Saturday, August 7, 2021

गोड 'सायोनारा'

 राष्ट्रगीत खऱ्या अर्थाने शोभून दिसेल अशा खूप ठराविक जागा आहेत. प्रत्येक शब्द तोलून धरता येतील असे प्रसंग देखील फार कमी.

वर जाणारे सीट सांभाळत सिनेमा गृहात ऐकलेले राष्ट्रगीत आणि तीन पायऱ्या असलेल्या पोडीयम वर मधल्या उंच पायरीवर उभे राहून बाकीच्या देशांच्या तुलनेत किंचित वर सरकणारा तिरंगा पहात कानावर पडणारे राष्ट्रगीत यांची तुलना होणे नाही.


 

'सायोनारा' इतका गोड कसा असू शकतो !

मनापासून शुभेच्छा !

खूप कौतुक !

 

Thursday, June 24, 2021

हुलकावणी ते गवसणी ..

हरण्याचं दुःख कोणाला होत नाही ? तो ही एखाद्या विश्वकरंडकाचा अंतिम सामना. दुःख आहेच. आपला संघ चांगला खेळाला नाही, मोक्याच्या क्षणी कच खाल्ली, फलंदाजांनी अपेक्षाभंग केला,झेल सुटले, हवामानाचा अंदाज कदाचित चुकला आणि अशी अनंत कारण देता येतील. पण या दुखापलीकडे देखील एक सुखावह गोष्ट आज जाणवली ती म्हणजे न्यूझीलंड सारख्या संघाचा मोठा विजय.

सय्यमी आणि सरळ कर्णधार केन विलियम्सनच्या संघाचा विजय हा आपल्या पराभवावर फुंकर मारणारा ठरला. २०१९ च्या विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात केवळ बाह्य नियमांचा फटका बसून एका मोठ्या स्वप्नपूर्तीपासून वंचित असलेला संघ तितक्याच जिद्दीने आणि जोमानं आज टेस्ट चॅम्पियनशिप मिरवतोय ही गोष्ट खूप सुसह्य वाटतीये.


 

जितका आनंद आपण जिंकल्यावर झाला असता तितकाच आनंद न्यूझीलंड जिंकल्यावर झाला अशातला भाग नाही पण तुल्यबळ संघ जिंकला आणि किंबहुन खऱ्या अर्थी वरचढ संघ जिंकला हे महत्वाच. याच जागी आपल्या विरुद्ध ऑस्ट्रेलिया किव्वा इंग्लंड जिंकले असते तर त्याचे कौतुक मला इतके नक्कीच वाटले नसते. पण २०१९ च्या फायनलची सल आज किवींनी भरून काढली याचा आनंद जास्त.

धावा,बळी, शतके या तांत्रिक गोष्टींचा विचार मी करतच नाहीये पण एक संघ म्हणून न्यूझीलंड जिंकले याचे समाधान आहे.कुठलाही गाजावाजा न करता फायनलला आलेला संघ. स्टार प्लेयर अशी बिरुदावली मिरवणारा एकही खेळाडू संघात नाही तरीही खेळाच्या तीनही अंगात मजबूत आयुध बाळगणारा संघ.

हातातोंडाशी आलेला यश केवळ नशिबात नसल्यामुळे हुलकावणी देऊन जातं आणि त्यात यत्किंचितही खचून न जाता त्याच अपयशातून भरारी घेत त्याच तोडीच्या स्पर्धेत विश्वविजेतेपद मिळवणे हा प्रवास नक्कीच सोपा नसणार.

आपल्या पराभवाची सल व्यक्त करत बसण्यापेक्षा समोरच्या संघाच्या जिद्दीचे कौतुक आणि विजयाच

अभिनंदन

करणे रास्त वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.पांढऱ्या स्वच्छ पोशाखातील अनभिषिक्त सम्राट आणि खऱ्या अर्थी सिकंदर ठरलेल्या विलियम्सन आणि त्याच्या सर्व वीरांचे मनापासून कौतुक आणि

अभिनंदन

...

तेव्हा पराभव ओशाळला होता..आज विजयाला अभिमान वाटला असणार यात शंका नाही !!!

हृषिकेश पांडकर

२४.०६.२०२१

 

Friday, May 7, 2021

हुलॉक गिबन

 ज्याच्या शेंडीला पावशेर तूप असतं ते माकड. ज्याला शेपटीच नसते ते हे वानर. वानर आणि माकड हे दोन वेगळे विषय आहेत हे समजायला मला तसा बराच वेळ गेला. अर्थात हा फोटो काढायच्या बऱ्याच आधी तो फरक समजला होता पण प्रत्यक्ष वानर पहायची ही माझी पहिलीच वेळ. 


 

मनुष्यप्राण्याच्या जातकुळीतीलच हे दोन्ही जीव.वानराला शेपटी नसते आणि माकडाला ती असते. त्यामुळे माणसाच्या जवळ जाणारा या दोघांमधला प्राणी म्हणजे वानर असं म्हणायला हरकत नाही.

वरील फोटोमध्ये असलेले वानर हुलॉक गिबन या नावाने ओळखले जाते. भारतात सापडणारी एकमेव वानराची प्रजाती. भारताच्या उत्तरपूर्वेला असलेल्या सात बहिणींना कधी भेट देण्याची संधी मिळाली तर या वानराची सुदधा भेट घ्या.

याच्या हातांची लांबी ही पायाच्या लांबीच्या साधारण दुप्पट असते. तोल सांभाळण्याचे काम जसे माकड आपल्या शेपटीने करतात साधारण तसेच काहीसे हे हुलॉक गिबन आपल्या हाताने करतात. लटकत अंतर कापणारी काळी वानरं हिरव्या झाडांवर मजेशीर दिसतात.

चेहेऱ्यावर असलेली पांढऱ्या रंगाची किनार एखाद्या मुखवट्या सारखी भासत राहते. नर आणि मादी यांच्या रंगात जरी काहीसा फरक असला तरी चेहेर्यावरील हा मुखवटा दोघांनाही तसाच असतो.यांची अजून एक मजेशीर बाजू म्हणजे गाणं म्हणल्यासारखा केला जाणारा आवाज. आवाजाच्या वेळा इतक्या ठरलेल्या असतात की कोंबड्याच्या बांगे प्रमाणे यांचा आवाज देखील वेळ सांगण्यासाठी होत असे अशी माहिती समजते.

जंगलातील उंच आणि भरगच्च झाडाच्या शेंड्यावर लोम्बकळात खेळणारी ही वानर पहायला मिळतात. माकडं जशी खाली जमिनीवर पण सहज दिसतात तशी ही वानरं खाली दिसणं तसं दुर्मिळच.

आसाम मध्ये गिबन अभयारण्य नावाचे स्वतंत्र अभयारण्य आहे जिथे हा जीव पहायला मिळतो. मात्र वर काढलेला फोटो हा काझीरंगा अभयारण्यातील आहे. काझीरंगा अभयारण्याला स्पर्शून जाणाऱ्या महामार्गावरून जाताना जर नशिबाने साथ दिली आणि नजर जाईल तिथपर्यंत पसरलेले चहाचे मळे पहाण्यातून वेळ झाला तर झाडावर बागडणारे हे गिबन सुद्धा दिसू शकतात. त्यामुळे अगदी अभयारण्य असे नाही पण बाकीच्या गोष्टी पाहण्यासाठी इथे जाणे झाले तर हा माणसाचा पूर्वज नक्की पहा.

हृषिकेश पांडकर

०७.०५.२०२१

We admit that we are like apes, but we seldom realize that we are apes.

Hoolock Gibbon | Assam, India | Mar '21