Thursday, February 21, 2013

Five Days To Remember...

      आज सकाळी ट्रेन मधून पुणे स्टेशनला उतरलो.पाच दिवसापुर्वीची मानसिकता आणि आजची यात कमालीची तफावत जाणवत होती.हे पाच दिवस वेगळे होते.हि सहल नव्हती,हा नुसता प्रवास नव्हता आणि हा नुसता अनुभव देखील नव्हता.हे एक शिक्षण होते.हे एक मार्गदर्शन होते,हे एक आश्चर्य होते.मात्र हा चमत्कार नक्कीच नव्हता.जादूटोणा नक्कीच नव्हता.कारण यामागचे कष्ट आणि संघर्ष पदोपदी प्रत्ययास येत होता.

     पाच दिवसापूर्वी याच स्टेशनवरून निघालो होतो.आपल्या अतिसामान्य जीवनाच्या रहाटगाडग्यातून  काहीतरी वेगळे पाहण्याची उत्सुकता आणि कुतूहल याचबरोबर पन्नास लोक आम्ही गाडीत बसलो तो क्षण अजूनही तसाच्या तसा आठवतोय. प्रवासात काय केले हे सांगणे अतिशय दुय्यम.कारण सर्वच लोक ते करत असावेत.आज मी अश्या ठिकाणी जात होतो कि जी गोष्ट सगळे लोक करू शकत नाहीत,अशी गोष्ट ज्यांनी करून दाखवली त्या 'बाबांच्या' जगात.अर्थात आनंदवन,हेमालकसा आणि सोमनाथ. 

     रेल्वे आणि बस या प्रवासातील सोपस्कार पार पडल्यावर गाडी जेव्हा 'आनंदवन' च्या कमानीत शिरली तेव्हा दुपारचे बारा वाजून गेले होते.भारतावर भर दुपारी मोट्ठे भिंग धरले आणि सूर्यकिरण एकत्रित करून विदर्भात पाडले तर जितके उन जाणवेल अगदी तसेच उन तापले होते.कमानीतून आत गेलो आणि समोर लहानग्या मुलांनी हसून स्वागत केले.त्यांच्या शाळेची मधली सुट्टी झाली असावी कदाचित.बाहेरची लोकं आली या कल्पनेने अचंबित झालेले चिमुरडे आमच्या बस कडे पाहत होते.जेवण आणि इतर गोष्टी उरकून आम्ही एका अद्भुत जगात प्रवेश करणार होतो.
     एखादी व्यक्ती किती मोठा संघर्ष करून होत्याचे नव्हते करून दाखवते याचा हा जिवंत नमुना होता.सरकार आणि समाज यांच्या विरुद्ध सामाजिक लढा देऊन समाज्याने झिडकारलेल्या महारोग्याला आसरा देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा हा यशस्वी प्रयत्न  आम्ही पाहत होतो.१९४८ साली सुरु झालेल्या या प्रकल्पाला आज जगाच्या नकाशावर स्थान प्राप्त झाले.
     प्रकल्प पहायला सुरुवात केली ती अंध मुलांच्या शाळेपासून.नीटनेटका गणवेष घातलेले अंध विद्यार्थी आणि विद्यार्थिनी झाडाच्या पारावर येउन काहीतरी ऐकत बसलेले होते.निसर्गाच्या सान्निध्यात असलेली ती शाळेची वास्तु हेवा वाटावा अश्या तोर्यात उभी होती.इतके विद्यार्थी असून देखील शांतता भंग होत नव्हती.''आनंदवन अंध प्राथमिक शाळा" या पाटीपलीकडे आहे काय हे  पाहण्यासाठी मी आत मध्ये गेलो.समोर ओळीने आठ वर्ग चालू होते.शिक्षणाची ओढ व्यंगत्वावर भारी पडत होती.डोळे असूनही आपण काही फार दिवे लावू शकलो नाहीत कि काय अशी भीती वाटून आणि कौतुकाचे हास्य चेहेर्यावर घेऊन मी अंधशाळेतून बाहेर आलो. 

                  

    
     पुढे कारागिरी विभागात आम्ही गेलो.प्रचंड मोठ्या प्रमाणात टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविण्याचे काम चालू होते.आणि शेजारी अश्या बर्याच गोष्टी बनवून मांडून ठेवलेल्या होत्या.पुण्यामुंबई सारख्या प्रगत लोकांच्या प्रगत शहरात आम्ही फक्त गुटख्यांची पाकिटे पडलेली पाहतो.आज कुष्ठरोगाने बाधित असलेल्या व्यक्तीने त्या पाकीटापासून बनविलेल्या टाकाऊ वस्तू पाहून 'उंचे लोग उंची पसंद' याचा याची देही याची डोळा प्रत्यय घेतला आणि मार्गी लागलो
 
     
तिथून पुढे गेल्यावर 'आम्ही आहोत अपंग,आम्ही आहोत कुष्ठरोगी पण आम्ही स्वाभिमानाने जगतो आणि हक्काची भाकरी खातो.' असे ठोसपणे सांगू शकतील याची संपूर्ण काळजी बाबांनी घेतलेली दिसत होती.हातमाग,लोहार काम,सुतार काम,शिवणकाम यासारखे लघुउद्योग वेगाने चालू होते.सराईत कामगाराप्रमाणे अंध कामगार आपले काम करत होते.हाताने अधू असलेले  कामगार पायाने काम पूर्णत्वाला नेत होते.हाताची बोटे गमावलेले कौशल्याने हातमाग विणत होते.शरीराचे अवयव हेच खरे दागिने असतात.आमच्याकडे सुदैवाने दागिने आहेत पण खरे सौंदर्य यांनीच जोपासले आहे.याची पदोपदी जाणीव होत होती.आणि यांना टाकणाऱ्या समाजाची कीव वाटत होती.बाबांच्या प्रयत्नाचे यश प्रत्येक पाऊलावर अधोरेखित होत होते

     एके काळी जिथे महारोग्याला बाजारात उभे राहायची परवानगी नव्हती तिथे आता महारोग्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंचा स्वतंत्र बाजार भरतो.आणि त्यांची उलाढाल चंद्रपूर बाजारापेक्षा जास्त होते.हे ऐकून बनियन घातलेले बाबा,प्रकाश आणि विकास आमटे यांच्या कामाचा अभिमान मनात काठोकाट भरला होता.अंध आणि अपंगांचा संगीताचा कार्यक्रम पाहून संगीताला भाषा,रंग,गंध,या गोष्टी दुय्यम असतात.स्वर हाच संगीताचा गाभा आहे याची खात्री पटली.कारण पुन्हा एकदा आज इच्छाशक्तीने  शारीरिक व्यंगावर केलेली मात स्वरांची उधळण करीत होती.
      आता वेळ होती बाबांच्या आणि साधनाताईच्यासमाधी कडे जाण्याची.ज्यांनी हे अजब
विश्व उभारले त्यांच्या समाधीचा परिसर अतिशय रम्य होता.उन्हाची तीव्रता ओसरली होती.महारोग्यांचे पुनर्वसन करून बाबा ज्या ठिकाणी अनंतात विलीन झाले त्या समाधी स्थळावर साधना ताईची पण समाधी आहे.'आम्हाला आमच्या लोकातच राहूद्या' याच विचाराने कदाचित बाबा अजूनही तिथेच आहेत असे वाटते.


     निघायची वेळ झाली होती.दिवसभर उन्हाने तापलेल्या आनंदवनावर संध्याकाळी वरुणराजाने दृष्टी ठेवली.अवकाळी पावसाने विदर्भ शहारले.अंधार आपले अस्तित्व कायम करीत होता.आम्ही आमच्या रहायच्या जागेवर स्थिरावलो.
वाटेतून परतत असताना माझ्या सुदैवाने 'आनंदवन' चे ट्रस्टी काका भेटले.पायाने अधू असलेले काका अर्धातास गप्पा मारत होते.आनंदवन शाळेचा पहिला विद्यार्थी ते आनंदवन चे ट्रस्टी हा प्रवास केवळ अविस्मरणीय होता.लोकांच्या विरोधाला न जुमानता आणि त्यांच्या जाचाला भिक न घालता आपले काम करणारे बाबा आणि त्यांचे हे अपंग असलेले सर्व सहकारी यांचा तो धावता आलेख काकांनी माझ्या डोळ्यासमोर ठेवला.पु.लंचे दर वर्षी आनंदवनात येणे,गंधर्वांचे आनंदवनातील वास्तव्य.नाना पाटेकरची दर वर्षी महिनाभर होणारी भेट यावर बोलताना  ताजणे काका भूतकाळात हरवून गेले.'माझी बायको मूक बधिर आहे,पुलं ची ती मानलेली मुलगी आहे.'' हे सांगताना काकांच्या चेहऱ्यावरील भाव मला वाचता आलेच नाहीत.आमच्या लग्नात कुमार गंधर्वांनी मंगलाष्टका म्हणल्या हे  सांगतानाचे समाधान लिखाणातून व्यक्त होऊ शकत नाही.आणि मिळालेले पुरस्कार दाखवताना फुगून आलेली छाती व्यंगावर हसताना स्पष्ट दिसत होती.एवढे मोठे काम असूनही चेहेर्यावर अहंभाव नव्हता.मृदुस्वभाव आणि लाघवी बोलणे यामुळे माझा अर्धा तास कसा सरला हे समजलेच नाही.पुन्हा एकदा अचंबा,कौतुक आणि काकांचा आशीर्वाद बरोबर घेऊन मी त्यांचा निरोप घेतला.लोकं इतकी प्रभावी कशी ठरतात हे मला त्या अर्ध्या तासाने शिकवले.बाहेर कोसळणारा पाऊस वातावरणातील उब कमी करीत होता.आणि ताजणे काकांबरोबरचा संवाद आश्चर्याचे पांघरूण घालत होता.
     एव्हाना रात्रीचा प्रहर येउन ठेपला होता.मी येवून राहण्याच्या ठिकाणी पोहोचलो.आनंदवनाला झोप लागली होती.जिथे दिवसच सकाळी चारला सुरु होतो तिथे रात्रीचे दहा म्हणजे मध्यारात्रच 


     दुसरा दिवस उजाडला तोच मुळात हेमलकसा आणि सोमनाथच्या ओढीने.आनंदवनने निर्माण केलेली उत्सुकता शंभर टक्के अबाधित होती.आणि आता वेळ होती हेमालकसाची. 
     पहाटे साडेपाच ला सुरु केलेला प्रवास इतका मोठा असूनही इतका सुखद असू शकेल यावर विश्वास बसत नव्हता.चंद्रपूर सारख्या ठिकाणच्या नक्षलवाद्यांच्या जंगलातून प्रवास करतानाचा अनुभव अवर्णनीय होता.ताडोबा अभयारण्याला भोवताली ठेवून गर्द झाडीतून होणारा प्रवास आणि उन्हाने घेतलेली विश्रांती या गोष्टी हेमलकसाची वाट सुकर करीत होत्या.जंगलात गस्त घालणारे जवान नजरेस येत होते.दोन क्षण सरफरोशची आठवण होवून अंगावर काटा उभा राहिला.सुमारे पाच तासांच्या प्रवासानंतर गाडीने 'लोक बिरादरी प्रकल्प- हेमलकसा' च्या कमानीत प्रवेश केला.आणि पुन्हा एकदा नवीन पाहण्याच्या आनंद घेण्यासाठी मी खाली उतरलो.

     बस मधून उतरल्यावर पहिली गोष्ट नजरेस आली ती म्हणजे 'अतिथीगृह' असे लिहिलेली पाटी.ज्याच्या खालच्या बाजूला तिथले काही नियम लिहिले होते.आणि त्यात पहिला नियम हा होता कि,'आपण शहरापासून लांब आहात त्यामुळे शहराच्या सुख सोयीप्रमाणे प्रत्येक गोष्ट इथे मिळेल याची शक्यता नाही.तरी इथे उपलब्ध असलेल्या गोष्टींवर समाधानी राहावे' या वाक्याने आलेला शहरा माझ्या अजूनही तेवढाच लक्षात आहे.असे लिहावेसे का वाटले असेल असे वाटून मी त्या अतिथी गृहात प्रवेश केला.

     जेवण झाल्यावर दिगंत आमटे आणि जगन काका यांनी रीतसर दिलेली हेमलकसाची इत्यंभूत माहिती 'आपण उगीचच जगतो कि काय ?' या प्रश्नावर नेवून ठेवत होती.बाबांचा संघर्ष आणि प्रकाश आमटे यांचे वन्यप्राण्यांवरील प्रेम याबद्दलचे अनुभव ऐकून सेवा करणे या शब्दाला कदाचित मराठीत 'देणे' हा समानार्थी शब्द आहे कि काय असे वाटायला लागले होते.प्रकाश आमटे यांनी जे प्राण्यांसाठी केले तेवढे कदाचित माणूस देखील माणसासाठी करीत नसावा यावर मी ठाम झालो आणि हेमलकसा मध्ये असलेल्या प्राण्यांच्या अनाथआश्रामाकडे आम्ही निघालो.


      प्राण्यांचे अनाथआश्रम हा शब्दच इतका जवळचा वाटत होता कि माणसांव्यातिरिक्त कोणी अनाथ होऊच शकत नाही या मानसिकतेवर अडकलेले आम्ही नवीन माहितीच्या शोधत पुढे चालत होतो.संपूर्ण अनाथालय पाहून आल्यावर असे वाटत होते कि,हेमलकसा हे गाव फक्त माणसांचे नसून इथे आदिवासी,वन्यप्राणी आणि माणसे एकत्र नांदतात.इथल्या दवाखान्यात प्राणी देखील झोपतात आणि माणसे देखील.इथे असलेल्या चीत्याच्या पिलाने देखील कापसाच्या बोळ्याने पाणी प्यायले आणि माणसाच्या देखील.आदिवासी हि भटकी जमात असली तरी ती माणसेच आहेत.हे ओळखणारे बाबा आणि प्रकाश आमटे इथे स्थिरावले.माडिया आणि गोंड या आदिवासींच्या जमातीचे पुनर्वसन आणि संगोपनाची संपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे वाहणाऱ्या हेमलकसाच्या प्रत्येक व्यक्तीचा अभिमान वाटावा असे ते चित्र होते.
     अजगरापासून ते चीत्त्यापर्यंत सगळे प्राणी आनंदाने वास्तव्यास असलेले पाहून माणुसकी आणि भूतदया या दोनही गोष्टी एकाच ठिकाणी प्रत्ययास येत होत्या.पाउलो पावली मिळणारे समाधान सुसह्य वाटत होते.साडेतीन तासाच्या त्या सुखद सफारीमध्ये बर्याच गोष्टी शिकायला मिळाल्या.हरणाला गवत घालणाऱ्या मुली आणि रस्ते स्वछ करणारे लहान विद्यार्थी यांचा हेवा करावा कि कौतुक या विचित्र मनस्थितीत मी हेमलकसाचा निरोप घेतला.

     आदिवासी लोकांच्या भाषेचा अभ्यास करून त्यांच्याशी साधलेले संवाद आणि त्यांच्या विकासाच्या दृष्टीने उचललेले पाऊल याचे कौतुक करावे तितके थोडे होते.दोनशे किलोमीटरच्या परिसरातील सर्व आदिवासी उपचारासाठी हेमलकसाला येतात.कारण सरकारी दवाखान्यात त्यांचे उपचार होत नाहीत.काहीवेळा हेमलकसाला पोहोचेपर्यंत त्यांचा मृत्यू होतो. आमच्या सारख्या प्रगत राज्यातून शिक्षेची बदली म्हणून चंद्रपूरच्या जंगलात बदली केली जाते .पण गरजूंच्या अडचणीत हे सरकारी लोक कधीच कामी पडत नाहीत हे त्यांचे दुर्दैव.सरकारचे दुर्लक्ष आणि हेमलकसाची झेप या गोष्टी निदर्शनाला येत होत्या.  
     प्रकाश आणि मंदा आमटे यांच्या या संपूर्ण कार्यासमोर नतमस्तक होवून मी हेमलकसा चा निरोप घेतला.पुन्हा तेच जंगल होते पण यावेळी त्यातला आपलेपणा जास्त जाणवत होता.पुन्हा तोच प्रवास होता पण आकर्षण वेगळे होते.आता वेळ होती सोमनाथ प्रकल्पाला भेट देण्याची.
     'Ideal Village' अशी ओळख असलेल्या सोमनाथला आम्ही रात्रो पोहोचलो.उद्याची सकाळ काय घेऊन येणार या विचारावर मी डोळे मिटले.

     सकाळी उठलो.जितका स्वछ सूर्यप्रकाश होता तितकाच स्वछ परिसर होता.पहायला कुठून सुरुवात करावी हा विचार येण्याआधीच तिथल्या काकांनी आमचे हसून स्वागत केले.आम्ही आपसूकच त्यांच्या मागे चालू लागलो.
     शेती हाच आमचा गाभा आहे.आणि पर्यायाने प्रगतीची चावी.या बाबांच्या दूरदृष्टीची प्रचीती नजरेच्या प्रत्येक टप्प्यात येत होती.कित्त्येक एकर वर पसरलेल्या शेतीचे दर्शन घडत होते.सरकार ने पाणी देण्यासाठी मनाई केली होती.अशा वेळी आपण आपापले बंधारे बांधून त्यातून संपूर्ण शेती फुलविणे हे मोठे काम होते.बस मधुन जाताना एका बाजूला सरकारने जो बंधारा वापरू नये असा इशारा दिला होता तो बंधारा सोडून बाकीचे सुमारे सत्तावीस तलाव पाण्याने भरून वाहत होते.शासनाच्या अडाणीपणावर आलेले हसू लपविणे शक्य होत नव्हते.कोबी.फ्लॉवर वांगी यांची अथांग पसरलेली शेती 'सुजलाम सुफलाम' या वाक्याचा अर्थ सांगून जात होती.महारोगी,अपंग आणि इतर माणसे यातील फरक काय आहे याचे उत्तर माझ्याकडे नव्हते.बाबांच्या प्रयत्नाने यातील फरक नाहीसा केला होता.शेती आणि त्यासाठी बांधलेले बंधारे पाहून,आम्ही शिकतो ते इंजिनियरिंग आणि यांचे इंजिनियरिंग यातील दरी स्पष्ट होत होती.आम्ही ज्या आकृत्या प्रयोगशाळेत बसून काढतो त्या आकृत्या या लोकांनी प्रत्यक्षात उतरवल्या होत्या.टायरचा वापर करून बांधलेले बंधारे चक्रावून सोडणारे होते. दुष्काळी परिस्थितीचा योग्य विचार करून केलेली आखणी वाखाणण्याजोगी होती.कदाचित पदवी  नसेल या लोकांकडे पण त्यापेक्षा कित्त्येक पटींनी जास्त कुवत या लोकांची स्पष्ट दिसत होती.

     

     बारा एकर मध्ये लावलेली आमराई पाहून तोंडात बोटे घालायची वेळ आली होती.पण पुढे दिलेल्या माहितीने हसावे कि रडावे हेच कळेना.काकांनी सांगितले कि जरी हि आमराई आमची असली तरी त्यावर पहिला हक्क प्राण्यांचा आहे.ज्या झाडावर माकडे,  खारी किव्वा पक्षी असतील त्या झाडावरील एकही आंबा आम्ही खाली उतरवत नाही.आणि म्हणूनच इतकी मोठी आमराई असूनदेखील फक्त दोन वेळाच आम्ही इथले आंबे चाखलेले आहेत.निसर्गाने दिलेल्या संपत्तीवर सर्वांचा समान हक्क आहे.हे वाचलेले वाक्य आज प्रथमच अनुभवलेले निदर्शनास आले.
 
     बाबांची दूरदृष्टी कामाचा ध्यास आणि महारोग्याविषयीची तळमळ प्रत्येक ठिकाणी समोर येत होती.चपखल नियोजन आणि यथायोग्य मांडणी या जोरावर उभारलेले ते 'Ideal Village' पुन्हा एकदा कौतुक आणि आश्चर्य जागृत करून गेले.
     संपूर्ण शेत परिसर,बंधारे आणि विसावलेली घरे डोळ्यात साठवून आम्ही राहण्याच्या जागेवर परतलो.कमालीचे आश्चर्य,पराकोटीचा आदर या दोनच भावना  मनात होत्या.कारण सर्वप्रथम समाज आणि शासन यांच्या विरोधात उभे राहून अपंग आणि महारोगी यांच्या पुनर्वसनासाठी एकाकी लढा देणे आणि त्यांना स्वबळावर जगणे शिकविणे हे कार्य बाबांनी यशस्वी पणे करून दाखविले.आणि त्यांचा वारसा त्यांची मुले आणि नातवंडे समर्थपणे चालवत आहेत.
     महारोगी सेवा समितीच्या तीनही प्रकल्पांचा अनुभव घेऊन आता निघायची वेळ झाली होती.तीन दिवसाच्या या काळात बर्याच नवीन गोष्टी शिकलो, पाहिल्या आणि अनुभवल्या.समाजसेवा कशाला म्हणतात हे नव्याने समजले. 

   'शरीराच्या व्याधीवर उपचाराने मात करता येते,मनाच्या व्याधीला उपाय नसतो.'...हेच खरे..

    पुन्हा एकदा बस प्रवास करून परतलो...आणि रेल्वे नि पुणे स्टेशन वर....

    ....पाच दिवसापुर्वीची मानसिकता आणि आजची यात कमालीची तफावत होती...हे वेगळे सांगणे नको…

                                                                              हृषिकेश पांडकर
                                                                             
२१-०२-२०१