Friday, April 13, 2012

निसर्गाची प्रयोगशाळा

           समुद्र झाला,बर्फ झाला,डोंगर झाले,वाळवंट झाला आता वेळ होती जंगलाची...

          प्रत्येक वेळी निष्कर्ष एकच होता निसर्ग आणि माणूस यांच्या पारड्यामध्ये  पुन्हा एकदा निसर्गाचे पारडे खूप खाली गेले होते.

        १५ वर्षापूर्वी पिंजर्यात ठेवलेले वाघ हत्ती खूप पहिले. तारेच्या कुंपणात केविलवाणी ८/१० हरणे खूप वेळा पहिली त्याच बंदिस्त पाण्यात सुस्त पडलेली मगर पहिली होती.पण आज मी पिंजर्यात होतो आणि ते मोकळे होते .आज त्यांच्या homeground वर match होती.  
    
        ऑफिसची सुट्टी,bookings चा खटाटोप,प्रवासाचे सोपस्कार यांचे स्पीड ब्रेकर ओलांडून गाडीने जेव्हा 'Nagarahole National Park A Tiger Sanctury ' च्या कमानीत प्रवेश केला तेव्हाच निसर्गाच्या अजून एक अविष्कार माझ्यासमोर उलगडायला सुरुवात झाली होती.'काबिनी' नदीवर बांधलेल्या काबिनी धरणाच्या Back water मुळे National park चे तीन भागात विभाजन झाले आहे.आणि त्यातीलच एक म्हणजे Nagarhole National Park.
        Resort,Lodges,Hotels मध्ये check-in खूप  वेळा केले आहे पण तंबूतील check-in पहिल्यांदाच केले.
        त्या रस्त्यावरून तंबूपर्यंत चालत असतानाच मी इतका भांबावून गेलो होतो कि या पेक्षा काय वेगळा निसर्ग आपण पाहू शकतो याचे कोडेच मला उलगडेना.समोर पसरलेले पाणी,दृष्टीच्या दोन्ही बाजूस घनदाट झाडी.आणि झाडाआड लपलेले आमचे तंबू.





         तंबू मध्ये सामान ठेऊन बाहेर खुर्चीत येऊन बसलो.आणि निसर्गाची मजा बघा,४ तासाच्या कार प्रवासात असलेले उन सूर्यावर चादर घालावी तसे नाहीसे  झाले होते.ऐन एप्रिल महिन्यात आभाळ भरून आले होते.सूर्यास्ताला अवकाश होता पण ढगांनी पावसाचे संकेत आधीच  दिले होते.पण 'आत्ता कसला आलाय पाऊस' या कॅलेंडरच्या ऋतुंमध्ये अडकलेल्या आमच्या सारख्यांना तो निसर्गाचा यॉर्कर कधीच समजला नव्हता.दोन तंबूंमध्ये असलेल्या जागेमध्ये पानझडीमुळे गळलेल्या  पानांचा गालीचा तयार झाला होता.
           याचवेळी काबिनी धरणाच्या back water मधील Wild life पाहण्यासाठी आम्हाला निघायचे होते.आमच्या बोटीत एकूण १६ लोक होते ज्यामध्ये आम्ही चौघे,अजून एक couple,७ foreigners आणि गाईड आणि नावाडी.आमची बोट किनार्यापासून सुमारे २ कि.मी लांब आली होती.चारही बाजूंनी स्थिर पाण्याने आम्ही वेढले गेलो होतो.पाण्यात अर्धवट कापलेल्या झाडांच्या खोडावर बसलेले पांढरे शुभ्र बगळे 'आम्हाला बघा' अशा अविर्भावात बसले होते.श्रीलंका आणि स्कॉटलंड वरून स्थलांतरित झालेले पक्षी किनार्यावर शोभेच्या वस्तूंप्रमाणे मांडून ठेवलेले होते.



             सूर्य आपले अस्ताला जाण्याचे काम चोख बजावत होता.हवेतील गारवा सूर्यप्रकाशाला 'Indiarect Proprtion' मध्ये होता.तेवढ्यात नदीत असलेल्या छोट्या बेटांवर हत्तींचा कळप नजरेस पडला.आणि त्या पेशवे बागेतील हत्ती पहिल्यांदा पाहिल्यावर जो आनंद झाला होता त्यापेक्षा जास्त आनंद आणि कुतूहल वाटले..चिखलाच्या पाण्याने मढलेले हत्ती, त्याभोवती असलेली त्यांची पिल्ले.आणि संपूर्ण वाढ झालेले ते हस्तिदंत हे पाहताना विलक्षण आनंद मिळत होता.अजून थोडे जवळ गेलो तेव्हा स्वतःच्याच अंगावर चिखल उडवणारे हत्ती कदाचित सावध झाले असावेत.पण आज त्यांना याची जाणीव असावी कि समोर कॅमेरा धरून बसलेले आपल्याला इथे काय करू शकणार आहेत? आज आम्ही त्यांच्या राज्यात होतो.




            तसेच थोडे पुढे सरकलो आणि समोर पाहतो तर एक अजस्त्र मगर नुकतीच पाण्यातून बाहेर येऊन किनार्याला निपचित पडली होती.फोटो काढण्यासाठी कॅमेरे  सरसावले.सुमारे १२ फूट तर नक्कीच असेल.आमच्या बोटीचा अंदाज आल्याने ती पुन्हा पाण्यात गेली.दृश्य इतके भारी होते मगर पाण्यात उतरत आहे आणि आम्ही देखील पाण्यात आहोत या विचाराने क्षणभर नकोसे होत होते.पण एव्हाना आमची बोट पुढे निघून गेली होती.





          आता आम्ही बरेच आत मध्ये गेलो होतो.डावीकडे आणि उजवीकडे हरणांचे कळप च्या कळप गावात खाताना दिसत होता.हत्तींच्या कळपाला बिचकून बिचारे  गवतात तोंड घालत होता.मधेच एखादा bison दृष्टीस पडत होता.असंख्य पक्षी वाऱ्याशी स्पर्धा करत होते.किनार्यावर मोर आणि लांडोर स्पष्ट दिसत होते.
आणि पुढे एका बेटावर एक सुसर तोंड उघडून बसलेली होती आणि तिच्या अंगावर दोन तीन साळुंक्या फिरत होत्या.
एव्हाना विविध रंगांच्या छटांनी संपूर्ण आकाश भरून गेले होते.मोरांचा आवाज,मध्येच माकडाचे ओरडणे आणि वार्याचा आवाज यांना छेदत आम्ही पुढे जात होतो.बोटीच्या पुढे जाण्याने पाण्यात येणारे तरंग परीघ वाढवत नाहीसे होत होते.



         आता परत फिरायची वेळ झाली होती.आम्ही बोट वळवली आणि परतीचा प्रवास सुरु झाला.वार्याचा वेग वाढला होता.आणि समोरचे ढग आता काळे होऊ लागले होते.आता पाऊस पडणार असे वाटून बोटीतील प्रत्येक जण अजून आनंदी झाला होता.आणि क्षणार्धात बारीक पावसाला सुरुवात झाली.वार्याचा वेग प्रचंड झाला होता,पाऊस भुरभूर येऊ लागला होता.नजर जाईल तिथपर्यंत नदीच होती.मध्ये मध्ये एखादे बेट दिसत होता.पावसामुळे किनार्याला असलेले प्राणी अचानक कुठेतरी दडी मारून बसले होते.आणि पावसाचा वेग देखील वाऱ्याशी स्पर्धा करू लागला,आतापर्यंत भुरभूर येणारा पाऊस चेहेर्यावर येऊन आदळू लागला.इतकावेळ दिसणारी किनाऱ्यावरची हिरवळ दिसेनाशी झाली होती.पावसाचा जोर इतका झाला होता कि पावसाचे पाणी सहज बोटीत येऊन पडत होते.बोटीतील प्रत्येक जण संपूर्ण ओला झाला होता.वर आणि पाऊस यांच्या खेळत आम्ही तुडवून निघत होतो.इतकावेळ डोळ्याला लावलेले कॅमेरे केव्हाच बोटीच्या बंद कपाटात गेले होते.पाऊस पाऊस म्हणून मगाशी  चेहेर्यावर आलेल्या आनंदाची जागा भीतीनी घेतलेली स्पष्ट पणे जाणवत होती.बोटीचे हेलकावे झुलत्या पाळण्याला लाजवतील असे होते.भिजलेला अंगामुळे थंडीनी
आपल्या सर्व मर्यादा केव्हाच सोडल्या होत्या.वार्याच्या वेगापुढे बोटीच्या इंजिनाचा थांगपत्ताही लागत नव्हता .
आता एकच उद्दिष्ट होते कि बोट फक्त एखाद्या बेटाच्या किनार्याला टेकवणे.पण वर आणि पावसाच्या इच्छेपुढे बिचारा नावाडी हतबल होता.इतकावेळ वाटणारी बोट सफारी आता suffer होऊ लागली होती.वार्यामुळे तयार झालेल्या लाटांमुळे बोट आता हेलखावे खात होती.मी सर्वात शेवटी बसलो होतो.त्यामुळे मागे असलेले मोटर  इंजिन आणि दिशादर्शक सुकाणू असून नसल्यासारखे झाले आहेत हे मला स्पष्ट जाणवत होते.आमच्या नावाड्याने कशीबशी बोट एका बेटावर लावली.पण तिथे उतरायची सोय नव्हती कारण मगाशी याच बेटावर आम्ही १३ फुटी मगरीचे फोटो काढले होते.

         या वार्यात मला पोहता येऊ शकेल का हा शेवटचा विचार मनात होता.आणि पाण्यात समजा पडलो तर मगाशी पाहिलेली मगर आणि सुसर आत्ता कुठे असू शकतील याचा विचार करण्याची देखील माझी हिम्मत होत नव्हती.
थोड्या वेळात पाऊस थांबला आणि वारा देखील जरा विसावला होता.क्षणभर आलेली डोळ्यासमोरील अंधेरी आता कमी झाल्यासारखी वाटत होती.सुकाणू आणि मोटर पाण्यात टाकून पुन्हा एकदा आम्ही परतीला सुरुवात केली.बोटीत जमलेले पाणी आधी बाहेर काढले.
        अंगावरील घातलेले सर्व कपडे ओले झाले होते.थंडीची सवय झाली होती.अंधार पडायला सुरुवात झाली होती.येताना असलेला उत्साह केव्हाच बुडून गेला होता.आधी किनार्याला पोहचू या विचारात आम्ही निघालो होतो.मगाशी दिसणारा निसर्ग आणि आता असलेला तोच निसर्ग याची तफावत डोळ्याला जाणवत होती आणि मनालाही.
        बोट व्यवस्थित पुढे सरकत होती.वार्याची जागा थंड हवेने घेतली होती.आपण कसे घाबरलो याचे वर्णन आम्ही एकमेकांना करत होतो.आता भीती जराशी ओसरली होती.किनारा जवळ येत होता.अर्ध्यातासात आम्ही किनार्याला आलो होतो.आता चेहरे पुन्हा हसरे झाले होते.अंधार आपली स्थिती मजबूत करीत होता.उतरल्यावर संपूर्ण किनार्यावर बेडकांचे साम्राज्य पसरले होते.पाणी शांत झाले होते.आजूबाजूचे प्राणी झोपेच्या ओढीने अभयारण्यात शिरले होते.नदीत असलेल्या झाडांवरील पक्षी उडून केव्हाच पसार झाले होते .आम्ही आमची life jackets काढून परत केली.वाटेत असलेले बेडूक चुकवत आणि निसर्गाच्या या खेळीचे कौतुक करत तंबूकडे परतलो.

           हवेत गारवा पसरला होता,मी आवरून पुन्हा तंबूबाहेर येऊन बसलो.हातात गरम चहाचा कप होता,पक्षांचे आवाज शमले होते,माकडांचा आवाज नाहीसा झाला होता.रातकिड्यांची पहाट झाली होती.वटवाघुळे उगीचच इकडे तिकडे फिरताना दिसत होती.मधूनच येणारा मोराचा आवाज थांबला होता....




             जंगल झोपेच्या तयारीत होते...आणि मी पण...

          दुसरा दिवशीचा सूर्यच कुतूहल घेऊन उगवला होता.आज वेळ होती जंगल आतून पाहण्याची.याआधी जंगलात जाऊन प्राणी पाहणे हि गोष्ट मी कधीच केली नव्हती.

          आवरणे,चहापाणी या गोष्टींचा वेळ सोडला तर ५ व्या मिनिटाला आम्ही गाडीमध्ये बसलो होतो.जंगलाला देखील आता व्यवस्थित जाग आली होती.मी माझे तीन मित्र  ड्रायव्हर आणि गाईड असे ६ जण आम्ही जंगला कडे निघालो.सुमारे ७ ची वेळ होती.पहाटेचे धुके आणि कालचा पाऊस याच्यामुळे हवेत गारवा आला होता.योग्य  परवानगी घेऊन आम्ही जंगलात प्रवेश केला.गर्द झाडी,दूरवर दिसणारे धुके.रस्ता नसल्यामुळे हेंदकाळत चालणारी आमची जीप आणि रात्रीच्या झोपेनंतर जागे झालेल्या पक्षांचा किलबिलाट.

        आता खर्या अर्थी जंगल सफारी सुरु झाली होती.सुरुवातीला एका प्रसन्न हरणाच्या कळपाने आमचे स्वागत केले.नेहमीच गरीब वाटणारी ती हरणे कळपाने चरत होती.जीपच्या आवाजाने त्यांचे कान टवकारले गेले खरे पण ती पळून गेली नाहीत.व्यवस्थित आणि शांतपणे चरणारी ती हरणे पाहून पेशवे पार्कातील आणि आज इथली हरणे यातील फरक मला रास्त वाटला.



          पुढे जात असताना असंख्य माहित नसलेले पक्षी नजरेस येत होते. आमचा गाईड त्यांची नावे सांगत होता.प्रचंड कमी वेगात आमची जीप पुढे जात होती.जंगल नजरेत साठवण्याचे काम मी करत होतो.तेवढ्यात आमच्या गाडी समोरून ( समोरून म्हणजे पुण्यात गाडी चालवताना सायकलवाला जसा समोर येतो तसं समोरून ) मोर  पळत गेला आणि डाव्या बाजूला जाऊन थांबला.मोरपंखी रंग हे या रंगाचे नाव याच्यामुळे पडले यावर  माझी खात्री पटली.मोराच्या मानेचा भाग आणि पिसारा इतका  जवळून पाहताना याला आपला 'राष्टीय पक्षी' निवडताना फार त्रास झाला नसेल असे मला वाटायला लागले.फुललेला पिसारा पाहायला मिळाला नाही पण मिटलेला  पिसारा घेऊन पाळणारा मोर देखील अतिशय सुंदर दिसतो हे आज पाहायला मिळाले.



       मोराचा विषय संपवून गाडी अजून थोडी पुढे गेली आणि ड्रायव्हरने करकचून ब्रेक दाबला आणि जमिनीवर बोट दाखवून पाहायला सांगितले.कोणालाही काही  सांगायची गरज नव्हती.कारण आता राष्ट्रीय पक्षानंतर पाळी होती राष्ट्रीय प्राण्याची.सुमारे साडेतीन इंचाचा वाघाच्या पावलाचा तो ठसा होता.आम्ही त्याला विचारले  कि 'कधी गेला असेल वाघ इथून ?'  तो शांतपणे म्हणाला कि ' झाला असेल अर्धातास'.मी सहज म्हणून चौफेर नजर फिरवली आणि पुन्हा एकदा त्या पंजाकडे  पहाट राहिलो.पायधूळ घ्यावी कि काय असा विचार एकदा मनात येण्याइतपत मला वाघाचे कुतूहल होते.पुन्हा एकदा ते ठसे पाहून आम्ही पुढे निघालो.




          लक्ष्मी रोड वर लोक दिसावीत तसे हरणांचे कळप दृष्टीस पडत होते.मोठी मोठी माकडे आमच्या बरोबरीने पुढे येत होती.मध्ये एखादा हत्तींचा कळप राजेशाही थाटात  सहकुटुंब सहपरिवार बांबूच्या झाडत न्याहारी करत असलेला दिसत होता.या प्राण्याचा राजेशाही तहात लगेच कळून येत होता.आपण आणि आपले खाणे या पलीकडे त्याला कशाचीही काही पडलेली नव्हती.त्यांनी आमच्याकडे पाहिले देखील नाही.

           अचानक एक जंगली कुत्र्यांची टोळी आमच्या नजरेस पडली.नेहमी टोळीने हल्ला करणारे म्हणून यांची ओळख प्रसिद्ध आहे.आम्ही तिथेच गाडी थांबवली. ड्रायव्हर ने आम्हाला शांत राहण्यास सांगितले .शेजारी असलेल्या हरणाच्या कळपावर त्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केला आणि २ क्षणामध्ये एका हरणाची आर्त  किंकाळी कानावर आली.क्षणार्धात शांतता पसरली.इतक्यावेळ ओरडणारे माकड निपचित पडले.आणि ड्रायव्हर ने हरीण गेल्याचे confirm केले.
थोडे वाईट वाटले पण याच तत्वावर जंगल जगते याची खात्री पटली.




       एव्हाना  उन्हं डोक्यावर आली होती.पण डोक्यावरील झाडांनी याची चाहूल लागू दिली नाही. पुढे जात असताना एक भला मोठा रानगवा नजरेस पडला.गाडीच्या उजव्या बाजूला असलेला गवा मोठ्या दिमाखात समोरून चालत डाव्या बाजूला गेला.महाकाय असलेला गवा चालत असताना आमच्या तोंडातून एक शब्द देखील फुटला नाही.सुमारे १० फुट लांब आणि साडेतीन फुटी रुंद असा तो देह समोरून चालत असताना कॅमेर्याचे बटन दाबण्या खेरीज आमच्याकडून काहीही घडले नाही.



        तिथून पुढे निघालो पाणवठ्यावर हत्तींचा कळप विसावला होता.मधूनच एखादी जंगली कोंबडी आपले अस्तित्व स्पष्ट करीत होती.जिथे जिथे पाणी दिसेल तिथे तिथे  बदक आणि बगळे आपली हजेरी लावत होते.
पक्षांचा किलबिलाट,माकडाचे ते typical ओरडणे,जंगली खारीचा तो बसका आवाज याने जंगलाची शांतता विस्कळीत होत होती.
        काही वेळात आम्ही जंगलाबाहेर पडलो.फोटो काढणाऱ्यांचे कॅमेरे भरले होते.माझे मन भरले होते.ज्या गोष्टी साठवता येतील त्या घेऊन मी जंगलाबाहेर पडत होतो.
       वाघ बघायला मिळाला नाही याची खंत सलत होती.पण हल्ली फोन करून कोणाच्या घरी गेलो तर ती लोक भेटतील याची खात्री नाही देता येत.इथे तर आम्ही त्यांच्या घरी न सांगताच गेलो होतो.
        का कोण जाणे पण बाहेरील डांबरी रस्त्याच्या आरामदायी प्रवास जंगलातील खडबडीत रस्त्याइतका सुसह्य वाटत नव्हता.

        प्राण्यांच्या राहणीमानाचा हेवा करत आम्ही पुन्हा आमच्या तंबूत परतलो, आता जंगल सोडायची वेळ आली होती.निसर्गाच्या या चमत्काराचा निरोप घ्यायची अजिबात इच्छा नव्हती.

      सामान गाडीत भरले आणि निसर्गाच्या प्रयोगशाळेतून बाहेर पडलो...








      अभयारण्याची हद्द सोडली आणि highway वर आलो...मागे हिरवा निसर्ग हसत होता..आणि पुढे उन्हाने तापलेल्या डांबरी रस्त्यावरील मृगजळ....


                                                    
                                                                                                 फोटोस - गंधार पारखी

                                                                                                 - हृषीकेश पांडकर
                                                                                                 १३-०४-२०१२