निसर्गाच्या
झोळीतून पुण्याने गोष्टी ओरबाडून घेतल्या आहेत.पाटीवर दोन थेंब टाकून पाटी तिरकी केल्यावर
जसे थेंब ओघळतात त्याप्रमाणे संपूर्ण शहरभर वाहणाऱ्या मुळा-मुठा,पेन्शनर पुणेकरांच्या
तब्ब्येतीची काळजी घेणाऱ्या टेकड्या,तक्क्याला टेकून बसावे तसे डाव्या बाजूला पसरलेला
सह्याद्री,हवामानाच्या जमून आलेल्या भट्टीमुळे दिसत असलेली हिरवळ आणि मोजून मापून असलेल्या
पुणेकरांना पचेल आणि रुचेल असे मोजून मापून उन,वारा,पाऊस देखील.
'पुणे तिथे काय उणे' या प्रश्नार्थी उक्तीच्या उत्तरांची संख्या काळानुरूप कमीजास्त
होत असली तरी समुद्र किनारा आणि सचिन तेंडुलकर
या दोन गोष्टींची सल कधीच भरून निघणार नाही.
पु.ल.
म्हणतात त्याप्रमाणे मुंबईकरांना मुंबईकर असल्याचा अभिमान असण्याची गरज नसते. पण दादर
किव्वा जुहु चौपाटीला समुद्र किनारा म्हणण्यात कितपत तथ्य आहे ? आणि म्हणूनच कदाचित
समुद्र पहायचा म्हणून मुंबईची निवड कधीच केली जात नाही,किव्वा मी तरी नक्कीच करत नाही.कदाचित
मुंबईकरांचे सुद्धा हेच म्हणणे असू शकेल.
याच
वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर मागे वळून पहिले कि असे लक्षात येते कि समुद्र म्हणजे
काय हे कळायला लागल्या पासून ते अगदी कालपर्यंत तो पाहण्याचा विचार मनात आला कि जायच्या
ठिकाणात दुमत नसते.कौटुंबिक सहलीची सुरुवात पण तिथूनच झाली.नंतर शाळेतील मित्र,कॉलेजचे
मित्र अशा वेगवेगळ्या लोकांबरोबर समुद्र बघितला. सोबत बदलली पण जागेच्या निवडीत वैविध्य
आले नाही.
सातशे किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असला तरी अलिबाग,मुरुड
पासून सुरु झालेला आणि मालवण,सिंधुदुर्गापर्यंत पसरलेला हा प्रदेश संपूर्ण महाराष्ट्राचे
आकर्षण राहिले आहे.आणि हाच तो चिंचोळा भाग ज्याला 'कोकण' या नावाने संबोधले जाते आणि
हा लहानपणापासून माझ्याही आकर्षणाचा विषय राहिला आहे.या विधानाला कदाचित कोणीच असहमत
नसेल.
सह्याद्रीच्या
खांद्यावरून पलीकडे उतरलेल्या तीन वेली प्रत्येक वेळी मला या स्वर्गात नेवून ठेवतात.कुम्भार्लीची
शिस्तबद्ध चढण,किव्वा वरंध्याची लांबलचक वळणे आणि या गोष्टी कमीच आहेत म्हणून संपूर्ण सह्याद्री दर्शन करविणारा अभेद्य ताम्हिणी…
शेवटी सगळेच रस्ते स्वर्गात उतरतात.घाट उतरून पुढे आलो आणि मुंबई-गोवा महामार्ग ओलांडला
कि सुरु होते या नंदनवनाची सीमा.
कोकणातले
कुठले गाव आहे याचा फारसा फरक पडत नाही.इथली जीवनशैली एकजात सारखी.सह्याद्री उतरून
एकदा पलीकडे गेलो कि कोकण सुरु झाल्याची ग्वाही देतात ते अरुंद आणि वळणदार रस्ते.झाडांच्या
छायेखाली पहुडलेली कौलारू घरे आणि ऊन जमिनीपर्यंत पोहोचणार नाही याची खबरदारी घेणारी
घनदाट झाडी.रात्रीच्या प्रवासात गावाचा अंदाज येत नाही कदाचित.पण कोकणातील दुपारचा
प्रवास असंख्य गोष्टी निदर्शनास आणतो.समोरून येणाऱ्या एस.टी. मुळे बाजूला घेऊन निमूटपणे
मार्गस्थ होणारी आपली गाडी.कडक उन्हात देखील सुसह्य सावलीतून लाकडाची मोळी घेवून रस्त्यालगतच्या
निमुळत्या जागेतून कसबीने चालणाऱ्या बायका,पार जुने झालेले मैलाचे दगड आणि सगळीच अंतरे
जवळ असल्याने एखाद्या चौक सदृश्य रस्त्यात तीन चार ठिकाणांचे दिशेसहित असणारे अंतराचे
बोर्ड.हे दृश्य कोकणात नवीन नाही. छोटाश्या टेकड्या पार करण्यासाठी असलेला नागमोडी
रस्ता आणि एखाद्या विशिष्ट वळणावरून दिसणारा अथांग सागर. पुन्हा वळून पुढे गेल्यावर
येणारी दाट झाडी आणि पुढच्या वळणावर पुन्हा डोकावणारा सिंधू सागर.कितीही वेळा कोकणात
गाडी नेली तरी पहिल्या वळणावर दिसणारी अरबी समुद्राची नवलाई अजिबात कमी होत नाही.
खाऱ्या
पाण्याचा वास प्रत्येक वेळी आपलासा वाटतो.इथल्या दमट हवेत देखील ओलावा असतो.बैठ्या
घरांच्या उतरत्या कौलांवर वाळत टाकलेले सुपारीचे ढीग किव्वा वाडीच्या शेजारी असलेल्या
गोठ्यांच्या कमानीवर वळत टाकलेले कपडे,कोकणातल्या प्रवेशाची साक्ष देतात.भाला घेवून
उभे राहिलेल्या पहारेकर्यासारखे प्रत्येक घराच्या वाडी मध्ये असलेली उंच नारळाची झाडे
आणि या संपूर्ण वाडीची काळजी घेणारी घरामागची दगडी विहीर.
गावात
शिरल्यावर रस्त्याच्या कडेला तुरळक पडलेली समुद्राची रेती.घराबाहेर लटकवलेले मासेमारीचे
जाळे आणि सायकलला अडकवून ठेवलेला नारळ तोडायचा कोयता गावात पोहोचलो असे सांगत असतात.अरुंद
गल्ल्या,दुतर्फा ऐसपैस टुमदार घरं आणि घरांच्या मागच्या बाजूला थेट समुद्रापर्यंत पोहोचलेली
आंबा फणसाची वाडी साधन आणि समृद्ध कोकणाचे दर्शन घडवत असतात.नारळ पोफळीच्या बागा,जायफळाचे
लटकलेले घड किव्वा आंब्यांच्या रचलेल्या राशी या केवळ पाहणे देखील एक सुखद अनुभव असतो.
कोकणी
माणसाकडे राहणे यासारखे सुख नाही.शेणानी सारवलेले घर,घरासमोरील पडवीत असलेला दणकट झोपाळा.कोकणस्थी अगत्य आणि पुरून उरेल एवढा टापटीपपणा.गावातील
प्रत्येकाला प्रत्येक व्यक्तीची नावासहित असलेली ओळख आपल्यासारख्या शहरी आणि मागास
माणसाला आश्चर्यचकित करते.
पहाटे
लवकर उजाडलेले कोकण रात्री लवकर निजते.जवळपास दर मोठ्या घरात पर्यटकांची राहायची सोय
केलेली असते.त्यामुळे संध्याकाळी पर्यटक समुद्रावरून येताना दिसतात.दुपारी चार नंतर
समुद्रकिनार्यावर येणारा पर्यटक आपापल्या आनंदात मग्न असतो.अथांग सागराचा किनारा देखील
अथांगच.किनार्याला येवून धडकणार्या लाटा आणि लाटांबरोबर येणारे असंख्य जीव,कोरड्या
रेतीत आपली बिळे बनवून लपाछपी खेळणारे खेकडे आणि शिंपल्यातून डोकावून बाहेरचे जग न्याहाळणारे
शिंपल्यातील कीडे.काही नावाड्यांच्या बोटी लांबवर तरंगताना दिसतात तर काही कडेला तश्याच
हेलकावे खात पडलेल्या असतात.
संध्याकाळची
किनारपट्टी आणि सकाळची यात नैसर्गिक फरक तर असतोच पण सौंदर्यात देखील फरक आढळतो.भरती
ओहोटी यातर त्याहून भिन्न गोष्टी.अस्ताला जाणारा सुर्य आणि उदयाला येणारा याचे प्रात्यक्षिक
डोळ्याचे पारणे फेडते.तिथल्या लोकांना हा देखावा रोजचाच असला तरी आपल्यासारख्यांसाठी
ती पर्वणीच ठरते.सूर्यास्ताच्या तिरप्या किरणांनी क्षितिजाकडे नजर वर करून बघता येत
नाही.पण तोच सुर्य क्षणात खाली उतरला कि इतका वेळ तापलेले क्षितिज सोनेरी आणि शांत
होवून जाते.आणि याच सोनेरी लाटांच्या गादीवर तो लाल गोळा आपली पाठ टेकवतो.
सूर्यास्तानंतर
आपल्या राहण्याच्या ठिकाणी परतताना कोकणच्या गंभीरतेची जाणीव होते.चिंचोळ्या गल्ल्यांमधील
अंधार,वाडी मधील गर्द झाडी,त्यातून येणारा रातकिड्यांचा समांतर आणि लयबद्ध आवाज आणि
पार्श्वभूमीवर अविरत चालू असलेली सागराची गंभीर गाज.प्रत्येक वेळी परतताना वाटणारी
भीती मी कुतूहल म्हणून जपून ठेवतो.
सकाळी
उठल्यानंतर दिसणारी कोकणी लगबग अवर्णनीय असते.वाडीच्या विहिरीतून काढले जाणारे पाणी,किव्वा वाळत घातलेले नारळाचे शेंडे गोळा करण्याची गडबड,पाणी गरम करण्यासाठी लावलेल्या बम्बातील
धुराचा वरपर्यंत गेलेला लोट या गोष्टी खूप वेगळ्या नाहीत.पण त्या लाल मातीत त्या नेहमीच
विशेष वाटतात. पहाटे त्याच लाल मातीत उमटलेली गुरांची पाऊले,वाडीतून फिरताना वाळून
खाली पडलेली शहाळी किव्वा अगदी छोटे नारळ सुद्धा.
जिथे
पर्यटन हा व्यवसाय म्हणून पाहिला जातो तिथे आधुनिकीकरणापेक्षा संस्कृती जतन करण्याची
जबाबदारी आज मोठी आहे आणि याचे तंतोतंत आचरण होताना दिसते.पर्यटक येतात किव्वा यावेत
यासाठी आपल्यात बदल करावा.पर्यटकांच्या सोयोसाठी आपल्या गावाची किव्वा घराची रचना बदलावी यासारखे विचार कोकणापर्यंत पोहोचले
नाहीयेत हे आपले भाग्य.आणि म्हणूनच कोकणातील कुठल्याही गावात आपल्याला या वेगळ्या जीवनशैलीचे
दर्शन घडते.
कोकणाने
जसे सांस्कृतिक वेगळेपण जपले आहे तसेच किंबहुन त्यापेक्षा जास्त आपले खाद्यसंस्कृतीचे
प्रेम जतन केले आहे.बारा महिने मिळणारे उकडीचे मोदक किव्वा कुठलाही कोकणी जेवणाचा प्रकार
कोकणाला एका वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवतो.पदार्थाच्या नावांचा उल्लेख करण्याचे मी प्रकर्षाने
टाळतो.कारण इथली खाद्यसंस्कृती माशांखेरीज पूर्ण होवूच शकत नाही.आणि माशांच्या बाबतीत
माझे ज्ञान अगदीच तोकडे.त्यामुळे खाण्याबाबतीत काही उल्लेख कमी पडला तर ते कोकणाला
पटायचे नाही.इथले लोक कसे आहेत याबद्दल जाणून घेण्याइतपत माझे वास्तव्य नाही.पण पु.ल.नि
रेखाटलेल्या अंतूशेटांसारखी इथली माणसे असतात असे मानून जर कोकणात प्रवेश केला तर त्याची
प्रचीती यायला फार वेळ लागत नाही.हि लोकं फणसासारखी वरून काटेरी आणि आतून गोड असतात
या पुलं च्या निरीक्षण शक्तीला माझी केव्हाच दाद गेलीये.
कड्यावरचा
गणपती,सोन्याचा गणपती,जलदुर्ग यासारख्या गोष्टींमुळे जरी कोकण सर्वश्रुत असले तरी कोकणाची
एक वेगळीच ओळख आहे.या ठिकाणांमुळे आपल्याला तिथे जाण्याचे कारण मिळते पण तिथे राहण्याचे
आणि त्या गोष्टी आवडण्याचे कारण मात्र तिथेच शोधले पाहिजे.
इथली
श्रीमंती दाखवावी लागत नाही आणि गरिबी झाकावी देखील लागत नाही.आपण फक्त असलेल्या गोष्टींचा
आस्वाद घ्यायचा असतो.कोणाची श्रीमंती आणि कोणाची गरिबी कशात आहे हे पाहणार्याचा दृष्टीकोन
ठरवतो.
कोकणातील
सहल म्हणजे लहानपणी फक्त समुद्रात डुंबणे आणि तोंडात खारे पाणी गेले म्हणून शंभर वेळा
थुंकणे होते.फोल्ड केलेल्या आणि तरी भिजलेल्या जीन्स मध्ये मुठभर माती सोबत आणणे होते.राहण्याच्या
ठिकाणी अंघोळीच्या वेळी कानात अडकलेली रेती काढणे इतकेच होते.वयाप्रमाणे किव्वा आवडीनुरूप
या गोष्टी आहे तश्या जपल्या पण कोकणाने अजून खूप गोष्टी शिकवल्या.नवीन पहायची संधी
प्रत्येक वेळी दिली आणि दर वेळी स्वतःबद्दलचे आकर्षण वाढवून ठेवले.
एका
बाजूला विशाल सिंधुसागर आणि दुसर्या बाजूला अभेद्य सह्याद्री यांच्या कुशीत पसरलेला
चिंचोळा भाग आपल्या जीवनाचा इतका अविभाज्य घटक बनू शकतो यावर विश्वास बसत नाही.
कोकण
म्हणजे गोवा नाही कोकण म्हणजे केरळ पण नाही.कोकण हे कोकणच आहे.या कोकणाचा कॅलिफोर्निया
करण्याची स्वप्न सुद्धा पाहणे मला पटत नाही.चार पैसे टाकून कॅलिफोर्निया होईल सुद्धा
पण त्याला या कोकणाची सर कधी यायची ?
किनार्यावरील
वाळूत रेखाटलेली अक्षर पुढच्या क्षणाला एका लाटेने नाहीशी होतात पण कोकणाने दिलेल्या
आठवणींना पुसून टाकणारी लाट येणे शक्यच नाही.
हृषिकेश पांडकर
२०/०९/२०१३