Wednesday, August 10, 2016

Mr.Bean



गोष्टी प्रथमदर्शनी जितक्या समजतात त्यापेक्षा जास्त त्या पुढल्या वेळी पाहताना कळतात.जितक्या जास्त वेळा पाहू तितक्या वेळा काहीतरी नवीन पाहिल्याचा बोध मला होतो. ही गोष्ट एका पंचवीस मिनिटांच्या बाळबोध टीव्ही मालिकेची आहे.

          शाळेत असताना साधारण सहा वाजता टीव्हीवर लागणार  Mr.Bean’  नावाचा तो अर्ध्या तासाचा कार्यक्रम मी न चुकता बघायचो.कथानक,संगीत,नेपथ्य,भव्यता किव्वा तत्सम यापैकी एकही गोष्ट त्यामध्ये नाहीये.पण तेव्हा पाहताना मजा वाटायची.

नंतर कॉलेज,क्लासेस,नोकऱ्या या मध्ये पुन्हा पाहण्याचा योग आला नाही.मागच्या आठवड्यात पुन्हा सगळे भाग पाहिले.खूप नाहीयेत पंचवीस मिनिटांचे पंधराच भाग आहेत.पण ते पाहताना आजही कमालीचा आनंद मला मिळाला.नवीन गोष्टी शिकलो.

          आहे तशी किरकोळ गोष्ट.एका करामती माणसाने दैनंदिन जीवनात घातलेले घोळ आणि ते निस्तरताना होणारी मजा इतकाच काय तो कथेचा गाभा.पण आधी सांगितल्या प्रमाणे प्रत्येक वेळी पाहिल्यावर नव्याने गोष्टी कळत गेल्या.

प्रस्तावना तशी ऐसपैस झाली.मूळ मुद्द्यावर येतो.तर Mr.bean पहात असताना एक गोष्ट लक्षात राहिली ती म्हणजे विनोद निर्मिती करण्यासाठी प्रत्येक वेळी भाषेचा वापर किव्वा अंगविक्षेप केलाच पाहिजे असे अजिबात नाहीये.कमालीचा हजरजबाबीपणा आणि पुस्तकी शिक्षणामधून कधीच न मिळणारी हुशारी bean ला कायम दिशा दाखवते.

थोडं Bean बद्दल सांगतो.हा माणूस अतिशय टिपिकल ब्रिटिश व्यक्ती आहे.वयाने  ३५-४० चा असावा.लग्न झालेले नाहीये.घरात एकटा राहणारा.अतिशय आचरट,हट्टी,कंजूस,भयंकर अस्ताव्यस्त,मुलखाचा आळशी,प्रचंड स्वार्थी आणि चिंधीचोर असा हा Bean.अर्थात या झाल्या त्याच्या स्वभावाची नकारार्थी बाजू.पण या उलट हा माणूस प्रचंड हुशार,हातातले काम पूर्ण करणारा (कुठल्याही मार्गाने),कुठल्याही बिकट परिस्थितीवर मात करणारा असा आहे.एकटाच रहात असल्याने दैनंदिन जीवनात येणाऱ्या सगळ्या गोष्टींना समर्थपणे तोंड देणारा आणि त्यात येणाऱ्या अडचणींना खुबीने हाताळणारा Bean पाहणे कायमच हलकेफुलके वाटते.पण याच दैनंदिन गोष्टी नक्की कश्या केल्या जातात हे बहुदा त्याला माहित नाहीये.आणि त्यामुळे कोणतीही छोटी गोष्ट करण्यात त्याला अडथळे येतात.वय वाढले मात्र बुद्धी तशीच राहिली आहे असे वाटण्याइतपत बालिश चाळे Bean करत असतो पण कमालीचा युक्त्या वापरून ते काम तो पूर्ण करतो हे पाहताना मजा येते.'रोवान ऍटकिन्सन' हा शिक्षणाने जरी इलेक्ट्रिकल इंजिनियर असला तरी विनोदी अभिनयामुळेच हा सर्वश्रुत आहे आणि राहिलाही.



स्वतःची गाडी लावण्यासाठी दुसऱ्याची गाडी ढकलून जागा करणे.रांगेत उभे असताना समोर असलेल्या लोकांना त्रास देऊन त्यांना रांगेतून बाहेर पडण्यास भाग पडणे.लहान मुलांना त्रास देणे,वयस्कर व्यक्तींना किव्वा अगदी पेशंटला सतावणे या सारख्या कुरापती काढणारा Bean आणि प्रेमाच्या बाबतीत कायम अयशस्वी ठरणारा किव्वा बरोबर असलेल्या जिवाभावाच्या टेडीवर जिवंत असल्याप्रमाणे वागणूक देणारा Bean कधी कधी केविलवाणा आणि हळवा देखील वाटतो.सीट खाली लावलेले च्युईंगम कानात बोळे म्हणून वापरणे,सँडविच मध्ये लागणारी पाने स्वतःच्याच मोज्यात घालून कुटणे या सारखे चाळे देखील बिनधास्तपणे करणारा Bean.स्वतःचे काम करीत असताना दुसऱ्याची जरा देखील पर्वा न करणे हा याचा स्थायीभाव.आपल्यामुळे कोणाला त्रास होतोय किव्वा गैरसोय होतीये याची किंचितही जाणीव न ठेवणे.आणि हे सर्व करीत असताना आपण कुठेच काही चुकत नाहीयोत किव्वा आपण केलेली चूक ही कोणाच्या लक्षातही आलेली नाहीये असा सोज्वळ चेहेरा करणारा Bean सुसह्य वाटतो.

परीक्षा हॉल मध्ये शेजारच्याचा पेपर चोरून बघण्याचा प्रयत्न असेल,चर्च मध्ये प्रार्थनेसाठी गेल्यावर केलेल्या करामती असतील, मित्रांना पार्टी साठी घरी बोलावल्यावर त्यांचे असणारे आदरातिथ्य किव्वा घराला रंग देताना चालवलेले डोके असेल, यातून Beanची सर्जनशीलता दिसून येते.आणि असे अनेक प्रसंग आहेत.हे सर्व करत असताना प्रत्येक प्रसंगात नामानिराळे राहण्याचे  याचे कसब वाखाणण्याजोगे आहे.



एखाद्या सेल च्या दिवशी दुकानात सर्वप्रथम पोहोचण्यासाठी वापरलेली युक्ती,खरेदी केलेले सामान घरी नेण्यासाठी गाडीत केलेली व्यवस्था किव्वा चूळ भरण्यासाठी गाडीच्या वयपरच्या पाण्याचा केलेला वापर या गोष्टी पाहणे मजेशीर आहे.प्रवासाच्या वेळी लहान बॅग आहे म्हणून झालेली गैरसोय आणि त्यातून कमी सामान नेण्यासाठीची खटपट आणि नंतर खाली ठेवलेली मोठी बॅग मिळाल्यानंतरची मजा या गोष्टीचा अप्रतिम अभिनय Beanने केलेला आहे.  



पोहण्याच्या तलावात उडी मारतानाची धावपळ.पाण्यात उतरल्यावर बाहेर येतानाचा गोंधळ या गोष्टी मनोरंजनाबरोबरच Bean च्या स्वभाव वैशिष्ट्यांची ओळख करून देतात.म्युझियम पहायला गेलेला Bean बॉबीचे फोटो काढतो तो प्रसंग मजेदार साकारला आहे.न्हाव्याच्या भूमिकेतील Bean बघताना झालेल्या चुका झटकून इंग्लंडच्या राजाचा मुखवटा चढवून कडेकडेने पळून जाणारा किव्वा लायब्ररी मधल्या पुस्तकाची चाळणी करणारा Bean पाहताना त्याच्यातील बालिशपणा सर्वार्थाने दिसून येतो.रात्री झोपताना घरातला दिवा बंद करण्याची पद्धत किव्वा स्वतःच्या गाडीचा दरवाजा लॉक करण्याची युक्ती पाहिल्यावर आपल्यालाच हतबल झाल्यासारखे वाटते.शाळेच्या प्रयोगशाळेत जावून नसते उद्योग करून घोटाळा करणारा किव्वा लहान बाळाला धडकगाडीत बसवणारा Bean पाहिल्यावर लहान मुलांच्या खोड्या काढायची वृत्ती समोर दिसून येते.

ट्रिपला गेल्यावर कॉफी बनवायची पद्धत असेल किव्वा सिनेमागृहात सिनेमा बघणे असेल प्रत्येक ठिकाणी वेगळेपणा दाखवला आहे.आईस स्केटिंगच्या कार्यक्रमात केलेल्या माकड चाळ्यांना कशाचीही उपमा देता येऊ शकत नाही.प्रेयसी सोबत सिनेमा बघणे किव्वा जादूचे प्रयोग बघणे या गोष्टी प्रेयसीलाच कशा महागात पडतात हे आपल्याला पदोपदी जाणवते.सिनेमाला येताना प्रेयसी साठी कोल्डड्रिंक न आणणे व स्वतः आणलेले चोरून पिणे.तिच्यासाठी छोट्या पाकिटात पॉपकॉर्न आणणे या गोष्टी पहायला विनोदी आहेतच शिवाय स्वभावाचे पैलू दाखवणाऱ्या आहेत.

या मजेशीर गोष्टींखेरीज अजून काही गोष्टी बघायला मिळतात.ते म्हणजे इंग्लंड मधील दैनंदिन जीवनातील घटनाक्रम.सध्या घरटी एखादी व्यक्ती परदेशात असली तरी या गोष्टी टीव्हीवर पाहण्याचे माझे अप्रूप कमी होईल असे वाटत नाही.वाहतुकीचे नियम, तिथली शाळा कॉलेजेस,चर्च,लायब्ररी,सिनेमागृह,कपडे धुण्याची सार्वजनिक जागा,हॉटेल,न्हाव्याचे दुकान किव्वा म्युझियम पासून ते अम्युझमेंट पार्क पर्यंत सगळ्या गोष्टी Bean मध्ये पहायला मिळतात.आणि या गोष्टी दाखवत असताना त्यातले बारकावे टिपले आहेत.

Bean चा तो खर्जातला आवाज फार कमी वेळा ऐकायला मिळतो.अर्थात संवाद काहीच नाहीयेत पण 'I am Bean' एवढं एकच वाक्य उच्चरल्यावर सुद्धा त्याचा तो वेगळेपणा दिसून येतो.त्याचा कायम ठरलेला पेहेराव,तोच मळखाऊ कोट, घाण झालेले बूट आणि पोटावर बांधलेली पॅन्ट.एखादी गोष्ट मनासारखी न झाल्यास कपाळावर पडणाऱ्या असंख्य आठ्या या परिचित आणि आपल्याशा होऊन जातात.



Mr.Bean हा कार्यक्रम विनोदी म्हणून दाखवला जातो हे सर्वश्रुत आहेच.पण ते साकारण्यासाठीची Rowan Atkinson ची मेहनत चार्ली-चॅप्लिन ची आठवण नक्की करून देते.पण यात विरुद्ध स्वभाव दाखवले आहेत.म्हणजे चार्ली हा गरीब दाखवला आहे मात्र यात Bean हा सर्वात हुशार आणि बेरकी  दाखवला आहे.

कार्यक्रमाचा इतिहास थोडा वाचला तर असे समजते कि Bean हा परग्रहवासी दाखविण्याचा कदाचित मानस असावा.कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या नामावलीमध्ये लंडन मधील St Paul's चर्च समोर Bean आकाशातून पडतो.त्यानंतर उठून तो उभा राहतो.त्याच्यावर स्पॉटलाईट घेतला आहे.याचा अर्थ सामान्य माणसाच्या जीवनावर आधारित हा विनोदी प्रकार दाखवण्याचा प्रयत्न.

ऍटकिन्सन जेव्हा ऑक्सफर्ड महाविद्यालयात शिकत होते तेव्हाच Bean या व्यक्तिरेखेची कल्पना डोक्यात आली.'वाढ झालेल्या शरीरातील लहान मूल' हा या पात्राचा गाभा आहे. Mr.Bean या नावाची मजा अशी आहे कि Mr. हा शब्द त्याच्या पासपोर्ट वर 'Name' या जागी लिहिलेला आहे आणि Bean’ हे त्याचे आडनाव आहे.तसेच हा माणूस जरी नोकरी करताना दाखवला नसला तरी कथानकानुसार ही व्यक्ती लंडनच्या राष्ट्रीय संग्रहालयात शिपायाचे काम करत असते.अर्थात ही माहिती कार्यक्रमात कुठेच दाखवलेली नाही.

थोडं वेगळं लिहिण्याचा खटाटोप करण्यामागे एकच विचार होता.कार्यक्रम विनोदी आहेच त्यामुळे हसायला येईलच.पण बाकीच्या छोट्या गोष्टी एकदम समजल्या कि त्यातली मजा अजून प्रकर्षाने जाणवते.

Bean च्या बाबतीत आपण काय बघत आहोत हा प्रश्नच नाहीये,पण आपण कसे पहात आहोत यावर त्यातून मिळणाऱ्या मनोरंजनाचा आलेख ठरतो.मनोरंजनाची व्याख्या ही व्यक्तीनुसार बदलते पण कोणत्या गोष्टीतून मनोरंजन करून घ्यावे याचे संपूर्ण अधिकार आणि ताबा हा त्या त्या व्यक्तीकडेच अबाधित असतो.त्यामुळे Mr.Bean कदाचित तुम्हाला कंटाळवाणे वाटू शकेल पण वर्णन केलेले सर्व प्रसंग पाहताना ते बारकाईने पहा स्वभावानुरूप होणार विनोद हा प्रत्येक ठिकाणी अधोरेखित होत असतो.



हृषिकेश पांडकर
१०-०८-२०१६

        खाली Mr.Bean कार्यक्रमाची व्हिडीओ लिंक देत आहे वेळ मिळाल्यास नक्की पहा.यात नसलेले भाग युट्युब वर नक्की पाहू शकता.

        https://www.youtube.com/watch?v=PY0uJFu6rl0

Wednesday, June 29, 2016

काजूकतलीची गोष्ट


          सहामाही परीक्षांचे निकाल जे लागायचे ते लागून गेले होते.शाळेतील आणि घरातील वातावरण आता निवळले होते.प्रगती पुस्तकावर पालकांची सही करून पुन्हा ती शाळेत पोहोचली होती.थोडक्यात काय तर सहली,स्पोर्ट्स आणि स्नेहसंमेलन सुरू होण्याअगोदर असलेला विसावा आम्ही अनुभवत होतो.ऑक्टोबरचा शेवट असल्याने शाळेचे स्वेटर घालायचे दिवस चालू होते.शनिवारी असलेली सकाळची शाळा नकोशी झाली होती.अर्थात शाळा नकोशी होण्यापेक्षाही सकाळचे उठणे असह्य होत होते.कारण शाळा नकोशी व्हावी अशी वेळच कधी आयुष्यात आली नव्हती.

          सातवीत होतो त्यामुळे अजूनही हाफ चड्डीचा गणवेश होता.पुढच्या इयत्तेपासून म्हणजे आठवीपासून पूर्ण चड्डी असायची.सकाळचा एखादा क्लास आणि मग शाळा असा सर्वसामान्य दिनक्रम होता.सायकलने शाळेत जात होतो आणि यंदा दिवाळीत नवीन सायकल घेतली होती त्यामुळे ती चालवत शाळेत जाणे हेच काय ते धाडसाचे काम असायचे.शाळा तशी दूर नव्हती पण कर्वे रस्त्यावर उड्डाणपूल अजून झाला नसल्याने गर्दी नक्की असायची.दुपार विभाग असल्यामुळे दुपारी ११.२० पर्यंत शाळेत पोहोचण्याचे उद्दिष्ट असायचे.बरोबर एक आठवीतला मित्र पण असायचा.दोघे एकत्रच जायचो.

          प्राथमिक शाळेत असताना एकाच रिक्षात असल्यामुळे मैत्री झाली होती.अन्यथा मैत्री व्हावी अशी वैचारिक साम्यता काही फार नव्हती.हा तसा लांबून यायचा.डहाणूकर कॉलोनी म्हणजे तेव्हा तसे लांबच वाटायचे.पण सायकल मारत हा माझ्या घराजवळ यायचा आणि आम्ही दोघे पुढे जायचो हा नित्यक्रम.अभ्यासात काही फार हुशार नव्हता.पण पु.लं देशपांड्यांच्या कथाकथनाची भारी हौस.त्यावेळी 'वॉकमन' बाजारात आले होते.याच्याकडे पण तो आला होता.त्यात सदैव कान घालून बसलेला असायचा.अंतूबर्वा,सखाराम गटणे,चितळे मास्तर,नंदा प्रधान,तो, असा मी असामी आणि बाकी सर्व.तो काही बाही सांगायचा त्यामुळे हे साधारण माहीत  होते.कानाला लावलेला "वॉकमन" चालू असताना त्याबरोबर स्वतः संपूर्ण म्हणण्याची त्याची सवय मला मात्र त्रासदायक व्हायची.धडे वाचावे त्याप्रमाणे तो 'मी आणि माझा शत्रुपक्ष' वगरे मोठ्याने म्हणायचं.पु लं विषयी अपार  प्रेम त्यांच्या सर्व लिखाणाचे प्रचंड कौतुक,आणि सर्व लेखन मुखोद्गत. मी मात्र या बाबतीत तास बाळबोधच होतो.पुढे पु.ला आणि सुनीताबाईंचे २-३ धडे आम्हाला मराठीच्या अभ्यासक्रमाला होते हेच काय ते पु.ल विषयीचे माझे ज्ञान.पु.ल ना भाई म्हणतात आणि ते सिनेमा नाटकात काम करतात एवढी माझी जुजबी माहिती.पण या मित्राचे मला अप्रूप वाटायचे.रोज ते कानात घालून सायकल वर जाताना ऐकणार.सगळी कॅसेट तोंडपाठ प्रसंगानुरूप एखाद्या पुस्तकातले एखादे वाक्य ऐकवणार,मला कायम अचंबा वाटायचा.  
     
तो गुरुवारचा दिवस होता.सकाळचं आटपून शाळेत जायला निघालो.खाली हा मित्र येऊन उभा होताच.आज थोडं लवकरच आला होता.आम्ही पण थोडे लवकर घरातून निघालो. १०.३० ची वेळ होती सकाळची.नित्याची घाई रस्त्यावर दिसत होती.ऑफिसेस,कॉलेज आणि बाकीचे व्यवहार सुरू होते.आम्ही पण शाळेकडे निघालो.मारुती मंदिर जवळ आल्यावर सहज एक विचार डोक्यात आला आणि मी मित्राला विचारले.'काय रे तू पु.लंचा  एवढा मोठा चाहता आहेस त्यांना कधी पाहिले आहेस का ? पुण्यातच असतात की.' या अचानक प्रश्नाने तो थोडं स्तब्ध झाला.'अरे वेडा आहेस  का..आपल्याला कसे भेटतील आणि का भेटातली पु.ल ?" मलाही आता त्याच्यात तथ्य वाटू लागले आणि माझा प्रश्न आता मलाच हास्यास्पद वाटू लागला.मी तो नाद सोडला आणि पुढल्या सिग्नलवर पाय टेकवला.   
    
          या सिग्नलला थांबलो असताना मित्रानेच मला विचारले की "आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे भेटले तर उत्तमच नाही भेटले तरी हरकत काय आहे ? मला त्यांच्या घराचा पत्ता माहितीये." मी उत्साहाने म्हणालो " हो  मग नक्की जाऊ शाळा सुटल्यावर";यावर तो म्हणाला की शाळा झाल्यावर कशाला आज शाळेला न जात थेट तिकडेच जाऊ". मी थोडं गोंधळलो.शाळा बुडवणे आणि ते ही न सांगता एवढे धाडस करायची सवय अजून लागायची होती.पण मित्र आता इरेला पेटला होता.आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही करावीच लागते या हिशोबाने मी आणि त्याने शाळा बुडवायचा निर्णय घेतला.

          परिस्थिती कशी असते बघा.कोणत्या तरी गुरुवारच्या दिवशी.शाळेला निघून शाळा बुडवणे.ते ही कोणाला न सांगता आणि कोणाला तरी भेटण्याच्या इचछेने.आणि एवढे करून भेट होईल याची शाश्वती नाही.त्या व्यक्तीची पूर्व परवानगी नाहीच नाही.आणि व्यक्ती साधी सुधी नाही तर साक्षात पु.लं...

          मनाची तयारी करून शाळेचे वळण चुकवले आणि थेट मित्राच्या माहितीत असलेले पु.लंचे घर गाठले.एव्हाना ११ वाजून गेले होते.सायकलचा स्टॅन्ड लावून त्या बैठ्या घराच्या दारापाशी आलो आणि समोर मोठी पाटी आढळली.मित्राने मोठ्याने वाचली "पु.लं.देशपांडे आता येथे वास्तव्यास नसून ते आता भांडारकर रस्त्यावरील 'मालती माधव' येथे स्थायिक झाले आहेत".

माझी निराशा लपत नव्हती.एखाद्या धाडसी कार्यात विघ्न येतातच अशा अविर्भावात आम्ही पुढेच मार्गक्रमण सुरू ठेवले.भांडारकर मार्ग काही लांब नाही.आणि आता शाळाही नसल्याने दिवसभर फुकटच होतो.काहीतरी खास करणार आहोत असा विश्वास मला तर पूर्ण होता त्यामुळे भांडारकर रास्तच काय पण अगदी शनिवारवाड्यापर्यंत सायकल हाकायला लागली असती तरी बेहेत्तर होते.मित्राला थोडा आत्मविश्वास कमीच होता.त्याचे म्हणणे होते की पु.लंच्या घराबाहेर नक्की सिक्युरिटी असणार.शिवाय ते पुण्यात असतील की नाही काहीच कल्पना नाही.बर असले तरीही आपल्याला का आत सोडतील? असे अनेक प्रश्न.पण जायचं ठरवलं होता त्यामुळे कर्वे रस्ता,लॉ कॉलेज रस्ता आणि सरते शेवटी भांडारकर रस्त्यावर येऊन पोहोचलो.

          बरोब्बर ११.३० वाजले होते.डाव्या बाजूला मालती-माधव लिहिलेले दगडी बांधकाम दिसत होते.एखादे सामान्य घर असावे तसे घर होते.दरवाजात सिक्युरिटी सोडा पण कुत्रं देखील नव्हते.सायकल तिथेच भिंतीला टेकवली दप्तराचे बंद व्यवस्थित केले.आणि एकमेकांकडे पाहून मालती माधव मध्ये निघालो.

          लोखंडी दार हळूच ढकलून आत गेलो.आणि लाकडी दरवाजासमोर येऊन उभे राहिलो.दरवाजा सताड उघडा होता.हे सर्व चालू असताना मित्र कायम पुढे होता.दोघंही घाबरतच पुढे जात होतो.आणि उघडा दरवाजा पाहत असताना दारावर असलेली पु.लंची सही दिसली आणि पोटात गोळाच आला.दरवाजावर नेम-प्लेट म्हणून पु.लंची सहीच लावली होती.लाकडी दारावर लावलेली सही पाहून वाहत असलेला मित्राच्या चेहेऱ्यावरचा आनंद शब्दात वर्णन करणे शक्यच नाही.आम्ही दबकतच दारात गेलो.बेल असली तरी दिसली नाही.मित्राने सावकाश कडी वाजवली आणि आवंढा गिळला.

                      
          दोघेजण स्तब्ध उभे होतो.खरंच पुलं भेटले तर काय ? आपण इथे का आलोय ? आपण कोण आहोत ? आणि एवढे करून मला काही फार पुलंची माहिती देखील नाही.जे काय आहे ते मित्राला,मी फक्त सोबत.एकतर हे दरवाजापर्यंत जात येईल याचीच कल्पना नव्हती.त्यात इथे तर दरवाजा उघडच होता.आपण यायला चुकलो की काय असे वाटावे तर दारावर ठसठशीत पाटी लावलेली होती.आणि घरात कोणी नसावे या शंकेला उघड्या दराने आधीच उत्तर दिले होते.त्यामुळे जे काय होईल त्याला आता सामोरे जायचे एवढेच आमच्या हातात होते.कुतूहल,आनंद,भीती आणि कुठलेसे दडपण असे भाव माझ्या मित्राच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होते.    
       
          कडी वाजवल्यावर पाच-सहा सेकन्द सरली आणि समोरून सुनीताबाई चालत आल्या.पुढे जे काय संवाद झाले (अर्थात संवाद म्हणण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीच बोलल्या आम्ही दोघंही मूग गिळून उभे होतो) ते कायम स्वरूपी जपले गेले एवढे मात्र निश्चित.

          सुनीताबाईंनी विचारले "काय पाहिजे ?".मित्र पुटपुटलापु.लंना भेटायचे आहे.बाईनी हसून विचारले "हो पण काम काय आहे ?" मित्र धिटाईने म्हणाला ''नाही फक्त भेटायचे आहे". सुनीताबाईंनी हसून आम्हाला आत  यायला सांगितले.

                    आम्ही दारातून आत पाय टाकला.थेट गाभाऱ्यात पाय टाकावा अशी भावना मित्राच्या चेहेऱ्यावर होती.आम्ही आता हॉल मध्ये उभे होतो.नजर नुसती भिरभिरत होती.असे वाटले की पु.लं कुठेतरी आतल्या खोलीत बसलेले असतील आणि काकू त्यांना बोलावून आणतील.पण घर न्याहाळत असताना आमच्या डाव्या बाजूला लाकडी विभाजन भिंतीवजा; नक्षीदार चौकट लावलेली होती.आणि त्याच्या पलीकडे साक्षात पु.लं काहीतरी वाचत बसलेले होते.

          आजी म्या ब्रह्म पाहिले अशा थाटात आम्ही दोघे आ वासून एकटक त्यांच्याकडे बघत उभे राहिलो.काहीसे पांढरे झालेले केस,अंगात पातळ पांढरी बंडी,बर्मुडा आणि जाड काड्यांचा डोळ्यावर लावलेला चष्मा.लाकडी आराम खुर्ची त्याला लावलेले नायलॉनचे कापड आणि शेजारी स्टुलावर ठेवलेले तांब्याभांड.आम्ही स्तब्ध होतो.   पु.लनी आम्हाला पाहिले आणि स्मित हास्य करून विचारलं "काय रे पोरांनो,काय झाल ?" मित्राने मानेनंच "काही नाही" असा सांगून पटकन ''नमस्कार" अस ओझरते म्हणाला. पु.लं फक्त हसले.पुलंनी विचारले "शाळा  सुटली का" ? मित्राने उत्तर दिले ''हो''..खरे बोलावे तरी पंचाईत आणि खोटे बोलावे तरी पंचाईत, मित्राने वेळ मारून नेली.पुलं पुन्हा म्हणाले "सकाळची का ?" पुन्हा मित्रानेच बाजू सांभाळली "हो". माझा बोलायचा संबंधच नव्हता.सगळं स्वप्नवतच चालू होते.पुन्हा पुलं म्हणाले "कुठली शाळा ?" "अभिनव मराठी,कर्वे रस्ता" इति मित्र,पुलं हसून म्हणाले "वाह".

          आता बोलायला आमच्या कडे काहीच शिल्लक नव्हते.परिस्थितीमुळे काही सुचण्याची सुतराम शक्यता देखील नव्हती. बर काम काय होते त्यालादेखील आमच्याकडे उत्तर नव्हतं.आणि तेवढ्यात पु.लं म्हणाले "बोला,काय  काम काढले ?".माझ्या पायाखालची जमीन सरकली.मित्राने धैर्याने तोंड दिले.तो म्हणाला "नाही फक्त भेटायला आणि पाहायला आलोय".पु.लं ही हसले.आणि मला हायसे वाटले..पु.लं म्हणाले "थांबा जरा", सुनीता अगं  पोरांसाठी बर्फी आण जरा."..बसा रे पोरांनो पाणी घेणार ?" असा विचारून त्यांनी हातातले पुस्तक बाजूला ठेवले.मित्र हळूच पुटपुटला "नाही ठीके".आणि हे होत असतानाच सुनीता बाई आतून वाटीत काजूकतली घेऊन आल्या.दोन दोन वड्या आमच्या हातावर ठेवल्या आणि आत गेल्या. आम्ही मुकाट्याने संपवल्या. इतर वेळी आवडीने खाणारा मी आता मात्र तोंडचे पाणीच पळाले होते.वडी संपताक्षणी मित्राने माझ्याकडे पाहिले.बोलायला तसेही काही नव्हतेच मित्र  स्वर्गीय सुखात न्हाऊन निघाला होता.मित्राने पु.लं ना सांगितले."सर येतो",पु.लं हसतच म्हणाले "ठीके.. .सावकाश जा रे"..आम्ही अक्षरशः पळतच बाहेर आलो आणि थेट सायकलींपाशी येऊन थांबलो.

दिवस सत्कारणी लागला होता..किंबहुना आयुष्य सत्कारणी लागल होत.मित्राचा आनंद चेहेऱ्यावरून ओसंडून वाहत होता.एकमेकांना काय बोलावे हे सुद्धा नीट काळात नव्हते.थंडी असूनही तळहातावर घाम जाणवत होता. आनंद व्यक्त करण्याचे फार मार्गही सुचत नव्हते.शाळा तशीही बुडाली होती.घरी जायची सोय नव्हती.आणि शाळा बुडवल्यामुळे काही बोलणे शक्य नव्हते.त्यामुळे घरचे सगळेच अनभिज्ञ होते आणि अजूनही आहेतच.मित्राच्या डोक्यातली एक खंत त्याने सांगितली की "भाईंच्या पाया पडू शकलो नाही राव ".जिथे हालचाल करायचे देखील भान नव्हते तिथे पाया पडायचे सुचणे सुद्धा अवघड दुरापास्तच.

इतके दिवस मित्राच्या तोंडून ऐकलेले पु.लं आज प्रत्यक्षात पाहिले होते.महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व अशी ज्यांची ओळख आहे अशा पुलंना आज साक्षात पहिल्याच आनंद फार मोठा होता.मित्राने घट्ट मिठी मारली आणि "आपले काम झाले रे" असे म्हणाला.तिथून थेट शाळेजवळच्या ग्राऊंडवर आलो आणि डबा खाऊन घेतला.खाऊन घेतला म्हणजे फक्त उघडला कारण पोट तर आधीच भरले होते.

त्याच पंधरा मिनिटांच्या आठवणीत पुढेच तीन-चार तास काढले आणि घरी परतलो एक अविस्मरणीय अनुभव  गाठीशी घेऊन.कधीच न विसरू शकणारी ती १५ मिनिटे आयुष्यभर लक्षात राहतील हे मात्र निश्चित.त्या पंधरा मिनिटांनी दाखवलेले पु.लं मी अजुही आयुष्यभर उलगडत बसलोय.

माझ्यापेक्षा जास्त आनंद आणि समाधान माझ्या मित्राने कमावले होते यात शंका नाही.फक्त त्याच्या भावना मी तुमच्या समोर ठेवल्या.त्याने अनुभवलेला प्रसंग तुमच्यासमोर यावा यासाठीच हा लिहायचा खटाटोप.त्याच्या मनात राहिलेली शाळा बुडवल्याची खंत माझ्यावाटे त्याने आज आपणासमोर मांडली ...मी केवळ निमित्त !

         बुडवलेल्या शाळेनेच आज सर्वात जास्त शिकवले  :)
     


तळटीप :

( परवा रात्री झालेल्या मुसळधार पावसात या मित्रासोबत खोळंबून राहण्याची वेळ आली होती.त्यावेळी त्याने ही त्याची भाईंची आठवण मला सांगितली.सांगत असताना तो इतका गुंतून गेला होता की त्याने मलाच त्याच्या सोबत भूतकाळात नेले.मी शरीराने प्रत्यक्षात तिथे त्या जागी कधीच नव्हतो पण त्याने मला ती पंधरा मिनिटे अनुभवायला दिली.पाऊस थांबला आणि तेव्हाच त्याचा हा अनुभव तुम्हा सर्वांसमोर मांडायचे ठरवले.)

                        
 

हृषिकेश पांडकर
२९.०६.२०१६