावर तलावा मधून बाहेर पडणारे चिमुरडे मला कायम उन्हात एक पाय वर करून शांतपणे पंख वाळवत बसलेल्या cormorant किव्वा बगळ्यांसारखी वाटतात.बाहेरच्या जगाची फारशी फिकीर न करता आईने अंगावर टाकलेला पंचा गुंडाळून निवांत बसलेली मुला त्यांच्याच विचारात मग्न असतात.डोक्यावरून निथळणारे पाणी आणि भर उन्हात अंगावर आलेला काटा अगदी त्या जंगलातल्या बगळ्याच्या किव्वा बदकाच्या झटकलेल्या पंखातून उडलेल्या पाण्याइतका जवळचा आणि सवयीचा वाटतो.

रस्त्यावरून जाणारी लाल दिव्याची गाडी आणि त्यामागून जाणारा त्यांचा ताफा हा मला नेहमी उंचावर  बसलेल्या गिधाडांच्या थव्या सारखा वाटतो.यात कुठलाही द्वेष अथवा तिरस्कार नाही पण त्या सदृश्य भावना कालानुरूप तयार झाली असावी.पान विरहित उंच फांदीवर बसलेली गिधाडे आणि लाल दिवे डोक्यावर लावून धावणारे सरकारी लोक यांच्यात साम्यता का वाटावी याचा मलाही फारसा अंदाज लावता आला नाहीये.

सारसबाग,झेड ब्रिज ,बालगंधर्व या ठिकाणी बसलेली प्रेमी युगुलं मस्त सावलील्या बसलेल्या पक्षांची  आठवण करून देतात.म्हणजे सदैव चिकटून बसलेले Bee eaters,Drongo,Jungle dove किव्वा Babbler यासारखे पक्षी.कायम आपल्या प्रेमात गुरफटलेले असतात.फक्त खाण्यासाठी तेवढे उडतात तशीच आपली प्रेमिक मंडळी.

यापेक्षा काहीसा वेगळा आणि जास्त आकर्षक दृश्य फर्ग्युसन रोड,इस्ट स्ट्रीट किव्वा रात्रीच्या वेळी डेक्कन परिसरात दिसते. आणि ते म्हणजे पुण्यातील सौंदर्याचा क्रीमिलेयर मोठ्यासंखेने पाहणे.तेव्हा आठवण होते ती Paradise flycatcher, Sunbird, Indian roller या सारखे सुंदर आणि रंगीत पक्षांची.आपल्या सौंदर्याची उधळण करत कॅमेराधारकांचे लक्ष विचलित करणारे हे पक्षी.अर्थात फर्ग्युसन रोडवर तुम्ही कॅमेरा चालवू शकत नाही हा भाग वेगळा.पण भावना मात्र तीच असते.अगदी टिपिकल सौंदर्य नजरेला पडत असते.तशी संख्या बर्यापैकी असते पण कंटाळा येण्याइतके टाकाऊ दृश्य नक्कीच नाही.बर यात काही पक्षी एकदम ३/४ दिसतात तर Flycatcher सारखा तसा दुर्मिळ पक्षी एकटाच दिसतो.सुंदर निमुळती होत जाणारी ओघवती,पिसासारखी झुपकेदार आणि पांढरी शुभ्र शेपटी धारण केलेला स्वर्गीय नर्तक डोळ्याचे पारणे फेडतो.आणि अगदी त्याचप्रमाणे रुपाली वैशाली किव्वा मार्झ-ओ-रिन बाहेर थांबलेल्या एखाद्या मुला मुलींच्या ग्रुप मध्ये असणारी सुंदर मुलगी लक्ष वेधत असते.

यात अजून एक म्हणजे परराज्यातून आलेल्या सुंदर मुली.या मुली पाहताना उगीचच आपल्याला स्थलांतरित पक्षी बघितल्याची भावना येते.म्हणजे समजा बांधवगड मध्ये फिरताना 'Lesser Adjutant Stork,किव्वा White-breasted Kingfisher असा मस्त पक्षी दिसला कि जी प्रतिक्रिया बाहेर पडते त्या सारखीच प्रतिक्रिया इथे सुंदर पण पुण्याबाहेरील मुलगी पाहताना दिली जाण्याची शक्यता आहे.

जंगलातून जात असताना एखाद्या लांबवर पसरलेल्या हिरवळीवर किव्वा दोन उंच झाडांमध्ये असलेल्या रिकाम्या पसरणीवर थाटात पण लगबगीने आणि मानेची लयबद्ध हालचाल करीत किडे टिपणारा सुंदर मोर नजरेस पडल्यावर आठवण होते ती मंगल कार्यात नटून मिरवणाऱ्या तरुण मुलींची.उत्सवप्रमुख कोणीही असो सुंदर मीच दिसणार या अविर्भावात संपूर्ण कार्यालय हा रंगमंच असल्यासारखा वावरतात.काही वेळेला तर संपूर्ण पिसारा फुलवलेला मोर आणि सेल्फी काढण्यात मग्न झालेल्या या नटलेल्या मुली पाहताना परस्पर दोन्ही गोष्टींची आठवण करून देतात.

जंगलात फिरत असताना अजून एक विषय दृष्टीक्षेपात पडतो तो म्हणजे शिकारी पक्षांचा.मोठे आडदांड पक्षी थोडे राकट चेहेर्याचे आणि कदाचित याच चेहेर्यामुळे स्वभावही तसाच चिडका असेल असे वाटणारे पक्षी. Changeable Hawk, crested serpents, black eagles किव्वा डौलात उडणारे Kite किव्वा raptors इत्यादी पक्षी.आता पुण्यात फिरत असताना या पक्षांची देखील आठवण होतेच.शांतपणे वाहणाऱ्या रस्त्यावर अचानक आवाज करत लक्ष वेधून घेणाऱ्या बुलेट,थंडरबर्ड चालवणाऱ्या त्या मुलांकडे पहिले कि या पक्षांची आठवण होते.का कोण जाने पण या लोकांचा स्वभाव रागीट असेल असे कायम वाटते.पण असे असूनही त्यांचा तो डाम डौल आणि तो राकटपणा वेगळाच वाटतो.

पुण्यात वावरताना अजून एक शैली नजरेस आणि अनुभवास येते ती म्हणजे अतिशहाणी टाळकी.आता याचा नेमका अर्थ काय तर अंगकाठीने तसे पाप्याचे पितर का असेना पण डोळ्याला गॉगल गळ्यात चेन घालून उगीच ट्रिपल सीट गाडीवरून फिरणे.एकटे असाल तर सुसाट गाडी चालवणे.चौका चौकात गाड्यांवर उलटे बसून गप्पा मारत बसने.किव्वा काहीतरी आगाऊपणा करून गर्दीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणे.थोडक्यात काय तर बेरकी मनोवृत्ती असलेला विशिष्ट गट पहावयास मिळतो.आता या लोकांकडे पहिले कि जंगलात टोळीने फिरणाऱ्या लांडगे,कोल्हे,तरस किव्वा जंगली कुत्री या प्राण्यांची आठवण झाल्यावाचून रहात नाही.प्रचंड खोडसाळ मनोवृत्तीचे आणि चपळ असलेले हे प्राणी.काहीसे धूर्त आणि बेरकी जनावर म्हणून प्रसिद्ध आहेत.अंगापिंडाने तसे जेमतेमच असतात पण प्रचंड आगाऊपणा आणि पुढे पुढे करण्याची वृत्ती यामुळे हे प्रतिबिंब कायमच कोरले गेले आहे.

याच मुद्द्याला धरून काहीसा विचार केल्यावर असे जाणवते कि पान टपरीवर गप्पा मारणारे,उगीचच चौकश्या करणारे,इकडच्या बातम्या तिकडे पसरविणारे आणि अखंड बडबड करून दिवस घालवणारी अजून एक जमात पुण्यात मोठ्याप्रमाणात पहावयास मिळते.आणि अर्थातच याची तुलना जंगलातील माकडांशी करायला काहीच हरकत नाही असे माझे मत आहे.कोण कुठे आहे,कोण काय करत आहे याची खडानखडा   माहिती असलेले आणि ती माहिती संपूर्ण जंगलाला करून देणारा एकमेव प्राणी म्हणजे माकड.दिवसभर हेच उद्योग करण्यात मग्न असलेले माकड निरुद्योगी जरी असले तरी जंगल उत्साही ठेवण्याचे काम चोखपणे बजावत असते.

जंगलात असणारे प्राणी काही अंशी तरी स्मरणात राहतात याचे समाधान पुण्यात फिरताना मिळते हि अतिशयोक्ती म्हणता येणार नाही.अर्थात हा सर्वस्वी वय्याक्तिक अनुभव आहे.कदाचित तुम्हाला तुमच्या अवतीभवती अशीच काही वेगळी उदाहरणे देखील नक्की मिळतील.

हे सगळे प्राणी पक्षी कोणत्या ना कोणत्या अवतारात का होईना पण शहरी जीवनात नजरेत येत असतात.पण पिवळे पट्टे असलेला आणि अवघ्या जंगलाचे नेतृत्व करणारा वाघ तसेच भव्यता,बुद्धिमत्ता आणि राजेशाही थाटाचे प्रतिक असलेला हत्ती मात्र मी या सिमेंटच्या जंगलात शोधू शकलो नाही किव्वा मला सापडला नाही.

जंगल ते जंगलाच यात शंका नाहीच.आणि त्याची तुलना देखील नाही.पण एक वेगळ्या दृष्टीने जंगलाचा विचार केला तर अशी काहीतरी निराळीच बाजू डोळ्यासमोर आल्याखेरीज राहणार नाही.हा अतिशय ढोबळमानाने आणि प्रथमदर्शनी आलेला विचार मी मांडला आहे.

जंगलामध्ये  प्राणी,पक्षी आणि निसर्ग या खेरीज बर्याच गोष्टी अनुभवण्यासारख्या आहेत.आणि यातूनच रुड्यार्ड किप्लिंग च्या 'Jungle Book' चा उगम झाला असेल का ? मनुष्य आणि प्राण्यांच्या स्वभावाचा रेखीव संबंध यात दिसून आला आहे.या पुढे कधीही जंगलात जायची संधी मिळाली तर रिकाम्या वेळात हे निरीक्षण सुधा करून बघा.कदाचित अजून काही ओळखीच्या आकृत्या नक्की सापडतील.






हृषिकेश पांडकर
०५-०५-२०१५

1 comment:

  1. aselahi kadachit..kinva naselahi kadachit..
    kinva kasa asawa yavishayi maza kahi mat asanyapeksha konitari te kase nasave he sangane kadachit shreyaskar aselahi kinva te sangaycha tu tuzya rekhiv shailitun prayatn kelasahi parantu vachtana mala zop ali aselahi...

    ..

    ..

    ..
    kinva naselahi

    ReplyDelete