Friday, January 17, 2020

रान मांजर

 

मांजर कुळातील आवडणारा अजून एक प्राणी,रान मांजर. दिसायला काहीशी पाळीव मांजराप्रमाणेच पण उंचीने थोडी जास्त. कमनीय आणि लांब सडक बांधा तसेच नेहमीपेक्षा असलेले उंच पाय या मुले स्पष्टपणे ओळखू येणारी.


 

सुंदरबनाच्या खारफुटी जंगलात ओहोटीच्या वेळात पिलासोबत दिसलेली ही रानमांजर.दलदलयुक्त भागात उगवलेले कमी उंचीचे खारफुटी जंगल आणि ओहोटीमुळे विसावलेले खाडीचे पाणी यामुळे चिखलाचा उघड पडलेला पृष्ठभाग. या भागात पिलासोबत शिकारीला आलेली ही आई.जमिनीलगत उडणाऱ्या पक्षाच्या मागावर इथवर आलेली ही मांजर इथे क्षणिक विसावली आणि पिलाच्या बाललीला सुरु झाल्या.

नजरेतून लगेच निसटून जाणारा मार्जार कुटुंबातील हा प्राणी.पण त्या पिलामुळे पोटभरून दर्शन घेता आले.झाडाच्या मुळांच्या पार्श्वभूमीवर दिसणाऱ्या माय-लेकांनी डोळ्याचे आणि पर्यायाने कॅमेऱ्याचे पारणे फेडले.

रान मांजर अर्थात जंगल कॅट या नावाने प्रचलित असलेला प्राणी तसा खूप दुर्मिळ नाही. मात्र दिसायला तसा सोपाही नाही.आधी पाहण्याचा योग्य आला होता पण इतकं सवडीनं बघायची पहिलीच वेळ.

मोठ्या मांजरीची अपेक्षा कायमच असते पण या छोटीने तिची हौस भागवली.अगदी दुधाची तहान ताकावर अशातला भाग नक्कीच नाहीये कारण जंगल म्हटल्यावर या कुटुंबातील पाळीव मांजर सोडल्यास सगळ्याच नातेवाईकांची ओढ तेवढीच राहते.

नेहमीच्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये (मध्य,दक्षिण आणि पश्चिम भारत) दिसणाऱ्या रान मांजरी वाळलेल्या गवतावर किव्वा झाडावर दिसतील मात्र या निमुळत्या आणि छोट्या मुळांमध्ये फिरत असलेल्या या मांजरी अजूनच रहस्यमय वाटत राहतात.

फोटोची अजून एक आठवण सांगतो मुख्य जंगलातून बाहेर पडायची वेळ झाली होती. शेवटच्या सफारीची वेळ आणि पर्यायाने सहलीचीही वेळ संपलेली होती.मुख्य बंदर १५-२० मिनिटापेक्षा जास्त दूर नव्हते.कॅमेरे बंद करून बॅगेत भरावेत अशा मनस्थितीत असताना दिसलेली ही मावशी दीर्घकाळ स्मरणात राहील.

नाजूक आणि देखण्या देहयष्टी सोबत असलेली शिकार करण्याची वृत्ती आणि धमक या गोष्टी पुन्हा एकदा ही मांजर वाघाची मावशी हे हे नातं सार्थ ठरवत होती एवढे नक्की.

हृषिकेश पांडकर

१७.०१.२०२०

Jungle Cat | Sundarban , India | Jan 2020

 

Monday, January 13, 2020

Ashy wood-swallow / ashy swallow-shrike

 

माळेत ओवलेले बारीक गोलाकार मणी किव्वा दसऱ्याला भरगच्च दिसावा म्हणून फुलं अगदी जवळ जवळ ओढून केलेला झेंडूचा हार दिसावा असंच काहीसं हे दृश्य. 


 

हिरव्यागार झाडाच्या एखाद्या पर्णहीन फांदीवर दाटीवाटीने बसलेले हे छोटे पक्षी.काहीश्या ढगाळ वातावरणात आणि सकाळच्या हवेत उतरलेल्या तापमानावर मात करण्याच्या हेतूने बसले असावेत असा समज करून बिलगून बसलेले हे पक्षी जवळून पहायला मजेशीर वाटत राहतात.

काही उलटे आणि काही सुलटे बसलेले असल्यामुळे त्या सरळ रेषेतही आलेले रंगाचे वैविध्य लांबूनही ओळखू येण्यासारखे असते. मात्र प्रत्यक्षात जवळ गेल्याशिवाय ते बसलेले पक्षीच आहेत याची कल्पना येत नाही.किंबहुना जवळ जाऊन देखील हे बिलगले पक्षी पाहताना हा फांदीचाच भाग असावा असा काहीसा भास होत राहतो. मात्र क्षणिक होणारी पंखांची हालचाल या जीवाची खात्री पटवते.

या रेषेतील एखादा मधलाच पक्षी जर उडून गेला तर मक्याच्या कणसातील मधलाच दाणा निघाल्यावर येणाऱ्या रचनेप्रमाणे हि फांदी दिसत राहते.रेषेतील बरेच पक्षी तरी डोळे मिटून होते. मात्र तोंडाने चाललेला अविरत आवाज त्या शांततेचा भंग करत होता आणि त्यांच्या अस्तित्वाची जाणीव देखील.

हा पक्षी साधारणतः असाच घोळक्यात दिसतो.उंच झाडाच्या वरच्या अंगाला पर्णहीन फांद्यांवर चिकटून बसलेले हे पक्षी आकाराला तसे लहानच पण हालचालालीला तितकेच चंचल असतात.उडताना रंगाचा अंदाज नीटसा येत नाही पण स्थिरावल्यावर याचा राखी रंग लगेच दिसून येतो.

हा पक्षी तसा फारसा लक्षात राहण्यासारखा किव्वा लोकप्रिय देखील नाही मात्र त्यांची हि बसण्याची पद्धत नक्कीच लक्षात राहते.किंबहुना यामुळेच हा पक्षी दीर्घकाळ स्मरणात राहील.

हृषिकेश पांडकर

१३.०१.२०२०

Sundarban Biosphere | India | January 2020

 

Monday, December 16, 2019

Sarus Crane - The tallest of the flying birds.

 

शायनिंग मारून लक्ष वेधणे हि कला मनुष्यजातीला नविन नाही.अर्थातच वन्यजीव त्यात तसूभरही मागे नसतात.फरक फक्त इतकाच कि प्राणी आणि पक्षांनुरूप ही शायनिंग मारायची पद्धत बदलत असते.पिसारा फुलवून नाचणारा मोर लांडोरीला साद घालतो अगदी त्याच प्रमाणे हा फोटोतला पक्षी आपल्या जोडीदाराला साद घालतो.हा फोटोतला पक्षी म्हणजे 'सारस क्रेन'.उत्तर प्रदेश या राज्याचा राज्यपक्षी.


 

दिसायला नाजूक,देखणा आणि उंचपुरा.लांबवर पसरलेल्या शेतीजमिनीवर शक्यतो जोडीनेच दिसणारा. जोडीदाराचे लक्ष वेधण्यासाठी आपल्याच पंखांचा गोलाकार पिसारा फुलवणारा हा सारस.मोरा इतक्या रंगछटा नक्कीच नाहीयेत पण आभाळाकडे मान उंचावून जोडीने साद घालणारा हा सारस त्या शेताच्या हिरव्या पडद्यावर कमालीचा रुबाबदार दिसतो.

उडणाऱ्या पक्षांमधील सर्वात उंच आणि अस्तित्वात असलेला पक्षी अशी देखील याची ओळख सांगितली जाते.या ओळखी सोबतच अजून एक विशेष माहिती समजली ती अशी की हा पक्षी जोडीदोरासोबत इतका एकनिष्ठ असतो की दोघांपैकी एक जण मृत पावला तर त्याच्या विरह शोकाने दुसरा अन्नत्याग करतो आणि तो देखील कालाधीन होतो.ऐकून नवल वाटले.

फुलवलेला पिसारा हा बॅडमिंटन शटलच्या पिसांच्या गोलाकार भागासारखा भासतो.या फुलवलेल्या पिसाऱ्यासोबत त्या दोघांचे ते लयबद्ध ओरडणे अगदी स्पष्ट ऐकू येते.'नल' सरोवराच्या आसपास असणाऱ्या सुंदर शेत जमिनींवर सकाळच्या वेळी विहार करणारे हे सारस कुटुंबीय.या 'नाचाची' थोडी प्रतीक्षा करावी लागते पण हा ३०-४० सेकंदांचा सोहोळा पाहण्यासारखा असतो आणि ऐकण्यासारखा सुद्धा.

संधी मिळाल्यास गुजरात,उत्तरप्रदेश या राज्यात गावाकडल्या भागातील शेतांवर हे दृश्य नक्की अनुभवा.थुई थुई नाचणारा फक्त मोरच नसतो या गोष्टीची प्रचिती या सारस कडे पाहून नक्की येईल.

हृषिकेश पांडकर

१६.१२.२०१९

Sarus Crane | Gujrat, India | 2019