Sunday, September 10, 2017

पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव

 

बुद्धीचा अधिपती मार्गस्थ होऊन आठवडा उलटतोय.परंपरा,कला,संस्कृती,मान,प्रतिष्ठा,दांडगा इतिहास,विद्येचे माहेरघर,पेशव्यांचा गणपती,छत्रपतींचा मानाचा गणपती,नवसाचा गणपती,श्रीमंत गणपती,ढोल ताशे,पौराणिक देखावे,ऐतिहासिक देखावे,अभूतपूर्व मिरवणूक,दहा दिवसांचा दिवसांचा सोहळा,प्राणप्रतिष्ठा,'श्रीं'चे विसर्जन या शाब्दिक अभूषणांच्या ओझ्याखाली मोडकळीस आलेला पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव.पुण्यातले गणपती आवडायला लागल्यापासूनची जवळपास सगळीच वर्षे नियमाने या दहा दिवसात पुण्यातले रस्ते झिजवणावर प्रत्येक पुणेकर याला सहमत असेल किव्वा असायला हरकत नाही.


 

ज्याचा अभिमान बाळगावा अश्या लक्ष्मी रस्त्याच्या मिरवणुकीला नाकारणारा आणि त्याच अनंत चतुर्दशीच्या सलग सुट्ट्या पदरात पाडून पुणे सोडणाऱ्या पुणेकरांची वाढती संख्या हे कमी होणाऱ्या उत्साहाचे चोख प्रतिक आहे.

पप्पी देणाऱ्या पारूला, सोतावर भरोसा नसलेल्या सोनूला आणि फक्त विसर्जनाला येणाऱ्या बाबुराववर नियंत्रण करणाऱ्या संपूर्ण पोलीस व्यवस्थेची होणारी ओढाताण खरंच योग्य आहे का ? आठवडा भर आधी आणि पंधरा दिवस नंतर तितक्याच अभिमानाने रस्त्यात उभे ठाकलेले मांडव; मेट्रो तर सोडाच पण किमान चालणाऱ्या माणसाला तरी सुसह्य आहेत का ?

दहा दिवस भेटायला आलेला विघ्नहर्ता ठरलेल्या सुट्टीसाठीच आलेला असतो.त्याला अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्यादिवशी देखील नाचवत ठेवणे तितकेसे योग्य आहे का ? लांबलेल्या मिरवणूका अजून किती वर्ष भूषण म्हणून मिरवायचा आहेत ? पुण्याजवळील उपनगरात काही मोठी मंडळे आदल्या दिवशीच आपल्या गणपतीचे विसर्जन करून घेतात म्हणजे शेवटच्या दिवशी पुण्याच्या मिरवणूका पहायला मिळतील.म्हणजे मूळ श्रद्धेचा भाग बाजूलाच राहिला नाही का ? नाही म्हणजे मर्जीनुसारच प्रतिष्ठापना आणि विसर्जन करणार असाल तर वर्षातील कुठलेही दिवस निवडू शकता ना ? त्यात शास्त्र किव्वा पंचांग पाहिले पाहिजेच अशी कुठे सक्ती नाहीये.उन्हाळ्याची तशीही सलग सुट्टी मिळत असेल तर हे काम उरकून घ्यायला तशी हरकत नाहीये.मुख्य म्हणजे गजाननाचे विसर्जन वाजत-गाजत करायचे असते.आपल्याला नाचायला मिळावे म्हणून तात्पुरती मूर्ती ट्रक वर बसवून आणि स्पीकरच्या भिंतीसमोर अंगविक्षेप करणे हा मिरवणुकीचा हेतू कधीच नव्हता.

विसर्जनानंतर लंबोदराच्या मुर्त्यांची होणारी दुर्दशा डोळ्यासमोर असूनही त्याला अजून योग्य उत्तर आपल्याकडे नाहीये.दहा दिवस सोने,चांदी,हार,तुरे,दुर्वा,नारळ,फळे आणि फुलांनी सजलेला बाप्पा नदीच्या पुलावरून आपण थेट भिरकावतो ? न विरघळलेल्या मुर्त्यांची भग्नावशेष दयानिय अवस्था हीच आपल्या भक्तीची साक्ष आहे ?

लोकमान्यांचा 'केसरीवाडा' प्रथम कि भाऊसाहेबांचा 'रंगारी' प्रथम हा मानाचा वाद कुठल्या राजकारणातून होतोय याच्या खोलात न जाणेच इष्ट पण या दोनही व्यक्तींच्या मूळ हेतूला अलगद बाजूला ठेऊन हा पुण्याचा तथाकथित सार्वजनिक उत्सव वर्षांच्या आकड्यात स्पर्धा करतोय या सारखी खेदाची बाब नाही.

पुण्याचे प्रसिद्ध गणपती देखावे किव्वा मिरवणूक पहायला पुण्याबाहेरील हजारो लोक येतात हि नक्कीच आनंदाची बाब आहे पण 'शिस्तीचा अभाव' या एका शीर्षकाखाली हे लोक आपल्या पाऊलखुणा सोडून जातात.आणि जितके बाहेरचे तितकेच पुण्यातील नागरिकही याला जबाबदार आहेत.कारण स्वच्छता,शिस्त,सामाजिक भान यांचा दुष्काळ हल्ली सार्वत्रिक आहे.

मंडळांची वाढती संख्या आणि पर्यायाने वाढती दादागिरी यातून सरळसरळ होणारा राजकीय हस्तक्षेप आणि मंगल सणाला लागणारे अमंगल गालबोट तितकेसे सुखावह नक्कीच नाहीये.

शिक्षणानिमित्त,नोकरीनिमित्त किव्वा इतर कुठल्याही कारणांमुळे देशाबाहेर असलेल्या पुणेकरांचे फेसबुक अकाउंट 'मिसिंग बाप्पा,मिसिंग फन,मिसिंग मिरवणूक,मिसिंग ढोल-ताशे अशा आशयाच्या अनंत पोस्ट,स्टेटसने वहात असते.पण तिथे राहून मिळालेले फोटो किव्वा व्हिडीओ परत टाकून इथल्या प्रत्यक्ष परिस्थितीची कल्पना येणे दुरापास्तच आहे.

बरं हि परिस्थिती दहा दिवसासाठीच असते एवढं सहन करायला काय हरकत आहे असे लांब राहून म्हणणे अतिशय सोपे आहे पण इथे राहून अनुभवणे हा खरंच कष्टप्रद अनुभव आहे.

सांगायचा मुद्दा इतकाच कि सणाचे मांगल्य आणि पावित्र्य कुठेतरी हरवत चाललंय.सार्वजनिक या शब्दाचा पुन्हा नव्याने विचार करण्याची गरज निर्माण झालीये.सण हा सणासारखाच साजरा व्हावा त्यात अतिरेक किव्वा स्पर्धा आली की चित्र बदलायला वेळ लागत नाही.पुण्याचा गणेशोत्सव सध्या अशाच काहीश्या फेऱ्यातून चालला आहे.एक निर्मळ भक्त आणि सुजाण नागरिक या नात्याने या गोष्टींचा फेरविचार होणे हि काळाची गरज आहेच.

आपल सोडा हो पण ज्या ओढीने तो सिद्धिविनायक इथे मुक्कामी येतो किमान त्याचा तरी आदर करूयात.'पुढच्या वर्षी लवकर या' च्या मागणीला आपण योग्य न्याय देतोय का एवढा फक्त विचार तरी करून पाहुयात... नाही का ?

- हृषिकेश पांडकर