Tuesday, April 7, 2020

अशी रविवार सकाळ

 

युद्ध इतके चालले नाही..पूर,भूकंप,ज्वालामुखीही कधी इतका टिकला नाही..

जिल्हा,शहर,देश सोडाहो...जगही यातून सुटले नाही..

जगाच्या नकाशावरील शंकरपाळीसारख्या भारतात तिळभर पुण्यातील माझी सकाळ काही वेगळीच होती..

रविवार सकाळ असून देखील रस्ते,मैदाने आणि हॉटेल मात्र तशीच निपचित नि बंद होती..

सहज डोक्यात विचार आला..आठवड्याचा आळस झटकायला पुण्याचा एक फेरफटका करावा..

काय म्हणतंय थंड,बंद आणि ठप्प पुणं याचा थोडा कानोसा घ्यावा..

दहा दिवसाची धूळ झटकून दुचाकीला दिला धक्का..

गर्दी,सिग्नल,हॉर्न आणि प्रदूषण यांच्या शिवायच पालथा घातला रस्ता अख्खा..

दगडूशेठ गणपती खिडकीतून सहज डोकावत होता..

हार तुऱ्यांच्या ओझ्यावाचून तो हि काहीसा निवांत होता..

मोकळा गाभारा कदाचित सुसह्य वाटत असावा त्याला..

'चल आता हा प्रश्न सोडवून दाखव' म्हणणाऱ्या आजोबांसारखा गालातल्या गालात हसत होता..

मंडई आज फक्त एक आठ पाकळ्यांची दगडी इमारत होती..

लोकमान्य आणि शारदा-गजानन सोडले तर बाकी निर्जीव हवेली होती..

इतके स्तब्ध असलेले खुद्द टिळकच आज तेवढे भाजीला आले होते..

ना प्रेमाने चार मिरच्या जास्त देणाऱ्या आजी..ना घासाघीस करणारे काका काकू होते..

अप्पा बळवंत चौक हा फक्त नावाला चौक उरला होता..

प्रभातचा सिनेमा तर लांबच..वीतभर पान आणि शिसपेन्सिल मिळायचा सुद्धा खोळंबा होता..

पुस्तक वह्यांचा गठ्ठयामागे लपलेली जोगेश्वरी ची नाजूक समयी तेवढी आज सहज दिसत होती..

या संकट समयी खांबीर असलेल्या फरासखान्याला बहुदा आशेची ऊब देत होती..

पेशव्यांचा गणपती, कसबा गणपती,लाल महाल अन शनिवारवाडा या अभूतपूर्व शांततेत गप्पांमध्ये रंगले...

सोन्याच्या नांगरापासून शाहिस्तेखानाच्या बोटांपर्यंत आणि अटकेपार लावलेल्या झेंड्यापासून ते सुंदर अशा मस्तानी पर्यंत चौघेही मनसोक्त दंगले...

बाजीरावांचा स्तब्ध अश्व आज पुन्हा धावत असलेला भासला..

या निशब्द शांततेतही समोरचा तिरंगा डौलाने फडकत हसला...

हजारो नागरिकांना रोज पाठीवरून वाहणाऱ्या PMT बसेस शिक्षा केल्यासारख्या खेटून उभ्या होत्या..

शेजारच्या वास्तूतील सरकारी लोकांच्या पुढल्या इशाऱ्याची जणू वाटच त्या पाहत होत्या..

झाशीची राणी आणि संभाजी महाराज घोड्यावरून हि शांतता अनुभवत होते..

अविरत वाहणाऱ्या संभाजी रस्त्याला आज एका वेगळ्याच रूपात निरखत होते..

त्या संभाजी बागेतल्या रणगाड्यालाही आज पटले असेल कदाचित...

सगळीच युद्ध रणगाडे,बंदुका आणि बॉम्बने जिंकता येत नसतात..

अशी धैर्य दाखवून पाळलेली शांतता आणि सय्यम देखील मोठी संकट परतवित असतात..

तरुणाईने ओथंबलेला फर्ग्युसन रस्ता निर्मनुष्य आणि ओस होता..

गुडलक,रुपाली,वैशाली यांना हसून वाकुल्या दाखवत होता..

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वास्तूची अवस्था याहून काही आगळी नव्हती..

प्लेग मधून सरल्यामुळे मात्र हि गोष्ट तिला तितकीशी नवखी नव्हती.

लक्ष्मी रस्त्यावरील स्तब्ध पुतळे या शांततेत आज हितगुज करताना दिसले..

मेन्स अवेन्यू मधले काही आज कासट मध्ये दिसले..

मानाचा चौथा गजानन आणि टुमदार मंदिरातला राम यांच्याशिवाय तुळशीबागेत कमालीचा शुकशुकाट होता..

तुळशीबागेत असलेला हा पुरुषांचा दबदबा न भूतो न भविष्यती असाच काहीसा होता..

चितळे बंधू,काका हलवाई यांच्या बंद कुलुपावरही आता धूळ जमली होती..

'इथलं गोडाचं संपल' असं वाटून आता मुंग्यांनीही रांग बदलली होती..

होळी थोडक्यात सुटली..गुढी पाडवा मात्र पुरता अडकला..

उघडण्याची आस लागलेल्या अक्षय तृतीयेचा धीर आता सुटत चालला...

पिवळे हेल्मेटविर,मोठ्या क्रेन यांच्या विना मेट्रोचे काम अगदीच ठप्प होते..

अर्धवट बांधकामाखाली सावलीला आज चिटपाखरूही नव्हते..

कधी होणार मेट्रो या प्रश्नाला तूर्तास तरी वाली नव्हता..

तो प्रश्न तसाच 'बटाटयाच्या चाळी सारखा' पुन्हा भिजत पडला होता..

सावरकर स्मारकातील विनायकांपासून ते कर्वे पुतळ्याच्या कर्व्यांपर्यंत सगळेच आज अचंबित होते..

'लॉकडाउन' चे पालन करणाऱ्या जनतेकडे अश्वारूढ छत्रपती अभिमानाने पाहत होते..

या सगळ्या शांततेत ससून,सह्याद्री,पूना आणि इतर वैद्यकीय सेवा मात्र अविरत चालू होत्या..

पोलीस,स्वछता कर्मचारी आणि जीवनावश्यक वस्तूंची काळजी घेणाऱ्या सर्वांसोबत खंबीरपणे किल्ला लढवत होत्या..

विद्येचे माहेरघर पालथे घालून मी हि शेवटी घरी परतलो..

न दिसणाऱ्या विषाणूची लीला पाहून क्षणभर काहीसा थबकलो..

सुसह्य असली तरी अशी रविवार सकाळ मला कदापिही भविष्यात नको..

जगाची विस्कटलेली घडी नीट बसून सगळं काही आलबेल व्हावं हीच आशा व्यक्त करतो..

हृषिकेश पांडकर

०७.०४.२०२०

स्टे इन.. स्टे सेफ..!!!