Saturday, September 15, 2012

नियोजनाची ऐशीतैशी



              दिवसातील चोवीस तासांचे नियोजन करणारे लोक आहेत..आठ तासाची झोप बाजूला ठेवून उरलेल्या सोळा तासात आपण काय काय करणार आहोत याचा तपशीलवार हिशोब ठेवण्यावाचून गत्यंतर नसते.सर्वांना तेच बारा तास मिळतात..आणि पर्यायाने तेवढेच चोवीस तास ...फरक एवढाच असतो कि तेच आपल्या वाट्याला आलेले तास कोण कसे वापरतो इतकाच.आणि यालाच रुटीन असे गोंडस नाव दिले गेलेले आहे.भले काहींचे रुटीन सारखे नसेलही.पण आजच्या दिवसात आपण काय करणार आहोत याचा अंदाज सर्वसामान्यांना असणे अपेक्षित असते..


             या गोष्टीवर लिहावेसे वाटले किव्वा विचार करावासा वाटला याला कर
च तसे आहे.आपल्या सर्वांना साधारण अंदाज असतो कि इथून पुढचे दोन ते तीन तास आपण काय करणार आहोत.काही गोष्टी ज्या प्रचंड अवेळी येतात आणि तितक्याच बिनकामाच्या पण वाटतात पण त्याला पर्याय नसतो.आणि अश्या गोष्टी पुढे असलेल्या कामाची रुपरेशाच बदलून टाकतात.या गोष्टी नकळत आणि एकदम घडतात त्यामुळे यांना तोंड देण्यावाचून पर्याय नसतो...
            बकिंगहम च्या राजवाड्यामधील दोन दिवस हा अनुभव कथन करण्यासाठी नक्कीच तिथे जावून अनुभव घेऊन येणे क्रमप्राप्त आहे.पण अवेळी घडणार्या गोष्टींमुळे होणारी धांदल किव्वा करमणूक हा सर्वांनाच येणारा अनुभव कथन करणे मला तितकेसे अवघड जाईल असे वाटत नाही.कारण झाडून सर्वांच्या आयुष्यात असे क्षण नेहमीच येत असतात.
          हि कल्पना डोक्यात आली तीच मुळात अशा एका वेळी जेव्हा अवेळी आणि बिनकामी परिस्थिती माझ्यासमोर उद्भवली.पण वयाची अठ्ठावीस वर्ष खर्च करून झाल्यावर आता काही गोष्टी निदर्शनास येतात कि या गोष्टी आधी अनंत वेळा झाल्या असतील पण त्याची दखल कधीच घेतली गेली नाहीये.आणि त्याचमुळे हे लिहिण्याचा खटाटोप.


             पावसाळ्यात पाऊस पडणारच हे छातीठोकपणे सांगायचे दिवस काळाच्या ओघात मागे पडले.त्यामुळे वर्षातले कुठलेही चार महिने पावसाळा समजून पाऊस पडू शकतो.परवाच्या रात्रीची गोष्ट लक्ख चांदणे आहे याची खात्री करून घराबाहेर पडलो.जिम करून बाहेर पडलो.आणि बाथरूम मधील नळ चालू करावा त्याप्रमाणे पाऊस कोसळू लागला होता.रात्रीचे साडे नऊ वाजून गेले होते.दोन watchman ३/४ कार,६/७ दुचाकी ४/५ माझ्यासारखे पावसामुळे अडकलेले लोक सोडले तर पार्किंग मध्ये कोणीच नव्हते.पटकन जाऊ घरी असे म्हणण्याइतका कमी पाऊस नक्कीच नव्हता, आणि सुमारे अर्धातास थांबेल याची चिन्ह पण नव्हती.त्यामुळे तो अर्धातास घालवणे हा खूपच वेगळा अनुभव होता...समदुखी लोकांच्या सुरात सूर मिसळून पावसावर तोंडसुख घेऊन घसा सुकल्यावर विषयांतर झाले.इतके दिवस एकत्र व्यायाम करणारे लोक बोलताना असे दिसतात हे पाहून आनंद वाटला..त्यानंतर मात्र एका जागी बसलो होतो आणि साखरफुटाण्याला लागलेल्या मुंग्या धक्का दिल्यावर जश्या बाहेर पडतात त्याप्रमाणे यासारखे न चुकवता येण्यासारखे प्रसंग डोक्यातून बाहेर पडले...


             पाऊस थांबवा हि एकच इच्छा असते.अश्यावेळी रस्त्यावरचे दिवे,गाडीचे लाईट हि दोनच पाऊसाची तीव्रता मोजण्याची उपकरणे उपलब्ध असतात.कारण हात बाहेर काढून हातावर पडणारा पाऊस कधीच खात्रीशीर माहिती देऊ शकत नाही...या वेळी फार तर फोन वर बोलणे,मेसेज करणे यापलीकडे टेक्निकल विरंगुळा नसतो ( प्रचंड वय्यक्तिक मत आहे ).एक जण म्हणत असतो कमी झाल्यासारखा वाटतोय,दुसरा म्हणतो कि 'नाही रे आहे अजून बराच...त्या दिव्याच्या उजेडात बघ'...आपल्याला भिजायचे नसते आपण बसूनच असतो.अर्थात भिजायचे आहे कि नाही हे इथून पुढे कुठे जायचे आहे यावर अवलंबून असते तो भाग वेगळा.काही लोक असलेल्या जागेत येरझार्या मारत असतात.अशावेळी बरोबर असलेले लोक आणि होणारा संवाद यावर आपले नियंत्रण नसते..बायका असतील तर आपल्याला उशीर होईल ( किव्वा तत्सम ) हे कळवायच्या पाठीमागे असतात,मुली असतील तर पाऊस नेमका कसा येतो आणि फक्त आपलीच कशी गैरसोय होते हे प्रियजनांना समजावण्याच्या मनस्थितीत असतात. 


                आणि फार थोडे लोक असतात जे अश्या परिस्थितीचा देखील आनंद घेतात.

                अजून एक येणारी अडनिड वेळ म्हणजे आपल्या गाडीचे चाक पंक्चर झालेले असते,पंक्चर काढायचे दुकान ओळखीचे नसते,काढून घेण्यावाचून गत्यंतर नसते पुढे उशीर होणार याची साधारण कल्पना असते...आणि बरोबर कोणीही ओळखीचे नसते.गाडी त्याच्या ताब्यात देऊन आता काय करायचे हा एक प्रश्न असतो.१५ मिनिटांचाच प्रश्न असतो पण उत्तर मात्र नसते.इतक्या वेळा पाहिल्यामुळे पंक्चर कसे काढतात हे माहित असते.पंक्चर किती झाली आहेत हे पाहण्या व्यतिरिक्त बाकीच्या गोष्टी पाहण्यात स्वारस्य राहिलेले नसते.आपले काम चालू असताना मध्ये मध्ये फक्त हवा भरण्यासाठी येणारे १०० लोक आपल्या कामाचा आणि पर्यायाने आपला अंत बघत असतात.लहानपणी सायकल चे पंक्चर काढताना तिथे पडलेले ball berings गोळा करणे हा एक तरी विरंगुळा होता वयाच्या नादात तो देखील गेलाय....

              अशीच परिस्थिती उद्भवते जेव्हा एखाद्याची वाट पाहण्याची वेळ आपल्यावर येते..कितीही व्यवस्थित ठरवून आपण भेटायचे ठरवले तरी चुकामुक हि होतेचअर्थात चुकामुक असे नाही पण दोघेही एकाच वेळी येतील हे जरा अवघड आहे.आणि अश्या वेळी ती व्यक्ती येईपर्यंत त्या ठिकाणी १० मिनिटे का होईना पण ताटकळत थांबणे कष्टप्रद असते.आणि अशाच वेळी आपल्या फोनबुक मध्ये असलेले आणि काही बरेच दिवस न वापरलेले नंबर ओळखीचे वाटू लागतात.बरेचदा आपण कोणाची वाट पाहत आहोत आणि कशासाठी वाट पहात आहोत यावरून होणार्या त्रासाची मोजदाद होते.'एक दोन मिनिट थांब जरा आलोच जाऊन' किव्वा हे धरून थांब मी येतोच' या वाक्यांना बळी पडून बर्याच वेळा अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असते.पण एकूणच वाट पाहण्यात घालविलेला वेळ सर्वस्वी अक्कलखाती याच खात्यात debit होऊ शकतो..

              आत्ता नाही पण आधी लाईट किव्वा टेलेफोन चे बिल भरायला रांगेत उभे राहण्यातली मजा शब्दात वर्णन करणे अवघड आहे.कारण २० x २० इंचाच्या खिडकीच्या पलीकडे बसलेल्या व्यक्तीला पैसे देण्यासाठी आलेली २३/३० लोक ताटकळत उभे असतात.आणि त्याला कशाचीही घाई जाणवत नसते.इतका वेळ रांगेत उभे राहून देखील खिडकीच्या तोंडावर आल्यावर खिशातून पैसे काढून मोजण्यापासून सुरुवात करणारे महाभाग असतात.रांगेत मधूनच घुसणारे आणि त्यांना हटकणारे यांच्यातील बाचाबाची.हे या रांगेतील अनुभवाचे highlights असतात.अर्थात पुन्हा एकदा हा वेळ फुकटच जातो.म्हणजे पैसे भरायचे काम २ मिनिटाच्या वर फार चालत नाही पण किमान २० मिनिटे रांगेत उभे राहणे क्रमप्राप्त असते.

              बस साठी कधी stop वर उभे राहायची वेळ आली असेल तर त्या सारखा भाग्याचा क्षण नाही.काम काहीच नसते,एखादी बस लांब दिसल्यावर तयारीने पुढे यायचे असते..आपली नसेल तर गप मागे जायचे असते.आणि आपली असेल तर मुकाट्याने चढायचे असते.पण या दरम्यान अनंत प्रतिक्रिया कानावर पडतात.सगळ्या बस कुठल्या मार्गावरून जातात,कुठे थांबतात,कधी येतात याचा हिशोब मला पाठ आहे अश्या अविर्भावात विचारणारे लोक मला भेटले आहेत.पण यात त्यांची चूक नसते म्हणा. फक्त बसायला व्यवस्थित सावलीची जागा आहे म्हणून टाईमपास करायला आलेले काही लोक देखील बस stop वर असतात.


             केस कापायला गेल्यावर थांबावे लागणे हा अनुभव परिचित असण्याची शक्यता दाट असेल.अश्यावेळी थांबण्याशिवाय आपल्या हातात काहीही नसते.केस कापले जातात अश्या ठिकाणी फक्त इंग्लिश मसिकच का ठेवली जातात याचा मला अजूनही उलगडा झालेला नाही.आणि कुठलीही तक्रार न करता आपण ती चालतो हे हि तितकेच खरे..तरीदेखील हा वेळ त्रासदायक कधीच वाटत नाही.पण हा वेळ वाचावा यासाठी आपल्या हातात कुठलाही उपाय नसतो. 


                  आधुनिकतेच्या नावाखाली कदाचित वरील अनुभवला आपण मुकत असू.पण असे अनेक क्षण येतात ज्यामुळे फक्त वेळ जातो.आणि तरीदेखील त्या वेळचे नियोजन करणे आपल्या हातात नसते.हा काही फार विचार करायचा मुद्दा नक्कीच नाही.पण याच छोट्या छोट्या प्रसंगातून चांगले अनुभव येतात.हा मात्र माझा स्वताचा अनुभव आहे.


                 वेळेचे नियोजन या मोठ्या शब्दाला सुरुंग लावणाऱ्या या छोट्या प्रसंगाला आनंदाने तोंड देणारे फार कमी लोक असतात.अर्थात हे प्रसंग देखील फार उत्साहवर्धक असतात असे नाही.पण याच छोट्या प्रसंगातून आणि अनुभवातून खूप गोष्टी शिकता येऊ शकतात हे मात्र नक्की. कदाचित वर लिहिलेले अनुभव काही कारणाअभावी सगळ्यांनाच घेता आले असतील किव्वा येऊ शकतील असे नाही पण असे इतर अनेक प्रसंग आहेत ज्याचा उल्लेख मी केलेला नाहीये..

            काही गोष्टींना घड्याळाच्या तबकडीत बसवता येत नाही...तरी देखील त्या चोवीस तासात मोजल्या जातात.... 



      
                                                                                                           

                                                                                  - हृषिकेश पांडकर
                                                                                    १४/०९/२०१२   

2 comments: