Saturday, May 12, 2012

Wonder In Greekland


                   
         काल रात्रीची गोष्ट, Movies channel वर 'Alice in Wonderland नावाचा सिनेमा लागला होता, खरं तर आधी तो सिनेमा थिएटर मध्ये पाहून झाला होता.3D असल्यामुळे आता TV वर पाहण्यात फार काही मजा येईल अशी अपेक्षा  नव्हती पण तरी जरा सुरुवात पहावी म्हणून जेवताना पाहत बसलो होतो.उशिरा घरी आल्यामुळे घरचे केव्हाच झोपले होते .मी एकटाच सिनेमा पाहत होतो,सुरुवातीच्या पाच एक मिनिटानंतर असे दृश्य आहे कि ती छोटी मुलगी एका सशाचा पाठलाग करता करता एका खोल खड्यात पडते, आणि शेवटी अशा  ठिकाणी येऊन पडते कि तिथले जगच वेगळे असते.आणि हेच ते wonderland असते आणि जिथे सगळा पुढचा सिनेमा उलगडत गेलेला आहे,मी मात्र ती alice खड्यात पडल्या नंतर tv बंद केला आणि ताट घासायला ठेऊन हाथ धुवून झोपायला निघालो.

            क्षणभर विचार मनात आला कि अगदी wonderland सारखी काल्पनिक नगरी नको पण त्या सारखेच एखादे ठिकाण अशाच एका खड्ड्यात पडून बघायला मिळाले तर काय अनुभव असेल .मनात आलेला हा पोरकट विचार धुतलेले हात पुसावेत तसे पुसून टाकले आणि झोपायला निघालो. उन्हाळ्याचे दिवस चालू असल्याने गच्चीत झोपण्याचा उपक्रम चालू झाला होता.त्यामुळे फक्त दार बंद करून वर जाणे हो formality करून मी गच्चीत पोहोचलो.वर जाऊन गादी घातली आणि नुसता गादीवर पडलो.झोप काही केल्या येत नव्हती, वर निरभ्र आकाश होते थंड वारा सुटला होता, पण पांघरून घेण्याची इच्छा फारशी नव्हती.तारे पाहून अंदाज लावावे या मधला मी नाही , ध्रुव तर उत्तरेला असतो या पलीकडे माझी खगोलशास्त्राची मजल नाही.उगीचच दिसणाऱ्या तार्यांचे चौकोन त्रिकोण काढत कधी डोळा लागला याचा अंदाज नाही.

         सकाळी जाग आली ती एका अलिशान हॉटेल च्या खोलीमध्ये.प्रथम डोळे किलकिले करून खोलीमध्ये नजर फिरवली, आणि ताडकन उठून बसलो,दिवाणावरून पाय खाली ठेवले तर पांढरा शुभ्र गालीचा आपल्या पायामुळे खराब  होईल अशी भीती वाटून पाय पुन्हा वर घेतले.पण भीती बाळगणे व्यर्थ होते कारण संपूर्ण खोलीभर गालीचा अंथरला होता.तेवढ्यात दारावर टकटक ऐकू आली,हळूच उठून दार उघडले आणि समोर एक उंचपुरी व्यक्ती स्कर्ट सारखा पांढरा पोशाख असलेली,संपूर्ण टक्कल, हातात एक निरोपाचा कागद घेऊन आली होती, मी काही बोलायच्या आत त्याने तो कागद मला दिला, आणि कमरेपासून खाली वाकून काहीतरी बोलून तो तिथून निघून गेला.मी कागद घेऊन आत आलो, दार लावले, आणि तो कागद उलगडून दिवाणावर येऊन बसलो..

            कागदावर काय असेल याचा अंदाज मला अजिबात नव्हता मी तो कागद हळू हळू वाचायचा प्रयत्न करू लागलो,एखादा लिफाफा असावा त्याप्रमाणे कोरीव आणि वळणदार अक्षरात इंग्लिश मध्ये " Invitation "असे लिहिले होते. आता माझ्यासाठी काही invitation असेल असे माझ्या ध्यानीमनी देखील नव्हते.मी कुतूहलाने पुढे वाचायला सुरुवात केली,तर खाली एका शहराचा नकाशा काढला होता आणि त्या नकाशावरील रस्त्यावरून कसे जायचे आहे त्याचे मार्गदर्शक बाण काढलेले होते.आणि जिथे बाण संपत होते तिथे एक मशाल काढलेली होती.मी पुन्हा एकदा सगळा नकाशा बारकाईने पाहीला. 'You are here' असे लिहिलेले लाल वर्तुळ  काढले होते.खोलीतही एकटाच होतो आणि काय करायचे  हे  देखील माहित नव्हते, तर नकाशा नुसार दिलेल्या आमंत्रणाचा स्वीकार करायला काय हरकत आहे निदान काय आहे ते कळेल तरी, असा धाडसी निर्णय मी घेतला.तो नकाशा गादीवर उलगडलेला तसाच होता,मी घडी घातली आणि तिथून निसटलो.

           ३ मजले उतरून खाली आलो तर समोर भव्य झुंबर लटकविलेले होते, जमिनीच्या ऐवजी काचेची फरशी होती, मगाशी आलेल्या त्या माणसासारखे १०/१२ लोक आपापली कामे करत होती,जुन्या पद्धतीचे मोट्ठे घड्याळ भिंतीवर लावलेले होते.मी ते डोळ्यात साठवून हॉटेल मधून बाहेर पडलो.
           नकाशा काढला आणि दिलेल्या दिशेनुसार चालायला सुरुवात केली. स्वच्छ रस्ते होते,सायकल वरून जाणारी लहान मुलं आणि लोक सुद्धा दिसत होती,अधून मधून उंची गाड्या वेगाने जात होत्या.आजू बाजूला असलेल्या इमारती  आणि घरांच्या बांधकामाची एक वेगळीच ठेवण दिसत होती, संपूर्ण दगडी बांधकाम होते, मधेच एखादी पुरातन वस्तू भासावी अशी इमारत दृष्टीस पडत होती,पाश्चिमात्य म्हणावा एवढी पण पुढारलेली दृश्य नव्हती पण खेडेगाव पण नव्हते . "Shades of Artemis" नावाच्या इंग्लिश सिनेमा प्रमाणे  ग्रीक शहर असावे असा माझा प्राथमिक समज झाला होता. 

           नकाशाप्रमाणे डावीकडे वळलो, तर माझा मगाशी झालेला समज खात्री मध्ये बदलला, कारण मोठ्या बोर्ड वर ग्रीक भाषेत लिहिले होते "Welcome to Ancient Olympia, Greece", म्हणजे हे वाक्य ग्रीक मध्ये होते आणि खाली छोट्या अक्षरात इंग्लिश मध्ये लिहिले होते.आता मी एका मोठ्या कमानीतून आत गेलो.समोरचे दृश्य अविस्मरणीय होते.मी एका विशिष्ट उंचीवर पोहोचलो होतो.समोर मला ते भव्य मैदान दिसत होते.त्यावर असलेले ते दगडी भग्न अवशेष  स्पष्ट दिसत होते.जणू एखादी खूप जुनी  इमारत पडली आहे आणि तिचे भग्नावशेष तिथेच आहेत असे ते चित्र होते.त्या जागेत खूप लोक जमले होते.मी पण त्यांच्यात सामील झालो. इथून पुढे काय होणार हे माझ्या हातात नव्हते कारण  नकाशाप्रमाणे मी त्या मशालीच्या जागेवर येऊन उभा होतो.

            सकाळी ९ ची वेळ असावी.सोनेरी कोवळा सूर्यप्रकाश होता, आम्ही हिरव्यागार गवतावर उभे होतो.कुठेही घाई गडबड नव्हती, गर्दी असल्याची जाणीव देखील होत नव्हती,डोळे मिटले असते तर मगाचची खोली आणि आत्ताची गर्दी  यात फरक जाणवला नसता कदाचित.लोक शांतपणे कशाची तरी वाट पहात होते. समोरचे दृश्य अतिशय विलोभनीय होते,समोर खूप मोठी रिकामी जागा होती, संपूर्ण जागेवर हिरवळ पसरली होती,मध्यभागी असलेल्या छोट्याश्या उंचवट्यावर  ३ उंच झेंडे रोवलेले होते, वार्याच्या संथ गतीमुळे झेन्ड्यावरील अक्षरे दिसणे अवघड होते पण मध्ये असलेला झेंडा ऑलिम्पिक चे चिन्ह दर्शवत होता.


          झेंड्याच्या पुढे काही अंतरावर काळ्याभोर रंगाच्या पोलिश केलेल्या लाकडी खुर्च्या एका ओळीत ४ अश्या ६  रंगांमध्ये मांडून ठेवलेल्या होत्या.झेंड्याच्या पुढच्या बाजूला एक कार च्या चाकाच्या  परिघाइतके मोठे वाडग्या सारखे भांडे सूर्याकडे तोंड करून नुसते ठेवले होते.त्या वाड्ग्याच्या तोंडाला भिंगाला लावतात तशी काच लावली होती.मी नजर डाव्या बाजूला फिरवली तर डाव्या बाजूला असलेल्या टेकडीवर लोक गटागटाने मस्त हिरवळीवर बसले होते,हातात कॅमेरे आणि दुर्बिणी घेऊन कशाची तरी प्रतीक्षा करीत असावेत.
              मी पुन्हा झेंड्याकडे नजर फिरवली, एक साधारण ६ फुटाचा माणूस ज्याने गुडघ्या पर्यंत स्कर्ट घातला होता, आणि वर बनियन घातला होता.त्याने मोट्ठ्याने बिगुल वाजवले आणि आत्ता पर्यंत असलेली ती शांतता क्षणार्धात भंग पावली.त्या बिगुलाच्या आवाजाबरोबर मी जिथे बसलो होतो अगदी त्याच्या मागच्या बाजूने त्या बिगुल वाजवणाऱ्या माणसाच्या वेशातील अजून काही तरुण एका रांगेत झेन्ड्याजवळ जाऊन थांबले आणि त्यांच्या मागोमाग त्याच रंगाचा मोठ्ठा पायघोळ परिधान केलेल्या काही तरुणी मैदानावर आल्या. दोघेही एकमेकांच्या समोर एका रांगेत उभे होते.आणि तेवढ्यात जोरात टाळ्या वाजायला सुरवात झाली, काही मान्यवर व्यक्ती समोर ठेवलेल्या खुर्च्यांवर येऊन बसले. ( अर्थात खुर्चीवर येऊन बसले म्हणून मान्यवर असावेत असा माझा समज. ), त्यानंतर एक अस्खलित इंग्लिश मधून announcment झाली आणि एक सुंदर तरुणी मैदानावर हळुवार चालत आली.( अर्थात सगळ्याच तरुणी सुंदर होत्या म्हणा ).ती तरुणी त्या दोन रांगांच्या सर्वात पुढे उभी होती, आणि तिच्या हातात एक मोठ्ठी मशाल होती मात्र तिला अजून ज्योत दिसत नव्हती.काही वेळाने पुन्हा एकदा announcment झाली कि "इथून पुढे तुम्ही जे पाहाल ते ग्रीक लोकांचे पारंपारिक नृत्याविष्कार"..तिचे बोलून व्हायच्या आत ग्रीक तरुणी आणि तरुण यांचे अप्रतिम नृत्य सुरु झाले होते.लोकांच्या कॅमेर्यांना उसंत नव्हती.मी डोळ्यात जितके साठवता येईल तितके साठवत होतो.नाचातील समन्वय आणि चपळाई याच्या सर्व मर्यादा पार झाल्या होत्या .सुमारे २० मिनिटानंतर त्यांनी आम्हाला कमरेतून वाकून अभिवादन केले आणि पुन्हा आपल्या जागी जाऊन उभे राहिले.पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.
               त्यानंतर मशाल धरलेली तरुणी त्या मशालीसह मोठ्या वाडग्याच्या इथे जाऊन उभी राहिली आणि तिने ती मशाल त्या वाडग्याला टेकवली.फक्त वार्यामुळे हलणाऱ्या पानांचा आवाज सोडला तर बाकी काही आवाज नव्हता, मी डोळ्यात प्राण आणून पहात होतो,सर्वप्रथम काय चालू आहे हे समजलेच नाही, पण नंतर अंदाज आला  कि, लहानपणी भिंगातून सूर्यकिरण एकत्रित करून कागद जसे मी जाळायचो अगदी तसेच हि तरुणी आत्ता करणार होती, आणि ते म्हणजे  सूर्यकिरण त्या वाड्ग्याच्या काचेवर पडून ते एकत्रित होऊन त्याच्या सहाय्याने ती मशाल पेटणार होती.आणि केवळ ७/८ मिनिटात अग्नी डोळ्याला दिसू लागला, मशालीवर पिवळी ज्योत आली होती, एव्हाना कॅमेर्याला असलेले डोळे  बाजूला झाले ,एकच जल्लोष चालू झाला होता, मी आजू बाजूला नजर फिरवली तर लोक आनंदाने टाळ्या वाजवत होते.


           आता मी पुन्हा समोर पहिले तर त्या तरुणीने त्या मान्यवरांसमोर पेटलेली मशाल उंच धरली, सर्व मान्यवर उभे राहिले होते.आणि इंग्लंड ऑलिम्पिक २०१२ ची ज्योत जिथे ऑलिम्पिक ची सुरुवात झाली अशा ग्रीक मध्ये धगधगली.वातावरणात प्रचंड उत्साह जाणवत होता.त्यानंतर त्या ज्योतीचा पवित्र अग्नी इंग्लंड ला नेण्यासाठी एक अजून सुंदर तरुणी पुढे आली तिच्या हातात एक ओंजळीत बसेल एवढ्या आकाराचा वाडगा होता.तो वाडगा हातात धरून ती त्या मशाल हातात धरणारीच्या समोर गुढघा टेकवून खाली बसली, आणि ओंजळ पुढे करून तिने वाडग्यातील ज्योत पेटविण्याची विनंती केली त्यानंतर ज्या तरुणीने मशाल हातात धरली होती तिने हातातील मशाल तिरकी करून वाडग्यातील वातीला अग्नी दिला, आणि हाच तो पवित्र अग्नी जो पुढे इंग्लंड ला नेला जातो.टाळ्यांचा पुन्हा एकदा कडकडाट झाला. 

            आता वेळ होती कि ऑलिम्पिकची जी फिरती मशाल असते तिला प्रज्वलित करण्याची, आणि या वेळी ग्रीक चा Spyros Gianniotis, जो ग्रीक चा नावाजलेला जलतरणपटू आहे त्याने ऑलिम्पिक ची मशाल प्रज्वलित केली आणि
एका हातात ऑलिम्पिक ज्योत आणि दुसर्या हातात ओलिव्ह झाडाची छोटी फांदी घेऊन संपूर्ण मैदानाला त्याने फेरी मारली.या वेळी संपूर्ण जमलेल्या लोकांनी टाळ्यांच्या गजरात त्याला सलामी दिली, आणि ऑलिम्पिक २०१२ इंग्लंड साठी सर्वात पहिले मशाल नेणारा म्हणून मान मिळविला.फेरी पूर्ण करून तो पुन्हा झेन्ड्याजवळ येऊन थांबला आता हीच ज्योत विविध देशातून फिरविली जाते, तर आता हि ज्योत इंग्लंडला नेण्यासाठी Alexander Loukos हा ग्रीक वंशाचा पण इंग्लंड चा boxer बरोब्बर Union jack च्या खाली उभा होता.  Spyros Gianniotis ने आपल्या हातातील ज्योत Alexander कडे सुपूर्द केली आणि सर्वांना अभिवादन करून तो मान्यवरांच्या खुर्चीवर येऊन बसला.पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर झाला.

         एव्हाना सूर्याने जागा बदलली होती.सकाळी कोवळे वाटणारे उन आता तापू लागले होते, पण लोकांमध्ये अजिबात चलबिचल नव्हती.सकाळी गवतावर असलेले दवबिंदू केव्हाच नाहीसे झाले होते.मगाशी डोक्यावर लावलेले काळे चष्मे आता डोळ्यावर दिसत होते.मी इतक्यावेळ उभा होतो पण 'दमलोय, आता बसावे ' असे कधीच वाटत नव्हते.एवढ्यात काहीतरी ग्रीक मध्ये बोलणे सुरु झाले, मला काहीच कळत नव्हते पण अतिशय मृदू वाटणारी भाषा कानावर पडताच लक्ष तिकडे गेले.तर त्यांच्यातीलच एक अजून तरुणी त्या मैदानात आली तिच्या हातात पांढर्या शुभ्र रंगाचे एक कबुतर होते, तिने येताक्षणी प्रेक्षकांना अभिवादन केले आणि पूर्व दिशेला पाठ करून ते कबुतर हवेत मोकळे सोडले .कबुतर  देखील सरळ उंच उडत गेले, कदाचित स्पर्धा निर्विघ्न आणि शांततेत पार पडावी यासाठीचाच अट्टाहास होता.लोक उन्हापासून लपण्यासाठी कपाळावर हात ठेऊन कबुतर शोधात होते.

          या नंतर त्याच ठिकाणी त्या मान्यवरांचे भाषण तिथे होते, कुठलाही मंच नव्हता स्टेज नव्हते गवतावर उभे राहून त्यांनी आपले ४ शब्द आमच्या पर्यंत पोहोचविले आणि कार्यक्रमाची सांगता झाल्याची घोषणा केली .


         कार्यक्रम संपला हे कळायला आता  मला कुठल्या भाषेची गरज नव्हती, पण कुठेही गोंधळ नव्हता, प्रथम मान्यवर बाहेर पडले, नंतर त्या ग्रीक तरुणी आणि तरुण बाहेर गेले, आणि मग आम्ही आलो त्या पावली मागे फिरलो, मी पुन्हा एकदा ते मैदान आणि तो परिसर मनात साठवून घेत होतो.आता वारा वाढला होता तिन्ही झेंडे डौलाने फडकत होते, उजवीकडे ग्रीस चा राष्ट्रीय झेंडा, मधला ऑलिम्पिक चा झेंडा, आणि उजवीकडे union jack वार्याशी स्पर्धा करत  होते, मी एका वेगळ्याच अनुभवातून बाहेर पडत होतो.
          मगाशी ज्या कमानीतून आत गेलो तिथपर्यंत मी आलो, मागे एकही माणूस शिल्लक नव्हता, समोर देखील फक्त रस्ताच दिसत होता...
        मी कमान ओलांडून पुढे आलो आणि अंगावर आलेल्या उन्हामुळे जाग आली, पांघरूण बाजूला सारले, समोरच्या टाकीवर कबूतर बसले होते,उगीचच चेहेर्यावर हास्य उमटले आणि मुकाट्याने गादी गुंडाळायला घेतली.
         दात घासताना हातात पेपर घेतला आणि पहिल्या पानावर आलेला 'England Olympic 2012' च्या तरुणीने धरलेल्या मशालीचा फोटो होता..

          " Alice In Wonderland " पेक्षा हा सिनेमा नक्कीच चांगला होता...तो तरी 3D होता..यात तर मी स्वतः होतो .....

                                                                             हृषीकेश पांडकर
                                                                             ११-०५-२०१२   

7 comments:

  1. Kadak Mitra!!! Kuthun suchte kunas thauk!!!:-) keep it up

    ReplyDelete
  2. Olympic 2012 cha Swagat Samarabh dakhavlya baddal tuze shatashah: dhanyawad !!! tuzi greece parayanta janyachi kalpana farach avdali... ekdam zak re :)

    ReplyDelete
  3. imaginary lihine khup avghad aahe. mast lihile aahes. keep it up

    ReplyDelete
  4. sundar re ... kalpnashakitcha paramocch !!
    Aani Olympic Sawagat Samarabhachi Zalak dilis aamhala..

    ReplyDelete
  5. mast varnan rangavale aahes....photos mule tu kharach tethe jaun aalas ki kaay ase vaatale :)

    ReplyDelete
  6. Faar faar bhari re ... ata movies sathi lihayla harkat nahiye. This is extraordinary writing. Keep it up !!

    ReplyDelete
  7. खूप सुरेख रे...कल्पनातीत गोष्टींचे वर्णन करणे फार अवघड. ते चित्र आमच्या डोळ्यासमोर प्रकट केल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete