शतकाला टाळया घेतं ते क्रिकेट असतंच... पण
निव्वळ २३ आणि ३९ धावा जमवून संबंध देशाची छाती अभिमानाने फुगवणार क्रिकेट जास्त लक्षात राहतं..
शाब्दिक चकमक,स्लेजिंग आणि मैदानावरील इतर गैरप्रकार हे क्रिकेट असतंच... पण
सगळ्या गोष्टींचा मारा समोरच्या संघाकडून होत असताना जिद्दीने आणि चित्त विचलित होऊ न देता थोपवून त्यावर मात करणारे क्रिकेट जास्त लक्षात राहत...
डावाने विजय,एकतर्फी विजय आणि निर्भेळ यश हे क्रिकेट असतंच...पण
जवळजवळ पराभव निश्चित असताना प्रतिस्पर्धी संघाचा भेदक मारा समर्थपणे थोपवून सामना वाचवणारे क्रिकेट जास्त लक्षात राहत..
कसोटीच्या शेवटच्या दिवशी आणि तेही ऑस्ट्रेलियामध्ये आपली गत काय होते हे सर्वश्रुत क्रिकेट असतेच.. पण
त्याच ऑस्ट्रेलियात, त्याच चौथ्या डावात आणि त्यांच्या भक्कम माऱ्या समोर तंबू ठोकून केलेली सामना वाचवणारी सय्यमी खेळी जास्त लक्षात राहाते..
ऑस्ट्रेलियात सामना चालू असताना सकाळी थोडे उशिरा उठलो की आपल्या संघाची असलेली दयनीय अवस्था हे क्रिकेट असतंच..पण
पण सकाळी उशिरा उठून सुद्धा सुस्थितीत असलेली फलंदाजी पाहणे हे क्रिकेट जास्त लक्षात राहत..
ऑस्ट्रेलियात ४०० धावांचा पाठलाग करत सामना वाचविण्याची स्वप्न पाहणेही जिथे दुरापास्त असते हे सवयीचे क्रिकेट होतेच... पण
दीड दिवस खेळून एक वेळ विजय मिळवण्याची स्वप्न बाळगून सुखरूप वाचविलेला सामना जास्त लक्षात राहतो..
अधिक धावा किव्वा बळी मिळवणारा सामनावीर होतो हे क्रिकेट नित्याचे आहेच...पण
यातील काहीही न करणारे देखील खऱ्या अर्थी सामनावीर ठरतात हे पाहणे जास्त लक्षात राहते..
आशिया बाहेर खेळताना मालिका वाचवावी किव्वा बरोबरीत काढावी याच्या तयारीने शेवटचा सामना खेळणे हे क्रिकेट नित्याचे...पण
कांगारुंच्या भूमीवर त्यांच्यावर ही वेळ आणत शेवटच्या सामन्यासाठी तयारी करणे हा क्षण जास्त लक्षात रहातो..
काही क्षण सवयीचे आणि नित्याचे असतात..पण
काही नकळत घडून जातात आणि कायमचे स्मरणात राहतात ..
- हृषिकेश पांडकर
११.०१.२०२१