'फॅशन' आणि 'आर्ट' या दोन अभेद्य बुरुजांवर दिमाखात वसलेले पॅरिस शहर.सुबक रस्ते,जुन्या कोरीव इमारती,नाजूक देखणी घरे,स्थापत्यकलेचा अचंबा असलेली चर्च,शहराच्या मध्यात एका कुशीवर झोपलेल्या तरुणीसारखी बेमालूम वाहणारी सिन नदी,नदीच्या दुतर्फा असणारी विविध प्रेक्षणीय स्थळे, शहरात कुठेही उभे राहून लक्ष वेधणारा रुबाबदार आयफेल टॉवर.या आणि अशा अनेक आकर्षणांनी मढलेले पॅरिस शहर.
सिन नदीतून नावेतून जात असताना उलगडत जाणारे पॅरिस असो,बसच्या टपावर बसून रस्त्यावरून दिसणारे पॅरिस असो किव्वा शांतपणे रस्त्यावरून चालत असताना डोळ्यासमोर येत असलेले पॅरिस असो या तीनही गोष्टींनी आपापले सौन्दर्य वैयक्तिकरित्या जपलेले आहे याची प्रचिती कायम येत राहते.
याच सौन्दर्याचा मानबिंदू म्हणून ज्याची ओळख सांगितली जाते त्यातील एक म्हणजेच 'Notre-Dame' चर्च.सिन नदीवरच्या बेटावर वसवलेले हे चर्च.फ्रेंच गॉथिक स्थापत्यकलेचा स्वप्नवत नमुना.इयत्ता सातवीत असताना साठ पानी इतिहासाच्या पुस्तकातील 'युरोप अर्थक्रांती'च्या धड्यामध्यें 'युरोपातील स्थापत्यकला' या परिच्छेदाशेजारी असलेले मोट्ठ्या,नक्षीदार आणि रंगीत काचेचा फोटो कायम पाहायचो तो इथे प्रत्यक्षात आहे.
वरील फोटो हा सिन नदीमधून दिसणाऱ्या 'Notre-Dame' चा आहे.एका बाजूला मोनालिसाचे लुव्र म्युझियम आणि त्याला कर्ण रेषेत समोर असलेले हे 'Notre-Dame' चर्च.या बाजूने समोरचे मनोरे नीट दिसत पण सर्वात उंच असलेला हा निमुळता मनोरा व्यवस्थित दिसतो.या फोटोची आणि या जागेची आठवण झाली ती काहीश्या वाईट बातमीनेच.पर्वा इथेच मोठ्या प्रमाणात आग लागली आणि इमारतीचा हा निमुळता मनोरा ढासळला.पुढे याची डागडुजी व्यवस्थित होईल,मनोरा आकाशाला शह देत पुन्हा उभा राहील यात शंकाच नाही पण रंगाचा बेरंग करणारी गोष्ट मनाला चटका लावून जाते.
स्थापत्य सौन्दर्याच्या या खाणीला दृष्ट लागू नये म्हणून हा काळा ठिपका लागला असावा असे समजून हे शहर पूर्वस्थितीत येईलच.तुम्ही देखील या शहराला भेट देण्याची संधी मिळाल्यास या भव्य प्रार्थनालयाला अर्थात 'Notre-Dame' ला नक्की भेट द्या.काल परवाच्या घटनेचा मागमूस देखील तिथे शिल्लक नसेल आणि तितक्याच जोमाने आपली श्रीमंती मिरवायला पुन्हा पॅरिस सज्ज असेल आणि असावे हीच प्रामाणिक इच्छा.
हृषिकेश पांडकर
१९.०४.२०१९
Wish you a speedy recovery !
'Our Lady of Paris' - Notre-Dame Cathedral.