Tuesday, January 30, 2018

दलदलीत उमललेले कमळ - 'भितरकनिका'

विविधतेत एकता अशी बिरुदावली मिरवणाऱ्या आपल्या राष्ट्रात संस्कृती,परंपरा,कला,धर्म,भाषा इतकीच विविधता नक्कीच नाहीये.या व्यतिरिक्तही भौगोलीक परिस्थिती,पर्जन्य,हवामान आणि त्यानुरूप बदलणारे वन्य आणि वनस्पती जीवन यातही प्रचंड विविधता जाणवते.याच वैविध्यतेमुळे पर्यटनात स्थळांमध्ये आपला देश अष्टपैलू ठरला आहे.आणि म्हणूनच कदाचित आपल्यापेक्षा वेगळे बाहेर काय पहायला मिळू शकेल याचा विचार डोकावतो.अर्थात प्रत्येक देशात त्यांचे त्यांचे वैशिष्ट्य आहेच पण आपल्या देशात असलेले हे सर्व प्रकारचे वैचित्र्य अचंबित करून सोडते.

मध्य आणि दक्षिणेकडील जंगलांचे नमुने पाहून झाल्यावर देशाची एकच दिशा शिल्लक राहिली होती जिथल्या जंगलाचा प्रत्यक्षदर्शी अनुभव मी कधीच घेतला नव्हता.आणि ती म्हणजे पूर्व.

६८व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आलेली सुट्टी पदरात पाडून या पूर्वेच्या जंगलात भटकंतीचा मुहूर्त लागला.तसे पहायला गेले तर सुंदरबन हे सर्वात प्रसिद्ध असलेले पूर्वेचे जंगल.मात्र याच रांगेत असलेले भितरकनिका हे तितकेसे अंगवळणी न पडलेले जंगल फिरावे हा सर्वप्रथम आलेला विचार.आणि याच विचारातून पुढे आलेले नाव म्हणजे भितरकनिका राष्ट्रीय उद्यान.

भारताच्या पूर्वेला पसरलेल्या अथांग बंगालच्या उपसागराला खेटलेल्या या जंगलात जाण्याचा हा पहिलाच अनुभव.वाघ नसला म्हणून काय झाले असंख्य पक्षांच्या जाती,विविध उभयचर आणि सर्वात मुख्य म्हणजे जंगलाचा सर्वात वेगळा प्रकार आणि तो म्हणजे खारफुटीचे जंगल.ज्याला इंग्रजी मध्ये 'मॅन्ग्रूव्ह' या नावाने ओळखले जाते.सुंदरबन खालोखाल ज्याचा नंबर लागतो तेच हे खारफुटीचे जंगल.

सुट्ट्यांच्या तारखा,तिकिटांची जमवाजमव,राहण्याची व्यवस्था या सगळ्यावर मात करून जेव्हा निघायचा दिवस येतो त्या क्षणासारखा आनंद नाही.

पुणे-कोलकाता-भुवनेश्वर असा प्रवास संपवून ओडिसा राज्यातील केंद्रपाडा गावात वसलेल्या या अभयारण्यात दाखल झालो.खाडीमध्ये पसरलेले हे जंगल.निमुळत्या वाटेने घुसलेले समुद्राचे पाणी आणि त्यातून तयार झालेल्या पाण्याच्या रुंद गल्ल्या आणि यातच दडलेले हे सुंदर वन्यजीवन म्हणजे भितरकनिका अभयारण्य.भितर म्हणजे आतील भाग आणि कनिका म्हणजे सुंदर.ज्याचे अंतरंग सुंदर आहे असे हे भितरकनिका.आणि अर्थातच नावाला तंतोतंत जागणारा अनुभव जंगल न्याहाळताना पदोपदी येत राहतो.

निळाशार असलेला समुद्र जेव्हा खाडीरूपाने भूतलावर शिरतो तेव्हा त्याचा रंग बदलतो.मात्र तेच निळे आकाश आणि गर्द हिरवळीने नटलेले दुतर्फा जंगल आपल्याला रहस्यमय ठिकाणी आणून सोडते.



जिप्सी ने जंगलात फिरणे आता सर्वश्रुत आहेच.पण अशा ठिकाणी आणि तितक्याशा गाजावाजा न झालेल्या शांत आणि एकांतात एका बोटीने फिरणे हा अनुभव खरंच अविस्मरणीय ठरतो.

कोणते प्राणी-पक्षी पहिले,झाडांची माहिती,राहायचे ठिकाण याबाबत तांत्रिक आणि पुस्तकी माहिती देण्यापेक्षा आलेल्या अनुभवाचे आणि वेगळेपणाचे वर्णन करायची संधी सुटू नये म्हणून हे लिहिण्याचा खटाटोप.

पहाटे सहाला उठून राहण्याच्या ठिकाणापासून बोटीच्या बंधाऱ्यापर्यंत चालत येतानाचा अनुभव पण मजेशीर होता.कोकणाचा भास व्हावा असे छोटेसे गाव.एकाच निमुळता रस्ता जो थेट पाण्याला आणून सोडतो.रस्त्याच्या दुतर्फा असलेली झोपडीवजा उभारलेली आणि शेणाने सारवलेली टुमदार घरे.अंगणात बांधलेल्या आणि नुकत्याच उठलेल्या शेळ्या.अनोळखी लोकांना पाहून आमच्यावर भुंकणारे गावातली कुत्री.पेटवलेले बंब आणि त्याची साक्ष देत धुक्याशी स्पर्धा करणारा त्याचा धूर.त्यातूनच किंचितसा डोकावणारा आणि तितकासा प्रखर नसलेला लोहगोल.

समुद्र इतका जवळ असूनही थंडी वाजायची हि कदाचित माझी पहिलीच वेळ.एका खांद्यावर कॅमेरा आणि एक हात खिशात अशा अवस्थेत चालत जाऊन बोटीवर बसलो.अथांग पसरलेले ते खाडीचे पात्र.दुतर्फा असलेली गर्द आणि हिरवीगार झाडी.किनाऱ्यावर असलेला संपूर्ण दलदलयुक्त गाळ.भरती ओहोटी नुसार कमी जास्त होणारे पाणी.पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या काही वनस्पती.मधूनच पाण्यातून आलेले एखादे झाड.काही ठिकाणी धुकं पांघरलेले पाणी.आणि यात संथपणे हेलकावे खात निघणारी आमची बोट.फक्त आमची बोट.



भारतात मिळणाऱ्या किंगफिशर पक्षांच्या जातीमधील सर्वात जास्त प्रजाती येथे पहायला मिळतात आणि याचा प्रत्यय पहिल्या अर्ध्यातासातच आला.पाण्यावर वाकलेल्या नाजूक फांदीवर बसणारे विविध किंगफिशर बघणे आणि पक्षाला चाहूल लागून न देता बोटीवरून फोटो टिपणे याची सर दुसऱ्या कशालाही नाही.

काही क्षणातच धुकं विरळ होत गेले आणि उन्हाची तिरीप थेट पाण्यावर विसावली.नुकतेच निघालेले ऊन आणि वातावरणात आलेली ऊब याचा फायदा घेऊन पक्षांची हालचाल वाढली.यातच काही हरणे पाण्याअडून चरताना दिसत होती.आणि मग रात्रभर पाण्यात बुडालेल्या खाऱ्या पाण्यातील मगरी आपले अजस्त्र शरीर पाण्याबाहेरील चिखलात वाळत घालायला सुरुवात करतात.भारतातील लांबीने सर्वात मोठ्या असलेल्या खाऱ्या पाण्यातील मगरी येथे पहायला मिळतात.यांची लांबी सुमारे वीस फुटापर्यंत असते.यांच्याच बरोबरीने त्यांची पिल्ले देखील मोठ्या संख्येने पहायला मिळतात.



याच गोष्टी न्याहाळण्यात सूर्य डोळ्यावर येत असतो.बोट तशीच संथ तरंगत असते.शांत आणि थंड वाटणारे पाणी आता चमकत असते.मगाशी पानांवर विसावलेल्या दवबिंदूंचे आता सूर्यकिरणांमुळे मोती झालेले असतात.

एवढ्यातच एखाद्या पाण्यावर आलेल्या झाडावर उन्ह अंगावर घ्यायला निश्चित पडलेला साप डोकावताना दिसतो.ऋतूंप्रमाणे स्थित्यंतर करणारे पक्षी काही परत येणारे तर काही जाणारे डोळ्यासमोरून उडत असतात.गाळ आणि पाणवनस्पतींमुळे पाणी निरभ्र नक्कीच नाहीये.त्यामुळे अंगावर येणार पाण्याचा गडद रंग प्रत्येक वेळी गंभीर वाटत राहतो.



सूर्याकडे मान वर करून पहायची वेळ होते तेव्हा पक्षांची सकाळ संपलेली असते.इतकावेळ चाललेला किलबिलाट ओसरू लागतो.सकाळी असलेला गारवा नाहीसा होत असतो.सकाळची सफारी संपते ती दुपारच्या ओढीने.कारण तरंगणाऱ्या बोटीवर उलगडणारी जंगलाची सकाळ आणि संध्याकाळ या दोन भिन्न गोष्टी असतात.

सकाळची सफारी उरकून मनसोक्त फोटो काढून आम्ही बोटीतून उतरून पुन्हा त्याच गावातून चालत येत होतो.सकाळची लगबग उरकून गाव आता स्थिरस्थावर होत होते.मगाशी लागलेले बंब आता नुसतेच धगधगत होते.

आमच्या त्या टुमदार घरात परतलो.शेळीच्या दुधाचा आणि किंचित खारट असलेला पण वाफाळता चहा घेऊन घराबाहेर असलेला त्याच खाऱ्या पाण्याच्या तळ्यावर खुर्च्या टाकून चहा घेण्यासारखा आनंद नव्हता..



त्यानंतर ओडिसी पद्धतीचे जेवण,काहीशी आळसावलेली शांत दुपार,कॅमेरा चार्जिंगसाठी असलेला अट्टाहास, पाहायला मिळालेल्या वन्यजीवांच्या प्रजातीवर झालेला उहापोह आणि यातच सकाळी भल्यापहाटे उठल्यामुळे येणाऱ्या झोपेची सावली या गोष्टीत वेळ कसा निसटतो याचा अंदाजच येत नाही.तेवढ्यात दुपारच्या सफारीची वेळ होते.

पुन्हा एकदा तो सफारीचा क्षण आला मात्र यावेळी प्रहर संध्याकाळचा होता.पुन्हा तोच गावातला रस्ता पालथा घालून आम्ही बोटीवर येऊन बसलो.दुपारचे तीन वाजत आले होते.जंगल तसे निपचित होते.पक्षांना अजून जाग नव्हती.बोटीने किनारा सोडला.काही वेळातच जंगलाला जाग आली.कडक उन्हात फिरणारे शिकारी पक्षी झाडाच्या उंच शेंड्यावर दिसत होते.कॅमेऱ्याची लेन्स जरी तोकडी पडली तरी प्रतिमा साठवण्याचे काम डोळे चोख बजावत होते.पुन्हा तेच जंगल होते पण सूर्य यावेळी अस्ताला जात होता.सकाळी दिसलेले सर्व पक्षी ठराविक अंतराने दर्शन देत होते.पाण्यातील पक्षांचा समावेश अर्थातच सर्वात जास्त होते.बगळे,करकोचे,बदके झाडून सगळे हजेरी लावत होते.खारफुटीच्या जंगलात आढळणारे पक्षी आणि प्राणी नशिबाच्या आलेखानुसार कमी जास्त दिसतात.पण पक्षांनी आम्हाला निराश केले नाही एवढे मात्र नक्की.

दुपार संध्याकाळ मध्ये बदलत होती.सूर्य झपाट्याने उतरणीला लागला होता.थंडीचे दिवस असल्यामुळे संध्याकाळची सफारी जेमतेम दोन अडीच तासच होती.उन्हाची जागा थंड वाऱ्याने घेतली होती.पक्षांचे बाणाच्या आकारात उडणारे थवे माघारी परतताना दिसत होते.सकाळी पहुडलेल्या मगरी खोल पाण्यात नाहीश्या झाल्या होत्या.



अंधार पडायच्या आत आम्ही किनाऱ्याला लागलो.नावाड्याने बोट लाकडी ओंडक्याला बांधली आणि आम्ही उतरलो.आता थंडी जाणवत होती.गर्द झाडीमुळे सभोवताल काळवंडला होता.मगाशी चालू असलेली पक्षांची लगबग आता नाहीशी झाली होती.गावातला तो रस्ता देखील आता शांत होता.दिवेलागणीच्या खुणा दिसत होता.सहाच्या आसपासच वाजले होते पण गावाला अंधाराने कवेत घेतले होते.आम्ही राहायच्या ठिकाणी पोहोचलो.

नवीन पहिल्याच आनंद होताच पण त्याबरोबर नवल देखील तितकेच होते.इतर जंगलांच्या तुलनेत तसूभरही हे जंगल मागे राहिलेले नव्हते.आणि भारताच्या पूर्वीचे जंगलाने माझ्या मनातली जागा कायमची पक्की केली.

थोडे आडवाटेला असल्याने तितकेसे प्रकाशझोतात न आलेले जंगल नक्कीच आहे. मात्र निसर्गाने वरदहस्त ठेवताना कुठेच आखडता हात घेतलेला नाहीये.पुन्हा एकदा तेच सांगावेसे वाटते कि संधी मिळाल्यास नक्की भेट द्या.खाऱ्या पाण्यावर फुललेल्या या हिरवळीवर नांदणाऱ्या जीवसृष्टीचा हेवा वाटल्याखेरीज राहणार नाही.'पश्चिम घाट' आणि 'मलाबार' यांच्या सौन्दर्याला खांद्याला खांदा लावून उभा असलेला हा पूर्वीचे समुद्रकिनारा डोळ्याचे पारणे फेडतो.

                                                                               हृषिकेश पांडकर
                                                                              ३०/०१/२०१८

Friday, January 19, 2018

Liberty Enlightening the World !


न्यूयॉर्क आणि न्यूजर्सीच्या मध्ये पसरलेल्या समुद्रातील बेटावर उभी असलेली हि स्वतंत्रदेवता एका हातात मशाल आणि एका हातात पुस्तक घेऊन उभी आहे.अमेरिका म्हणल्यावर जे चित्र डोळ्यासमोर येतं त्यातील एक म्हणजे हि बाई.


 

विस्तीर्ण जलाशयात असूनही स्तब्ध उभी असलेली स्त्री पाहणे मजेशीर वाटते.कॅमेऱ्यासमोर कुठलेही हातवारे न करता आणि सर्वात मुख्य म्हणजे न हसणारी कदाचित हि पहिलीच आणि अर्थातच शेवटची बाई असावी.

न्यूयॉर्क स्कायलाईनच्या पार्श्वभूमीवर हा स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा पाहणे कमालीचा अनुभव ठरतो.राष्ट्राच्या आग्नेयेला पाहात जगभरातील लोकांचे खुल्या मनाने अमेरिकेत स्वागत करणाऱ्या या स्वातंत्रदेवीला अजूनतरी ट्रम्पच्या व्हिसा पॉलिसीचा अंदाज नसावा.नाहीतर विदेशींच्या स्वागताचे इतके अगत्य किमान तिच्याकडून तरी अपेक्षित नाहीये.

बाकी पुतळ्याची ढीगभर माहिती गुगल वर आहेच.तीच इथे लिहिण्यात मजा नाही.पण संधी मिळाल्यास नक्की भेट द्या.प्रत्यक्ष बेटावर उतरून पुतळा पाहण्यापेक्षा अलीकडून संपूर्ण नजारा पाहणे हि खऱ्या अर्थाने पर्वणी ठरते. डोळ्याला आणि कॅमेऱ्याला देखील.

काही जणी जवळ जाऊन पाहण्यापेक्षा लांबूनच अधिक सुंदर दिसतात.त्यातलेच हे काहीसे..

Statue of Liberty | New York | USA November 2017

 

Friday, December 15, 2017

सुटलेल्या झेलांच्या आठवणी

 टेस्ट क्रिकेट किव्वा एकदिवसीय सामन्यात एखादी मोठी भागीदारी चालू असताना,भरपूर धावा होत असताना आणि विकेट पडण्याची सुतराम शक्यता नसताना समजा आपण जर स्लिप मध्ये उभे राहिलो असू आणि 'From no where' एखादा जोरात टाकलेला लेंग्थ बॉल बॅटची कड घेऊन थेट आपल्या गुडघ्याच्या उंचीवर आल्यावर एक क्षण जी मानसिक स्थिती होते ना तशीच अगदी तशीच अवस्था हा फोटो काढताना माझी झालीये.


 

प्रस्तावना झाली आता गाभा सांगतो.वर वर्णिलेल्या प्रसंगातून वाचकहो असा भावार्थ घ्या कि इतका वेळ आपण चालू असलेल्या प्रकाराशी इतके समरस झालेलो असतो कि अचानक आणि अनपेक्षित घडलेल्या घटनेकडे कदाचित दुर्लक्ष होते आणि ज्याची आपण मनापासून वाट पाहत असतो ती गोष्ट डोळ्यादेखत निसटते.अर्थात वरच्या प्रसंगात अगदी 'कॅचेबल हाईट' वर असलेला म्हणजे साधारण सहज झेलत येणारा चेंडू क्षणार्धात जमिनीवर सांडतो.खेळ पुन्हा तसाच पुढे चालू राहतो आणि पुन्हा एकदा तीच प्रतीक्षा अविरत सुरु राहते.

हे सांगायचं उद्देश असा कि अश्याच एका दक्षिण भारतातल्या संध्याकाळी जंगलातून जात असताना काहीतरी दिसेल या प्रतीक्षेत बराच वेळ होतो पण सय्यम अंत पहात होता.धुळी पासून कॅमेरा जपावा म्हणून झाकलेला कॅमेरा तसाच निपचित होता.सूर्य देखील नित्य नेमाने प्रदक्षिणा पूर्णत्वाला नेत होता.अगदी सूर्यास्त नाही पण किरणे मात्र चांगलीच लांबली होती.उन्हाचा उबदारपणा थंड वाऱ्याने बेमालूम चोरला होता.जंगल दिवसाच्या उत्तरार्धात विसावत होतं.

एवढ्यात एका वळणावरून आम्ही पुढे सरकलो आणि आमच्या काही फुटांवरून या बिबट्याने शांतपणे रस्ता ओलांडला.मागे वळून कॅमेरा काढून,त्याच्या आयपीस मधून तो बिबट्या पाहून आणि असलेल्या प्रकाशाचा हिशोब जुळवत जेव्हा घाई घाईत शटर दाबले तोपर्यंत राजे झुडपात नाहीसे झाले.हाती फक्त दोन फोटो राहिले.जंगल पुन्हा तेच आणि तोच पुढचा शोध कायम.

हाती लागलेल्या त्या दोन फोटोपैकी आत्ता टाकलेला हा एक फोटो.इतक्या वेळच्या सुस्तपणामुळे अचानक गडबडीत काढलेला फोटो.डोळ्यासमोर दिसणारा संपूर्ण बिबट्या तसाच सोडून शेजारच्या झाडाचे खोड व्यवस्थित फोकस झाले आहे.बिबट्या तसाच पसार झाला निसटता आणि धूसर.हाती आलेला चांगला फोटो गमावला तो भाग वेगळाच.पण क्षणार्धाच्या घाईमुळे आठवणीतला फोटो कायमचा गेला याचे शल्य जास्त.

असो …चालायचेच…प्रत्येक फोटोमागे काहीतरी आठवणी असतात त्याप्रमाणेच या धूसर फोटोमध्येही तितक्याच स्पष्ट आठवणी जपल्या गेल्या एवढे मात्र नक्की.घेतलेल्या झेलांच्या आठवणी कायमच आनंददायी असतात पण सुटलेल्या झेलांमधून शिकण्याची मजा काही वेगळीच नाही का ? 

- हृषिकेश

Karnataka | India | November 2017

 

Friday, December 8, 2017

किल्ल्यावरचा वाघ

 लहानपणी दिवाळीत घराच्या बाल्कनी मध्ये किल्ला बनवायचो.'लहानपणी' हा शब्द मुद्दाम वेगळा नमूद करावा लागतोय याचे कारण एकतर मी (वयाने) मोठा झालोय किव्वा मी आता किल्ला बनवत नाही.अर्थात दोन्ही गोष्टी तितक्याच क्लेशदायक आहेत.असो तर या दिवाळीच्या आमच्या किल्ल्यावर कायमच वाघाला अभेद्य स्थान असायचे.वर्षानुवर्षे त्याच आवेशात बसलेला वाघ किल्ल्याची शान असायचा.


 

अळीव किव्वा मोहरीच्या बनात आणि विहिरीला खेटून असलेल्या गुहेत गवतात चरत असलेल्या गाई आणि हरणांना न्याहाळणारा तो जंगलचा राजाची तेव्हाही तसूभर हालचाल नसायची आणि आजही तो यत्किंचित हलला नाही.त्याच विहिरीवर पाणी भरायला आलेल्या बायका शांतपणे बसून तो तेव्हाही पहायचा आणि आज आमची संबंध जिप्सी असूनही तो जरासाही वळला नाही.

तशीच मुद्रा,तोच आवेश,तसाच रुबाब आणि तेच सौन्दर्य.अंगाभोवती गवत असूनही आपले वेगळे पण जपणारा तो वाघ आज पुन्हा आठवला

नाही म्हणायला मधले काही क्षण पाठीवर लोळला देखील पण फोटो काढायला त्याची परवानगी नसावी.काही वेळ तर पलीकडे तोंड करून झोपला होता; हाक मारायची देखील सोय नाही.नंतर कदाचित आमची कीव येऊन त्याने आमच्याकडे मान फिरवली असावी.

तोच हा क्षण,टीव्हीवरच्या दोन कार्यक्रमात जाहीरात लागावी त्याप्रमाणे सूर्यास्त आणि रात्र या मध्ये केवळ रंग दाखवून जाणारा संधिप्रकाश पसरला होता.आमची सफारी संपण्याची वेळ झाली होती आणि याच्या रात्र सफारीचा तो प्रारंभ होता.

पुढ्यात बसलेला वाघ सोडून निघून जाणे इतका माज करण्याची संधी सुदैवाने कधीच मिळाली नव्हती.पण एखाद्याच्या घरी न सांगता भेटीला जायचे म्हणल्यावर त्याच्या 'रुटीन' ला अडथळा येणार नाही याचे भान ठेवणे यासारखे सामंज्यस्य नाही हेच खरे..नाही का ?

- हृषिकेश