हरण्याचं दुःख कोणाला होत नाही ? तो ही एखाद्या विश्वकरंडकाचा अंतिम सामना. दुःख आहेच. आपला संघ चांगला खेळाला नाही, मोक्याच्या क्षणी कच खाल्ली, फलंदाजांनी अपेक्षाभंग केला,झेल सुटले, हवामानाचा अंदाज कदाचित चुकला आणि अशी अनंत कारण देता येतील. पण या दुखापलीकडे देखील एक सुखावह गोष्ट आज जाणवली ती म्हणजे न्यूझीलंड सारख्या संघाचा मोठा विजय.
सय्यमी आणि सरळ कर्णधार केन विलियम्सनच्या संघाचा विजय हा आपल्या पराभवावर फुंकर मारणारा ठरला. २०१९ च्या विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात केवळ बाह्य नियमांचा फटका बसून एका मोठ्या स्वप्नपूर्तीपासून वंचित असलेला संघ तितक्याच जिद्दीने आणि जोमानं आज टेस्ट चॅम्पियनशिप मिरवतोय ही गोष्ट खूप सुसह्य वाटतीये.
जितका आनंद आपण जिंकल्यावर झाला असता तितकाच आनंद न्यूझीलंड जिंकल्यावर झाला अशातला भाग नाही पण तुल्यबळ संघ जिंकला आणि किंबहुन खऱ्या अर्थी वरचढ संघ जिंकला हे महत्वाच. याच जागी आपल्या विरुद्ध ऑस्ट्रेलिया किव्वा इंग्लंड जिंकले असते तर त्याचे कौतुक मला इतके नक्कीच वाटले नसते. पण २०१९ च्या फायनलची सल आज किवींनी भरून काढली याचा आनंद जास्त.
धावा,बळी, शतके या तांत्रिक गोष्टींचा विचार मी करतच नाहीये पण एक संघ म्हणून न्यूझीलंड जिंकले याचे समाधान आहे.कुठलाही गाजावाजा न करता फायनलला आलेला संघ. स्टार प्लेयर अशी बिरुदावली मिरवणारा एकही खेळाडू संघात नाही तरीही खेळाच्या तीनही अंगात मजबूत आयुध बाळगणारा संघ.
हातातोंडाशी आलेला यश केवळ नशिबात नसल्यामुळे हुलकावणी देऊन जातं आणि त्यात यत्किंचितही खचून न जाता त्याच अपयशातून भरारी घेत त्याच तोडीच्या स्पर्धेत विश्वविजेतेपद मिळवणे हा प्रवास नक्कीच सोपा नसणार.
आपल्या पराभवाची सल व्यक्त करत बसण्यापेक्षा समोरच्या संघाच्या जिद्दीचे कौतुक आणि विजयाच
अभिनंदनकरणे रास्त वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.पांढऱ्या स्वच्छ पोशाखातील अनभिषिक्त सम्राट आणि खऱ्या अर्थी सिकंदर ठरलेल्या विलियम्सन आणि त्याच्या सर्व वीरांचे मनापासून कौतुक आणि
अभिनंदन...
तेव्हा पराभव ओशाळला होता..आज विजयाला अभिमान वाटला असणार यात शंका नाही !!!
हृषिकेश पांडकर
२४.०६.२०२१