विविधतेत एकता अशी बिरुदावली
मिरवणाऱ्या आपल्या राष्ट्रात संस्कृती,परंपरा,कला,धर्म,भाषा इतकीच विविधता नक्कीच नाहीये.या
व्यतिरिक्तही भौगोलीक परिस्थिती,पर्जन्य,हवामान आणि त्यानुरूप बदलणारे वन्य आणि वनस्पती
जीवन यातही प्रचंड विविधता जाणवते.याच वैविध्यतेमुळे पर्यटनात स्थळांमध्ये आपला देश
अष्टपैलू ठरला आहे.आणि म्हणूनच कदाचित आपल्यापेक्षा वेगळे बाहेर काय पहायला मिळू शकेल
याचा विचार डोकावतो.अर्थात प्रत्येक देशात त्यांचे त्यांचे वैशिष्ट्य आहेच पण आपल्या
देशात असलेले हे सर्व प्रकारचे वैचित्र्य अचंबित करून सोडते.
मध्य आणि दक्षिणेकडील
जंगलांचे नमुने पाहून झाल्यावर देशाची एकच दिशा शिल्लक राहिली होती जिथल्या जंगलाचा
प्रत्यक्षदर्शी अनुभव मी कधीच घेतला नव्हता.आणि ती म्हणजे पूर्व.
६८व्या प्रजासत्ताक दिनाच्या
निमित्ताने आलेली सुट्टी पदरात पाडून या पूर्वेच्या जंगलात भटकंतीचा मुहूर्त लागला.तसे
पहायला गेले तर सुंदरबन हे सर्वात प्रसिद्ध असलेले पूर्वेचे जंगल.मात्र याच रांगेत
असलेले भितरकनिका हे तितकेसे अंगवळणी न पडलेले जंगल फिरावे हा सर्वप्रथम आलेला विचार.आणि
याच विचारातून पुढे आलेले नाव म्हणजे भितरकनिका राष्ट्रीय उद्यान.
भारताच्या पूर्वेला पसरलेल्या
अथांग बंगालच्या उपसागराला खेटलेल्या या जंगलात जाण्याचा हा पहिलाच अनुभव.वाघ नसला
म्हणून काय झाले असंख्य पक्षांच्या जाती,विविध उभयचर आणि सर्वात मुख्य म्हणजे जंगलाचा
सर्वात वेगळा प्रकार आणि तो म्हणजे खारफुटीचे जंगल.ज्याला इंग्रजी मध्ये 'मॅन्ग्रूव्ह'
या नावाने ओळखले जाते.सुंदरबन खालोखाल ज्याचा नंबर लागतो तेच हे खारफुटीचे जंगल.
सुट्ट्यांच्या तारखा,तिकिटांची
जमवाजमव,राहण्याची व्यवस्था या सगळ्यावर मात करून जेव्हा निघायचा दिवस येतो त्या क्षणासारखा
आनंद नाही.
पुणे-कोलकाता-भुवनेश्वर
असा प्रवास संपवून ओडिसा राज्यातील केंद्रपाडा गावात वसलेल्या या अभयारण्यात दाखल झालो.खाडीमध्ये
पसरलेले हे जंगल.निमुळत्या वाटेने घुसलेले समुद्राचे पाणी आणि त्यातून तयार झालेल्या
पाण्याच्या रुंद गल्ल्या आणि यातच दडलेले हे सुंदर वन्यजीवन म्हणजे भितरकनिका अभयारण्य.भितर
म्हणजे आतील भाग आणि कनिका म्हणजे सुंदर.ज्याचे अंतरंग सुंदर आहे असे हे भितरकनिका.आणि
अर्थातच नावाला तंतोतंत जागणारा अनुभव जंगल न्याहाळताना पदोपदी येत राहतो.
निळाशार असलेला समुद्र
जेव्हा खाडीरूपाने भूतलावर शिरतो तेव्हा त्याचा रंग बदलतो.मात्र तेच निळे आकाश आणि
गर्द हिरवळीने नटलेले दुतर्फा जंगल आपल्याला रहस्यमय ठिकाणी आणून सोडते.
जिप्सी ने जंगलात फिरणे
आता सर्वश्रुत आहेच.पण अशा ठिकाणी आणि तितक्याशा गाजावाजा न झालेल्या शांत आणि एकांतात
एका बोटीने फिरणे हा अनुभव खरंच अविस्मरणीय ठरतो.
कोणते प्राणी-पक्षी पहिले,झाडांची
माहिती,राहायचे ठिकाण याबाबत तांत्रिक आणि पुस्तकी माहिती देण्यापेक्षा आलेल्या अनुभवाचे
आणि वेगळेपणाचे वर्णन करायची संधी सुटू नये म्हणून हे लिहिण्याचा खटाटोप.
पहाटे सहाला उठून राहण्याच्या
ठिकाणापासून बोटीच्या बंधाऱ्यापर्यंत चालत येतानाचा अनुभव पण मजेशीर होता.कोकणाचा भास
व्हावा असे छोटेसे गाव.एकाच निमुळता रस्ता जो थेट पाण्याला आणून सोडतो.रस्त्याच्या
दुतर्फा असलेली झोपडीवजा उभारलेली आणि शेणाने सारवलेली टुमदार घरे.अंगणात बांधलेल्या
आणि नुकत्याच उठलेल्या शेळ्या.अनोळखी लोकांना पाहून आमच्यावर भुंकणारे गावातली कुत्री.पेटवलेले
बंब आणि त्याची साक्ष देत धुक्याशी स्पर्धा करणारा त्याचा धूर.त्यातूनच किंचितसा डोकावणारा
आणि तितकासा प्रखर नसलेला लोहगोल.
समुद्र इतका जवळ असूनही
थंडी वाजायची हि कदाचित माझी पहिलीच वेळ.एका खांद्यावर कॅमेरा आणि एक हात खिशात अशा
अवस्थेत चालत जाऊन बोटीवर बसलो.अथांग पसरलेले ते खाडीचे पात्र.दुतर्फा असलेली गर्द
आणि हिरवीगार झाडी.किनाऱ्यावर असलेला संपूर्ण दलदलयुक्त गाळ.भरती ओहोटी नुसार कमी जास्त
होणारे पाणी.पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या काही वनस्पती.मधूनच पाण्यातून आलेले
एखादे झाड.काही ठिकाणी धुकं पांघरलेले पाणी.आणि यात संथपणे हेलकावे खात निघणारी आमची
बोट.फक्त आमची बोट.
भारतात मिळणाऱ्या किंगफिशर
पक्षांच्या जातीमधील सर्वात जास्त प्रजाती येथे पहायला मिळतात आणि याचा प्रत्यय पहिल्या
अर्ध्यातासातच आला.पाण्यावर वाकलेल्या नाजूक फांदीवर बसणारे विविध किंगफिशर बघणे आणि
पक्षाला चाहूल लागून न देता बोटीवरून फोटो टिपणे याची सर दुसऱ्या कशालाही नाही.
काही क्षणातच धुकं विरळ
होत गेले आणि उन्हाची तिरीप थेट पाण्यावर विसावली.नुकतेच निघालेले ऊन आणि वातावरणात
आलेली ऊब याचा फायदा घेऊन पक्षांची हालचाल वाढली.यातच काही हरणे पाण्याअडून चरताना
दिसत होती.आणि मग रात्रभर पाण्यात बुडालेल्या खाऱ्या पाण्यातील मगरी आपले अजस्त्र शरीर
पाण्याबाहेरील चिखलात वाळत घालायला सुरुवात करतात.भारतातील लांबीने सर्वात मोठ्या असलेल्या
खाऱ्या पाण्यातील मगरी येथे पहायला मिळतात.यांची लांबी सुमारे वीस फुटापर्यंत असते.यांच्याच
बरोबरीने त्यांची पिल्ले देखील मोठ्या संख्येने पहायला मिळतात.
याच गोष्टी न्याहाळण्यात
सूर्य डोळ्यावर येत असतो.बोट तशीच संथ तरंगत असते.शांत आणि थंड वाटणारे पाणी आता चमकत
असते.मगाशी पानांवर विसावलेल्या दवबिंदूंचे आता सूर्यकिरणांमुळे मोती झालेले असतात.
एवढ्यातच एखाद्या पाण्यावर
आलेल्या झाडावर उन्ह अंगावर घ्यायला निश्चित पडलेला साप डोकावताना दिसतो.ऋतूंप्रमाणे
स्थित्यंतर करणारे पक्षी काही परत येणारे तर काही जाणारे डोळ्यासमोरून उडत असतात.गाळ
आणि पाणवनस्पतींमुळे पाणी निरभ्र नक्कीच नाहीये.त्यामुळे अंगावर येणार पाण्याचा गडद
रंग प्रत्येक वेळी गंभीर वाटत राहतो.
सूर्याकडे मान वर करून
पहायची वेळ होते तेव्हा पक्षांची सकाळ संपलेली असते.इतकावेळ चाललेला किलबिलाट ओसरू
लागतो.सकाळी असलेला गारवा नाहीसा होत असतो.सकाळची सफारी संपते ती दुपारच्या ओढीने.कारण
तरंगणाऱ्या बोटीवर उलगडणारी जंगलाची सकाळ आणि संध्याकाळ या दोन भिन्न गोष्टी असतात.
सकाळची सफारी उरकून मनसोक्त
फोटो काढून आम्ही बोटीतून उतरून पुन्हा त्याच गावातून चालत येत होतो.सकाळची लगबग उरकून
गाव आता स्थिरस्थावर होत होते.मगाशी लागलेले बंब आता नुसतेच धगधगत होते.
आमच्या त्या टुमदार घरात
परतलो.शेळीच्या दुधाचा आणि किंचित खारट असलेला पण वाफाळता चहा घेऊन घराबाहेर असलेला
त्याच खाऱ्या पाण्याच्या तळ्यावर खुर्च्या टाकून चहा घेण्यासारखा आनंद नव्हता..
त्यानंतर ओडिसी पद्धतीचे
जेवण,काहीशी आळसावलेली शांत दुपार,कॅमेरा चार्जिंगसाठी असलेला अट्टाहास, पाहायला मिळालेल्या
वन्यजीवांच्या प्रजातीवर झालेला उहापोह आणि यातच सकाळी भल्यापहाटे उठल्यामुळे येणाऱ्या
झोपेची सावली या गोष्टीत वेळ कसा निसटतो याचा अंदाजच येत नाही.तेवढ्यात दुपारच्या सफारीची
वेळ होते.
पुन्हा एकदा तो सफारीचा
क्षण आला मात्र यावेळी प्रहर संध्याकाळचा होता.पुन्हा तोच गावातला रस्ता पालथा घालून
आम्ही बोटीवर येऊन बसलो.दुपारचे तीन वाजत आले होते.जंगल तसे निपचित होते.पक्षांना अजून
जाग नव्हती.बोटीने किनारा सोडला.काही वेळातच जंगलाला जाग आली.कडक उन्हात फिरणारे शिकारी
पक्षी झाडाच्या उंच शेंड्यावर दिसत होते.कॅमेऱ्याची लेन्स जरी तोकडी पडली तरी प्रतिमा
साठवण्याचे काम डोळे चोख बजावत होते.पुन्हा तेच जंगल होते पण सूर्य यावेळी अस्ताला
जात होता.सकाळी दिसलेले सर्व पक्षी ठराविक अंतराने दर्शन देत होते.पाण्यातील पक्षांचा
समावेश अर्थातच सर्वात जास्त होते.बगळे,करकोचे,बदके झाडून सगळे हजेरी लावत होते.खारफुटीच्या
जंगलात आढळणारे पक्षी आणि प्राणी नशिबाच्या आलेखानुसार कमी जास्त दिसतात.पण पक्षांनी
आम्हाला निराश केले नाही एवढे मात्र नक्की.
दुपार संध्याकाळ मध्ये
बदलत होती.सूर्य झपाट्याने उतरणीला लागला होता.थंडीचे दिवस असल्यामुळे संध्याकाळची
सफारी जेमतेम दोन अडीच तासच होती.उन्हाची जागा थंड वाऱ्याने घेतली होती.पक्षांचे बाणाच्या
आकारात उडणारे थवे माघारी परतताना दिसत होते.सकाळी पहुडलेल्या मगरी खोल पाण्यात नाहीश्या
झाल्या होत्या.
अंधार पडायच्या आत आम्ही
किनाऱ्याला लागलो.नावाड्याने बोट लाकडी ओंडक्याला बांधली आणि आम्ही उतरलो.आता थंडी
जाणवत होती.गर्द झाडीमुळे सभोवताल काळवंडला होता.मगाशी चालू असलेली पक्षांची लगबग आता
नाहीशी झाली होती.गावातला तो रस्ता देखील आता शांत होता.दिवेलागणीच्या खुणा दिसत होता.सहाच्या
आसपासच वाजले होते पण गावाला अंधाराने कवेत घेतले होते.आम्ही राहायच्या ठिकाणी पोहोचलो.
नवीन पहिल्याच आनंद होताच
पण त्याबरोबर नवल देखील तितकेच होते.इतर जंगलांच्या तुलनेत तसूभरही हे जंगल मागे राहिलेले
नव्हते.आणि भारताच्या पूर्वीचे जंगलाने माझ्या मनातली जागा कायमची पक्की केली.
थोडे आडवाटेला असल्याने
तितकेसे प्रकाशझोतात न आलेले जंगल नक्कीच आहे. मात्र निसर्गाने वरदहस्त ठेवताना कुठेच
आखडता हात घेतलेला नाहीये.पुन्हा एकदा तेच सांगावेसे वाटते कि संधी मिळाल्यास नक्की
भेट द्या.खाऱ्या पाण्यावर फुललेल्या या हिरवळीवर नांदणाऱ्या जीवसृष्टीचा हेवा वाटल्याखेरीज
राहणार नाही.'पश्चिम घाट' आणि 'मलाबार' यांच्या सौन्दर्याला खांद्याला खांदा लावून
उभा असलेला हा पूर्वीचे समुद्रकिनारा डोळ्याचे पारणे फेडतो.
हृषिकेश पांडकर
३०/०१/२०१८