Wednesday, November 27, 2013

विमानतळ आणि मी



        काही गोष्टी आधीपासूनच येत असतील तर त्या करण्यात फारशी मजा नाही असे म्हणतात.पण एखादी गोष्ट आपल्याला जमू शकेल असे वाटत असताना तीच गोष्ट आपल्याला करायला मिळाली तर त्याचा आनंद वेगळाच असतो. या गोष्टीची प्रचिती मला परवाच आली. अशा छोट्या छोट्या गोष्टींची प्रचिती यायला कोणते मोठे अनुभव यायची गरज नसते,ती आपल्याला साध्या दिनचर्येत सुधा येतेच.

        तर हे सांगण्याचा हेतू हा होता की,IT,ऑफिस,पगार,मिटींग्स या बेचव गोष्टीत अडकल्यापासून दिवाळी म्हणजे फक्त सुट्टी हे एकच समीकरण आम्ही जुळवतो.पंधरा वर्षापूर्वी दिवाळीची समीकरणे सहामाही परीक्षेपासून सुरु व्हायची आणि सुट्टीनंतरच्या शाळेच्या पहिल्या दिवसावर संपायची. भाषेचा पेपर पहिला असल्यामुळे मराठीचा पेपर पहिला हे गणितच होते.आणि शंभर गुणांचा पेपर म्हणजे पंधरा मार्कांचा निबंधाचा प्रश्न हे अगदीच अलिखित होते.काही गोष्टी भूतकाळ झाल्याशिवाय आठवणी बनत नाहीत हेच खरे.पण सगळाच भूतकाळ आठवणींच्या नावाखाली समोर येत नाही.

       याच आठवणींना उजाळा मिळाला जेव्हा आमच्या बिल्डींग मधल्या मुलांचा सहामाही परीक्षेचा भाषेचा पेपर झाला तेव्हा.पार्किंगमध्ये गाडी लावत असताना त्या काकू मुलाला विचारात होत्या, " कुठला निबंध लिहिलास ?,निबंध शेवट लिहायच्या नादात विसरला नाहीस ना ? पेपरमध्ये टिकमार्क केला नाहीये म्हणून विचारतीये."…वर्तमानाचे आवरण गळून पडले आणि भूतकाळाच्या आठवणींनी दाटी केली.त्या काकूंचा प्रश्न अगदीच सरळ होता.त्या मुलाचे उत्तर देखील त्या प्रश्नाला साजेसे असेलही,पण ते उत्तर ऐकण्याच्या मनस्थितीत मी नव्हतो.या प्रश्नाला मी सुद्धा सरावलेला होतो.निबंध म्हटल्यावर भीतीपेक्षा कंटाळा जास्त वाटायचा,त्यात वेळ कमी पडेल असे नेहमी वाटायचे. आणि त्या नादात शेवट कायमच गुंडाळला जायचा.…आणि याच मुद्द्यावर मी भूतकाळ सोडून वर्तमानात आलो.गाडी लावली आणि थेट त्या मुलाचा पेपर हातात घेतला.पेपरच्या उजव्या बाजुला किती मार्क मिळतील हे गोल करून लिहिले होते.जमलेल्या प्रश्नावर बरोबरची खूण केली होती.’रिकाम्या जागा भरा’ या प्रश्नाची उत्तर पेन्सिलने लिहिलेली होती.मी पटकन निबंधाचे विषय पाहून घेतले.त्या मुलाने तिसऱ्या पर्यायावर बोट ठेवून 'हा निबंध लिहिला' असे हसत उत्तर दिले.तो निबंधाचा विषय होता 'रेल्वे स्थानकावरील एक तास'.तो मुलगा नंतर पेपर घेवून वर गेला आणि माझ्या डोक्यात विचारांची मिटिंग सुरु झाली. मला समजा निबंध लिहायची वेळ आली आणि हाच विषय फक्त 'रेल्वे स्टेशन' ऐवजी 'विमानतळ' असा आला तर काय होईल..? आणि म्हणूनच आपल्याला तेव्हा जमले नसते पण आता कदाचित निट जमू शकेल आणि लिहायला वेळ देखील पुरू शकेल या आशेने मी हा निबंध लिहायला घेतला.

          उगीचच समोर पेपर आहे आणि समोर निबंधाला 'विमानतळावरील दोन तास' हा विषय आहे अशा थाटात मी लिहायचे ठरवले.

प्रश्न १ ला.  खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे २५० ते ३०० शब्दात निबंध लिहा.    ( १५ )

          १. ……….
          २ ……….
          ३  'विमानतळावरील दोन तास'
          ४ ……….
          ५ ……….   
 
उत्तर : 

        एयरपोर्टवर जायचे म्हणजे विमानात बसलेच पाहिजे असे काहीही नसते.हल्ली घरटी एक व्यक्ती शिक्षण किव्वा नोकरी निमित्त परदेशात असते.त्यामुळे कोणाला आणायला किव्वा सोडायला एयरपोर्टवर जाण्याचा योग येतोच.तर त्याच कारणामुळे परवाच मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्याची संधी मिळाली.
     एयरपोर्ट ते हि आंतरराष्ट्रीय आणि तेही मुंबईत या सगळ्या गोष्टी जुळून आल्या कि डोळ्यासमोर एक वेगळीच  प्रतिमा तयार होते.काहीतरी भव्य दिव्य असेल असे उगीच वाटते आणि आपल्या अपेक्षा उंचावतात.

       का कोण जाणे पण मला एक कोडे कायमचेच पडलेले आहे.सकाळी छान अंघोळ वगरे करून,नाश्ता करून दहा वाजता विमान आहे असे कधी ऐकले आहे का ? सगळ्यांची विमानं रात्री दहा नंतरच कशी उडतात ? सकाळी विमान चालवण अवघड आहे का ? प्रश्न अतिशय बाळबोध असला तरी मला कायम पडतो.रात्री बाराला सिक्युरिटी चेक,रात्री एक वाजता आत सोडतात.बर आता आम्ही निघणार पुण्यावरून त्यामुळे आधी मुंबईचा प्रवास आणि मग एयरपोर्टची वाट.अर्थात पुण्यात एयरपोर्ट होईपर्यंत याला पर्याय नाही.
      तर विषय भरकटण्याआधीच मुद्द्याचं बोललेला अर्थात लिहिलेला बरं.हा तर मुंबईच्या देखण्या एयरपोर्टवर पोहोचल्यावर लक्षात येते ती मुंबईची भव्यता.’छत्रपति शिवाजी आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा’ हा मोठा बोर्ड पाहिल्यावर मला उगीचच दडपण आल्यासारखे वाटते.

      दुतर्फा लावलेले आगमन आणि प्रस्थानचे मोठे फलक,विविध आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुरविणार्यांची ओळीने लिहिलेली नावे,अखाती देश,गोऱ्यांची विमाने,अमेरिकेचा थाट आणि इतर बरीच नावे एका मागून एक डोळ्यासमोरून जात असतानाच आपण तिथे पोहोचतो. 
 
      एखाद्याला घ्यायला जायचे असेल तर साहजिकच खालच्या बाजूला 'आगमन' लिहिलेल्या कमानीखालून गाडी थेट आगमन दारात येवून थांबते.आणि मग या एयरपोर्ट वरील विविध गोष्टींचे कुतूहल आणि नाविन्य उलगडत जाते. 

          आप्तेष्टांची वाट पाहत आशाळभूत नजरेने समोरच्या काचेच्या दारावर डोळे लावून बसलेले आपल्यासारखे असंख्य चेहेरे दृष्टीक्षेपात येतात.परदेशी नागरिकांना घ्यायला आलेले 'Pick Up & Drop' चे ड्रायव्हर त्यांच्या नावाचे फलक घेवून उभे राहिलेले दिसतात.कोण कसा काळा कि गोरा किवा काळी का गोरी आपल्या वाटेला येईल याचा शहानिशा करीत असलेले ते ड्रायव्हर निवांत गप्पा मारत बसलेले असतात.काही लोक त्या सामानाच्या ट्रोली शोधत फिरत असतात.कामानिमित्त एकटे फिरणारे आपल्या कामात व्यग्र असतात.त्यांना तर सदैव घाईच असते.एखादीच Bag असल्यामुळे ते ट्रोलीच्या फंदात पडत नाहीत.
        आमच्यासारखे घ्यायला आलेले लोक एक डोळा त्या बाहेरच्या लावलेल्या टीव्हीच्या पडद्यावर आणि दुसरा डोळा त्या समोरच्या काचेच्या दाराकडे लावून बसलेले असतात. अर्थात वयानुसार भिरभिरणारी दृष्टी बदलत असते.एका ठराविक वेळानंतर चक्कर मारून पुन्हा त्याच जागी आल्यावर असे लक्षात येते कि जशी आपली परिस्थिती असते तशीच बाकीच्यांची. 

      एखाद्या विमानाच्या नावासमोर 'Arrived' असे लिहून आले कि लोकांमधील उत्सुकता वाढत असते.मधूनच मोठ्या जत्थ्यानी लोकं बाहेर पडत असतात.बाहेर येवून मोठ्याने हाक मारून घ्यायला आलेल्यांना मिठ्या मारण्याचे प्रकार सर्रास् पहायला मिळतात. मधूनच येणारा पायलट आणि हवाई सुंदर्यांचा समूह लक्ष वेधून घेतो.पाण्यात बराच वेळ राहून बाहेर आल्यावर आपण जसा दीर्घ श्वास घेतो त्याप्रमाणे ते लॉबी मधून बाहेर आले कि सिगारेट पेटवतात.त्यांची वेशभूषा आणि रुबाब बघितला कि आपण दिवसातले आठ तास एकाच खोलीत बसून काय करतो असा प्रश्न मला साहजिकच पडतो.
विविध रंगाचे लोक आणि त्यांनी लावलेले नानाविध रंगाचे परफ्युम नाकाचे पारणे फेडत असतात.लोकं विमानातून प्रवास करतात कि मिरवायला जातात हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.परदेशी नागरिकांचे सोडाच पण भारतीय वंशाचे प्रवासी देखील विमान प्रवासात समारंभातील पाहुणे वाटतात.उगीचच एखाद्या पार्टीला आलोय कि काय असा भास होतो.  

          मात्र याचाच विरोधाभास पाहायला मिळतो जेव्हा युरोप वरून येणाऱ्या प्रवासी दारावरून पुढे जावून आपण अरब देशातील विमानाच्या 'Arrival' पाशी येतो.दौंड जंक्शन च्या 'Platform' ची आठवण झाल्यावाचून राहत नाही.अक्षरशः बोचकी आणि ट्रंका यांनी व्यापलेले प्रवासी पाहायला मिळतात. पाचशे मीटरच्या अंतरात एवढी तफावत कमालीची विचित्र वाटते.
          पुणे स्टेशनच्या कॅन्टीन मध्ये आठ रुपयाला मिळणारे Sandwitch इथे पन्नास रुपयाला विकत घेवून Aluminium च्या कागदात गुंडाळून खाणारे प्रवासी पहिले कि आंतरराष्ट्रीय विमानप्रवासाच्या भव्यतेची प्रचीती येते.

          साधारणतः प्रवास करणार्यांपेक्षा निरोप देणारे आणि स्वागत करणारे यांची संख्या इथे जास्त असते.राहणीमानानुसार या लोकांची स्वागत करण्याची किव्वा निरोप देण्याची पद्धत बदलते.काहींचे अश्रू स्वागत करतात.काहींची मिठी तर काहींचे ओठ…काही नुसतेच हस्तांदोलन करून स्वागताचा आनंद घेतात.भावनांची खोली मोजण्यासाठी पट्टी अजूनतरी आलेली नाही पण लोक आपापल्या परीने भावना व्यक्त करीत असतात.आणि याच गोष्टी निरोपाला देखील नक्की होत असणार.   

        सरावलेल्या प्रवाशांच्या वावर्ण्यातील आत्मविश्वास आणि नवशिक्यांच्या कृतीतील अडखळणे स्पष्ट दिसत असते.सामानाची ट्रोली ढकलण्यापासून ते पासपोर्ट जपून ठेवण्यापर्यंत सगळ्या हालचालीत अनुभवानुसार फरक आढळतो.चोवीस तासांचे घड्याळ बघताना होणारी तारांबळ देखील काहीवेळा मजेशीर ठरते.आपले विमान दुसऱ्या देशात कधी पोहोचेल या चर्चेमध्ये होणारी वेळेची गम्मत ऐकणे हा अनुभव नक्की घ्यावा.

         हे सगळे अनुभव घेताना दोन अडीच तास कसे जातात याचा अंदाज पण येत नाही. एव्हाना आपले पार्सल पोहोचलेले असते.वर लिहिल्याप्रमाणे आपण देखील त्यांचे स्वागत करतो.आणि मार्गस्थ होण्यासाठी बाहेर पडतो.गाडीपर्यंत पोहोचून त्या परिसरातून बाहेर पडतानाचा वेळ वेगळाच असतो.कदाचित त्या वातावरणातून मानसिकदृष्ट्या बाहेर येण्यासाठी तो वेळ असतो असे मला प्रत्येक वेळी वाटते.कारण मुंबई एयरपोर्टच्या बाहेर आल्यावर अंधेरीची गर्दी आ करून उभी असते.कदाचित सगळी कडे हीच परिस्थिती असेल असे नाही पण किमान माझा अनुभव तरी हेच सांगतो.

         माझे दोन तास चुटकीसरशी संपतात.आणि प्रत्येक वेळी नवीन अनुभवाची भर पडत जाते.

     या निबंधाला कदाचित गुण मिळणार नाहीत पण निबंध लिहायला वेळ कमी पडला नाही हे समाधान नक्की आहे.





                                                                                  हृषिकेश पांडकर
                                                                                  २७/११/२०१३

Thursday, November 21, 2013

स्वप्नवत नाश्ता ...

सचिनचा शेवटचा सामना अपेक्षेनुसार तीन दिवसात संपला.उरलेले दोन दिवस प्रसिद्धीमाध्यमांनी आणि वृत्तपत्रांनी सचिनची कुंडली आपल्यासमोर व्यवस्थित मांडली.
एका पर्वाचा अंत झाला… 

त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे परवा मुंबई ला जाण्याचा योग आला.एक दिवसाचा मुक्काम असल्याने साहजिकच एक दिवस फिरण्यात घालविण्याची इच्छा होती.रविवार सकाळी लिओपोल्ड कॅफेत ब्रेकफास्टला जावे असे ठरले. मी अंधेरीला असल्यामुळे मी एकटा जाणार होतो आणि बाकीचे दोन मित्र चर्चगेट वरून डायरेक्ट येणार होते. 

     लोकलनी प्रवास म्हणजे पहाटेच निघावे या विचाराने मी लवकरच घराबाहेर पडलो. रविवार सकाळ असल्याने खूपच लवकर मी लिओपोल्डला पोहोचलो.मित्रांना यायला वेळ लागणार होता.मी शांतपणे कॅफेत जावून बसलो.

पुढे घडलेला प्रसंग माझ्या समोरील पाच लोकांच्या टेबल वर घडलेला असून त्याचा वास्तवाशी संबंध असू शकतो…

इथून पुढे …थेट लिओपोल्ड मधून…. 

( दादा डोक्यामागे हात ठेवून निवांत बसला आहे,डोळ्याला गॉगल आणि अंगात स्लीवलेस त्याच्या समोरच्या खुर्चीत VVS बसला आहे )
दादा : अरे …कधी यायची ही लोकं ??…किती वेळ लावलाय. आणि या छोट्या हॉटेल मध्ये ए. सी. पण नाहीये.  
VVS : येतील येतील दादा…एवढा पण पेशन्स नाहीये का तुझ्याकडे…अत्ता कुठे सुटले आहेत एकदाचे,येतीलच इतक्यात.
(तेवढ्यात हातात कॅमेरा आणि दोन पुस्तक घेवून जंबो आत येताना दिसतो)
दादा : ये ये …बस…झाले मनासारखे फोटो काढून …बस
जंबो : अरे बाकीचे दोघं कुठे आहेत ? आज पण उशीर केलाय का ?… आता कसली कामं आहेत यांना ?
VVS : अरे जंबो,तू तर असा वैतागला आहेस कि तुझ्या बोलिंग वर कोणी कॅच सोडलाय…
( दादा आणि VVS जोरात टाळी देवून हसतात )
तेवढ्यात Jammy आणि SRT येतात
( Jammy टी शर्ट आणि जीन्स मधे, टी शर्ट व्यवस्थित खोचलेला आणि हातात मोबाईल,SRT थ्री फोर्थ आणि "I LOVE MUMBAI" असा लिहिलेला आणि गेट वे ऑफ इंडियाचा फोटो असलेला टी शर्ट.)
VVS : या…आले आले…झाल एकदाच खेळून ?… आत्ता थांबतील …मग थांबतील,पण नाहीच …शेवटी थांबले एकदाचे.
दादा : जाऊदे VVS मोठी लोक आहेत.
Jammy :  अरे कसली मोठी लोक दादा, आपण एकत्रच सुरुवात केलीये खेळायला…अर्थात तू ९२ साली आला होतास त्यानंतर काही दिसला नाहीस टीम मध्ये हाहाहाहा….
SRT : हो खरय…आणि तुम्ही लोक येईपर्यंत मी तसा जुनियर असल्यासारखाच होतो.
जंबो : बर ते जाऊदे रे…अरे बाबांनो ते PF च्या पैशांचे विचारले का कोणी ? नंतर परत पेन्शन ची वगरे लफडी असतात.
VVS : हो ना यार…मला तर फक्त टेस्टचाच PF आलाय.वनडे चा अजून मिळायचा आहे.  
दादा : अरे VVS तू वनडे पण खेळला आहेस का ? तुला बघितलच नाहीये रंगीत कपड्यात
Jammy : नाही नाही दादा असा नको म्हणूस ऑस्ट्रेलियाला वनडे सिरीजला तो एकटाच खेळलाय…
SRT : तसही ऑस्ट्रेलिया मध्ये आपण टीम म्हणून फार कमी वेळा खेळलोय…एखादाच प्लेयर खेळायचा आपला.
दादा : Jammy आणि SRT मुळे किमान तीन दिवस तरी टेस्ट चालायची.
SRT : अरे माझ्यापेक्षा पण VVS चांगला खेळायचा…ऑस्ट्रेलिया आणि तो हे समीकरण उगीच नव्हते.
जंबो : अरे पण तरी शेवटच्या सिरीज मध्ये आपण खर्या अर्थाने टीम म्हणून खेळलोच की . नाहीतर या आधीची सिरीज भांडण्यात घालवली.
Jammy : जाउद्या…आता भज्जी आणि सायमंड सारख्या लोकांच्या नादी लागण्यात काहीच अर्थ नाहीये.एकतर भज्जी कसा आहे हे माहितीये तुम्हाला.तरी SRT मध्ये पडला म्हणून आटोक्यात आलं.
VVS : आपल्याकडे भांडायला लोक कमी नव्हती… काय दादा… हाहाहा
दादा : काय म्हणायचं काय तुला…अरे मी कायम टीमच्या हितासाठी भांडायचो.तुमच्यासारखा स्लीप मध्ये नखं खात बसलो नाही कधी.
जंबो : अरे मला तुम्ही तीस यार्डमध्ये उभं पण राहून दिलं नाही.
SRT : जंबो अरे तीस यार्डमध्ये चेंडू खूप जोरात येतो.… उगीच लागला वगरे तर काय घ्या…त्यात तू पळणार नाहीस.
Jammy : SRT पण जंबो लागलं असून देखील खेळायला आला होता.…आठवतंय ना…लारा ची विकेट घेतली होती.
 VVS : हो ते मात्र मानलच पाहीजे.अगदी सरदार सारखी पगडी बांधून आला होता खेळायला.
दादा : नाही खरच कमिटेड प्लेयर होता आपल्यातला…इनिंग मध्ये दहा विकेट म्हणजे चेष्टा नाही.
जंबो : अरे त्या दहा विकेट मुळे आठवलं…तीन निर्णय माझ्याबाजुने गले नसते तर ते कधीच शक्य नव्हतं.…बिचारा सकलेन…नशीब रे…त्यात श्रीनाथ नि मुद्दाम वाईड टाकून मदत केली ती वेगळीच…(सगळेच हसतात).  


SRT : अरे खोट आउट देणे या बद्दल तर मी न बोललेलंच बर…अरे काय तो बकनर काय तो अलीम दार…अरे अंगाला चेंडू लागला तर LBW आणि नाही लागला तर 'Caught Behind' देतात रे…शेवटची सिरीज पण सोडली नाही यांनी…तिथे काही प्रतिक्रिया दिली नाही पण डोक्याला शॉट होतो.  
दादा : खरय…त्या पोंटिंग नि तर एक टप्पा कॅच घेतल्याचा अपील केला होता रे…
VVS : …अरे अम्पायरलाच आउट द्यायला सांगणारे हे लोक…आणि म्हणे 'Gentelmens Game'.
Jammy : अरे  'Gentelmens Game''Gentelmens Game' म्हणून मी दोनदा आउट नसताना परत आलोय.आता बोल…
VVS : अरे त्या कोलकाता टेस्ट मध्ये मी आणि Jammy दिवसभर खेळलो खरे,पण पोंटिंगचा एका चेंडूवर 'LBW ' वाचलो होतो.बर झाल दिला नाही.…पोंटिंगनी बोलिंग करण्याची वेळ यावी यासारखे दुर्दैव नाही ऑस्ट्रेलियाचं…आणि त्याला विकेट द्यावी यासारखा पाहुणचार नाही…हाहाहाहा…   
जंबो : अरे एका 'LBW'च काय घेवून बसलाय…माझ्या फ्लिपरवर असंख्य 'LBW' दिले नाहीयेत,त्याचा काहीच नाहीये तुम्हाला…
VVS : हाहा…अरे जंबो फ्लिपर पेक्षा पेस आणि सरळ चेंडूनवरच जास्त विकेट्स मिळाल्या आहेत तुला…तूच आमचा खरा 'Pace Attack' होतास.( सगळे मोठ्याने हसतात …जंबोसहीत)
जंबो : अरे काही का असेना…पण बोलर होतो,आणि बोलर असून देखील लॉर्डस वर टेस्ट शतक आहे…तुझी देखील असेल कदाचित…( जीभ चावत )…किमान इंग्लंड बरोबर एकतरी…
( सगळे परत हसतात …VVS इकडे तिकडे बघतो.)
SRT : जाऊदे…लॉर्डस आणि शतक याचा विषय नको रे…
दादा  : ( गालातल्या गालात हसतो )
जंबो : बर जाऊदे खायला मागवा…तसही लंच टाईम झालाय…
Jammy : संपूर्ण कारकिर्दीत दिवसाची हि वेळ मी मैदानावरच काढलीये…'Batting' असो किव्वा 'Bowling'. त्यामुळे या वेळेची किंमत जास्त आहे मला.सांगूयात काहीतरी खायला.
दादा : अरे निम्मे चेंडू तर तू सोडूनच दिले आहेत तुझ्या करियर मध्ये…( SRT ला डोळा मारत)
SRT : जाऊदे दादा…तू पण 'Short Balls' सोडू शकला असतास.
(SRT आणि Jammy टाळ्या देतात.)
VVS : Jammy जाऊदे तू जॅम आणि ब्रेड सांग …तुला खरच भूक लागलीये…
Jammy : मग त्या हिशोबानी दादाला चावनप्राश खावे लागेल…म्हणजे पोट फक्त माझा आणि SRT च भरेल…तू आणि जम्बो तर अगदीच उपाशी राहणार…हाहाहाहाहाहा…
दादा : हाहाहा … दरवेळी 'कांगारू करी' खावून याचा आयुष्यभराच पोट भरलंय.
(SRT खायची ऑर्डर देतो.)



जंबो : अरे मग त्याच कांगारूनबरोबर २००३च्या फायनल का नीट 'Batting' केली असती तर आम्ही पण WC च्या 'Winning Team' मध्ये आलो असतो…आणि आता VVS ला बोलतोय तू.
Jammy :  तेव्हा विरु सोडला तर कोणीच खेळले नाही.अरे आपण ३६० रन्स दिले यावरच माझा विश्वास बसत नाही. 
दादा : अरे काय करणार…तो ZK बघ ना. पहिल्या ओवर पासून खुन्नस देतोय…ते पण गिलख्रिस्ट आणि हेडनला.अरे आपला पेस काय,आपण करतोय काय ? तरी मी त्याला तीन वेळा सांगितला …पण नाहीच.
SRT : जाऊदे…आता खेळ आहे .या गोष्टी व्हायच्याच…
जंबो : अरे तुझा ठीक आहे रे…तुझ काम झालय २०११ ला.त्यामुळे तू समाधानी आहेस.आमच्या कारकिर्दीत आम्हाला तो आनंद नाही मिळाला ना. तुझ्यावेळी तुझा कर्णधार खेळला…'Captains Knock'…हाहाहा
दादा : जंबो अरे आता तू कर्णधारावर काय घसरतोय…अरे त्या दिवशी माझा खेळ चांगला नाही झाला.पण आदल्याच सामन्यात केनिया विरुद्ध माझे शतक आहे.   
VVS : कुठली टीम ??….हाहाहाहा…जाऊदे ताट सरकवा इकडे…( सगळे हसतात)
SRT : हो जंबो तेवढा खरय…अरे ती एकच सल राहिली असती पण पोरांनी करून दाखवल.नाहीतर तेव्हाही आपला विरु लवकरच आला होता आतमध्ये आणि ते पण 'रेफरल' वाया घालवून…मी पण काही विशेष केलं नाही पण माही आणि गौती नि करून दाखवलं.
Jammy : आईला WC म्हणलं  कि मला नकोच वाटत…२००७ ला काय दिवे लावले आपण.अरे बांगलादेश कडून हरलोय.
दादा : नाहीतर काय…काय एक T-20 WC जिंकला तर सगळेच हवेत…
जम्बो : चालायचंच दादा नवीन कर्णधाराचा पहिलाच WC होता…आता आपले रथी महारथी वनडे WC ला नाही खेळले तर कसा जिंकणार WC …हरले…ते हि बांगलादेश कडून ? हाहाहाहा …
दादा : अरे तुम्ही सारखा 'Captain Captain' काय लावलाय ? ( बाकी सगळे हसतात)…लोकांनी Captaincy स्वताहून सोडलीये …हाहाहाहा
SRT : आईला…
Jammy : अरे मला तर कधी मिळाली आणि कधी गेली समजलच नाही… हाहाहा…
VVS : अरे स्लीप ला उभे राहणे आणि Ball ला शाईन करणे यापलीकडे मी काहीही केले नाहीये त्यामुळे captaincy तर माझ्यासाठी खूप दूरची गोष्ट. 
जंबो : अरे शाईन करायचा काम सुद्धा निट केल नाही तू.निम्म्या वेळा मलाच करावी लागायची.
SRT : अरे उरलेल्या निम्म्या वेळात मी केलीये…कवर्स मध्ये उभा राहून…
Jammy : अरे SRT नि शाईन केलीये सुद्धा आणि घालवलीये सुद्धा आणि एकदा तर म्हणे सीम सुद्धा कुरतडलीये…( बाकीचे हसतात ) 
दादा : अरे पण तेव्हा ते तिथेच क्लियर झाला कि त्याने कुरतडली नसून त्यावरचे गवत काढले आहे…खोटा आरोप होता तो …च्यायला तेवढ्यासाठी आफ्रिकेतून परत यायला लागला…
VVS : हमम…तेच म्हणणार होतो मी…SRT वर आरोप करणे योग्य नव्हते…
SRT : आईला … नुसतं सीम वरचं गवत काढला तर एवढी बोंब …लोक हल्ली प्रातर्विधी पीचवर उरकतात हे चालता यांना…हाहाहा…आणि म्हणे आम्ही क्रिकेटचे जनक…
जंबो : आधी एखादा विश्वकरंडक तरी जिंका…आणि म्हणे जनक…हाहाहा
Jammy : अरे जनक वरून आठवण झाली…तो शोएब अख्तर चा 'बाप बाप होता है' वाला किस्सा खरा आहे का रे SRT ?
SRT : हाहाहा…अरे विरु खरच म्हणाला का ते मला माहित नाही पण ती सिक्स मारलेली माझ्या लक्षात आहे.खर तर त्याला सिक्स मारणं सोप आहे…हाहाहा
 VVS : हाहाहा …मिडिया समोर उगीच खोटं सांगाव लागत…'Talented Player' वगरे…
दादा : हाहाहा…काय गचाळ प्लेयर आहे…तो काय तो मोहम्मद युसुफ काय…त्याला तर मी भर मैदानावर झाडलाय…
VVS  : हो ना दादा…अरे तू कोणाला सोडला आहेस तेवढा सांग…अरे तू 'Steve Waugh' ला पण नाही सोडलास ते हि ऑस्ट्रेलिया मध्ये त्यांच्या देशात… 
Jammy : अरे आत्ताची पोर बघा…तो कोहली,धवन…त्या 'Watson'च भर मैदानात माकड बनवल…बिचारा काही बोलू पण शकला नाही.
SRT : आता त्याच जोशात खेळतायेत म्हणून प्रश्न नाही…पण शिस्त हवीच.
दादा : हा तू तेवढा शिस्तीचा सांग सगळ्यांना…इतके दिवस शांत होतो आपण म्हणून ते ऑस्ट्रेलियन बोलत होते…त्यांना तसेच दिले पाहिजे रे…
जंबो :  हो आता बरोबर आहे…दादाची Bat ऑस्ट्रेलिया समोर तळपली नाही…पण वागण्यातून तू व्यवस्थित समज दिलीस हाहाहा…
दादा : तळपली नाही काय…जेवढे फोटो तू ब्रिस्बेन मध्ये काढले नसतील तेवढ्या रन्स आहे माझ्या 'Gabba'वर 
VVS : दादा तू कुठे लगेच अशा गोष्टींवर चिडतो… खावून घे…
SRT : अरे खावून घ्या रे…गार होतंय ते…
Jammy : होवूदे रे गार… आता काय घाई आहे तुला…सगळ्यातून बाहेर पडला आहेस आता तू…शिवाय 'Commentry' पण करशील अस वाटत नाही आता.आम्हाला ते तरी काम आहे किमान.  
SRT : हो ना राव…आता खरच काम नाहीये…तुमचं तरी बरंय बडबडीच काम मिळालय.
VVS : हाहाहा आता खर्या अर्थाने दादाला 'Job Satisfaction' मिळेल.
Jammy : बिचारा जंबो IPL मधून लगेचच बाहेर पडला.
दादा : हो…अरे डाइव्ह मारताना दहा वेळा विचार केला कि असाच होणार…हाहाहा…
जम्बो : दादा… तुला देखील फार काही जमलय अशातला भाग नाहीये…शेवटी कोणीच घेतला नाही तुला …हाहाहा   


Jammy : अरे तुम्ही आपापसात भांडू नका रे…तुम्हीच असा म्हणालात तर VVS  कोणाकडे पाहणार ? तो तर कसाबसा IPL खेळू शकला आहे. हाहाहा…
SRT : अरे…जंबो पण एकाच सिझन खेळला आहे.त्यामुळे IPL हा मुद्दा वादाचा होवू शकतो.( सगळेच मोठ्ठ्याने हसतात)
जंबो : चला निघावं
दादा : अरे थांब रे…आता तुला काय घाई आहे ? इथे मुंबईत कसले फोटो काढणार आहे भर दुपारी ? आणि आम्ही 'Batting' करत असताना तसही भरपूर फोटो काढलेले आहेत.
VVS : अरे चल मी पण निघतो…आता वेस्टइंडीजच्या वनडे सुरु व्हायच्या आधी घरी जावून यायच आहे…परत कॉमेंट्री आहेच.  
Jammy : खरच रे…चला,एकतर या SRT च्या शेवटच्या सामन्यामुळे अशक्य दगदग झालीये.
SRT : अरे दगदग कसली ? मस्त AC खोलीत बसून गप्पा तर मारत होता तुम्ही.त्यात निम्म्यापेक्षा जास्त वेळ हर्षाच बोलत असतो.
दादा : अरे त्या बाबतीत तुझा अनुभव कमी आहे…तुझा अजून त्या क्षेत्रात 'Debut' व्हायचय.…हाहाहा
जंबो  :  अरे चला…अजून तिकीट काढायचंय विमानाचं. आता BCCI काढत नाही. हाहाहा
SRT : अरे रेल्वे विमानाची तिकीट कसली काढता…माझ्याकडे बघा भारतभर विमानप्रवास फुकट हाहाहा…
Jammy : हाहाहाहा… भारतरत्न SRT
VVS : अरे खरच कि… एवढी बक्षीस मिळाली पण याची मज काही वेगळीच असेल.
जंबो : त्या कार्यक्रमाला फोटो काढायला बोलाव मला तसाही काहीच करत नाही मी सध्या…
दादा : अरे आफ्रिकेत टेस्ट क्रिकेटची कॉमेंट्री मला जर भीती वाटतीये.'Short Ball' हा शब्द उच्चारायला सुद्धा नको वाटतंय…चला निघूया.
Jammy : अरे भेटत जा असेच…तेवढ्याच जरा जुन्या आठवणी.
VVS : मी तर म्हणतो एखादी टेस्ट सिरीज एकत्र बघुयात.कळेल कशी खेळतात हि पोरं.
SRT : अरे नक्कीच चांगली खेळणार… आपण एकत्रच बघुयात.
जंबो : मला तर वाटतंय कि २०१५  चा WC आपलाच असणार आहे.काय टीम आहे आपली मस्तच…
Jammy : चांगली टीम झालीये आणि लिडर पण चांगला मिळालाय…   
दादा : ए अरे आपल्या वेळेला लिडर चांगला नव्हता अस म्हणायचं का तुम्हाला …
( पुन्हा एकदा सगळेच मोट्ठ्याने हसतात)
( सगळे निघतात SRT पैसे भरतो,Jammy TIP देतो,जंबो ग्रुप फोटो घेतो…दादा गॉगल लावून बाहेर पडतो,VVS बडीशेप घेण्यासाठी काउंटर वर जातो  सगळे निरोप घेतात आणि मार्गस्थ होतात )  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

माझे मित्र येवून गेले बहुतेक … पण आज मी वेगळ्याच लोकांबरोबर नाश्ता केला…मी पण बाहेर पडलो…

                                                                                                हृषिकेश पांडकर
                                                                                                २१/११/२०१३