मागच्याच आठवड्यातील तो दिवस....सकाळी उठलो तेव्हा ध्यानीमनी देखील नव्हते कि आज रात्री झोपायच्या आधी मला असे दोन एकाच बांधणीचे पण टोकाचे अनुभव येतील.म्हणजे एखादी व्यक्ती एकाच दिवसात एकाच पद्धतीचे पण प्रचंड विरोधाभास असलेले अनुभव कसे घेऊ शकते या विचारानेच माझी झोप लांबवली..
अगदी दैनंदिनी लिहायच्या फंदात पडत नाही पण दिवसाचा घटनाक्रम सांगायचा हा खटाटोप.तारीख, वार लिहिण्याचे सोपस्कार पाडायची फारशी गरज वाटत नाही.पण दिवस चांगलाच असावा...मित्राच्या साखरपुड्याचा मुहूर्त होता.आता खरं सांगायचे तर अगदी जवळचा मित्र आहे असे म्हणण्याइतपत जवळचा मित्र नाहीये..पण ऑफिस हि जागाच अशी आहे कि रोज भेटून भेटून ओळखीला मैत्री म्हणायची वेळ येते.हरकत नाही..आमची ओळख ४/५ महिन्याच्या पलीकडे जाणारी नव्हती.पण जन्म कोल्हापूर चा असल्याकारणाने साखरपुड्याला नक्की या असे बजावून सांगितले होते.आणि मी पण गेलो होतो.अर्थात साखरपुड्याला पुणे सोडून जाणे, एवढा उत्साह माझ्यात नाही.पण ऑफिस ला सुट्टी आणि तेवढंच फिरण्याचा आनंद या दोन सोयीस्कर गोष्टीनमुळे मी पण जाणार होतो.
अगदी दैनंदिनी लिहायच्या फंदात पडत नाही पण दिवसाचा घटनाक्रम सांगायचा हा खटाटोप.तारीख, वार लिहिण्याचे सोपस्कार पाडायची फारशी गरज वाटत नाही.पण दिवस चांगलाच असावा...मित्राच्या साखरपुड्याचा मुहूर्त होता.आता खरं सांगायचे तर अगदी जवळचा मित्र आहे असे म्हणण्याइतपत जवळचा मित्र नाहीये..पण ऑफिस हि जागाच अशी आहे कि रोज भेटून भेटून ओळखीला मैत्री म्हणायची वेळ येते.हरकत नाही..आमची ओळख ४/५ महिन्याच्या पलीकडे जाणारी नव्हती.पण जन्म कोल्हापूर चा असल्याकारणाने साखरपुड्याला नक्की या असे बजावून सांगितले होते.आणि मी पण गेलो होतो.अर्थात साखरपुड्याला पुणे सोडून जाणे, एवढा उत्साह माझ्यात नाही.पण ऑफिस ला सुट्टी आणि तेवढंच फिरण्याचा आनंद या दोन सोयीस्कर गोष्टीनमुळे मी पण जाणार होतो.
आता आम्ही सकाळी ८.३० वाजता गाडीत बसलो आणि ११ .३० वाजता कराड ला पोहोचलो.मजा बघा..तिथे गेल्यावर मित्राला पुन्हा पत्ता विचारला कि बाबा रे आम्ही इथे आलोय पुढे कसे जायचे...यावर तो म्हणाला कि कराड पासून थोडे पुढे म्हणजे साधारण ४० km अंतरावर तासगाव नावाचा तालुका आहे तिथे या....आम्ही मुकाट तिथे गेलो...गाडीचा पत्रा आणि डांबर या दोन्ही गोष्टी सहज वितळतील असे छान उन पडले होते...निसर्ग म्हणल्यावर जे डोळ्यासमोर येते अशी कोणतीही गोष्ट खिडकीतून दिसत नव्हती.सुमारे तासाभरानंतर आम्ही तिथे पोहोचलो.मग पुन्हा तिथून त्याला फोन केला तर तो म्हणाला कि आता तासगाव पासून अजून १० km अंतरावर शिरगाव नावाचे एक गाव आहे तिथे या आणि फोन करा...आमच्याकडे आता पर्याय नव्हता ..आम्ही तिथे गेलो आणि फोन केला...दुपारचा १ वाजून गेला होता कुठून इथे आलो मरायला असे वाटण्याइतपत कंटाळा आला होता...मित्राला फोन केला कि आम्ही आलोय आता कुठे ? तर तो म्हणाला कि ******* हे नाव विचार त्यांच्या घरासमोरच मांडव आहे.
आता घरासमोर मांडव हि कल्पना पटायलाच माझा थोडा वेळ गेला.कारण याआधी अशा ठिकाणी जायची वेळच आली नव्हती.जिथपर्यंत गाडी जाईल तिथपर्यंत गाडी नेली.आणि केवळ आमचे भाग्य कि मांडव दिसू शकेल अशा ठिकाणापर्यंत आम्ही पोहोचू शकलो...
आता घरासमोर मांडव हि कल्पना पटायलाच माझा थोडा वेळ गेला.कारण याआधी अशा ठिकाणी जायची वेळच आली नव्हती.जिथपर्यंत गाडी जाईल तिथपर्यंत गाडी नेली.आणि केवळ आमचे भाग्य कि मांडव दिसू शकेल अशा ठिकाणापर्यंत आम्ही पोहोचू शकलो...
आम्ही गाडीतून उतरलो आणि थेट मांडवात गेलो...दुपारचे १.३० वाजून गेले होते..भुकेने आपल्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या...साखरपुडा म्हणल्यावर जे पदार्थ डोळ्यासमोर येतात त्यातील एकही पदार्थ असू शकेल याची शक्यता देखील नव्हती.आम्ही मांडवा पाठीमागे असलेल्या हपाश्यावर हात,पाय,तोंड धुतले..पाण्याची चव या विचायावर लोकांनी आपापली मत मांडली.काहींनी एका शिवीमध्ये विषय हाताबाहेर काढला.नंतर शेजारी असलेल्या पिंपळाच्या पारावर येऊन बसलो आमच्या बरोबरीने गावातील काही वृद्ध मंडळी गप्पा मारत बसले होते...काही जण केवळ जेवणाच्या वेळेची वाट पहात पहुडले होते.मांडवातील दृश्य अतिशय स्पष्ट दिसत होते.विधी जिथे चालू होते त्या चौथर्यावर जितकी लोक होती तितकीच लोक चौथर्याच्या खाली होती.मोजून ११ खुर्च्या समोर टाकल्या होत्या त्यातल्या ९ रिकाम्या होत्या..एकावर कुत्रे बसले होते...जे नंतर एका आजोबांनी हटकल्यामुळे पळून गेले....
कुठेही गोंधळ नव्हता...शांतपणे सगळे चालू होते...रिंग exchange ज्याला आम्ही म्हणतो तो विधी कधी झाला हे सांगण्या इतपत लक्षात नाही...पण मित्रांनी हात वर करून रिंग दाखवली खरी.मांडवाला लागुनच मुलीचे घर असावे.कारण २/३ ठराविक बायका घरातून मांडवाकडे आणि मांडवातून घराकडे अक्षरशः पळत होत्या .विधी झाल्यावर पेढ्याला लागलेल्या मुंग्या पेढ्याला धक्का लागल्यावर जश्या पसरतात त्याप्रमाणे चौथार्यावरची गर्दी पांगली...काही लोक थेट घरी गेले...आता थेट म्हणण्यात मजा नाही कारण ४ पावलांवर घरे होती.त्यानंतर जेवणाची वेळ आली..अर्थात आम्ही पोहोचलो ती सुद्धा जेवणाचीच वेळ होती..पण आता जेवण पण होते.पहिली पंगत बसली जी तब्बल २२ लोकांची .मगाशी पहुडलेले आजोबा, काका सगळे पंगतीत होते...त्यांचे जेवण चालू असताना आम्ही एका tractor वर बसून फोटो काढत होतो.
त्यानंतर आमची जेवायची वेळ आली...आम्ही जाऊन बसलो पत्रावळ्या ठेवल्या द्रोण ठेवले...पाणी मिळाले...भात वाढला आणि शिरा वाढला....दोन्ही पदार्थ अतिशय अप्रतिम झाले होते आणि त्यात भूक आ वासून उभी होती भात आणि शिरा संपला आता मी पोळी or पुरी ची वाट पहात बसलो ...पण असे समजले कि तसलं काही नाहीये.... आता साखरपुड्याच्या जेवणात पोळी किव्वा पुरी नाही हि गोष्ट माझ्यासाठी पहिल्यांदाच होती...आणि याच गोष्टीचा विचार मी हात धुवत असताना करत होतो....आणि मग सहजच विचार डोक्यात आला कि जर पोळी आणि पुरी नाहीये तर बटाट्याची भाजी फक्त भाताबरोबर खायची होती ?...तरी देखील पोटभर जेवलो...
एव्हाना उन कमी झाले होते गार वर सुटला होता...आम्ही जेवून पुन्हा पारावर येऊन बसलो.मधल्या वेळेत मित्र आणि त्याची बायको घरात जाऊन जेवून आले...पुढच्या अर्ध्या तासात सर्वांची जेवणं झाली...
३ वाजले होते. निघायची वेळ झाली होती...तेवढ्यात मित्र म्हणाला कि अरे सगळे स्टेजवर या..आम्ही मुकाट स्टेजवर जाऊन उभे राहिलो...मुलाकडले पाहुणे या नात्याने मुलीकडच्यांनी आम्हाला नारळ टॉवेल आणि टोपी दिली...आता पांढरी टोपी स्टेजवर घालून घ्यायची माझी पहिलीच वेळ.आणि हे सर्व झाल्यावर त्या काकांनी ताकीद दिली कि टोपी अज्जिबात काढायची नाही.मग तसाच स्टेज वरून उतरून आम्ही निघालो.जीन्स घातलेले बहुदा आम्हीच ४/५ जण असू.उगीचच कोणीतरी वेगळे आहोत असे पदोपदी वाटत होते.
त्यानंतर आम्ही मित्राचे अभिनंदन करायला पुन्हा स्टेजवर गेलो.फक्त दोघेच होते .मित्राला अभिनंदन केले आणि त्याच्या बायकोला पण.कुठेही बडेजाव नव्हता,घाई नव्हती.बारीक आवाजात सनई चालू होती काही लोक मांडव स्वछ करत होते.एका कोपर्यात ओट्या भरणे चालू होते.नवरा बायको घरात hall मध्ये बसले होते.गावकरी आपापल्या घरी निघाले होते.आणि आम्ही विदुशकासारखे मांडवातून फिरत होतो.एकूण मिळून ६० लोक पण नसतील...निघायची वेळ आली ...३.३० वाजले होते.मित्राचा निरोप घेऊन आणि एकूणच गावाचा निरोप घेऊन आम्ही पुण्याला परत निघालो...प्रवासातले सगळे सोपस्कार पार पाडून साधारण ७.०० ला मी घरी पोहोचलो..
घरी पोहोचतानाच मोबाईल वाजला...आणि unknown नंबर पाहून उगीचच कपाळावर आठ्या आल्या...नाखुशीने फोन उचलला...आणि २ मिनिटानंतर समजले कि समोरून बोलणारी व्यक्ती इयत्ता ७ वी मध्ये बेंचवर माझ्या शेजारी बसत असे...सध्या अमेरिकेत रहात असून साखरपुड्याकरिता पुण्यात आलेली आहे आणि आजच त्याचा साखरपुडा आहे आणि मला तिथे जायचे आहे....ज्या दिवशी साखरपुडा त्याच दिवशी पाउण तास आधीचे ते आमंत्रण घेऊन मी अंघोळीच्या तयारीला सुरुवात केली...सकाळचा साखरपुडा संपतो न संपतो तोच समोरचा दत्त म्हणून समोर होता...
पटापट आवरून बाहेर पडलो...स्थळ होते श्रुती मंगल कार्यालय..आपटे रोड.. आता आपटे रोड म्हणल्यावर साहजिकच वेशभूषा करण्यात थोडा जास्त वेळ गेला...सकाळी समोरील व्यक्ती कशी दिसत असेल याची काळजी होती...आणि आता आपण कसे दिसत असू याची…..सौंदर्याचे गणित जमवून घाईतच बाहेर पडलो..
१५ मिनिटात कार्यालयात आलो...पहिल्या मजल्यावर कार्यक्रम आहे असे सुचविणारी मोठी इलेक्ट्रोनिक आणि साधी अशा दोन्ही पाट्या खाली लटकविलेल्या होत्या...जाताना जिन्यात असलेल्या आरशात पाहून उगीच formality पूर्ण केल्या.आणि hall मध्ये पोहोचलो...perfume चा घमघमाट पसरला होता....
समोर स्टेजवर विधी चालू होते...पत्रकार परिषदेत पत्रकार ज्या प्रमाणे कॅमेरे धरून उभे असतात त्या प्रमाणे लोकांची photography चालू होती...काही लोक सरळ लावलेल्या खुर्च्या सोयीस्कर फिरवून त्यावर बसून जेवण सुरु होण्याचा वेळेपर्यंत गप्पा मारून टाइमपास करत होते. मुलाची आई आणि नवरी मुलगी यांच्या makeup मधील चढाओढ चेहेर्यावर स्पष्ट दिसत होती...
सनई लावली होती पण ती का लावली आहे याचे उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न केला नाही...
मी आणि माझे दोन मित्र मागे बसून गप्पा मारत होतो...मध्ये एकदा उत्सवमूर्ती ला हात केला...hall मध्ये 'मला बघा' या अविर्भावात फिरणाऱ्या मुलींकडे पाहण्यात आमचा वेळ चमच्यावर ठेवलेली maggie जशी हळुवार घसरते त्या प्रमाणे अलगद जात होता.
काही वेळानंतर 'Ring Exchange ' चा कार्यक्रम चालू झाला...दोघांनी आपापल्या ring एकमेकांना घातल्या...Congratulations चा केक कापला...लोकांनी टाळ्या वाजवल्या मोठा फुगा फुटला त्यातली चमकी नवरा बायको सोडून सगळ्यांवर व्यवस्थित पडली..पेढा भरवणे या प्रकारात नको नको म्हणताना मुलीने ५/६ पेढे सहज रिचवले….
ज्या साठी त्यांनी मला बोलावले तो कार्यक्रम तर झाला...आता ज्या साठी आम्ही गेलो तो कार्यक्रम सुरु झाला होता...
खाणे संपेल कि काय या भीतीने लोकांनी बुफेपाशी गर्दी केली...त्यात आम्ही पण होतोच अर्थात...मीठ आणि लिंबू धरून बरोब्बर १७ प्रकार जेवायला होते...जेवताना मधेच जावून घेणार्यानमुळे नवीन डिश घेणाऱ्यांच्या कपाळावरील अठ्यांची संख्या सुरळीच्या वडीच्या थरानपेक्षा जास्त होती.
जेवण झाल्यावर हात धुण्यासाठी washroom मध्ये गेलो...लोकांनी हात धुतल्यावर पुन्हा एकदा आरश्यासमोर उभे राहून चेहेर्याची रंगरंगोटी सुरु केली होती.
...' कृपया पेपर Napkins येथे टाकू नका' यातील 'कृपया' आणि 'टाकू' या दोन शब्दांवर आधीपासूनच कागद पडलेले होते.
बाहेर आलो बडीशेप ठेवलेली होती...लहान मुलं बडीशेप मधील खडीसाखर वेचून खात होते.
एव्हाना जवळचे मित्र आणि अगदी जवळचे नातेवाईक एवढेच फक्त hall मध्ये शिल्लक होते.बाकीच्यांचा साखरपुडा केव्हाच संपला होता.आम्ही देखील निघायचे म्हणून मित्राला भेटायला गेलो.अभिनंदन केले स्टेजवर व्हिडीओ कॅमेर्यासमोर खोटे हसलो.’पुन्हा भेटू नक्की’ या विरत्या आश्वासनाने हसत त्याचा निरोप घेतला...
जवळचे नातलग आणि मित्रमैत्रिणी या मध्ये त्यातल्या त्यात उठून दिसणारे चेहरे उगीचच मागे वळून टिपत आम्ही जिन्यापाशी आलो.मगाशी दारावर लावलेल्या तोरणा मधील फुलाच्या पाकळ्या खाली पडल्या होत्या...मगाशी भरलेला hall आता रिकामा होता.बाहेर काढलेली रांगोळी व्यवस्थित हलली होती आणि hall मधील खुर्च्यांची एक नवीनच रांगोळी तयार झाली होती.
आम्ही मात्र मस्त जेवण चेपून घराकडे परतलो……
असे खूप कमी दिवस येतात ज्या दिवशी गादीला पाठ लागल्यावर संबंध दिवस आठवावासा वाटतो किंबहुना तो दिवस आपोआपच डोळ्यासमोरून जातो..
एकाच दिवसातील सूर्योदय आणि सूर्यास्त असे एकाच नाण्याच्या दोन बाजू दाखवतील असे ध्यानी मनी पण नव्हते.पण एकाच प्रकारच्या दोन समारंभात इतके भिन्न अनुभव येतील याचा आनंद मला दुसर्यादिवशी मित्रांना सांगताना लपवता आला नाही.अर्थात लिहिण्यामागे कुठेही तुलना करायची मुळीच इच्छा नाहीये.पण ज्या प्रकारे गोष्टी घडतात तश्याच इथे उतरवल्या आहेत.कुठला समारंभ चांगला वाटला असे विचारले तर माझ्याकडे ठाम मत नाही.कारण दोन्ही ठिकाणच्या मजा वेगळ्या आहेत.
फक्त फरक इतकाच कि विकायची असते काचच...पण काही लोक थर्मोकोल मध्ये ठेऊन विकतात तर काही लोक गवताच्या भाऱ्या मध्ये गुंडाळून.....
खरच.....अनुभव घेताना choice नसलेलाच बरा असतो.....
- हृषीकेश पांडकर
२१ नोव्हेंबर २०११
Too good ... dolyasamor chitra ubhe rahile ... faar mast lihilay .. keep writing
ReplyDeleteJyada bhari.. donhi event la mi tuza barobar aslyacha bhas zhala.. Apratim varnan :):)
ReplyDeleteEkach number ! Surekh likhan. ज्या साठी त्यांनी मला बोलावले तो कार्यक्रम तर झाला...आता ज्या साठी आम्ही गेलो तो कार्यक्रम सुरु झाला होता... hahaha... Pudhcha lekh lavkar yava hich iccha...
ReplyDeleteFarach mast... 1 ch no... Keen observation.... :)
ReplyDeleteBtw konachi engagement hoti???? Any of our batchies???
Likhan...Tod nahiye...Besht!
ReplyDelete