रंग बदलू गीरगीट
सरड्यासारखे रंग बदलणे ही म्हण जरी प्रचलित आणि वापरात असली तरी प्रत्यक्षात रंग बदलणारे सरडे पहायचा योग फारसा आला नाही. किळस वाटणे किव्वा घाबरणे यामुळे तसा दुर्लक्षित झालेला प्राणी अशी काहीशी याची ओळख.
सरड्यांमध्ये अनेक प्रकार असतात हे वयपरत्वे समजत गेले. वर असलेला फोटो आणि आपण बागेत किव्वा भोवताली बघतो तो सरडा यांच्यात फरक आहे. लिझर्ड आणि 'chameleon' हा तो फरक. फोटोत जो आहे तो chemeleon. दोन्ही प्राणी रंग बदलतात. पण हा chameleon मात्र आपल्या चकली सारख्या शेपटीमुळे लक्षात राहतो. निशाचर असल्याने दिवसा सहसा पहायला मिळत नाही.
अजून एक मजेशीर माहिती समजली ती म्हणजे सापाप्रमाणे हा प्राणी देखील कात टाकतो. मात्र साप जशी संपूर्ण आणि एकसंध कात टाकतो तशी हा टाकत नाही. याची कात तुकड्या तुकड्यात असते. असो , तर कात टाकणे आणि रंग बदलणे या दोन्ही गोष्टी या प्राण्याकडून माणसापर्यंत आल्या हे महत्वाचे.
रात्री झाडाच्या फांदीला आपल्या चारही पायांनी बिलगून बसलेला हा जीव शोधणं फारसं कठीण नाहीये करण त्याचा असलेला आकार आणि रंग. संथ गतीने डोळ्याचे बुबुळ फिरवणारा आणि भोवतालचा अंदाज घेऊन शेपटीची चकली करणारा छोटा जीव पहायला मजा येते.
'सरड्यासारखे रंग बदलणे' या म्हणीमुळे हा प्राणी जितका बदनाम झाला आहे प्रत्यक्षात तसं काहीच नाहीये. कारण सरड्याचे रंग बदलणे आणि त्या म्हणीतील रंग बदलणे या भावार्थात,उपयोगात कमालीचा फरक आहे.
लोकवस्ती पासून काहीस दूर जर रात्री फेरफटका मारणार असाल तर मध्यम उंचीच्या झाडावरील फांद्यांमध्ये नक्की लक्ष ठेवा. अनेकविध रंग धारण करणारा हा chameleon नक्की पहायला मिळेल.
हृषिकेश पांडकर
११.०३.२०२१
Chameleon | Bhigvan | March '21