ती मऊ फोमवाली गादी असते नं,ज्याच्यावर बसल्यापेक्षा बुडल्याचा भास होतो अशा गादीवर आज पहाटे
जाग आली.खिडकीचा पडदा अर्धवट उघडा होता.कमालीची थंडी असावी बाहेर.कारण आत लावलेल्या
हिटरमुळे आणि अंगभर पसरलेल्या रजई मुळे त्याची तीव्रता जाणवत नव्हती.पण बाल्कनी आणि
आणि खोली यांना विभागणाऱ्या संपूर्ण काचेवर जमलेले दवबिंदू आतील आणि बाहेरील तापमानाचे
देखील विभाजन दर्शवत होते.पहाटे पाऊस झाल्याचे संकेत रस्ते आणि दुतर्फा असलेली झाडे
देत होती.
आळस झटकून कामाला लागावे वगरे वाटण्यासारखे वातावरण नव्हते.पण एखादी नवीन गोष्ट
पहायची या याची जेव्हा ओढ लागते तेव्हा आळस हा एकस्क्ल्यूझिवली झटकावा लागत नाही.
नोव्हेंबरची थंडी होती.जगाच्या
अगदी पश्चिम टोकाला मी होतो.पाऊस मिश्रित थंडी कदाचित फिरण्यावर धुकं घालणार असंच वाटत
होत.आणि याच विचारात मी पांघरूण अलगद बाजूला सारून बाथरूममधे शिरलो.
आवरून घराबाहेर पडलो.हवेत गारवा होता पण पावसाचा जोर कमी होता.गाडी सोसायटीच्या
रस्त्यावरून मुख्य रस्त्याला आली.गाड्यांची गर्दी तशी तुरळकच.चालणारी लोक तर नव्हतीच.शहराच्या
मध्यवर्ती भागातून गाडी चालवत होतो.काचेवर ओघळणारे पाणी वायपर ने झटकल्यावर दिसणाऱ्या,दुतर्फा असलेल्या सरकारी इमारती आणि त्यावर असलेला त्यांचा ध्वज
लक्ष वेधून घेत होता.रस्ते अगदीच रिकामे होते अशातला भाग नाही पण सर्व गोष्टी संथपणे
चालू होत्या.कदाचित शुक्रवार रात्र आणि संपूर्ण शनिवार या गोष्टींचा रविवार सकाळवर
झालेला तो परिणाम असावा.
भुरभूर चालू होती.रस्ते साधारण ओले झाले होते. कॅलीफोर्निया मधील लोम्बार्ड स्ट्रीटच्या
समोर येउन पोहोचलो.घसरगुंडीवर उभे राहावे असे ते दृश्य होते.त्या नागमोडी उतारावरून
गाडी खाली नेणे हा कमालीचा अनुभव होता.अगदी कमी वेगात आणि सावकाश मी त्या रस्त्यावरून
खाली उतरलो.गाडी लावून बाहेर आलो.आणि संपूर्ण रस्ता परत चालत चढायला सुरुवात केली.
'Winthrop Street' आणि 'The Embarcadero' यांना
जोडणारी वळणावळणाची घसरगुंडी आणि 'रशियन हिल' नावाच्या परिसरात असलेल्या 'Hyde' व 'Leavenworth' या रस्त्यांच्या मध्ये असणारा 'लोम्बार्ड स्ट्रीट' हा एक विचित्र प्रकारचा रस्ता आहे.ज्याला तीव्र उतारावर आठ वळणे
आहेत.अतिशय सुंदर अशी व्हिक्टोरियन पद्धतीची बैठी घरे दोन्ही बाजूला आहेत. घराच्या
समोरून सरपटत जाणारा हा लोम्बार्ड स्ट्रीट त्या नुकत्याच थांबलेल्या पावसात न्हाऊन
निघाला होता.लहानपणी 'देखावा' नावाचे चित्र काढत डोंगर,सुर्य,पक्षी,झाडे आणि घर यानंतर घराच्या उंबरठ्याला लागून असलेला नागमोडी
रस्ता जसा आपण रेखाटायचो अगदी तसाच हा नागमोडी रस्ता होता.
साधारण साडे नऊ वाजले होते सकाळचे.भिजावावं इतका पाऊस नव्हता पण छत्री सोडवत नव्हती.मी
रस्त्यावरून चढत वर पोहोचलो.आता संपूर्ण शहर दृष्टीक्षेपात होते.नाकासमोर दिसणारा समुद्र
एखाद्या कॅनवासची भूमिका पार पाडत होता.मनासारखे फोटो काढले आणि उतरायला सुरुवात केली.
आधीच ओल्या झालेल्या त्या उतारावरून हळू उतरण्यात मजा वाटायला लागली.मधूनच एखादी
गाडी सावकाश सगळी वळणे पार करत मार्गस्थ होत होती.मी संपूर्ण उतार उतरून खालच्या रस्त्यावर
आलो.तो तासभराचा वेळ अविस्मरणीय होता.अतिशय नाजूक आणि नागमोडी रस्ता,तीव्र उतार आणि रस्त्यालगत असलेली सुंदर बैठी घरे.घराबाहेर पाय
टाकला की रस्त्यावर येणारे ते बांधकाम स्थापत्यशास्त्राचा अचंबा होते.
दोन वळणांच्या मध्ये लावलेली झाडे रस्त्याचे वेगळेपण टिकवून ठेवत होती.पाऊस मगाशीच
थांबला होता.सूर्याने डोके वर काढले होते.पावसाने भिजलेली वळणे सूर्यप्रकाशात चमकत
होती.मोठ्या छत्र्या आणि छोट्या चड्ड्या घालून फिरायला आलेली लोकं आपापल्या पोरांना घेवून
पद्धतशीर फोटो काढत होती.
खाली उतरल्यावर वरून येणाऱ्या गाड्या पाहणे हा पर्यटनाचा भाग आहे.गणपतीत देखावा
पहावा तसे लोक तसे लोक या उतारावरून येणाऱ्या गाड्या पहात होते.जमिनीशी सुमारे २७-३०
अंशाचा कोनात असलेला हा उतार प्रत्यक्ष पाहणे हा गमतीशीर प्रकार होता.
ते सकाळचे तीन तास कसे गेले समजले नाही.पुढे अनेक गोष्टी पहायच्या होत्या आणि त्याची
सुरुवात इतकी वळणदार होईल असे नक्कीच वाटले नव्हते.
हृषिकेश पांडकर
०४/०९/२०१५