ग्रँड कॅनियन म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर अमेरिका येते हे आपले दुर्दैव आहे. केवळ जगासमोर म्हणावं तेवढं पोहोचलं नाही म्हणून ते तितकसं प्रसिध्द नाही. कालांतराने या जागेची ओळख भारताचे 'ग्रँड कॅनियन' अशी झाली. निसर्गाने निर्माण केलेली गोष्ट ही प्रतिकृती कशी असू शकते ? प्रति बालाजी, प्रति शिर्डी इथपर्यंत ठीक आहे पण प्रति ग्रँड कॅनियन ?
वाहत्या नदीच्या प्रवाह वेगाने उभ्या पर्वताला छेदत जेव्हा पाणी वाट काढत जाते तेव्हा त्यातून तयार होणारा हा नैसर्गिक चमत्कार. आज याच चमत्काराला विस्तारून लिहितोय.
दक्षिण भारतातील आंध्रप्रदेश राज्यात असलेल्या कडप्पा तालुक्यात लपलेले ही भौगोलिक आश्चर्य. एरामाला डोंगर रांगांमधून वाहणारी पेन्नार नदी. अनेक वर्ष या डोंगर रांगांना चिरत वाहणारी नदी आणि त्या घर्षणाने तयार झालेली ही महाकाय दरी किंवा खिंड. डोंगर पोखरून तयार झालेली ही विस्तीर्ण खिंड. पर्वतरांगेवर उभे राहून ही डोंगर छेदत जाणारी नदी पाहणे हा कमालीचा अनुभव आहे. अर्थात तितकीशी नावलौकिक न मिळाल्याने पर्यटकांची संख्या अजिबातच नाही. वरून दिसणारी नागमोडी खोल दरी भौगोलिक अचंबा आहे.
मावळत्या सूर्यप्रकाशात ते कापलेले पर्वत पाहताना चकाकणाऱ्या सोन्याचा भास व्हावा इतकं नितळ ते दृश्य असते. लहानपणी मॅकेना'स गोल्ड नावाचा चित्रपट पाहिला होता. त्यात असलेल्या सोन्याचा खजिना आणि सिनेमाचे शूटिंग जिथे झाले ती जागा आपल्या या गंडीकोटा पेक्षा तसूभरही वेगळी नाही.कातळ कापून वाहणारी नदी वरून पाहताना प्रचंड गंभीर भासते. सूर्याच्या जागेनुसार चमकणारे कातळ आणि उभ्या कपारींची त्यानुसार पाण्यात पडणारी सावली लक्ष वेधत राहते.
उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात दिसणारे वेगवेगळे रंग या संपूर्ण परिसराचे सौंदर्य वाढवतात. पेन्नार नदी जरी बारमाही नसली तरी कृष्णा नदीवर असलेल्या गंडीकोटा, मैलावरम आणि श्रीशैलम या धरणांमुळे सदैव सुजलाम असते.
या ग्रँड कॅनियनला लागूनच १३ व्या शतकात बांधलेला गंडीकोटा किल्ला आहे. कल्याणी चालुक्य, पेम्मासानी नायक आणि गोवळकोंडा साम्राज्य यांसारख्या विविध राजवंशांसाठी हा किल्ला सत्तेचा केंद्रबिंदू होता. किल्ल्याच्या आतमध्ये असलेले विजयनगर शैलीतील माधवराय मंदिर अप्रतिम आहे. याचबरोबर बांधलेली जामा मशीद लक्ष वेधून घेते. किल्ल्याच्या एका बाजूस असलेली मजबूत तटबंदी आणि दुसऱ्या बाजूस असलेला ही भौगोलिक अभेद्य तटबंदी किल्ल्याचे महत्त्व जपून आहे. आत असलेले धान्याचे कोठार देखील भव्य आणि सुस्थितीत आहे. याबरोबरच असलेला चारमिनारच्या आकाराचा कैदखाना पाहण्यासारखा आहे.
सूर्यास्त आणि सूर्योदय या दोनही वेळा इथला भिन्न अनुभव देतात. मावळणारा सूर्य संपूर्ण दरी आणि परिसर सोनेरी करतो तर इथला शांत आणि थंड सूर्योदय हा संपूर्ण परिसर प्रसन्न बनवतो. टेकडीवर उभे राहून एका बाजूस किल्ला आणि दुसऱ्या बाजूस हा कॅनियन पाहताना ऐतिहासिक आणि भौगोलिक या दोन्ही निर्मितींचे आश्चर्य वाटत राहते.
तसे हे ठिकाण खूप चर्चेत कधीच नव्हते. पण इतका मोठा चमत्कार आपल्याकडे पण आहे हे दाखवण्याचा मोह याआधी कोणाला कसा झाला नाही याचे आश्चर्य वाटते. किल्ल्याचा जवळ पर्यटकांसाठीच्या सोयी फार नाहीयेत. पण प्राथमिक सोयी होऊ शकतील अशी परिस्थिती आता निर्माण होत आहे. किल्ला किंवा कॅनियन पाहण्यासाठी कुठलेही शुल्क देखील नाहीये ( अजून तरी ). आंध्रप्रदेशात आणि तेही कडप्पा सारख्या दुर्गम भागात सहज जाणे होणे दुरापास्तच आहे. पण हा नैसर्गिक चमत्कार पाहण्यासाठी आणि लहान मुलांना दाखवण्यासाठी नक्की जा.
हेलिकॉप्टर राईड करून आणि हजारो पैसे भरून अमेरिकेतील ऍरिझोना राज्यातील ग्रँड कॅनियन हौसेने बघायला असंख्य भारतीय पर्यटक जातातच. तर अगदी त्याच तोडीचे आपले हे गंडीकोटा कॅनियन देखील नक्की बघा. ते लोक त्यांच्या गोष्टी आवर्जून ओरडून जगाला सांगत असतात मग आपण आपल्याच गोष्टी अशा झाकून ठेवल्यासारखे का करतो ? सोयी नसल्याने पर्यटन कमी असेल कदाचित पण पाहणाऱ्यांची संख्या वाढली तर. भविष्यात कदाचित इथल्या पर्यटनाचा विकास देखील नक्की होईल अशी आशा बाळगायला काय हरकत आहे ?
मंदिरे, निसर्ग आणि संकृती यांनी ओतप्रोत भरलेला दक्षिण भारत या आणि अशा अनेक जागांमुळे अजून प्रगल्भ आहे. घासून गुळगुळीत झालेल्या जागांवर तेच तेच फोटो घेण्यासाठी जाण्यापेक्षा अशा अडवाटांवरील प्रेक्षणीय गोष्टी नक्की अनुभवा. वेगळं पाहिल्याचा आनंद आणि आपल्याकडली श्रीमंती अजून अधोरेखित होत जाईल.
हृषिकेश पांडकर
१५.०६.२०२६



