काही
गोष्टी आधीपासूनच येत असतील तर त्या करण्यात फारशी मजा नाही असे म्हणतात.पण एखादी गोष्ट
आपल्याला जमू शकेल असे वाटत असताना तीच गोष्ट आपल्याला करायला मिळाली तर त्याचा आनंद
वेगळाच असतो. या गोष्टीची प्रचिती मला परवाच आली. अशा छोट्या छोट्या गोष्टींची प्रचिती
यायला कोणते मोठे अनुभव यायची गरज नसते,ती आपल्याला साध्या दिनचर्येत सुधा येतेच.
तर
हे सांगण्याचा हेतू हा होता की,IT,ऑफिस,पगार,मिटींग्स या बेचव गोष्टीत अडकल्यापासून
दिवाळी म्हणजे फक्त सुट्टी हे एकच समीकरण आम्ही जुळवतो.पंधरा वर्षापूर्वी दिवाळीची
समीकरणे सहामाही परीक्षेपासून सुरु व्हायची आणि सुट्टीनंतरच्या शाळेच्या पहिल्या दिवसावर
संपायची. भाषेचा पेपर पहिला असल्यामुळे मराठीचा पेपर पहिला हे गणितच होते.आणि शंभर
गुणांचा पेपर म्हणजे पंधरा मार्कांचा निबंधाचा प्रश्न हे अगदीच अलिखित होते.काही गोष्टी
भूतकाळ झाल्याशिवाय आठवणी बनत नाहीत हेच खरे.पण सगळाच भूतकाळ आठवणींच्या नावाखाली समोर
येत नाही.
याच
आठवणींना उजाळा मिळाला जेव्हा आमच्या बिल्डींग मधल्या मुलांचा सहामाही परीक्षेचा भाषेचा
पेपर झाला तेव्हा.पार्किंगमध्ये गाडी लावत असताना त्या काकू मुलाला विचारात होत्या,
" कुठला निबंध लिहिलास ?,निबंध शेवट लिहायच्या नादात विसरला नाहीस ना ? पेपरमध्ये
टिकमार्क केला नाहीये म्हणून विचारतीये."…वर्तमानाचे आवरण गळून पडले आणि भूतकाळाच्या
आठवणींनी दाटी केली.त्या काकूंचा प्रश्न अगदीच सरळ होता.त्या मुलाचे उत्तर देखील त्या
प्रश्नाला साजेसे असेलही,पण ते उत्तर ऐकण्याच्या मनस्थितीत मी नव्हतो.या प्रश्नाला
मी सुद्धा सरावलेला होतो.निबंध म्हटल्यावर भीतीपेक्षा कंटाळा जास्त वाटायचा,त्यात वेळ
कमी पडेल असे नेहमी वाटायचे. आणि त्या नादात शेवट कायमच गुंडाळला जायचा.…आणि याच मुद्द्यावर
मी भूतकाळ सोडून वर्तमानात आलो.गाडी लावली आणि थेट त्या मुलाचा पेपर हातात घेतला.पेपरच्या
उजव्या बाजुला किती मार्क मिळतील हे गोल करून लिहिले होते.जमलेल्या प्रश्नावर बरोबरची
खूण केली होती.’रिकाम्या जागा भरा’ या प्रश्नाची उत्तर पेन्सिलने लिहिलेली होती.मी
पटकन निबंधाचे विषय पाहून घेतले.त्या मुलाने तिसऱ्या पर्यायावर बोट ठेवून 'हा निबंध
लिहिला' असे हसत उत्तर दिले.तो निबंधाचा विषय होता 'रेल्वे स्थानकावरील एक तास'.तो
मुलगा नंतर पेपर घेवून वर गेला आणि माझ्या डोक्यात विचारांची मिटिंग सुरु झाली. मला
समजा निबंध लिहायची वेळ आली आणि हाच विषय फक्त 'रेल्वे स्टेशन' ऐवजी 'विमानतळ' असा
आला तर काय होईल..? आणि म्हणूनच आपल्याला तेव्हा जमले नसते पण आता कदाचित निट जमू शकेल
आणि लिहायला वेळ देखील पुरू शकेल या आशेने मी हा निबंध लिहायला घेतला.
उगीचच समोर पेपर आहे आणि समोर निबंधाला 'विमानतळावरील
दोन तास' हा विषय आहे अशा थाटात मी लिहायचे ठरवले.
प्रश्न १ ला.
खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे २५० ते ३०० शब्दात निबंध लिहा. ( १५ )
१. ……….
२ ……….
३ 'विमानतळावरील दोन तास'
४ ……….
५ ……….
उत्तर :
एयरपोर्टवर
जायचे म्हणजे विमानात बसलेच पाहिजे असे काहीही नसते.हल्ली घरटी एक व्यक्ती शिक्षण किव्वा
नोकरी निमित्त परदेशात असते.त्यामुळे कोणाला आणायला किव्वा सोडायला एयरपोर्टवर जाण्याचा
योग येतोच.तर त्याच कारणामुळे परवाच मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्याची संधी
मिळाली.
एयरपोर्ट
ते हि आंतरराष्ट्रीय आणि तेही मुंबईत या सगळ्या गोष्टी जुळून आल्या कि डोळ्यासमोर एक
वेगळीच प्रतिमा तयार होते.काहीतरी भव्य दिव्य
असेल असे उगीच वाटते आणि आपल्या अपेक्षा उंचावतात.
का
कोण जाणे पण मला एक कोडे कायमचेच पडलेले आहे.सकाळी छान अंघोळ वगरे करून,नाश्ता करून
दहा वाजता विमान आहे असे कधी ऐकले आहे का ? सगळ्यांची विमानं रात्री दहा नंतरच कशी
उडतात ? सकाळी विमान चालवण अवघड आहे का ? प्रश्न अतिशय बाळबोध असला तरी मला कायम पडतो.रात्री
बाराला सिक्युरिटी चेक,रात्री एक वाजता आत सोडतात.बर आता आम्ही निघणार पुण्यावरून त्यामुळे
आधी मुंबईचा प्रवास आणि मग एयरपोर्टची वाट.अर्थात पुण्यात एयरपोर्ट होईपर्यंत याला
पर्याय नाही.
तर
विषय भरकटण्याआधीच मुद्द्याचं बोललेला अर्थात लिहिलेला बरं.हा तर मुंबईच्या देखण्या
एयरपोर्टवर पोहोचल्यावर लक्षात येते ती मुंबईची भव्यता.’छत्रपति शिवाजी आंतरराष्ट्रीय
हवाई अड्डा’ हा मोठा बोर्ड पाहिल्यावर मला उगीचच दडपण आल्यासारखे वाटते.
दुतर्फा
लावलेले आगमन आणि प्रस्थानचे मोठे फलक,विविध आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुरविणार्यांची
ओळीने लिहिलेली नावे,अखाती देश,गोऱ्यांची विमाने,अमेरिकेचा थाट आणि इतर बरीच नावे एका
मागून एक डोळ्यासमोरून जात असतानाच आपण तिथे पोहोचतो.
एखाद्याला
घ्यायला जायचे असेल तर साहजिकच खालच्या बाजूला 'आगमन' लिहिलेल्या कमानीखालून गाडी थेट
आगमन दारात येवून थांबते.आणि मग या एयरपोर्ट वरील विविध गोष्टींचे कुतूहल आणि नाविन्य
उलगडत जाते.
आप्तेष्टांची
वाट पाहत आशाळभूत नजरेने समोरच्या काचेच्या दारावर डोळे लावून बसलेले आपल्यासारखे असंख्य
चेहेरे दृष्टीक्षेपात येतात.परदेशी नागरिकांना घ्यायला आलेले 'Pick Up & Drop'
चे ड्रायव्हर त्यांच्या नावाचे फलक घेवून उभे राहिलेले दिसतात.कोण कसा काळा कि गोरा
किवा काळी का गोरी आपल्या वाटेला येईल याचा शहानिशा करीत असलेले ते ड्रायव्हर निवांत
गप्पा मारत बसलेले असतात.काही लोक त्या सामानाच्या ट्रोली शोधत फिरत असतात.कामानिमित्त
एकटे फिरणारे आपल्या कामात व्यग्र असतात.त्यांना तर सदैव घाईच असते.एखादीच Bag असल्यामुळे
ते ट्रोलीच्या फंदात पडत नाहीत.
आमच्यासारखे
घ्यायला आलेले लोक एक डोळा त्या बाहेरच्या लावलेल्या टीव्हीच्या पडद्यावर आणि दुसरा
डोळा त्या समोरच्या काचेच्या दाराकडे लावून बसलेले असतात. अर्थात वयानुसार भिरभिरणारी
दृष्टी बदलत असते.एका ठराविक वेळानंतर चक्कर मारून पुन्हा त्याच जागी आल्यावर असे लक्षात
येते कि जशी आपली परिस्थिती असते तशीच बाकीच्यांची.
एखाद्या
विमानाच्या नावासमोर 'Arrived' असे लिहून आले कि लोकांमधील उत्सुकता वाढत असते.मधूनच
मोठ्या जत्थ्यानी लोकं बाहेर पडत असतात.बाहेर येवून मोठ्याने हाक मारून घ्यायला आलेल्यांना
मिठ्या मारण्याचे प्रकार सर्रास् पहायला मिळतात. मधूनच येणारा पायलट आणि हवाई सुंदर्यांचा
समूह लक्ष वेधून घेतो.पाण्यात बराच वेळ राहून बाहेर आल्यावर आपण जसा दीर्घ श्वास घेतो
त्याप्रमाणे ते लॉबी मधून बाहेर आले कि सिगारेट पेटवतात.त्यांची वेशभूषा आणि रुबाब
बघितला कि आपण दिवसातले आठ तास एकाच खोलीत बसून काय करतो असा प्रश्न मला साहजिकच पडतो.
विविध रंगाचे लोक आणि त्यांनी लावलेले नानाविध रंगाचे
परफ्युम नाकाचे पारणे फेडत असतात.लोकं विमानातून प्रवास करतात कि मिरवायला जातात हा
प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.परदेशी नागरिकांचे सोडाच पण भारतीय वंशाचे प्रवासी देखील
विमान प्रवासात समारंभातील पाहुणे वाटतात.उगीचच एखाद्या पार्टीला आलोय कि काय असा भास
होतो.
मात्र याचाच विरोधाभास पाहायला मिळतो जेव्हा
युरोप वरून येणाऱ्या प्रवासी दारावरून पुढे जावून आपण अरब देशातील विमानाच्या
'Arrival' पाशी येतो.दौंड जंक्शन च्या 'Platform' ची आठवण झाल्यावाचून राहत नाही.अक्षरशः
बोचकी आणि ट्रंका यांनी व्यापलेले प्रवासी पाहायला मिळतात. पाचशे मीटरच्या अंतरात एवढी
तफावत कमालीची विचित्र वाटते.
पुणे
स्टेशनच्या कॅन्टीन मध्ये आठ रुपयाला मिळणारे Sandwitch इथे पन्नास रुपयाला विकत घेवून
Aluminium च्या कागदात गुंडाळून खाणारे प्रवासी पहिले कि आंतरराष्ट्रीय विमानप्रवासाच्या
भव्यतेची प्रचीती येते.
साधारणतः प्रवास करणार्यांपेक्षा निरोप देणारे
आणि स्वागत करणारे यांची संख्या इथे जास्त असते.राहणीमानानुसार या लोकांची स्वागत करण्याची
किव्वा निरोप देण्याची पद्धत बदलते.काहींचे अश्रू स्वागत करतात.काहींची मिठी तर काहींचे
ओठ…काही नुसतेच हस्तांदोलन करून स्वागताचा आनंद घेतात.भावनांची खोली मोजण्यासाठी पट्टी
अजूनतरी आलेली नाही पण लोक आपापल्या परीने भावना व्यक्त करीत असतात.आणि याच गोष्टी
निरोपाला देखील नक्की होत असणार.
सरावलेल्या
प्रवाशांच्या वावर्ण्यातील आत्मविश्वास आणि नवशिक्यांच्या कृतीतील अडखळणे स्पष्ट दिसत
असते.सामानाची ट्रोली ढकलण्यापासून ते पासपोर्ट जपून ठेवण्यापर्यंत सगळ्या हालचालीत
अनुभवानुसार फरक आढळतो.चोवीस तासांचे घड्याळ बघताना होणारी तारांबळ देखील काहीवेळा
मजेशीर ठरते.आपले विमान दुसऱ्या देशात कधी पोहोचेल या चर्चेमध्ये होणारी वेळेची गम्मत
ऐकणे हा अनुभव नक्की घ्यावा.
हे सगळे अनुभव घेताना दोन अडीच तास कसे जातात याचा अंदाज पण येत नाही. एव्हाना
आपले पार्सल पोहोचलेले असते.वर लिहिल्याप्रमाणे आपण देखील त्यांचे स्वागत करतो.आणि
मार्गस्थ होण्यासाठी बाहेर पडतो.गाडीपर्यंत पोहोचून त्या परिसरातून बाहेर पडतानाचा
वेळ वेगळाच असतो.कदाचित त्या वातावरणातून मानसिकदृष्ट्या बाहेर येण्यासाठी तो वेळ असतो
असे मला प्रत्येक वेळी वाटते.कारण मुंबई एयरपोर्टच्या बाहेर आल्यावर अंधेरीची गर्दी
आ करून उभी असते.कदाचित सगळी कडे हीच परिस्थिती असेल असे नाही पण किमान माझा अनुभव
तरी हेच सांगतो.
माझे दोन तास चुटकीसरशी संपतात.आणि प्रत्येक वेळी नवीन अनुभवाची भर पडत जाते.
या निबंधाला
कदाचित गुण मिळणार नाहीत पण निबंध लिहायला वेळ कमी पडला नाही हे समाधान नक्की आहे.
हृषिकेश पांडकर
२७/११/२०१३