Tuesday, February 11, 2020

लाकडी बूट

 

भाईंची देहरुपी प्रतिमा आपल्यातून केव्हाच परतलीये. मात्र आपल्या दैनंदिन जीवनात लेखणीने विसावलेले पुलं हे चिरकाल आपल्यात असणार हे नक्की. परवा दुपारच्या जेवणा सोबत तोंडी लावायला पुलंचे 'अपूर्वाई' घेऊन बसलो होतो. डोळे मिटून कुठलेही पान उघडले आणि वाचायला सुरुवात केली तरी पहिल्या ओळीपासून आपल्या भोवताली असलेल्या गोष्टी टिपणारे पुलं जवळचे वाटत राहतात.

पहिल्यांदा परदेशी निघण्यापूर्वी चालू असलेल्या तयारीच्या वेळी आलेले चपला बुटांचे वर्णन वाचत असताना या वरील फोटोची आठवण झाली आणि हा लिहिण्याचा घाट घालावासा वाटला.


 

इंग्रजी धरतीला आणि तिथल्या हवेला टिकेल असा बूट जो भाईंना बनवायला सांगितला होता ते वर्णन वाचून मला हा ‘क्लॉग’ अर्थात लाकडी बूट आठवला.हॉलंड मध्ये असताना हे लाकडी बूट बनवायचा छोटा कारखाना पहिला होता.दिसायला जरा मजेशीरच असतो.लाकडी पेटीत पाय ठेवल्याचा भास व्हावा असा तो आकार.पिवळे,निळे,लाल रंगाचे बूट त्यावर ट्युलिपच्या फुलांची नक्षी आणि मुलीं प्रमाणेच चालताना टॉक-टॉक आवाज करण्याचा आनंद.

पद्धतशीर गोलाकार असलेले हे सर्व मापातील बूट पहायला जितकी मजा येते तितकीच मजा घातल्यावर देखील येते. सुरुवातीला लाकडी पायताणाचा आणि आपला तास काही संबंध नसल्याने तोल सांभाळत चालणे हा भाग महत्वाचा ठरतो.लाकडी ओंडक्यावर कोरीव काम करून तो बूट बनवला जातो. पुढे त्याला पॉलिश, रंगरंगोटी आणि आकाराची जुळवाजुळव करून परिपूर्ण केले जाते.

शेतांमध्ये,खाणीत किव्वा कारखान्यात काम करण्यासाठी पायाला संरक्षण म्हणून या बुटांचा वापर केला जातो.काही लोकांशी बोलल्यावर असे समजले कि हे लाकडी बूट गरीब लोकांचे पायताण म्हणून देखील ओळखले जाते. थोडक्यात हलक्या प्रतीचे आणि एका ठराविक कामगार वर्गाचे म्हणून देखील या कडे बघितले जात असे. मात्र आता ती परिस्थिती राहिली नाहीये. असेच लाकडी पायताण मात्र चप्पल सदृश्य मी जपानला पहिले आहे. ज्याला 'गेता' म्हणून संबोधले जाते. 'गेता' म्हणजे लाकडी पारंपरिक जपानी पद्धतीची चप्पल. आता मात्र या लाकडी बुटांकडे फॅशन म्हणूनही पहिले जाते.

या दुकानातून फिरत असताना सहज मी याची किंमत पहिली. माझ्या मापाचे ३५ युरो ला होते. पुलंचा बूट ४८ रुपयांचा होता हा बूट ३५ युरोचा. म्हणजे जवळपास ३५०० रुपयांचा तो हि लाकडी बूट. सुरुवातीला या बुटाला पाय लावायची माझीही हिम्मत होईना. मजा म्हणून विकत घेण्याची इच्छा किंमत वाचूनच विरली. कारण घरी आणून ते बूट इथे घालायची तशी सोय नाही. पण न राहवून छोट्या मापाची जोडी घेतली फक्त आठवण म्हणून.

त्या दुकानात असलेल्या या प्रकारच्या बुटांचे असंख्य प्रकार,रंग,आकार पाहताना आणि लाकडी असल्याने थोडे जड आणि वाजणारे बूट घालून चालताना मजा येत राहते.हे क्लॉग विविध नृत्यप्रकारात देखील मोठ्या प्रमाणात वापरले जातात.चालताना निर्माण होणारा आवाज या वैशिष्ट्याचा नाचताना पुरेपूर वापर केला जातो.

दुकानातून बाहेर पडताना या नाविन्यपूर्ण बुटाच्या आठवणी घेऊन बाहेर पडलो.अजून एक नवीन गोष्ट पहिल्याच आणि अनुभवल्याचा आनंद होताच.आणि तोच आनंद आज पुलंनी पुन्हा एकदा नव्याने आठवून दिला.

पुलंच्या वर्णनाचा गाभा अर्थातच भिन्न होता. पण त्या निमित्ताने या लाकडी बुटांची आठवण झाली. बहुरंगी आणि बहुढंगी प्रसिद्धी असलेल्या युरोपला भेट देणार असाल आणि पुरेसा वेळ हातात शिल्लक असेल तर धावती का होईना पण हा मजेशीर बूट नक्की पहा. विकत घ्यायचा निर्णय मी तुमच्यावर सोपवतो. पण पहा तरी नक्कीच. कारण जुन्या आणि बुटक्या पवनचक्क्या,स्तब्ध करणारे निसर्ग सौन्दर्य, मनसोक्त रंग उधळणाऱ्या ट्युलिपच्या बागा हे सगळे पाहत असताना हे छोटे लाकडी बूट राहून जायला नकोत…एवढच…

हृषिकेश पांडकर

११.०२.२०२०

 

Thursday, February 6, 2020

मोनालिसा


'सूर्यास्ताचा देखावा' हा विषय चित्रकलेच्या परीक्षेत आल्यावर गुण्या वापरून डोंगर,कोनमापक वापरून सूर्य,पट्टी वापरून घर आणि मराठी अंकगणितात असलेला चार आकडा काढून उडणारे पक्षी काढणे याच्या वर कधी माझी चित्रकला जाऊ शकली नाही.तसेच 'लिओनार्डो दा व्हींची' आणि 'मोनालिसा' हि लोक इयत्ता आठवीच्या इतिहासातल्या पुस्तकाबाहेर कधी आलीच नाहीत आणि 'पिकासो कि पैंटिंग मेरा पिछा पकड के टेक्सास मे नाचे मिल के' या गाण्याबाहेर माझा आणि पिकासोचा कधी संबंधही आला नाही.थोडक्यात काय तर मी चित्रकला किव्वा पेंटिंग यांच्या वाट्याला गेल्याचे माझ्या स्मरणात नाही.


 

पॅरिस मध्ये असलेले 'लुव्र' म्युझियम अशाच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे.मी सकाळी साधारण दहा साडेदहाला इथे पोहोचलो.हॉटेलमधूनच खूणगाठ बांधून आलो होतो कि काहीही झाले तरी म्युझियम आतून पहायचे नाही.एकट्या मोनालिसा साठी हजारो रुपये खर्च करण्याइतका मी शौकीन नाही.आणि मला त्या चित्रांमधले काही कळातही नाही.त्यापेक्षा त्या दालनाबाहेर असलेल्या असंख्य गोष्टी पाहण्यात मला जास्त मजा येईल.

इतका कठोर निग्रह असूनही त्या भव्य संग्रहालयाबाहेर आल्यावर मनाची चलबिचल झालीच.ठरवलेल्या सगळ्या गोष्टी 'मोनालिसा आज नाही पाहणार तर कधी ?' या प्रश्नासमोर पार फिक्या पडल्या आणि 'चल मोनालिसा आज तेरे खातीर' अशा अविर्भावात मी लुव्रच्या पायऱ्या चढू लागलो.

मजल दरमजल करीत मोनालिसाचे दालन गाठले.अतिशय मोठी खोली आहे.दालनाच्या चारही बाजूला अप्रतिम कलाकारी आहे.आणि त्यातली एक संपूर्ण भिंत मोनालिसाने व्यापली आहे.मी शब्द 'व्यापली' आहे असा जरी वापरला असेल तरी तिचे मूळ पेंटिंग हे फक्त २१ x ३० इंचाचे आहे म्हणजे आपला प्रिंटिंग चा A२ आकाराचा कागद असतो त्यापेक्षा जरासे मोठे.मात्र त्या पूर्ण भिंतीवर तेवढे एकच चित्र लावलेले आहे.त्या दालनातील प्रत्येक इसम तिच्याच कडे पाहत असतो.फक्त सेल्फी काढताना आणि परत निघताना तिच्याकडे पाठ करतो बाकीचे वेळ फक्त मोनालिसा.

अगदी जवळ जाऊन मोनालिसा न्याहाळली.चित्र किती सुंदर आहे वगरे मला विचारलं तर हा पाहणाऱ्याचा दृष्टिकोन आहे असं मी म्हणेन.पण जितकी प्रसिद्धी आणि चर्चा तिची झालीये त्याच्या तोडीचे कौतुक मी तरी नक्की करू शकत नाही एवढे निश्चित.अर्थात एक कलाकृती म्हणून अप्रतिम असेलही आणि आहेच पण मग तिथे असलेल्या बाकीच्या कलाकृतीही तितक्याच तोलामोलाच्या वाटतात.

या वेळी मी सर्वात जास्त आनंद घेतला तो लोकांच्या नमुनेदार मानसिकतेचा.डोळ्यांनी पाहणाऱ्या लोकांपेक्षा कॅमेऱ्याच्या आयपीस मधून डोकावणारे डोळे जास्त पहायला मिळत होते.मी पाहिली नाही तरी चालेल पण माझ्यासोबत सेल्फी मध्ये मोनालिसा आली पाहिजे मग भले माझी बायको का शेजारी असेना या जोशात सेल्फी काढणारे लोक मला जास्त मजेशीर वाटत होते.गणपतीच्या दहा दिवसात दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात ज्याप्रकारे लोक गर्दीतून आपला मोबाईल वर करून फोटो काढतात अगदी तसेच दृश्य इथे अनुभवायला मिळाले.मला दर्शन नाही झाले तरी बेहेत्तर पण फोटो आला पाहिजे हि चढाओढ माझे मनोरंजन करत होती.लोकांची तिला कॅमेऱ्यात टिपण्याची तळमळ वाखाणण्याजोगी होती.

बरं पेंटिंग कोणी काढले,किती साली काढले,किती वर्ष लागली,ते काढण्यामागची प्रेरणा काय हि माहिती घेण्याची उत्सुकता फार थोड्यामध्ये जाणवली.चित्र एका मोठ्या बुलेट प्रूफ काचेत ठेवले आहे.आणि दोन्ही बाजूला सिक्युरिटी गार्ड उभे आहेत.मोनालिसाच्या बरोब्बर समोरच्या बाजूला असलेले चित्र मला जास्त आवडले.खऱ्या अर्थाने संपूर्ण भिंत व्यापलेले हि कलाकुसर जास्त लक्ष वेधून घेते.

असो,ते आठवीच्या पुस्तकात द विंची आणि त्याची ती मोनालिसाचा आज पुन्हा नव्याने उलगडा झाला.आज त्या पिकासोची न कळणारी चित्र पहायची संधी मिळाली.सर्वात जास्त लोकांकडून भेट दिले जाणारे कला संग्रहालय अशी समर्पक बिरुदावली याला का मिळाली आहे याची जाणीव पदोपदी झाली.डोळे दिपवणारी पेंटिंग्स,डोळ्यात न मावणारी झुंबरे,नजर जाईल तितके लांब कॉरीडोअर्स असे हे आठ विविध भागात विभागलेले जगप्रसिद्ध लुव्र

म्युझियम.जगभरातील लोक इथे येऊन या संग्रहालयातील चित्रांवर डॉक्टरेट करतात.वर्षनुवर्षं इथली कलाकारी न्याहाळतात मी तर चार तासांसाठी आलो होतो.जमेल तितक्या गोष्टी डोळ्यात साठवल्या आणि मोनालिसाचा निरोप घेतला.

सल याचीच राहते कि वेळेची कमतरता आणि मोनालिसा पाहण्याचा उत्साह यात आपण बाकीची कलाकारी नीट पाहू शकत नाही.इथे भेट देणार असाल तर नक्की वेळ बरोबर घेऊन जा आणि या बाईच्या पलीकडेही पाहण्यासारख्या अनंत गोष्टी इथे आहेत त्या देखील तितकाच आनंद घेऊन पहा...सगळी चित्र आणि शिल्प संगहालयाच्या वेब साईट वर हाय रिसोल्युशन मध्ये सहज उपलब्ध आहे त्यामुळे कॅमेऱ्यातून पाहण्यापेक्षा डोळ्यांनी नक्की पहा..मजा अजून जास्त येईल...

हृषिकेश पांडकर

 

Monday, February 3, 2020

चेंजेबल हॉक इगल

 

भौगोलिक परिस्थिती, आवश्यक भोवताल,पक्षाचे राहणीमान,स्थलांतर करण्याच्या पद्धती,पाणी आणि अन्न यांची उपलब्धता या काही प्राथमिक बाबी असतात ज्यावरून पक्षाची ओळख पटविता येते किव्वा पक्षी ओळखता येऊ शकतो.आणि हेच मापदंड असू शकतात ज्यावरून पक्षांचे वेगळेपण ठरते. सरते शेवटी या गोष्टींमुळेच एकाच पक्षाचे विविध प्रकार अस्तित्वात आहेत आणि पहायला देखील मिळतात.


 

प्रस्तावना तशी लांबलीच. पण हे सांगणे गरजेचे वाटले. सुरुवातीला गरुड म्हणजे एक ठराविक पक्षी म्हणून माहित होता. ज्याचा आकार इतरांपेक्षा मोठा असतो. घारीपेक्षा मोठा आकार असल्याने छोट्या प्राण्यांना उचलून नेण्याची क्षमता यांच्यात असते. पक्षांच्या अन्नसाखळीत अग्रस्थानी असलेला हा गरुड पक्षी. अशी साधारण माहिती होती.

कालांतराने दक्षिण, मध्य आणि उत्तर भारतातील जंगलात गेल्यावर याच गरुडाचे अजून प्रकार पहायला मिळाले.काहींना तुरे होते. काही आकाराने मोठे, काहींच्या पंखांची ठेवणं वेगळी होती काहींच्या चोचीचा आकार भिन्न तर काही रंगानेच निराळे होते.

फोटोत असलेला हा पक्षी पण गरुडच. 'चेंजेबल हॉक इगल' असे याचे नाव.हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश,भारताचा ईशान्य भाग,बांगलादेश आणि अंदमान निकोबारचा बेट समूह या भागात आढळणारा हा पक्षी.आधी कॉर्बेटला गेलो होतो तेव्हा एकदा पहायला मिळाला होता. मात्र तो कॉर्बेट मधील चेंजेबल इगल आणि हा फोटोतील चेंजेबल इगल यात महत्वाचा फरक म्हणजे याचा रंग. साधारणपणे चेंजेबलचा हा गडद रंगाचा नमुना सहसा पहायला मिळत नाही. संपूर्ण गडद बाह्यरंग आणि उडताना देखील पंखांच्या खालील भागातील असलेला काळसर पत्ता नेहमीच्या चेंजेबल गरूडातील आणि यातील फरक स्पष्ट करतो.

उडण्याची पद्धत,भोवताल आणि खायची सामग्री जरा कमी अधिक प्रमाणात सारखी असली तरी यांची संख्या आणि दिसण्याची शक्यता तशी खूप कमीच. सुंदरबनाच्या बुटक्या आणि पर्णहीन काटक्यांवर रमलेला हा काळा ठिपका लांबून अगदीच सहज दिसला. तसा दुर्मिळ आणि कधीच न पाहिलेला असल्याने उत्कंठा अधिकच वाढली होती. शक्य तितक्या जवळ बोट नेऊन जमेल तितके फोटो काढण्याचा प्रयत्न केला. मात्र चेहेर्या समोरून फोटो घेण्याची हौस याने पूर्ण करून दिली नाही.अर्थात बघायला पोटभरून मिळाला याचा आनंद जास्त होता.

एक नवीन पक्षी पहायला मिळाल्याचा आनंद तर होताच पण केवळ रंगछटेमुळे आपले वेगळेपण जपणारा जीव असू शकतो याचा अचंबा देखील तितकाच होता.शेवटी गरुडचं तो, बोटीची चाहूल लागताच वार्याला कापत नजरेच्या आड झाला.पण आमची १५ मिनिटे सुसह्य करून गेला एवढे मात्र नक्की.

हृषिकेश पांडकर

०३.०२.२०२०

Changeable Hawk Eagle (Dark Morph) | India 2020