Wednesday, January 4, 2017

कलात्मक कोपेश्वर



नावारूपाला आलेली ठिकाणे प्रेक्षणीय स्थळे म्हणून पाहण्यास आपण कायमच उत्सुक असतो.गतवर्षाचा शेवट किव्वा नववर्षाची सुरुवात साजरी करण्याच्या हेतूने अनेक जण अशा विविध ठिकाणांना भेट देत असतातच.पण यंदा हा धोपट मार्ग सोडून थोडा वेगळा विचार डोक्यात आला.'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटातील 'शिव भोला भंडारी' या गाण्याच्या निमित्ताने ते शिवमंदिर पडद्यावर पाहण्याचा योग्य आला आणि तेव्हाच इथे जाऊन यायचे पक्के झाले.सिनेमाचे छायाचित्रण झाल्याने हे मंदिर देखील प्रकाशझोतात येईल असे वाटले होते पण वास्तविकता थोडी वेगळी आहे.

कोल्हापूर पासून साधारण साठ किलोमीटरवर खिद्रापूर नावाचे छोटेसे गाव आहे.अर्थात हे गाव माहित असण्याचे तसे फारसे कारण नाहीये. पण पुढे येथेच असलेल्या प्राचीन शिव मंदिरामुळे नक्की नावारूपास येईल याची खात्री आता बाळगायला हरकत नाही.तर प्रसिद्ध असलेल्या नरसोबाच्या वाडीपासून जेमतेम वीस किलोमीटरवर स्थित असलेले हे खिद्रापूर गाव आणि त्यात वसलेले हे शिव मंदिर.

रात्री कोल्हापूरला मुक्काम करून पहाटे पाच वाजता मंदिराकडे निघालो.डिसेंबर अखेर असल्याने रस्त्यावरील दिवे वगळता मिट्ट काळोख होता.हायवे सोडल्यानंतर गावाकडे जाणारा रस्ता तास साधारणच आहे पण व्यवस्थित आहे.दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही खिद्रापूर गावात येऊन पोहोचलो.सूर्योदयाला अवकाशच होता पण गावाला तशी जाग आली होती.गुरं हाकणाऱ्या बाईंना 'मावशी कोपेश्वर मंदिर कुठे आलं' असे विचारल्यावर 'ते काय पलीकडे गावाच्या चावडी शेजारी' असे सहज उत्तर मिळाले आणि मावशी निमूट चालत्या झाल्या.पुढे दुसऱ्याच मिनिटाला मंदिराच्या जवळ येऊन पोहोचलो.गाडी लावली.फक्त आमचीच गाडी होती.तांबडं फुटायला लागलं होतं.आम्ही मंदिराकडे निघालो.

एखाद्या जुन्या वाड्यात प्रवेश करावा तसे ते दोन फळकुटांचे दार होते.दार ढकलून आत गेलो.सूर्याने डोकावले नव्हते पण फटफटल्याची चिन्ह स्पष्ट दिसत होती.उंबरा ओलांडून आत प्रवेश केला आणि पहाटेचं धुकं आणि उजाडण्याच्या बेतात असलेला सूर्यप्रकाश यांच्या मिश्रणाने तयार झालेल्या रंगात समोरच्या शिवमंदिराचे रूप पाहून आम्ही अचंबित झालो.दारामधून प्रत्यक्ष मंदिर दृष्टीक्षेपात येत नाही पण पुढचे दोन तास आपण काय अनुभवणार आहोत याची प्रचिती दुसऱ्या मिनिटाला आली होती.संपूर्ण सूर्योदय होण्यापूर्वी मंदिराला एक चक्कर मारून घेतली आणि सूर्योदयाची वाट बघत कॅमेरा तयार करत बसलो.



काही मिनिटातच सूर्योदय झाला.मंदिराने आपले रूप स्पष्ट केले.इतके दिवस अशी कलाकृती नावारूपाला येऊ शकली नाही याचे आश्चर्य वाटत होते.कॅमेरा लटकावून मंदिर बघायला सुरुवात केली.
या आधी अनेक शिव मंदिरे पहिले आहेत पण बहुदा हे एकमेव शिवमंदिर असेल जिथे गाभाऱ्यामध्ये विष्णूचे पिंडरूपी दर्शन आधी घडते आणि मग उत्तरमुखी कोपलेल्या शिवाचे दर्शन होते.येथे अजून एक दुर्लभ गोष्ट पहायला मिळते ते म्हणजे शिवमंदिरात नंदीचे दर्शन हे अध्याहृतच आहे.मात्र या मंदिरात कोठेही नंदी पहायला मिळत नाही.याचा पौराणिक खुलासा पुढे केलेलाच आहे.

कोपेश्वर मंदिर सातव्या शतकात बांधले गेले आहे.चालुक्य राजांच्या अमलाखाली याची उभारणी झाली.पुढे अकराव्या आणि बाराव्या शतकात सिलहारी राजे गंदरादित्य,विजयादित्य आणि राजा भोज यांच्या कारकिर्दीत मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले.दुर्दैवाने मुघल सरदारांच्या दक्षिण मोहिमेत मंदिराची मोठ्याप्रमाणात हानी झाली.मंदिराचे स्थापत्य बऱ्यापैकी हळेबीड आणि बेलूर यांच्याशी मिळते जुळते आहे.



मंदिराला पौराणिक पार्श्वभूमी आहे.दक्ष राजाला सोळा मुली होत्या,त्यात सर्वात लहान मुलगी म्हणजे सती.दक्ष प्रजापती हे सतीचे म्हणजेच शंकराच्या पत्नीचे वडील,शंकराचे सासरे.दक्ष राजा पुत्रकामेष्टी यज्ञ करतो त्यावेळेस शंकर आणि दाक्षायणी ( सती ) ला  आमंत्रित करीत नाही.मात्र माहेरी जाण्याच्या हट्टापायी सती नंदीला घेऊन तिच्या वडिलांकडे यज्ञासाठी जाते.शंकर मानी असल्याने आमंत्रणा शिवाय तिथे जात नाही.सती तिथे गेल्यावर दक्ष राजा सर्वांसमोर तिचा अपमान करतो आणि तिला हाकलून लावतो.मात्र हा अपमान सहन न झाल्यामुळे ती तिथल्याच अग्निकुंडात उडी घेते.हि माहिती समजल्यावर शंकराचा राग (कोप) अनावर होतो.त्यानंतर शंकर वीरभद्राला पुत्रकामेष्टी यज्ञाचा विध्वंस करण्याचे आवाहन करतो.हा राग शांत करण्यासाठी साक्षात विष्णू शिवाला घेऊन खिद्रापूरला येतात.शंकरानी क्रोधाने आपल्या जटा भूमीवर आदळून इथे क्रोध प्रकट केला आणि म्हणूनच या मंदिराचे नाव कोपेश्वर (चिडलेला देव) असे आहे.तसेच येथे विष्णूची पिंड देखील आहे.म्हणूनच कोपेश्वर आणि धोपेश्वर ( विष्णू ) आणि सती वडिलांकडे जाताना सोबत नंदीला घेऊन जाते त्यामुळे कोपेश्वर मंदिरात नंदी देखील नाहीये.

आता मंदिराविषयी थोडेसे,

          मंदिर एकूण चार भागात विभागले गेले आहे.मात्र चारही भाग आतून जोडले गेलेले आहेत.हेच मंदिराचे चार भाग म्हणजे स्वर्गमंडप,सभामंडप किव्वा रंगशीला,अंतरा (अंतराळ गृह ) आणि गाभारा.

मंदिराच्या मुख्य दारातून प्रवेश केल्यावर डोळ्यासमोर येतो तो म्हणजे स्वर्गमंडप.मंदिराला एकूण एकशे सव्वीस खांब आहेत.त्यातील अट्ठेचाळीस खांब हे स्वर्गमंडपात आहेत.स्वर्गमंडप हा अट्ठेचाळीस गोलाकार आणि कोरीव दगडी खांबांवर उभारलेला आहे.तीन समकेंद्री पण भिन्न परिघाच्या वर्तुळावर हे खांब उभारले आहेत.त्यातील एका वर्तुळात बारा,दुसऱ्या वर्तुळात सोळा आणि तिसऱ्या वार्तिलावर बारा खांब उभे केले आहेत.उरलेले आठ खांब हे स्वर्गमंडपाच्या चारही दारात उभारले आहेत.अट्ठेचाळीस खांबांमधील प्रत्येक खांब हा वैविध्यतेने कोरलेला असून,खांबाचा आकार गोल,चौकोन,षट्कोनी किव्वा पंचकोन अशा विविध आकारात आहे.



स्वर्गमंडपाची अजून एक खासियत म्हणजे मंडपाचे छत हे गोलाकार असून त्यातील तेरा फूट त्रिज्येचे वर्तुळ हे उघडेच आहे.ज्यातून थेट आकाश दिसते.आणि बरोबर त्या खाली तेरा फूट त्रिज्येचा गोल दगड बसवण्यात आला आहे.जिथे यज्ञ किव्वा पूजा होत असत.खाली असलेल्या दगडावर उभे राहून वर पहिले असता बरोबर मध्यभागी असलेल्या गोलाकार खिडकीतून थेट आकाश दिसते.छताचा एकही भाग कोरीव कामाशिवाय सुटलेला नाही.वर्षातील ठराविक पौर्णिमेला चंद्र बरोब्बर त्या वर्तुळाच्या मध्यभागी येतो आणि त्याचे प्रतिबिंब त्या दगडी वर्तुळावर पडते हे दृश्य नक्कीच विलोभनीय असणार यात शंका नाही.




मंदिराचा दुसरा भाग म्हणजे सभामंडप किव्वा रंगशीला.सभामंडप हा आयताकृती आहे.हीच भूमिती अबाधित ठेवण्यासाठी इथे असलेले सगळे साठ खांब हे त्याच आयतामध्ये व्यवस्थित ओळीत उभारलेले आहेत.पहिल्या ओळीत बारा,दुसऱ्या ओळीत वीस आणि उरलेले खांब हे भिंतींशी संलग्न उभारलेले आहेत.या मंडपातील सगळे खांब आयाताकृतीच आहेत.




प्रत्येक खांबावर विलक्षण कोरीव कामाचे नमुने आहेत.कुठल्याही खांबावर एकच चित्र किव्वा नक्षी परत कोरलेली नाही.दक्षिणेचे अधिपती असलेले विष्णू,हरणावर स्वर झालेला वायू,बोकडावर बसलेला अग्नी,हत्तीवर बसलेले इंद्र,रेड्यावर बसलेला यम आणि मोरावर बसलेले कार्तिकेय यांची त्या खांबांवर कोरलेली शिल्प लक्ष वेधून घेतात.मंदिराचे पूर्ण बांधकाम हे बेसॉल्ट खडकापासून झालेले आहे.मंदिर उभारायची पद्धत भिन्न स्वरूपाची होती.खांब एकमेकांना दुव्यांनी जोडले गेले त्यामध्ये नंतर माती भरली गेली आणि मग उभारणी पूर्ण झाल्यावर त्यातील माती काढून टाकण्यात आली.अशा पद्धतीने संपूर्ण मंदिर उभारले गेले आहे. सभामंडपाच्या चारही बाजूंना असलेल्या खिडक्यांवर जरबेराची फुले कोरलेली आहेत.खांबांवर असलेले चालुक्य राजांचे चिन्ह म्हणजे उलटा नाग आणि यादव साम्राज्याचे चिन्ह म्हणजे व्याल या गोष्टी अतिशय कलात्मक पद्धतीने कोलेल्या आहेत. ‘Cloning animal' या शास्त्राच्या आधारावर तोंड बैलाचे आणि देह वेगळ्याच जनावराचा किंवा तोंड रेड्याचे आणि देह वेगळ्याच प्राण्याचा असे संकरित प्राण्याची कोरीव शिल्प येथील खांबांवर बघायला मिळतात.



मुख्यदरवाजावर गणपतीचे शिल्प असून स्वर्ग मंडपाच्या दारात सरस्वतीचे शिल्प आहे.आतमध्ये गजलक्षमीचे कोरीव शिल्प दारावर रेखाटलेले आहे.खांबांवर कलात्मक कोरलेले यक्ष आणि किन्नर यांचे शिल्प लक्ष वेधून घेतात.मानवी कवटीपासून बनविलेले ( मानवी कवटीसारखे दिसणारे )मुकुट परिधान केलेल्या द्वारपालांचे कोरलेले शिल्प अचंबित करायला लावते.शंकराच्या द्वारपालांच्या मुकुटावर मानवी कवटीचे चित्र का या प्रश्नाचे उत्तर म्हणजे शंकर स्मशानात असतो म्हणून द्वारपालाला कवटीचे मुकुट.हातामध्ये पळी घेऊन उभी राहिलेली अन्नपूर्णा,रुद्राक्ष घातलेले नाथ,सर्प नियंत्रण करणारा गारुडी आणि विविध मैथुन शिल्प यांनी रंगशिलेतील सर्व खांब सजलेले आहेत.एका खांबावर बासरी वाजविणारा बाळकृष्ण,बलराम आणि पेंद्या या तिघांचा रेखीव मिलाप पहायला मिळतो.तसेच गरुडावर आरूढ झालेला सपत्नीक विष्णू कमालीचा भासतो.मार्गक्रमण करणाऱ्या हंस पक्षांची शिल्पे मन मोहित करतात.हरेराम हरेकृष्णच्या नामस्मरणात तल्लीन झालेल्या लोकांची मुद्रा शिल्पाद्वारे खांबांवर रेखाटलेली आहे.रंगाशीलेच्या नर्तकीची मुद्रा देखील पाहावयास मिळते.

खांबांवर आणि भिंतींवर रामायण आणि महाभारताच्या कथा कोरलेल्या आहेत.राम-रावणाच्या युद्धात बाण लागून जखमी झालेल्या लक्ष्मणाला मांडीवर घेऊन हनुमानाला संजीवनी बुटी आणायला पाठविण्याचा प्रसंग मोठ्या कल्पकतेने कोरलेला पहावयास मिळतो.बुद्धावतारातील मूर्ती,बालाजीची मूर्ती तसेच वाल्मिकी आणि कोदंडधारी रामाची सर्वांगसुंदर शिल्प येथे कोरलेली आढळतात.स्त्रिया न्हायल्यानंतर आपले ओले केस एका  बाजूला घेऊन चालतात त्या रूपातील स्त्रीचे शिल्प रेखाटलेले आहे.शंकर,पार्वती,ब्रह्मदेव आणि गंगा यांच्या कथांचे शिल्प देखील पहायला मिळते.



रामायण आणि महाभारताबरोबरच पंचतंत्रांच्या गोष्टी देखील कलात्मतेने कोरलेल्या आढळतात.मगर आणि माकडाच्या मैत्रीची गोष्ट तसेच बगळ्यांच्या तोंडातून उडणाऱ्या कासवाची गोष्ट सुरेख पद्धतीने कोरलेली आहे.तसेच सिहाच्या वधाचे शिल्प आकर्षित करून घेते.

याच बरोबर दुर्गा,कालीमाता,महिषासुरमर्दिनी यांसारख्या देवींची शिल्पे कोरलेली आढळतात.रंगशिलेमध्ये गणपतीला कोनशीला बसवून पूजा केली गेली आणि तिथूनच मंदिराचे बांधकाम सुरु केले गेले अशी माहिती सांगण्यात येते.रंगशाळेतील एका खांबाच्या पायाला गणपती बसविला आहे.

मंदिराचा तिसरा भाग म्हणजे अंतरा (अंतराळ) या मध्ये तसा बऱ्यापैकी काळोख आहे.छोटासा चौकोनी आवारासारखी हि जागा असून याच्या संपूर्ण भिंतीवर विविध शिल्प साकारलेली आहेत.अंतराळगृहाच्या प्रवेशद्वारापाशी आठ फूट उंचीचे द्वारपाल साकारले आहेत.द्वारपाल आभूषणांनी नखशिखान्त नटलेले आहेत.




मंदिराचा शेवटचा आणि मुख्य भाग म्हणजे गाभारा.इथे विष्णू ची पिंड आणि शेजारी शिवलिंग पहायला मिळते.मिणमिणता तेलाचा दिवा सोडल्यास प्रकाशाचा स्रोत येथे नाही.घुमणारा आवाज आणि गाभाऱ्यात येणार ठराविक वास गंभीर वातावरणाची जाण करून देतो.गाभार्याच्या भोवताली भिंतीलगतच्या खांबांना खेटून अठरा तरुणी पूजा साहित्य घेऊन उभ्या आहेत.पायाखालील फरशीवर शंख व फुलवेलीची नक्षी आहे.भव्यतेने भरलेल्या या दरवाजातूनच प्रथम धोपेश्वर दिसतो व नंतर त्यामागील कोपेश्वराचे दर्शन होते.कोपेश्वराच्या शाळुंखेला अंगभूत जावे आहे.

मंदिराच्या बाहेरूल बाजूस डोळे दिपविणारी कलाकृती आहे.संपूर्ण मंदिर हे शहाण्णव हत्तीवर उभे आहे.यातील प्रत्येक हत्तीच्या दागिन्यांची नक्षी वेगळी आहे.दुर्दैवाने या हत्तीचे बरेचसे नुकसान झालेले आढळते.याचबरोबर मंदिराच्या बाह्यांगावर पठाणी व्यक्ती,कुबेराची शिल्पे,अगस्ती मुनी आणि आदिमानव इत्यादी प्रतिमा कोरलेल्या आहेत.हातात चिपळ्या धरलेले किन्नर,विष्णू,गायत्री,तसेच वीरभद्राचे शिल्प असे नानाविध सुंदर शिल्प येथे कोरलेली आढळतात.दक्षाच्या यज्ञाचा नायनाट करण्यासाठी गेलेल्या वीरभद्राने छाटलेले दक्षाचे मुंडके घेऊन उभे राहिलेले शिल्प अत्यंत कोरीव आणि देखणे आहे.सहाव्या शतकात देखील पेशवेकालीन पगडीतील कोरलेल्या व्यक्ती अचंबित करतात.



मंदिराला असलेल्या झरोक्याची फुले हि सगळी वेगळ्या जातीची असून प्रत्येक फुलाचे कोरीवकाम विलोभनीय आहे.स्वर्गीय नर्तिकेचे कोरीव शिल्प पाहताना रंगशय्येतील नर्तकी आठवते मात्र या दोन्ही कलाकृतींमध्ये भिन्नता आहे याची मी खात्री करून घेतली.मंदिराच्या बाह्यभिंतीवर कोरलेल्या शिलालेखात मंदिर कोणी बांधले याचे काही अवशेष पहायला मिळतात.कुठल्याश्या कार्यक्रमाची निघालेली वरात मोठ्या कल्पकतेने कोरलेली दिसते.लखूलीची मुद्रा कोरलेली आहे.बौद्ध मुनी,गण,विषकन्या,टाळ वाजवणारे लोक यांची कोरलेली शिल्प चित्त खिळवून ठेवतात.भविष्य सांगणारा ब्राह्मण,विष्णूचा वामन अवतार असलेले बटु,तल्लीन होऊन गाणारी स्त्री गायिका यांची शिल्पे आश्चर्यकारक आहेत.त्या काळातही 'High heels' परिधान केलेल्या स्त्रियांचे शिल्प अनाकलनीय भासते.दुःशासन आणि द्रौपदीचा भर दरबारातील प्रसंग मोठ्या शिताफीने कोरलेला आहे.राम लक्ष्मण आणि सीता यांचे वनवासातील दृश्य,आळसावलेली स्त्री,गजारूढ इंद्र,एडक्यावर स्वार झालेला अग्नी हि शिल्पे भारतीय पौराणिक संस्कृतीचे दर्शन घडवतात.धन्वंतरी,पुत्र वल्लरी आणि पुत्रवल्लव तसेच सुरसुंदरी यांची शिल्पे मंदिराच्या बाह्य भिंतींवर रेखाटलेली आहेत.राजस्थानी बंजारन,नदीवरून निघालेली वरात,कीर्तिमुख आणि रेड्यावरचा यम यासारखं  कोरीव शिल्प मन मोहून टाकतात.



हातात धनुष्य आणि भात्यात असलेले पाच बाण यावरून कामदेव आणि रती ओळखता येतात हे मला त्या शिल्पाने शिकवले.स्त्रीची साडी ओढणारे माकड आणि त्याच पुढे स्त्रीची साडी ओढणारा कुत्रा या दोन मर्कट लीलांचे शिल्प मोठ्या खुबीने साकारलेले आहे.शनी देव,तसेच अर्धा भाग शंकर आणि अर्धा देह पार्वती असे कोरीव शिल्प पाहून नवल वाटते.एका हातात साप,मुंडके आणि कलश धरलेला भैरव,वरावतार,कूर्मावतार यांचे कोरीव काम बघून वेड लागते.



काही शिल्प हि इतक्या आतील बाजूस कोरलेली आहेत कि त्यांची मूळ लकाकी अजून बऱ्यापैकी अबाधित आहे.ती बघून आपण पूर्वीच्या सौन्दर्याचा अंदाज नक्की लावू शकतो.खऱ्या अर्थाने काळा बेसॉल्ट आपल्याला पहायला मिळतो.

मंदिराच्या उजव्या बाहेरील बाजूस पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचे शिल्प,तसेच पत्राचे लिखाण मध्यंतरावर आलेले शिल्प आणि त्याच पत्राखाली स्वाक्षरी करणारे शिल्प मोठ्या कलात्मक पद्धतीने कोरलेले आहे.या व्यतिरिक्त इराणी,चायनीज,अरेबिक लोकांची शिल्प लक्ष वेधून घेतात.त्यांच्या लांब दाढ्या आणि पिळदार मिश्या अतिशय हुशारीने रेखाटल्या आहेत.



महाकालीचे शिल्प,तसेच मंदिराच्या डाव्या बाजूला असलेले मगरमुखातून येणारे पाणी,अश्वारूढ असलेले कल्की,दर्पसुंदरी आणि पृथ्वी वराह यासारखी शिल्पे अविश्वसनीय आहेत.रामाने रावणाला शेवटचा बाण मारला  त्यावेळची रामाची मुद्रा खुबीने कोरलेली पाहण्यास मिळते.रामाने दिलेली अंगठी घेताना आणि ती सीतेपर्यंत पोहोचवितानाचा प्रसंग आपल्याला थेट रामायणात घेऊन जातो.गजांतलक्ष्मी बरोबरच,हत्तीच्या पायी देण्याच्या शिक्षेची पद्धत मंदिराच्या उजव्या बाजूला कोरलेली आढळून येते.भिकबाळी घालतानाच्या मुद्रेतील स्त्रीशिल्प तेव्हाच्या रसिकतेची छाप सोडून जाते.शिव तांडवाचे शिल्प तसेच अर्धा देह शंकर आणि अर्धा विष्णू यांचे शिल्प अवाक करून सोडणारे आहे.उजव्या बाजूने पुन्हा स्वर्गमंडपाकडे येतेना भिंतीवर बौद्ध भिक्षुक कोरलेला आढळतो.



          अशा नानाविध अवतारांचे,व्यक्तींचे,प्रसंगांचे,काल्पनिक,ऐतिहासिक पुरावे अतिशय साचेबद्ध पद्धतीने कोरलेले पहायला मिळतात.या तासभराच्या प्रदक्षिणेच्या खूप गोष्टी नव्याने पहिल्या.खूप गोष्टी शिकलो.आणि आपली संस्कृती,आपला इतिहास,आपले वाङ्मय,आपले पुराण तसेच पंचतंत्र,महाभारत,रामायण या सर्वांना स्पर्शून जाणारी हि प्रभावी प्रदक्षिणा करताना मंदिराच्या आवारातून हलूच नये असे वाटत होते.

एव्हाना सूर्य माथ्यावर येऊ पहात होता.पुन्हा एकदा एक धावती नजर संपूर्ण मंदिरावर टाकली आणि मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो.कॅमेरा वरून बॅग मध्ये भरला आणि उंबरा ओलांडून रस्त्यावर आलो.

बऱ्याच वेळा प्रसिद्ध आणि नावाजलेल्या गोष्टी पाहण्याच्या नादात आपल्याच जवळ असलेले आणि इतकी कलात्मक आणि वैविध्यपूर्ण वास्तू बघायची राहून जाते याची पुनःप्रचिती मला येत होती.



          इथून पुढे कधी कोल्हापूरचा पन्हाळा,रंकाळा,नरसोबाची वाडी किव्वा जवळपासच्या ठिकाणांना भेट देणार असाल तर थोडी वाट वाकडी करून इथे नक्की डोकावून जा कारण दगडी कोरीव कामाचा अप्रतिम नमुना असणारे हे कोपेश्वर मंदिर नक्कीच आपले गतवैभव अधोरेखित करणारी उत्तम कलाकृती आहे.


हृषिकेश पांडकर
०४/०१/२०१७