अॅनिमेशनने ओतप्रोत भरलेला बाहुबली पाहण्याचा योग आला.सिनेमा आवडला,कथा तशी काल्पनिक असल्याने नक्कीच सुसह्य आहे.पात्रांची मांडणी
आणि निवड योग्य वाटते.एकूण काय तर तीन तास निखळ मनोरंजन करण्याची क्षमता यामध्ये नक्कीच
आहे.या तीन तासानंतर जेव्हा आपण थियेटरच्या बाहेर पडतो तेव्हा सर्वजण आपापल्या विचारानुरूप
आठवणी घेवून तिथून बाहेर पडत असतात.
या तीन तासाने मला काय दिले याचा हिशोब जमवत असताना सुरुवातीला दाखवलेला धबधबा
आणि सर्वात शेवटी दाखविलेली लढाई या दोन गोष्टींना झुकते माप गेले.अर्थात दोन्ही गोष्टी
ग्राफिक्सच्या सहाय्याने भव्य दाखविल्या आहेत यात शंका नाही.पण या गोष्टी ज्या प्रकारे
समोर मांडल्या आहेत त्या नक्कीच कौतुकास्पद आहेत.
धबधब्याचा सीन बघत असताना 'हा धबधबा खरच असेल का ?' अशी शंका आल्यावाचून रहात नाही.पण नंतर समजले की केरळ मधील हा
धबधबा खरंच अस्तित्वात आहे.ज्याचा विस्तार मोठा दाखविण्यासाठी विशेष मेहनत घेतलेली
स्पष्ट दिसते तो भाग वेगळा.भारतामध्ये फक्त धबधबा पहायला जावे असे प्रसंग फार थोडे.आणि
म्हणूनच या वरील दोन परिच्छेदातून उगम झालेल्या विचारला वाहते करण्याचे काम अशा एका
धबधब्याने केले की,काही पाणी कॅनडा आणि काही पाणी अमेरिकेत फेकणाऱ्या नायगऱ्याचा
विसर पडावा.
टिपू सुलतानचे साम्राज्य असलेले तेव्हाचे मैसूर राज्य जे आता कर्नाटक म्हणून ओळखले
जाते आणि 'God's own paradise' म्हणून ज्याची ओळख आहे असे निसर्गाचा वरदहस्त असलेले गोवा राज्य.या
दोन राज्यांच्या सीमेवर कोसळणाऱ्या धबधब्याचे याची देही याची डोळा दर्शन झाले आणि 'भारता मध्ये फक्त धबधबा पहायला जावे असे प्रसंग फार थोडे'
हा विचार कोसळणाऱ्या प्रत्येक थेंबागणिक निखळून पडला.
दूधसागर…ज्याच्या नावातच त्याच्या अस्तित्वाची ओळख आपल्याला होते.स्वच्छ,नितळ,शुभ्र,समृद्ध असे दुध आणि अथांग,अमर्याद,अविरत वाहत असलेला सागर.या दोघांचा एकत्रित अविष्कार म्हणजेच
कदाचित दूधसागर धबधबा.ढगातून कोसळणारे पांढरेशुभ्र फेसाळ पाणी अखंडपणे धावत खाली येत
असते आणि याच दृश्यामुळे याचे दूधसागर हे नाव सार्थ होते.
तर खरच फक्त धबधबा बघायला जावे असा माझा पहिलाच अनुभव होता.धबधबा म्हणजे भिजणे
फार तर फार साचलेल्या पाण्यात उड्या मारणे या पलीकडे काही असू शकेल यावर माझा विश्वासच
नव्हता.पण तो 'चेन्नई एक्स्प्रेस'मध्ये दाखवलेला 'दूधसागर' बघायला जावू या ओढीने मी इथपर्यंत येवून पोहोचलो आणि गोवा-निजामुद्दीन
या गाडीने प्रवासाला सुरुवात केली.
प्रवासातल्या गमती जमती (ज्या कायम सारख्याच असल्या तरी प्रत्येक वेळी आपण नव्याने
सांगतो) आणि वेळेत न आलेली गाडी किव्वा तत्सम गोष्टी यांचे वर्णन करण्याचा मोह मी मुद्दामच
टाळलेला आहे.
आणि संध्याकाळी सुटलेली गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे कॅसल रॉक या स्टेशन वर थांबली.इथे थोडा भूगोलाचा आधार घेतो.धबधब्याची जागा हि
कॅसल रॉक आणि कुळें या दोन स्टेशनमध्ये आहे आणि गाडी थांबेल असे एकही स्टेशन मध्ये
नाही.हे दुर्दैव आहे कि सुदैव हे पुढे समजेलच.तर पहाटे पाच वाजता आम्ही कॅसल रॉक स्टेशन
सोडले आणि गाडीच्या दारात येवून उभे राहिलो.इथून पुढचा हिशोब अतिशय साधा होता.येणारा
प्रत्येक बोगदा मोजायचा,बरोबर दहा बोगदे झाले की गाडी पंधरा सेकंदाकरिता ब्रेक तपासणीसाठी थांबते.तेव्हा सर्वांनी खाली उतरायचे
इथे प्लॅटफॉर्म नाही.वाचताना जितके विचित्र वाटते तितके प्रत्यक्षात करायला अवघड नाहीये.
असो…कॅसल रॉक वरून गाडी सुटली आम्ही दारात येवून उभे राहिलो.सूर्याने
दर्शन दिले नव्हते पण उगवल्याची चाहूल नक्की लागत होती.केस कापणारा न्हावी जसा पाण्याचा
फवारा तोंडावर मारतो त्याप्रमाणे पाऊस चालू होता. घाट असल्याने कमी वेगात रेल्वे चालत होती.डाव्या बाजूला अभेद्य कडे
आणि उजव्या बाजूला खोलवर पसरलेले भगवान महावीर अभयारण्य.गाडी पुढे सरकत होती,दर काही मिनिटांनी दिसणारे,मिळेल त्या वाटेतून ओरडत खाली येणारे
छोटे धबधबे लक्ष वेधत होते.वळणावर दिसणारे आपल्याच गाडीचे इंजिन तसेच मधूनच वाजणारा
आणि वार्याच्या भीषण आवाजाला छेद देणारा गाडीचा लयबद्ध हॉर्न निसर्ग आणि मानवी तंत्रज्ञान
या दोघांचे अस्तित्व अधोरेखित करत होता.
'Western Ghats' या दोन शब्दात सामावलेला संपूर्ण निसर्ग आपल्या पावसाळी अधिवेशनाची
जाहिरात करीत होता.काळा कातळ,हिरवी झाडे किव्वा वाहणारे पाणी या खेरीज कुठलाही भाग डोळ्यांना
दिसत नव्हता. 'Braganza Ghats' या नावाने ओळखला जाणारा सुमारे सत्तावीस किलोमीटरचा तो घाटमार्ग
आणि त्यातून जाणारी एकमेव रेल्वे लाईन या दोन गोष्टी पावसाने न्हाऊन निघाल्या होत्या.
या गोष्टी अनुभवत असतानाच बोगद्यांची मोजणी आम्ही चुकविली नाही.दहा बोगदे पार झाले आणि गाडीने पंधरा
सेकंदांचा विसावा घेतला.क्षणार्धात आम्ही खाली उतरलो.गाडी तशीच पुढे सरली.आम्ही रुळावर
आलो. डाव्या बाजूला छातीवर असलेला उंच कडा, उजव्या बाजूला असलेल्या अभयारण्याचे खोल आणि हिरवेगार अंथरलेले
छत,त्यावर रस्ता चुकल्यासारखे भरकटलेले कापसाच्या पुंजक्याप्रमाणे
वाहणारे छोटे ढग.
एव्हाना सहा वाजले होते.पुढचे पावूल दिसावे इतपत नक्कीच उजाडले होते.गाडी पुढच्या
वळणाला नाहीशी झाली.आम्ही रुळावरून मार्गस्थ झालो.दूधसागर लिहिलेली पाटी नजरेस आली.चालतच
पुढचा बोगदा पार करायचा होता.
साधारण एक किलोमीटर चालत पुढे आलो.बोगद्यातून बाहेर पडलो आणि डाव्या बाजूला ढगातून
कोसळणारा दुधाचा जलाशय अंगावर आला.शांतता भंग करणारा तो आवाज,वाहणाऱ्या पाण्यामुळे उडणारे तुषार आणि खाली हिरव्या गालिचावर
नाहीशी होणारी ती धबधब्याची धार या गोष्टींनी भिजणे,पाणी उडवणे किव्वा साचलेल्या पाण्यात उड्या मारणे या छोट्या
कल्पना वाहून गेल्या.
नुकतेच उजाडलेले,बेताची थंड हवा,जाणवेल पण भिजवणार नाही असा बारीक पाऊस,पक्षांचा आवाज दाबणारा तो धबधब्याचा आवाज आणि थेट ढगातून तांडव
करत कोसळणारे पांढरेशुभ्र दुध या गोष्टी स्वप्नवत होत्या.
प्रत्येक फोटो वेगळा वाटावा असे ते वातावरण.मधूनच येणारी आणि धबधब्याच्या आवाजाशी
स्पर्धा करणारी मालगाडी.रुळावरून बाजूला येवून करून दिलेली वाट या गोष्टी अनुभव म्हणून
अवर्णनीय होत्या.दहा फुटांवरून वाहणारा धबधबा इतका जवळ होता कि कॅमेर्यात देखील कैद
व्हायला तयार नव्हता. जमतील तसे आणि जमतील तेवढे फोटो काढून आम्ही वाट
धरली.पुढची वाट देखील रेल्वे रुळावरूनच होती.अर्थात इथे याखेरीज कुठलेही साधन नव्हते
हि उत्तम गोष्ट.
रुळावरून आणि तेही घाटात चालायची पहिलीच वेळ.फार काही वर्दळ नसलेली त्या जंगलातली
एकमेव रेल्वे लाईन.हिरवळीला बाजूला सारत वाट काढत जाणारी.पावसामुळे चमकणारे रूळ.स्वछ
धुवून निघालेल्या दोन रूळामधील त्या दगडी पट्ट्या.क्वचितच बाजूला पसरून ठेवलेले जास्तीचे
रूळ.आणि सततच्या पावसाने धुतली गेलेली पसरलेली खडी.गोऱ्या साहेबांनी सुरु केलेल्या
रेल्वेचे आज खर्या अर्थाने कौतुक वाटले.
रुळावरून दोन किलोमीटर गेल्यावर आपण 'View point' नावाच्या जागेवर येतो.अर्थात हि काही वेगळी जागा नाहीये.इथेपण
रुळावरूनच यावे लागते आणि रुळावरच उभे राहावे लागते.पण इथून दिसणारे दृश्य हे सर्वस्वी
विलोभनीय आहे.इथून संपूर्ण धबधबा व्यवस्थित दिसतो.त्यात त्या धबधब्यातून कापत जाणारी
रेल्वे लाईन आणि नशिबाने साथ दिली तर धावणारी रेल्वे देखील दृष्टीस पडते.धबधबा बरोब्बर
मध्यातून चिरत जाणारी रेल्वे पाहणे कमालीचे आनंददायी दृश्य होते.आणि याच क्षणासाठी
आम्ही दोन तिथे फक्त बसून होतो.अर्थात वाट बघण्यात घालवलेल्या वेळेचे चीज झालेच.जेव्हा
एक्स्प्रेस हॉर्न वाजवत त्या बोगद्यातून बाहेर आली आणि धबधबा कापत पुढे गेली.कित्येक
शे फुट उभा ठाकलेला धबधबा त्याच्या मध्यातून आडवी जाणारी रंगीत डब्यांची रेल्वे आणि
भोवती पसरलेला विस्तीर्ण आणि हिरवागार पश्चिमी घाट हे दृश्य डोळ्याला जितके प्रसन्न
आणि मोहक दिसते तितके कदाचित कॅमेर्याला दिसत
नसावे.तरीदेखील हे सर्व टिपण्याचा आटापिटा करण्यात वेगळीच मजा आहे.
धबधब्याचा सर्व दिशांनी अनुभव घेवून आम्ही कुळें या पुढच्या स्टेशन कडे निघालो.रुळावरून
चालणे हे ऐकायला जितके सोपे वाटते तितके ते नाहीये.कारण रुळावर असलेली असलेली खडी तो
प्रवास काहीसा खडतर बनवते हे नक्की. साधारण चार किलोमीटर नंतर सोनालीयम नावाचे एक छोटे
स्टेशन येते,अर्थात इथे गाडी थांबत नाही.इथेही प्लॅटफॉर्म नाही.
अतिशय साचेबद्ध असा पडणारा टिपिकल 'रेन फॉरेस्ट' मधला पाउस तीन/चार मिनिटेच पडत होता पण कुठलाही भाग कोरडा राहणार
नाही याची पूर्ण खबरदारी तो घेत होता.अगदी तुडवणारा पाउस आणि क्षणार्धात त्या पाण्याचे
मोती करणारे लक्ख ऊन हा बदल नवीन नसला तरी त्या वातावरणामध्ये कमालीचा भासत होता.
याच अश्या निसर्गाच्या कमानीतून चालत आम्ही कुळें स्टेशन गाठले आणि परतीच्या गाडीची
वाट पहात बसलो…गाडी आली आणि आम्ही पुढचे सगळे सोपस्कार पार पडले…
धबधबा म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा आधार घेवून मिळेल त्या
वाटेने खाली ओघळणारे पाणी. पण त्यातही इतके सौंदर्य असू शकते याचा पुनःप्रत्यय आला.परतीच्या
गाडीत बसलो आणि पुन्हा तोच रेल्वेचा मार्ग गाडीतून अनुभवला.तितकीशी मजा नव्हती अर्थातच.आता गाडीने घाट ओलांडला…
इथून पुढच्या आयुष्यात जेव्हा कधी धबधब्याचा विषय निघेल
तेव्हा दुधसागर हे नाव कायम डोळ्यासमोर येईल हे नक्की. साता समुद्रापार जाऊन आणि रेनकोट
चढवून जर नायगरा पाहणार असाल तर जरूर जा पण या इथे पलीकडे घाटात उतरून एकदा या दुधात
न्हाऊन यायला काहीच हरकत नाही.तुलना करत नाहीये पण जे आपल्याजवळ आहे ते कदाचित कुठेच
नाहीये.
नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्याला जायला अजून बराच अवकाश
आहे.पण त्या आधी हे उतू जाणारे दुध नक्की पहा.कारण दक्षिणेकडून उत्तरेला सरकणारा मान्सून
कॅलेंडरची वाट पाहत नाही.
हृषिकेश पांडकर
२५.०७.२०१५