Friday, March 9, 2012

खरच...तो फक्त द्रविडच होता....





पृथ्वीतलावर गुरुत्वाकर्षणाचा नियम लागू होणारे सर्वच आहेत...
पण क्रीजवर मात्र चुंबकत्वाचा नियम लागू होणारा द्रविडच होता...

 One down Batsman कसला हो हा ???
 पहिल्याच drinks break ला हजेरी लावणारा हा द्रविडच होता...

दुसरी इंनिंग असताना उन्हामध्ये लेग स्टंप मागून...
Night  Watchman ला पाठीमागे लपवून दिवस वाचवणारा हा द्रविडच होता...

खूप वेळा वाटायचे याचा नंतर सचिन आहे batting  ला ....
पहिली wicket गेल्यावर दुसरी विकेट लगेच पडावी...

 पण असे कधीच वाटले नाही कि द्रविड आउट व्हावा.
का कोण जाणे सचिन असूनही नेहमी वाटायचे द्रविड असावा बाबा ...

 सचिनच्या विश्वासावर बोट नव्हते..
 पण द्रविडच्या खंबीरपणावर  हृदय होते....

समोरच्या टीमच्या  धावांचा डोंगर पाहिल्यावर 
विश्वासाचा पहिला शिलेदार द्रविड होता....

स्लीप मधला catch म्हणल्यावर bowler चे नाव पुरेसे होते
 कारण catch घेणारा द्रविडच होता....

दही हंडी फोडणारा जरी वेगळा असला ...
तरी पहिल्या वर्तुळात पाय रोवलेला द्रविडच होता....

नवीन कोर्या लाल Ball ला शाइन करणारा....आणि..
नवीन कोर्या लाल Ball ची शाइन घालविणारा देखील द्रविडच होता....

सचिन,सौरव,VVS च्या विक्रमांच्या ...
धगधगत्या मशालीचे तेल द्रविडच होता....

Captain,keeper,opener,hitter...
टीम च्या प्रत्येक हाकेला ओ देणारा द्रविडच होता....

Taunton,Eden,Leeds,Lahore .....
साथीदाराच्या  यशात झाकोळला गेलेला द्रविडच होता....

'Bradman Oration' ला अभिमानाने आणि 
WC पराभवाची जबाबदारी स्वीकारून धीराने बोलणारा देखील द्रविडच होता....

मोहाली,मोटेरा किव्वा  मेलबोर्न...
टीम चे जहाज किनार्याला लावणारा 'Captain' द्रविडच होता....

१६ वर्षापूर्वी घातलेले पांढरे शुभ्र कपडे....
१६ वर्षानंतर उतरविताना देखील पांढरेशुभ्र ठेवणारा...द्रविडच आहे..

|| कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ||

अर्जुनापेक्षा हे वचन ज्याने सर्वात जास्त पाळले असेल 
तर तो फक्त राहुल द्रविडच होता...आहे ...आणि राहीलही....

                                                            - हृषीकेश पांडकर
                                                             ०९-०३-२०१२  

Wednesday, March 7, 2012

माझे जीवन गाणे ...

         "गुरुवार"  ..वार जरी दत्ताचा असला तरी मात्र 'लाईट नसणे' हा प्रश्नच आमच्या समोर दत्त म्हणून हजर असतो.थोड्या फार प्रमाणात हा प्रश्न कमी झाला आहे.असे  वाटत असतानाच परवाच्या गुरुवारी लाईटच्या 'जाण्याने' धक्का बसणे हे मी पुन्हा अनुभवले ..Invertor, battery backup,solar backup यांनी केव्हाच हात वर  केले होते..Laptop असल्यामुळे "लाईट नाहीत" याचा आनंद फार काळ  टिकला नाही.आणि शांततेत कामाला पूर्ववत सुरुवात झाली.Server चा आवाज,लिफ्ट चा आवाज या आवाजाची अनुपस्थिती सुसह्य वाटत होती.मी सहज म्हणून माझ्या फोन मधला FM चालू केला आणि earplugs लटकावून कामाला लागलो.मी शक्यतो असे गाणी ऐकत बसलोय असे घडत नव्हते पण एवढ्या शांततेत तेवढाच टाईमपास म्हणून मी रेडीओ ऐकायचे ठरवले होते. मात्र पुढचे सुमारे साडेतीन तास मी एका वेगळ्याच विश्वात गेलो.सर्वसाधारणपणे पुण्यामध्ये ६/८ music stations आपण व्यवस्थित ऐकू शकतो.ज्याला 1500 रुपयांचा फोन  आणि ८५ रुपयाचा ear plug खूप पुरून उरत होता.
        मी संध्याकाळी घरी आलो,आणि आवरून जिम मध्ये गेलो.व्यायाम करत असताना माझ्या शेजारी माझा  मित्र trademill वर पळत असताना earplug लावून गाणी ऐकत असल्याचे मी पाहत होतो ,जिम झाल्यावर मी त्याला विचारले कि तुझ्या ipod वर तू किती गाणी टाकली आहेस आणि किती बसतात ? मोठ्या अभिमानाने त्याने Ipod माझ्या हातात ठेवला,मला म्हणाला कि 'सध्या २०० गाणी आहेत आणि अजून हजार दीड हजार सहज बसतील.मी चांगली, नवीन selected गाणी टाकली आहेत'.मी हसलो आणि त्याला विचारले कि 'अरे म्हणजे तुला कुठली गाणी लागणार आहेत हे माहित असणार' ? तो यावर म्हणाला  'म्हणजे काय...मीच तर टाकली आहेत...सगळी आवडीची आहेत रे..' मी हसलो..त्याला ipod परत केला..आणि घरी मार्गस्थ झालो...अर्थात मी त्याच्यावर हसलो  नव्हतोच...
         रात्री अंथरुणावर आल्यावर दुपारचा आणि संध्याकाळचा प्रसंग एखाद्या डासासारखा माझ्याभोवती गुणगुणत आला.मी सहज दुपारचा प्रसंग आणि संध्याकाळचा प्रसंग compare केला होता..
         दुपारी मी FM ऐकत होतो.तेव्हा मला अजिबात कल्पना नसायची कि पुढचे गाणे कोणते आहे.फक्त ऐकत राहणे हे एकच काम होते.. दुपारचे ३ तास मी वेगळ्याच विश्वात होतो हे सांगायचे मुख्य कारण हेच होते.गाण्याची आवड निवड हा वेगळाच मुद्दा आहे.पण आठवणीतील गाणी हि गोष्ट मात्र सगळ्यांना नक्कीच  लागू होते.भले ती आठवण चांगली असो किवा वाईट.असे बरेच प्रसंग एखाद्या गाण्यामुळे आयुष्यभर कायम लक्षात राहतात.काही अशी गाणी आहेत जी अचानक कानावर आली कि आपल्याला एखाद्या जुन्या वेळेची आठवण होते.काही गाणी अशी असतात कि ती ऐकल्यावर अगदी तोच क्षण देखील आहे तसा आठवतो.'तू चीज बडी हे मस्त मस्त' हे गाणे मी ऐकलं आणि  'एक से बढकर एक' नावाचा गाण्यांचा कार्यक्रम जसाच्या तसा डोळ्यासमोर आला.आता तस पहायला गेला तर फार  काही विशेष कार्यक्रम नसेलही  कदाचित पण या ४ मिनिटाच्या गाण्याने संपूर्ण उजळणी करून दिली.हीच गत झाली 'हमसे हे मुकाबला' मधील 'मुकाबला' या  गाण्याची, हे गाणे ऐकले आणि थेट 'फिलिप्स Top 10' आठवले, कारण या गाण्याचे lyrics कधीच समजले नव्हते आणि तेव्हा या कार्यक्रमात खाली lyrics लिहून यायचे.त्यामुळे गाणे ऐकणे आणि पाहणे या पेक्षा Lyrics वाचणे हा कार्यक्रम असायचा. हे गाणे ऐकल्यावर पुन्हा भूतकाळात येऊन विसावलो होतो.
काही गाणी आणि प्रसंग याचा ताळमेळ काहीच नसतो पण त्यांचा संबंध का लागतो याचे कोडे उलगडत नाही पण ते गाणे ऐकले कि क्लिक करावे तसे आपण भूतकाळात त्या प्रसंगाच्या फोल्डर मध्ये येऊन पडतो एवढे मात्र नक्की.
      'स्वदेस' मधील "ये तारा वो तारा " हे गाणे मी आत्ता जरी ऐकले तरी मी त्या दिवाळीच्या दिवशी आम्ही japanese group भेटलो होतो हे मला का आठवते. आणि ते सुद्धा ठिकाण,वेळ,लोक यांच्या संपूर्ण तपशीलासाहित.रणरणत्या उन्हात देखील 'कहो न प्यार है' मधील ती दोन गाणी ऐकली कि  मी direct ' हिमालयातील पिंडारी' Glaciour वर जाऊन का पोहोचतो."चक दे इंडिया" चे Title song ऐकल्यावर भले आज भारत डावाने हरला असेल तरीही मी मात्र कोकणातील मित्राच्या घरी पाहिलेल्या आणि आपण जिंकलेल्या २०-२० विश्वकरंडकाच्या फायनलच्या आठवणीत का रमतो.
   या ५ मिनिटाच्या गाण्यात एवढी ताकद असते का या वर माझा अजूनही विश्वास बसत नाही.

         एखादे गाणे ऐकले कि मी direct मित्राच्या लग्नात जाऊन पोहोचतो.आणि लग्नात नाही बरका, लग्नाला जाताना केलेल्या बस च्या प्रवासात जाऊन पोहोचतो.आणि मग तो बस चा प्रवास,ते रूम वरचे राहणे,मित्राचे लग्न,लग्न असूनही हॉटेल मध्ये केलेले जेवण आणि परतीचा प्रवास या गोष्टी आपसूक माझ्या  डोळ्यासमोरून जाण्याची भूमिका न चुकता बजावतात.काही वेळेला तर एखादे गाणे आपल्याला एका विशिष्ट क्षणाची आठवण करून देतात म्हणजे ते गाणे ऐकले  कि मला फक्त, मी कुठे उभा होतो माझ्या समोर काय दिसत होते याचीच फक्त आठवण करून देते.म्हणजे मी ते गाणे ऐकले कि मी direct 'रानडे institute ' च्या  canteen मध्ये सगळ्यात उजवीकडच्या खुर्चीत बसलोय आणि समोर FC road झाडाच्या फांद्यांमधून दिसतोय एवढंच फक्त आठवते.
       एखादे गाणे मला कुठेही असलो तरी आमच्या नवीन गाडीच्या माझ्या पहिल्या राइड ची आठवण करून देते.म्हणजे भले मी रस्तावरून चालत असीन आणि मी ते गाणे ऐकले तर मला नकळत आमच्या गाडीतूनच जावे लागते.....किमान 5 मिनिटे तरी.
        भले मी आत्ता ५४ इंची ' home theater ' वर इंग्लिश सिनेमा पाहत आहे आणि अचानक कुठून तरी 'भोली भाली लडकी' हे गाणे मी ऐकले तर मी थेट ५४ वरून १४ इंची ' black n white ' टीव्हीवर जातो...टीव्ही वर असलेले मोट्ठे आवाजाचे बटन मला आवाज वाढविण्याची साद घालतात..आत्ताच्या हातातल्या रिमोट चे काय घेऊन बसलाय.
             बर प्रत्येक वेळी गाण्यामुळे जुन्या आणि छान आठवणींना उजाळा मिळेल असेही नाही.एखाद्या आनंदाच्या क्षणी मी ते गाणे ऐकले मी direct 'Dukes Nose ' च्या  ट्रेक ला गुडघा दुखावल्याने दोन मित्रांचा आधार घेऊन चालतोय याची आठवण करून देते.पण म्हणून ते गाणे ऐकूच नये असे मला कधीच वाटले नाहीये.कारण ती ५ मिनिटे मला तो संपूर्ण ट्रेक, तो पाऊस, तो ट्रेन प्रवास आणि तो लंगडत तुडवलेला लोणावळ्याचा रस्ता या गोष्टीनी न्हाऊ घालते.
         एखादे गाणे थेट दिवाळीच्या सुट्टीत केलेल्या किल्ल्यावर नेऊन सोडते.आता ते गाणे मी तेव्हा किल्ला करताना ऐकले होते कि काय हे मला आठवत नाही पण ते गाणे आत्ता कानावर आले कि मी थेट आमच्या galery मध्ये केलेल्या किल्ल्यावर जाऊन थांबतो.
          गाण्याचे lyrics या गोष्टीला कारणीभूत असेल..असेही नसावे कारण अहो इयत्ता ४ / ५ मध्ये 'उर्वशी' सारख्या गाण्याचे lyrics समजल्यामुळे लक्षात राहिले असे होणे किमान माझ्यासाठी तरी शक्य होते असे मला प्रामाणिक पणे वाटत नाही.पण अजूनही उर्वशी हे गाणे ऐकले कि मी मला आमच्या घरासमोरचा चिखलाने माखलेला  रस्ता आठवतो.कारण तिथे डांबरीकरण झाले नव्हते.पण आता हे गाणे आणि तो रस्ता याचा संबंध काय असेल याचा विचार करण्यापेक्षा 'आत्ताचा रस्ता तेव्हा असा दिसत होता होय' या आश्चर्याने त्या वेळेचा आनंद लुटतो.
         अश्या अनेक गोष्टी मला अनेक क्षणांची आणि प्रसंगांची  आठवण करून देतात.कदाचित मला जसे गाण्याबद्दल असे वाटते तसेच कदाचित सगळ्यांचे असेलही.याला कारण काय असेल हे शोधण्यात मला काडीमात्र रस नाहीये.पण आश्चर्य नक्की आहे.पण प्रत्येक कुतूहल उलगडून बघायची गरज असतेच असे नाही.
          आता रात्रीचे बरेच वाजून गेले होते...आणि मी या निष्कर्षावर पोहोचलो होतो कि ipod वर गाणी ऐकणे किव्वा FM वर गाणी ऐकणे यात फरक एवढंच आहे कि iPod मध्ये कोणती गाणी लागणार आहेत हे त्याला आधी माहित होते पण तसे FM चे होत नाही...आणि त्यामुळेच कदाचित अनपेक्षित लागलेल्या गाण्यामुळे भूतकाळात  जाण्याचा माझा आनंद जास्त होता..

           अर्थात यात कुठेही तुलना नाहीये.पण अचानक एखादे ऐकलेले गाणे आपल्याला भूतकाळातील एखाद्या ठराविक आठवणीवर नेऊन सोडते.म्हणजे ५ मिनिटाचे  गाणे आपल्या आयुष्यातील कित्त्येक आठवड्यांचा,महिन्यांचा आणि वर्षाचा देखील काळ एका क्षणात rewind करतात.

....आणि याच विचारात माझ्या झोपेने माझ्या डोक्यातील विचारांचा ताबा घेतला ...

कदाचित आयुष्याच्या पुस्तकात हि गाणी Bookmarkचे काम करतात कि काय असे मला नेहमी वाटते...

                                                                                                                                  हृषीकेश पांडकर
                                                                                                                                  ( ०७-०३-२०१२ )