Sunday, July 12, 2020

ऑनलाईन शाळा

 'ऑनलाईन शाळा' म्हणजे सरकार अन शिक्षण बोर्डाचा मोघम तोडगा झाला..

करोनामुळे वर्ष वाया जाऊ नये म्हणून चिमुरड्यांवर मात्र अन्यायच झाला...

स्क्रीन शेअर करून आकडे,चित्र आणि अक्षरे तर स्पष्ट वाचता येतील कि..

पण काळा फळा,ओला खडू आणि डस्टर मधून उडणारी पांढऱ्या खडूची पूड कशी दिसायची ?

सोनी,JBL चे हेडफोन लावून शांत आणि एकांतात सरांचा अन बाईंचा आवाज अगदी व्यवस्थित येईल हो..

पण मधल्या सुट्टीची घंटा,सुट्टीच्या बातमीचा धिंगाणा आणि राष्ट्रगीतातील 'भारत माता कि जय' कुठून ऐकू येईल ?

घरीच असल्यामुळे रोज आईच्या हातचे गरम जेवण सहज मिळू शकेलच कि..

पण घोळका करून खाल्लेल्या थंडगार पण 'व्हरायटी फूड' ची चव कशी मिळणार ??

इंटरनेट बंद पडून किव्वा लाईट जाऊन सुट्टी मिळेलही कदाचित..

पण 'शाळेभोवती तळे साचून' मिळणाऱ्या सुट्टीच मोल त्याला कधी यायचे ??

परवा बाईंनी वारीचे फोटो दाखवून पालखीची माहिती व्यवस्थित सांगितली खरी..

पण कपाळाला गंध,हातात टाळ आणि सोनेरी कागद लावलेली पालखी प्रत्येक वर्गात मिरवण्याची हौस तेवढी राहूनच गेली।.

कॅमेरा आणि माईक म्यूट करून घरच्या घरी डुलकी काढणे सहज शक्य आहे..

पण वर्गात बसून पुस्तकात डोके घालून घेतलेल्या वामकुक्षीचा आनंद त्यात कधी असेल का ?

झूम मीटिंग,गूगल हॅन्गआउट किव्वा अगदी स्काईप वर लॉगिन करून शाळेची सुरुवात तर दिमाखात होईल..

पण 'एक साथ नमस्ते' किव्वा 'भारत माझा देश आहे..सारे भरतीय माझे बांधव आहेत' याने सुरु होणाऱ्या मराठीच्या तासाची ऐट काही न्यारीच..

सकाळची शाळा असूनही आवरायला लवकर उठायची गरज भासणार नाही कदाचित..

पण रिक्षा वाल्या काकांची हाक आणि शाळेत जाईपर्यंतचा रिक्षातील 'कल्ला' हरवून गेलाच कि..

ऑनलाईन शिकवताना चित्र,प्रेझेंटेशन्स आणि ऑडिओ नक्कीच उत्कृष्ट दर्जाचे असतील..

पण फळ्यावर लिहिलेला सुविचार वाचणे किव्वा बाईंनी काढलेला प्राणी घोडा कि गाढव हे ओळखताना होणारी कसरत तेवढी पुन्हा होणार नाही..

पँडेमिकच्या लाटेत श्रावण तर सहज सारून जाईल..पाठोपाठ गणपती,दसरा आणि दिवाळी देखील वाहून जातील..

पण शाळेतली दही हंडी..गणपतीची आरती,सहामाही परीक्षा आणि बऱ्याच गोष्टींचा उल्लेखही आता होणार नाही ..

ऑफलाईन होऊन किव्वा विंडो मिनिमाइझ करून शाळा सुटेल रोजच..

पण घंटा ऐकताच गर्दी करून वर्गातून पळण्याची हौस त्यातून भागणार नाही हे नक्की..

घरूनच शाळा असल्याने डबा,गणवेश आणि दप्तराच्या ओझ्यातून मुलं बाहेर येतील..

पण खाऊचा डबा, शाळेचा धुतलेला गणवेश आणि तासाप्रमाणे लावलेले दप्तर यातली मजा हिरावली जाईल..

ऑनलाईन शिक्षण हि काळाची गरज असेलही कदाचित...त्यात मुलांची सुरक्षितताही नक्की असेल..

पण 'शाळा' म्हटल्यावर ज्या गोष्टी आपण अनुभवल्या त्या आनंदाला हि चिमुरडी मुकणार याची सल जास्त बोचणार..

#lockdownreturns

हृषिकेश पांडकर

१२/०७/२०२०

 

Wednesday, July 8, 2020

काटेरी मुकुटधारी

 

एकाने 'भारतीय क्रिकेट' रथाच्या अश्वाला टाच मारून खऱ्या अर्थी घोडदौड सुरु केली आणि दुसऱ्याने सय्यम,कुशलता आणि चातुर्याने वेग वाढवत अग्रक्रमांक गाठला…

एकाने हिरे वेचून संघ बांधला..दुसऱ्याने बांधलेल्या संघाला तारुण्याचे तोरण बांधून सोने केले…

एक मुळातच खानदानी,राजेशाही आणि गडगंज..दुसरा तसा सामान्य,धडपडून आणि प्रतिकूल परिस्थिती मधून वर आलेला…

साम्य इतकेच कि कारकिर्दीच्या सूर्यास्ताला दोघांकडेही रुबाब तितकाच…

एकाने सगळ्यांना क्रीज सोडून मारले..दुसऱ्याने क्रीज सोडणाऱ्यांना मारले…

एक टाईमिंग आणि पदलालित्याचा जादूगार तर दुसरा मनगटाच्या ताकदीचा धनी..

एक योग्य वेळी बोलून किव्वा कृतीतून लगेच व्यक्त होणारा निर्भीड दुसरा तसा अलिप्त आणि प्रसिध्दी झोतापासून हात राखून...

एकाने २००३ ला स्वप्नासमीप नेले...दुसऱ्याने तेच स्वप्न २०११ ला पूर्णत्वाला नेले..

एकाने 'आरे' ला 'कारे' विचारण्याची सवय लावली..दुसऱ्याने कोणी 'आरे' विचारणारच नाही याचीच खबरदारी घेतली..

'प्लेयर्स तो ऐसेही बनते है' असं म्हणत एकाने दुसऱ्याला बढती दिली..'आखरी सेशन है दादा कप्तानी आप करो' असे म्हणत दुसऱ्याने पहिल्याला मानवंदना दिली…

पहिला कायमच वाघासारखा आक्रमक,खमक्या आणि रुबाबात होता..दुसरा नेहमीच चित्त्या सारखा चपळ धूर्त आणि सय्यमी राहिला…

क्रिकेटवेड्या देशाचे जगाच्या नकाशावर यशस्वी नेतृत्व करणाऱ्या दोनही काटेरी मुकुटधारी सेनापतींना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा !!!

हृषिकेश पांडकर

०८.०७.२०२०

 

Friday, June 19, 2020

एक चिकन वॉन टॉन सूप वन बाय टू !!!

काल संध्याकाळची गोष्ट, वाण्याच्या दुकानात जाण्याचा योग आला. योग यासाठी म्हणतोय कि सूर्यास्तानंतर उघडे असलेले दुकान पाहणे गेले तीन महिने दुरापास्त झाले होते ते काल पहिले.तर वाण्याच्या दुकानात गेलो होतो मॅगी घ्यायला.नेहमीचा वाणी बंद असल्याने जरा लांब जावे लागले होते.

मॅगी या शब्दाचा उच्चार करताना मास्कचा मुख्य भाग दोनदा जिभेवर आला.वैतागून मास्क खाली केले आणि काका मॅगीचं चारवालं पाकीट द्या असं सांगितलं.शेजारच्या आजोबांच्या चिक्कीचा गूळ आधी चाखून मग वजन करता करता दुकानदार काका म्हणाले, 'नो मॅगी, आता चायनाचा माल ठेवणार नाही'.अजून काय हवय सांगा.मी जरा गोंधळून गेलो. म्हणलं छान आहे काका चीनच्या वस्तू ठेवणार नाही हे उत्तम आहे पण मॅगी चीनची नाहीये. नेस्टले कंपनी स्वित्झर्लंडची आहे. काका कपाळावर आठ्यांचं जाळं विणत म्हणाले "अरे बाबा न्यूडल म्हणजे चीनचा पदार्थ. चिनी माल बंद म्हणजे बंद. तुम्ही पण नका घेऊ" माझंच काहीसं चुकलं, किव्वा मीच देशद्रोही असल्याच्या अविर्भावात तिथून काढता पाय घेतला.

लावलेल्या गाडीपर्यंतचे अंतर कापत असताना मॅगी चायनीज कशी या विचारात मी पुरता बुडालो. केवळ माझं नशीब बलवत्तर म्हणून दुकानवाल्या काकांनी साखरेला चिनी म्हणतात म्हणून साखर आणि दालचिनी मध्ये चिनी आहे म्हणून दालचिनी अजूनही बॅन केली नव्हती.

चायनीज कंपनीचे मोबाईल फोन,इलेक्ट्रॉनिक वस्तू,मोबाईल ची ऍप्लिकेशन्स,प्लास्टिकच्या वस्तू इथपर्यंत असलेला बॅन मी एक सामान्य भारतीय नागरिक म्हणून समजू शकत होतो पण किराणा मालाच्या दुकानातील मॅगी बंद हा पेच मात्र मला काही केल्या सुटेना.

त्यात सकाळी कानावर आलेली बातमी अशी कि सर्व हॉटेल्स मधून चायनीज पदार्थांवर बंदी आणावी. स्वस्त आणि चमचमीत मिळते या दोन मुद्द्यांवर संबंध तारुण्यात हातगाडी एवढ्या 'ड्रॅगन','हॉट चायनीज','गोल्डन चायनीज','रेड हॉट' या आणि अशा अनंत टपऱ्यांवर चायनीज च्या नावाखाली वाट्टेल ते खाल्ले.चायनीज भाषेतील शेजवान हा शब्द सोडला तर चीन या देशाजवळ जाणारा एकही घटक त्यात नव्हता आणि इथून पुढेही नसेल. बरं तिथे काम करणारे आणि आचारी वर्ग देखील चायनीज वंशाचे असायची सुतराम शक्यता नाही.ही झाली टपऱ्यांची परिस्थिती, मोठ्या हॉटेल्स मध्ये देखील मिळणारे चायनीज आणि मूळ चीन मध्ये मिळणारे चायनीज याचा खरंच काही संबंध असेल असे मला वाटत नाही. तरी देखील आपण हे नावापुरते चायनीज पदार्थ बंद करून खरंच काही साध्य करू शकणार आहोत का ?

कुरापती करणाऱ्या चिन्यांना शह हा दिलाच पाहिजे आणि आपण तो नक्कीच देऊ पण चीन हा देश आणि भारतातील चायनीज पदार्थ या पूर्णतः भिन्न गोष्टी आहेत हे मुळात जाणून घेऊयात.उगीचच जिनपिंग ,यूहान ,कोविड-१९,गलवान व्हॅली या शब्दांच्या ओझ्याखाली बिचाऱ्या गोबी मंचुरियन आणि ट्रिपल शेझवान यांची गळचेपी का करावी नाही का 

हृषिकेश पांडकर

१९.०६.२०२०