Wednesday, February 21, 2018

Central Park

 चित्रकला म्हणल्यावर माझा कागद त्रिकोणी डोंगर,मराठीमध्ये चार हा अंक लिहिल्यावर तयार होणारे पक्षी,दोन डोंगरांच्या बेचक्यात शंकू पूर्ण करणारा सूर्य,त्या सूर्याच्या खालून सुरु होणारी नदी,डाव्याबाजूला घर,घराच्या दारातून नदीला समांतर असलेली नागमोडी पायवाट आणि घराच्या उजव्या बाजूला घरापेक्षा उंच असणाऱ्या आणि कदाचित वर काढलेल्या डोंगरालाही स्पर्शून जाईल असे डेरेदार झाड अशा गोष्टींनी पूर्ण होतो.या पलीकडे माझी चित्रकला गेलेली नाही.


 

एखादा चित्रकार आपल्यासमोर एखादे चित्र साकारतोय हे पहायची संधी फारशी मिळाली नाही.काकाला व्यक्तिचित्र काढताना पहिले आहे पण डोळ्यासमोर असलेल्या प्रत्यक्ष देखाव्याचे तंतोतंत रेखाटन होत असताना पाहण्याची हि माझी पहिलीच वेळ.

झाडाच्या सावलीत आपला स्टॅन्ड मांडून त्यावर कॅनव्हास व्यवस्थित ठेवून रंगाचे शिंतोडे उडले तरी कपड्यांना हानी होणार नाही याची खबरदारी म्हणून गळ्यात लटकविलेले ऍप्रन अशा थाटात त्या काकू समोरचा निसर्ग रंगामध्ये कैद करत होत्या.साधारण दुपारी दोन ते सायंकाळी सहा या चार तासात समोरच्या छोटेखानी पुलाची मुद्रा व्यवस्थित आपल्या कॅनव्हास वर रेखाटण्याचा यशस्वी प्रयत्न पूर्णत्वाला नेत होत्या.

पुलावरून शेकडो पर्यटक ये-जा करत होते,मधेच थांबून फोटो काढत होते,वाऱ्याच्या अलगद लाटेबरोबर असंख्य 'मोहब्बते' ची पाने सांडत होती पण याचा किंचीतसाही परिणाम काकुंवर झाला नाही आणि पर्यायाने त्या चित्रावरही.

पानांच्या रंगछटेप्रमाणे रंगलेला कॅनव्हास पाहणे डोळ्याला खूपच सुसह्य होते.डोळ्यसमोर उलगडलेले चित्र पाहताना काकूही प्रचंड समाधानी दिसत होत्या.त्यांचे अभिनंदन करून आणि हा फोटो घेऊन पुढे सरकलो.

त्या चित्राचे पुढे काय होईल किव्वा काय झाले याची मला कल्पना नाही पण माझ्या हातातल्या कॅमेऱ्यापेक्षा आज काकूंच्या हातातल्या ब्रशचे कौतुक जास्त वाटले.कॅमेरा काय आणि ब्रश काय दोन्ही कलेच्या पूजेसाठी लागणाऱ्या गोष्टी.पण कधी घंटेचा आवाज कानाला छान वाटतो तर कधी टाळाचा.हा हि त्यातलाच भाग आपण मात्र आरती चालू ठेवायची ☺

#ThoughtWithShot

Central Park | New York | Nov 2017

 

Wednesday, February 14, 2018

Brown-winged kingfisher

 बे ऑफ बंगाल अर्थात बंगालचा उपसागर,भारताचा पूर्वीय समुद्रकिनारा.आणि तिथलाच हा रहिवासी.ब्लॅक-कॅप्ड किंगफिशर जसा गोव्यामधील झुवारी नदीच्या तीरालगत म्हणजे पश्चिम किनारपट्टीवरही दिसू शकतो तसे याचे नाही.हा फक्त भारताच्या पूर्वेलाच पहायला मिळतो तो देखील खारफुटी,खाडीचा प्रदेश,दलदल अशाच ठिकाणी.त्यामुळे याला पाहण्यासाठी भितरकनिका,सुंदरबन या अतिशय योग्य जागा.


 

किंगफिशर कुटुंबातील आकाराने तुलनेत मोठा असणारा हा सदस्य.अर्थात सर्वात मोठा म्हणणार नाही पण दुसरा क्रमांक लागू शकेल.पाण्यातून थेट वर आलेल्या फांदीवर सकाळच्या वेळी खाद्य टिपण्यासाठी बसलेली हि याची मुद्रा.अंगावर आलेले सोनेरी ऊन आणि पंखांवर शिंपडल्यासारखे जमलेले जलबिंदू यामुळे फोटो काढण्याची मजा अजूनच वाढते.इतर कुटुंबीयांप्रमाणेच चंचल असल्याने एका जागी बसून रहायची वृत्ती नाही.अर्थात तसा बराच धीराचा म्हणावा लागेल कारण संपूर्ण नाव त्याला ओलांडून गेली तरी फांदी सोडली नाही याने.

बाकी रंगसंगती म्हणाल तर नावाप्रमाणेच गर्द तपकिरी रंगाचे पंख आणि त्यामुळेच लांबून ओळखायला सोपा आणि शोधायलाही.बरं आकाराने भक्कम असल्यामुळे सहसा लपून राहिला नाही.मात्र पाण्यालगत उडताना ते दलदलीचे पाणी आणि त्यावर उडणारा हा पक्षी चटकन कळून आला नाही.पण बसल्यावर मात्र ध्यानस्थ साधूसारखा भासतो.लांब सडक चोच आणि टक लावून पाण्याकडे बघणारी नजर खूप लोभस वाटते.आणि याच आवेशात टिपलेला हा फोटो.

The brown-winged kingfisher (Pelargopsis amauroptera) is a tree kingfisher belonging to the family Alcedinidae.These brown-winged kingfisher species inhabit tropical and subtropical mangrove forests, marine intertidal mud flats, salt pans, marine intertidal rocky shoreline, marine intertidal pools, brackish creeks and shallow estuaries.

Bhittarkanika | Odisha, India | January '18

 

Monday, February 12, 2018

'ब्लॅक कॅप्ड' किंगफिशर

 'चिऊताई चिऊ ताई दार उघड...थांब माझ्या बाळाला अंघोळ घालू दे' इथं पासून ते या 'ब्लॅक कॅप्ड' किंगफिशर पर्यंतचा पक्षांसोबतचा प्रवास खऱ्या अर्थाने मजेशीर होता.गेल्या वर्षी गोव्या मधल्या 'झुआरी' नदीत याला सर्वप्रथम पहायची संधी मिळाली.पण कॅमेऱ्यासमोर बसण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे कॅमेऱ्यात कैद करायचे स्वप्न काही काळ लांबणीवर पडले.मात्र मागच्या आठवड्यात भितरकनिकाच्या खारफुटी जंगलात याला मनसोक्त टिपण्याची संधी मिळाली.डोक्यावर असलेला गर्द काळा रंग आणि मानेवर असलेला शुभ्र पांढरा पट्टा त्यामुळे आपले वेगळेपण अधोरेखित करणारा किंगफिशर कुटुंबातील हा पक्षी.


 

अप्रतिम रंगसंगती आणि कमालीची चपळाई यात किंगफिशर पक्षी खूप पुढे आहे.आकाराने लहान असल्यामुळे आणि अतिशय चंचल असल्याने शांत बसलेला पक्षी जवळून पहायची संधी तशी फारशी मिळत नाही.मात्र पक्षी मिळण्याचे ठिकाण,पक्षाची फिरण्याची वेळ,बसण्याच्या ठरलेल्या जागा आणि आपली सावध हालचाल या गोष्टींचा मेळ जमला तर हा पक्षी व्यवस्थित पाहण्याचा आनंद नक्की घेता येऊ शकतो.

The black-capped kingfisher (Halcyon pileata) is a tree kingfisher which is widely distributed in tropical Asia from India east to China, Korea and Southeast Asia.This kingfisher is about 28 centimetres (11 in) long. The adult has a purple-blue wings and back, black head and shoulders, white neck collar and throat, and rufous underparts. The large bill and legs are bright red. In flight, large white patches or "mirrors" at the base of the primaries are visible on the blue and black wings.

Black Capped Kinfisher | Odisha | January 2018