Tuesday, April 7, 2020

अशी रविवार सकाळ

 

युद्ध इतके चालले नाही..पूर,भूकंप,ज्वालामुखीही कधी इतका टिकला नाही..

जिल्हा,शहर,देश सोडाहो...जगही यातून सुटले नाही..

जगाच्या नकाशावरील शंकरपाळीसारख्या भारतात तिळभर पुण्यातील माझी सकाळ काही वेगळीच होती..

रविवार सकाळ असून देखील रस्ते,मैदाने आणि हॉटेल मात्र तशीच निपचित नि बंद होती..

सहज डोक्यात विचार आला..आठवड्याचा आळस झटकायला पुण्याचा एक फेरफटका करावा..

काय म्हणतंय थंड,बंद आणि ठप्प पुणं याचा थोडा कानोसा घ्यावा..

दहा दिवसाची धूळ झटकून दुचाकीला दिला धक्का..

गर्दी,सिग्नल,हॉर्न आणि प्रदूषण यांच्या शिवायच पालथा घातला रस्ता अख्खा..

दगडूशेठ गणपती खिडकीतून सहज डोकावत होता..

हार तुऱ्यांच्या ओझ्यावाचून तो हि काहीसा निवांत होता..

मोकळा गाभारा कदाचित सुसह्य वाटत असावा त्याला..

'चल आता हा प्रश्न सोडवून दाखव' म्हणणाऱ्या आजोबांसारखा गालातल्या गालात हसत होता..

मंडई आज फक्त एक आठ पाकळ्यांची दगडी इमारत होती..

लोकमान्य आणि शारदा-गजानन सोडले तर बाकी निर्जीव हवेली होती..

इतके स्तब्ध असलेले खुद्द टिळकच आज तेवढे भाजीला आले होते..

ना प्रेमाने चार मिरच्या जास्त देणाऱ्या आजी..ना घासाघीस करणारे काका काकू होते..

अप्पा बळवंत चौक हा फक्त नावाला चौक उरला होता..

प्रभातचा सिनेमा तर लांबच..वीतभर पान आणि शिसपेन्सिल मिळायचा सुद्धा खोळंबा होता..

पुस्तक वह्यांचा गठ्ठयामागे लपलेली जोगेश्वरी ची नाजूक समयी तेवढी आज सहज दिसत होती..

या संकट समयी खांबीर असलेल्या फरासखान्याला बहुदा आशेची ऊब देत होती..

पेशव्यांचा गणपती, कसबा गणपती,लाल महाल अन शनिवारवाडा या अभूतपूर्व शांततेत गप्पांमध्ये रंगले...

सोन्याच्या नांगरापासून शाहिस्तेखानाच्या बोटांपर्यंत आणि अटकेपार लावलेल्या झेंड्यापासून ते सुंदर अशा मस्तानी पर्यंत चौघेही मनसोक्त दंगले...

बाजीरावांचा स्तब्ध अश्व आज पुन्हा धावत असलेला भासला..

या निशब्द शांततेतही समोरचा तिरंगा डौलाने फडकत हसला...

हजारो नागरिकांना रोज पाठीवरून वाहणाऱ्या PMT बसेस शिक्षा केल्यासारख्या खेटून उभ्या होत्या..

शेजारच्या वास्तूतील सरकारी लोकांच्या पुढल्या इशाऱ्याची जणू वाटच त्या पाहत होत्या..

झाशीची राणी आणि संभाजी महाराज घोड्यावरून हि शांतता अनुभवत होते..

अविरत वाहणाऱ्या संभाजी रस्त्याला आज एका वेगळ्याच रूपात निरखत होते..

त्या संभाजी बागेतल्या रणगाड्यालाही आज पटले असेल कदाचित...

सगळीच युद्ध रणगाडे,बंदुका आणि बॉम्बने जिंकता येत नसतात..

अशी धैर्य दाखवून पाळलेली शांतता आणि सय्यम देखील मोठी संकट परतवित असतात..

तरुणाईने ओथंबलेला फर्ग्युसन रस्ता निर्मनुष्य आणि ओस होता..

गुडलक,रुपाली,वैशाली यांना हसून वाकुल्या दाखवत होता..

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वास्तूची अवस्था याहून काही आगळी नव्हती..

प्लेग मधून सरल्यामुळे मात्र हि गोष्ट तिला तितकीशी नवखी नव्हती.

लक्ष्मी रस्त्यावरील स्तब्ध पुतळे या शांततेत आज हितगुज करताना दिसले..

मेन्स अवेन्यू मधले काही आज कासट मध्ये दिसले..

मानाचा चौथा गजानन आणि टुमदार मंदिरातला राम यांच्याशिवाय तुळशीबागेत कमालीचा शुकशुकाट होता..

तुळशीबागेत असलेला हा पुरुषांचा दबदबा न भूतो न भविष्यती असाच काहीसा होता..

चितळे बंधू,काका हलवाई यांच्या बंद कुलुपावरही आता धूळ जमली होती..

'इथलं गोडाचं संपल' असं वाटून आता मुंग्यांनीही रांग बदलली होती..

होळी थोडक्यात सुटली..गुढी पाडवा मात्र पुरता अडकला..

उघडण्याची आस लागलेल्या अक्षय तृतीयेचा धीर आता सुटत चालला...

पिवळे हेल्मेटविर,मोठ्या क्रेन यांच्या विना मेट्रोचे काम अगदीच ठप्प होते..

अर्धवट बांधकामाखाली सावलीला आज चिटपाखरूही नव्हते..

कधी होणार मेट्रो या प्रश्नाला तूर्तास तरी वाली नव्हता..

तो प्रश्न तसाच 'बटाटयाच्या चाळी सारखा' पुन्हा भिजत पडला होता..

सावरकर स्मारकातील विनायकांपासून ते कर्वे पुतळ्याच्या कर्व्यांपर्यंत सगळेच आज अचंबित होते..

'लॉकडाउन' चे पालन करणाऱ्या जनतेकडे अश्वारूढ छत्रपती अभिमानाने पाहत होते..

या सगळ्या शांततेत ससून,सह्याद्री,पूना आणि इतर वैद्यकीय सेवा मात्र अविरत चालू होत्या..

पोलीस,स्वछता कर्मचारी आणि जीवनावश्यक वस्तूंची काळजी घेणाऱ्या सर्वांसोबत खंबीरपणे किल्ला लढवत होत्या..

विद्येचे माहेरघर पालथे घालून मी हि शेवटी घरी परतलो..

न दिसणाऱ्या विषाणूची लीला पाहून क्षणभर काहीसा थबकलो..

सुसह्य असली तरी अशी रविवार सकाळ मला कदापिही भविष्यात नको..

जगाची विस्कटलेली घडी नीट बसून सगळं काही आलबेल व्हावं हीच आशा व्यक्त करतो..

हृषिकेश पांडकर

०७.०४.२०२०

स्टे इन.. स्टे सेफ..!!!

Friday, March 27, 2020

lockdown

 

आज मला कळले भारताची रत्न आणि भारतरत्न यात कमालीची तफावत असते..

कला, क्रीडा, संगीत, सिनेमा,नाटक आणि राजकारण यांच्यावरही कोणी तरी नक्की असते..

आज मला कळले की बाईनी 'गपचूप वर्गात बसायचे' सांगितल्यावर वर्गात बसणारी फक्त लहान मुलचं नाहीयेत..

'कल से आगे के इक्कीस दिन के लिये कोई घर से बाहर नही निकलेगा' असं पंतप्रधानांनी सांगितल्यावर संबंध देशवासीय सुद्धा घरीच बसलेत..

आज मला कळले की ट्रिप,पार्टी,हॅन्ग-आउट,नाईट-आऊट याविना काहीच घंटा अडत नसते..

जुने फोटो,फोन वर गप्पा,जोपासलेले छंद आणि घरचे जेवण या गोष्टींचे आचरण त्याहीपेक्षा जास्त समर्थ असते..

आज मला कळले पोटाच्या खळगी समोर जिभेचा चोचला अधिक उथळ असतो..

चार गुलाबजामांपुढे चार पोळ्यांचा पगडा हातभार खाली असतो..

आज मला कळले क्रोसीन,डिस्प्रिन,कॉम्बीफ्लाम आणि पॅरासिटामोल हे निव्वळ भ्रम असतात..

गरम पाणी,हळद-दूध,मिठाचे पाणी,ओवा,गूळ आणि साधी वामकुक्षी या गोष्टी देखील सहज किल्ला लढवतात..

आज मला कळले अर्जंट पोहोच,अर्जंट भेटू,अर्जंट पाहिजे,अर्जंट निघा यात अर्जंट असं काहीच नसत..

तुम्हाला उशीर झाला,तुम्ही नाही गेला म्हणून कोणीच,काहीच आणि कधीच थांबत नसत..

आज मला कळले की गॅलरी मधून दिसणारी गाड्यांची वर्दळ,माणसांची ये-जा,फेरीवाले,स्टॅन्ड वरच्या रिक्षा आणि कट्यावरची आजोबा मंडळी यांच्या पलीकडे सुद्धा काही दृश्य लपलेली असतात..

हळूच तरंगत येऊन रिकाम्या रस्त्यावर घरंगणारी झाडाची पानं,आपल्या घरट्यासाठी अविरत काड्या गोळा करणारे पक्षी आणि सूर्याच्या प्रवासानुसार जागा बदलणाऱ्या झाडांच्या सावल्या या गोष्टी काचेवरची धूळ झटकून स्वच्छ दिसाव्या अशा नजरेला येतात..

आज मला कळले की इमारत बांधणारा कामगार वर्ग निव्वळ मुंडासं बांधून विटा वाहणे आणि सिमेंट वाळू एकत्र करून भिंती लिंपत नसतो..

बिडीचे झुरके घेत क्रिकेट खेळणे आणि तान्ह्या बाळाला प्रेमाने न्हाऊ घालणे हा पण त्यांचा विरंगुळा असतो..

आज मला कळले व्हेंटिलेटर,बायोप्सी,ECG,डायलेसिस,स्कॅन,टेस्ट,एक्सरे,MRI यांचा वापर हा तर उपचाराचा दुय्यम मार्ग असतो..

'गप गुमान मुकाट्याने घरात बसणे' याच उपायाने शेवटी गुण येणार असतो..

आज मला कळले गुळगुळीत फरशांचे मॉल,थंडगार AC मध्ये मांडलेल्या हिरव्यागार भाज्या आणि पॉपकॉर्न घेऊन रिक्लायनर वर पडून भव्य पडद्यावर पाहिलेले सिनेमे हे जीवनाचे अविभाज्य घटक कधीच नसतात..

खालचा किराणावाला,शेजारचा चार टोपल्यांचा भाजीवाला आणि घरचा ३८ इंची पडदा यासाठी कायमच सक्षम असतात..

आज मला कळले की निर्विकार चेहरा,अरसिक व्यक्तिमत्व,अबोल स्वभाव यांच्यामागे देखील अविश्वसनीय प्रतिभा दडलेली असते..

एरवी केवळ नावाला असलेली आणि दखलाही न घेतलेली जाणारी मंडळी सुप्त कलेने आणि लपलेल्या गुणांनी अचंबित करत असते..

आज मला कळले की प्रत्येक वेळी देशासाठी लढणे म्हणजे सीमेवर जाऊन बंदूक हातात घेणे नसते ..

घरात बसून स्वतःची आणि पर्यायाने सर्वांची काळजी घेणे देखील देशसेवेपेक्षा तसूभरही कमी नसते..

आज मला कळले की जिंकलेला सामना,जिंकलेली लढाई,एखादा सण किव्वा तत्सम गोष्टीच फक्त देशाला एकत्र आणत नसतात..

शिंकल्यावर सुद्धा पसरणारा आणि डोळ्याला सुद्धा न दिसणारा सूक्ष्म जीव देखील या १०० करोड लोकांना लढण्याचे सामर्थ्य आणि एकी देऊन जात असतात..

आज मला कळले की कमळ,पंजा,घड्याळ,हत्ती आणि इंजिन यांच्यातली लढाई हि शेवटी लुटुपुटुचीच ठरते..

जेव्हा देशावरचेच आभाळ फाटायला सुरुवात होते तेव्हा झेंडयावर अशोकचक्रच लावावे लागते...

आज मला कळले की देशाच्या लोकशाहीचा गाडा वाहणारे चार स्तंभ म्हणजे न्यायपालिका,अधिकारी वर्ग,प्रशासन आणि प्रसार माध्यमे हे जरी असले तरी..

खऱ्या अर्थाने आणि अविरतपणे देश जिवंत ठेवणाऱ्या चार स्तंभांनी म्हणजे वैद्यकीय अधिकारी,स्वच्छता अधिकारी,सरकारी अधिकारी आणि सर्व गोष्टींच्या अंमलबजावणीवर डोळ्यात तेल घालून निगराणी ठेवणारे पोलीस आणि लष्करी अधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थाने आज देश पेलतो..

#lockdown #fightagainstcorona

हृषिकेश पांडकर

२७.०३.२०२०

 

Wednesday, February 19, 2020

शिवजयंती

 

'पिकतं तिथं विकत नाही' आणि 'गाढवाला गुळाची चव काय' या वास्तविक दोन भिन्न अर्थाच्या म्हणी आहेत.पण सद्य परिस्थिती पाहता काही अंशी या दोन्ही म्हणी आपल्याला चपखल बसतात.

आज शिव छत्रपतींची जयंती. एकाच व्यक्तीची जयंती एकाच वर्षात एक पेक्षा जास्त वेळा साजरा करणारा कदाचित भारत हा पहिलाच देश असेल.

शिवरायांची मूल्य,कर्तृत्व,विचारधारा,किल्ले आणि तत्सम असंख्य वास्तू या सर्व खजिन्याचा वारसा सोडून आपण इतर नको त्या गोष्टी पुढे घेऊन आलो हे आपले दुर्दैव.राजकारणासाठी राजांचे नाव,शक्ती प्रदर्शनासाठी राजांचे नाव,स्मारक बांधणी आणि गडांच्या डागडुजीसाठी निधीसंकलनापुरते महाराजांचे नाव,तुटपुंज्या मतांसाठी महाराजांचे नाव आणि या दोन जयंत्यांच्या दिवशी 'जाणता राजा' लिहिलेला भगवा मिरवण्यापुरतेच आपले छत्रपती आपल्यात शिल्लक आहेत का ?


 

हा वर टाकलेला फोटो ऍमस्टरडॅम मधील 'Rijksmuseum' या संग्रहालयातील आहे. वेळेअभावी या संग्रहालयात जाऊन हे चित्र प्रत्यक्ष पाहता आले नाही पण या संग्रहालयाच्या प्रवेशदारा शेजारी असलेल्या लॉबीमध्ये याच चित्राचे छोट्या आकाराचे छायाचित्र लावलेले आहे ते पाहिले.'Rijksmuseum' हे डच राष्ट्रीय संग्रहालय आहे. युरोपातील इतर भव्य संग्रहालयांच्या तुलनेत काहीसे लहान. कला आणि इतिहास येथे जपण्याचा प्रयत्न केला आहे आणि तिथे हे चित्र पहायला मिळते.

कागदावर जलरंगात रेखाटलेले हे चित्र. मुख्यत्वे सोनेरी,काळा आणि पांढरा हे रंग यात वापरलेले आहेत.कलाकाराच्या नावाचा उल्लेख येथे नाहीये किव्वा तितकी माहिती उपलब्ध नाहीये.पण चित्र नीट पाहिल्यावर समजते कि २/३ ओळींचे चित्राबद्दलचे वर्णन डच भाषेत खाली लिहिलेले आहे.

हे सांगायचा मुद्दा एवढाच कि यूरोपातील कोणत्या एका छोट्या शहरातील तश्याच काहीश्या लहान संग्रहालयात हे छत्रपतींचे चित्र जतन करून ठेवले आहे. आता ही गोष्ट घराच्या गच्चीवरून सिंहगड,तोरणा आणि हाकेच्या अंतरावर लाल महाल असणाऱ्यांना किती अभिमानाची असेल आणि असायलाच हवी.

कधीही कोणाचे सहजासहजी कौतुक न करणारे गोरे लोक जर कौतुकाने आदराने महाराजांचा फोटो आपल्या संग्रहालयात ठेवत असतील तर त्या राज्याचे मोठेपण काय असले पाहिजे.आणि असा राजा आपला होता हे आपले भाग्य किती थोर.

पण दुर्दैवाने आज लाल महाल आपण नीट जतन करू शकलो नाही किव्वा तोरणा,सिंहगड,पुरंदर,राजगड रायगड यांसारख्या अभेद्य स्मारकांना ऐतिहासिक वारशाचे तितकेसे महत्व देऊ शकलो नाही.

चूक कोणाची,जबाबदारी कोणाची त्यामागचे राजकारण,समाजकारण आणि अर्थकारण हा मुद्दा इथे घ्यायचाच नाहीये पण सोन्यासारखा इतिहास आणि छत्रपतींसारख्या राजाचे छत्र लाभलेला आपला महाराष्ट्र आज त्यांच्याच आठवणी जपण्यात अपयशी ठरला ही खंत या फोटोकडे बघताना येत राहते.

राजांविषयी अभ्यासपूर्ण लिहिणारा किव्वा बोलणारा यात मी कुठेच नाही. पण एक भारतीय म्हणून सातासमुद्रापार जेव्हा आपण असे अनुभव घेतो तेव्हा ही सल प्रकर्षाने बोचते एवढे नक्की. म्हणूनच कदाचित 'पिकतं तिथं विकत नाही' आणि 'गाढवाला गुळाची चव काय' या दोन्ही म्हणी आपल्यालाच तंतोतंत लागू होतात याचा प्रत्यय येतो.

'राजे तुम्ही परत या' असे आपण मोठ्या आवेशात म्हणतो तेव्हा राजांचेच असलेले तेव्हाचे सुराज्य आणि साम्राज्य त्याच राजांसमोर आपण तेवढ्याच अभिमानाने दाखवू शकू का हा प्रश्न तेवढाच अनुत्तरित राहतो..

शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा !!!

हृषिकेश पांडकर

१९.०२.२०२०