Tuesday, May 24, 2022

The Cheesecake Factory

       मागल्या आठवड्यातला अनुभव, जगाच्या पश्चिम टोकावर असलेल्या कॅलिफोर्नियातल्या 'द चीज केक फॅक्टरी' मध्ये जेवायला जायचा घाट घातला होता. अगदीच गोऱ्यांच्या भूमीतली ती खायची फॅक्टरी आणि ते डोळे दिपवणार अंगावर येणारं हॉटेल 'काय सांगावं महाराजा' अशा थाटातलं होता. 'द चीज केक फॅक्टरी' असं ते भव्य काचेच्या हॉटेल समोरचा नाव वाचून 'कुत्रा मोकळा सोडला आहे, येता-जाता दार लावावे' अशी पाटी वाचून जे डोक्यात येते तसा काहीसा माझा चेहरा झाला होता. याआधीचा माझा जेवणानुभव म्हणजे दुर्वांकुर, आशीर्वाद, शीतल अगदीच फार फार तर रुपाली, वैशाली या घरगुती टेबलांपलीकडे कधी गेला नव्हता. आणि त्यातच सांगायच्या ऑर्डर सहित सगळं इंग्लिश मध्ये बोलायचं हे म्हणजे जरा अतीच होत. कारण या लोकडाऊनच्या काळात माझं इंग्रजी 'I will check and let you know' आणि 'Can we have a short call' या दोन वाक्यांना टेकून उभ होतं. 'Asian Veg Meal ' मध्ये अंड येता का ? कि फक्त व्हेज मिल सांगावं या भ्रमात माझा संपूर्ण विमान प्रवास जातो इथे तर पदार्थांची मांदियाळी असणार या चिंतेत माझा त्या हॉटेलच्या दारातच एक मिनिट सरला. मोठ्या हॉटेलात जेवायला जायचं म्हणून दुपारच्या बेताच्या जेवणानंतर पाण्यालाही न शिवलेला मी नावानुसार या हॉटेलात चीज पासून केलेला फक्त केकच मिळेल कि काय याची चिकित्सा 'The Cheesecake Factory' च्या पायरीवरच सुरु झाली. 

       


       ऑर्डर काय करावे, कारण एका डॉलर ला ७७ ने गुणून आलेल्या गुणाकाराइतकी रुपयातली किंमत इथे मला मोजायची होती. रुपयाच्या नाण्या इतकंच ते नाणं पण त्या मागचा गुणाकार आपल्या सारख्यांना वेदनादायी ठरतो. पाचशे रुपयांच्या वर संपूर्ण थाळीचे बिल न भरलेल्या मला आत बसलेल्या लोकांच्या टेबलावरचे मेनू बघून किमतीचे दडपण यायला सुरुवात झाली. पण 'Credit Card' या शब्दामागे संपूर्ण भीती दाबून मी चेहऱ्यावर हसू टिकवू शकलो. तात्पर्य, पैशाची बाजू अगदी बळकट आहे असं मला वाटत होतं. मुख्य प्रश्न होतं ताट मागवावे कसे ? शेवटी कुलदेवतेचे नामस्मरण करून आत पाऊल टाकलं.

बराच वेळ माझ्याकडं कोणी पाहीच ना . मी सुद्धा त्या अत्यंत अपरिचित वातावरणात तरंगायलाच लागलो होतो. एक तर अतिशय आलिशान का काय म्हणतात तसे ते मोठे हॉटेल, चपला काढून फिरावे असे मऊ गालिचे, सिनेमात असतात तशी देखणी झुंबरं, वेटिंग एरियामध्ये देखील असलेल्या राजेशाही खुर्च्या आणि दार उघडल्यावर वेलकम म्हणणाऱ्या सुंदर तरुणी यासोबतच इंग्रजी वगळता परिचित असलेली एकही भाषा कानावर येत नव्हती. कोपऱ्यातून येणारे मंद इंग्रजी संगीताचे स्वर कानाला चाटून जात होते. अगदी सांद्र संगीत चालू असल्याचा भास. कारण इंग्रजी संगीत म्हणजे सांद्र एवढंच आपल्याला ठाऊक. 

       वेळ रात्रीचीच होती, आत भरपूर प्रकारचे दिवे सुद्धा होते पण प्रकाश यावा या हेतूने कदाचित दिवे लावले नसावेत असं माझा समज झाला कारण इतके दिवे असूनही प्रत्येकाचे चेहेरे स्पष्ट दिसत नव्हते. तरी देखील ज्यांचे चेहरे स्पष्ट दिसावेत त्यांचे चेहरे आणि टेबलावर घासून ठेवलेले काटे चमचे, बाउल की बोल अगदी चकाकत होते. प्रत्येक टेबलावर मांडून ठेवलेल्या सॉस आणि चटण्यांच्या नाजूक बाटल्या पाहिल्यावर मला जरा दडपणच येते, कशावर काय ओतावे आणि कशाबरोबर काय खावे यांच्याबद्दलची माझी बुद्धी अगदीच बाळबोध असल्याने या बाटल्यांमधील गोष्टी कशाशी खातात याचा उलगडा मला कधीच नीट झाला नव्हता. आधी काट्याचे भय होते इथे तर स्प्रेडर आणि चॉपस्टिक सुद्धा होते. त्यामुळे नक्की खायचे कशाने हा देखील प्रश्न सतावू लागला होता. चॉपस्टिक ने खाणे म्हणजे चार चौघात शोभा निश्चित होती त्यामुळे शक्यतो तसे पदार्थ नकोच हा निर्णयाचे नक्की झाला. बरं नावातच चीज असल्याने तो स्प्रेडर वापरावा यावर एकमत झालं. पण फुगीर ब्रेडला त्या स्प्रेडर ने चीज कसे लावावे हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहिला. अशा गोंधळलेल्या अवस्थेत मी उभा असताना, 'yes sir' असा लाघवी आवाज कानावर विसावला. सुंदर महिलेने त्यात गोऱ्या घाऱ्या, स्वतःहून आणि जवळ येऊन सर वगरे म्हणावे अशी माझी पहिलीच वेळ. आदबीने तिने मला टेबलापाशी नेलं, अगदी ठरल्याप्रमाणे मी खुर्ची ओढली आणि स्थानापन्न झालो. स्थानापन्न फक्त म्हणायला छान वाटते बाकी तसा जाऊन बसलो म्हणायला हरकत नाही .

       पहिले काय विचारावे याची जमवाजमव करायच्या आधीच त्या ललनेने मला एकूण तीन मेनूकार्ड समोर आणून ठेवली. एकाच हॉटेलात तीन मेनूकार्ड कशासाठी आणि एवढंच होत तर एकच मोठे का नसेल बनवले वगरे दुय्यम आणि वेळखाऊ विचार मी बाजूला सारत एक एक करून ती कार्ड पाहू लागलो. व्हेज भूना, मटर पनीर, नरम रोटी आणि दाल राईस किव्वा अगदीच चैनीची परमावधी म्हणून चीज मार्गारिटा, किव्वा व्हेज बर्गर या पलीकडे मजल न गेलेला मी 'Pretzel Bites With Cheddar Cheese Fondue, 'Avocado Eggrolls ', 'Fire-Roasted Fresh Artichoke ' आणि 'Sweet Corn Tamale Cakes ' अशी नावं वाचूनच पुरता गांगरून गेलो. एकही शब्द लागत नव्हता फक्त पुढल्या किमती तेवढ्या कळत होत्या. आता जेवण मागवायचे कसे हा सुरुवातीपासून भेडसावणारा प्रश्न आता दुप्पट वेगाने उसळून आला. त्यातून ती सुंदर अट्टेण्डण्ट तरुणी एवढ्या वेळात तीन वेळा सर म्हणून येऊन गेली होती. ते एक वेगळंच दडपण टोचायला लागलं. काही वेळ माझ्याकडून काहीच उत्तर नाही असं लक्षात येऊन तिने चॉकलेटी आणि पांढरा असे दोन प्रकारचे ब्रेड आणि ३/४ प्रकारचे बटर चे प्रकार न विचारताच पुढ्यात आणून ठेवले. न मागता आलेले पदार्थ पाहून मी जरा धास्तावलोच, पण या गोष्टी कॉम्प्लिमेंटरी असतात म्हणे तिथे. खाता येण्याजोग्या, वेळ निभावून नेता येईल आणि मुख्य ऑर्डर द्यायला जरा श्वास मिळेल या आनंदात मी नुसत्या 'Thank you' च्या ऐवजी 'Thank you So much' वगरे म्हणालो आणि निश्चित झालो.

       पुढला काही वेळ दोन्ही हाताने ब्रेड तोडून मधल्या भागात स्प्रेडर ने बटर लावण्यात गेला, ती एक कमालीची सर्कस झाली पण एक वेगळे केल्याचा आनंद होता. हे करत असतानाच पुन्हा एकदा ती तीनही मेनू कार्ड पालथी घातली. जिभेला, धर्माला, खिशाला आणि पोटाला मानवेल अशा गोष्टी हेरून ठेवल्या आणि ऑर्डर देण्यासाठी सज्ज झालो. अर्थात तोंडाने बोलून देण्यापेक्षा थेट मेनूकार्ड दाखवावे असे डोक्यात आले कारण उच्चार कसा करावा आणि कसा असतो याचे गणित काही शेवटपर्यंत सुटेना. उगीच सांगण्यात चूक झाली तर भलताच पदार्थ ताटात पडेल या भीतीने थेट सोक्षमोक्ष लावावा म्हणून मागच्या सुंदरीच्या पुढ्यात मेनूकार्ड धरून माझी ऑर्डर पक्की केली. तिने देखील ती हसून स्वीकारली, तिला समजली असावी.

       पुढल्या काही मिनिटात त्या मेनूकार्डात लिहिलेले आणि मी सांगितलेले पदार्थ समोर येऊन स्थिरावले. आता फक्त खायचे काम बाकी होते. त्यानंतरचा तासभर, काटा, चमचा,स्प्रेडर आणि अजून काही निराळ्या गोष्टींबरोबर खेळत आणि जमवलेल्या सर्व पदार्थांची चव चाखत सरत होता. या मधल्या वेळात ती ललना मधून मधून विचारून जात होती, मी उगीच हसल्यासारखं करत होतो.

       सुमारे दीड तासाच्या या संपूर्ण कार्यक्रमात एक वेगळाच अनुभव आणि आनंद मिळाला. बिलाची विल्हेवाट टिपेसहित लावून आणि अन्नदेवतेचे आभार मानून तिथून बाहेर पडलो. काय खाल्लं हे अचानक कोणी विचारला तर पटकन सांगता येईल याची शाश्वती नाहीये, पण एक वेगळी चव चाखल्याचा आनंद नक्की आहे. आता या आंब्याच्या मोसमात हे असलं काहीतरी खाणे म्हणजे तसं जीवावरच येण्याजोगं होतं आणि आपला हापूस इथे चाटून खाण्याची सोय देखील नसते म्हणा.

       तर अशा सात्विक भोजनाचा आनंद घेऊन आणि आतल्या एसी ला लाजवेल अशा बाहेरच्या थंड वाऱ्यातून वाट काढत मार्गस्थ झालो. 

       वरील लेख वाचताना पदोपदी पुलांची आठवण येईल..अर्थात हा केवळ योगायोग अजिबात समजू नका.कारण या लेखाचा गाभाच पुलं आहेत.

हृषिकेश पांडकर

२३/०५/२०२२

 

Friday, March 25, 2022

Jewel of Sundarban !

 दक्षिण भारतातल्या काबिनी, बंदीपूर मधला असो, मध्य भारतातल्या कान्हा,ताडोबाचा असो, किव्वा अगदी उत्तर भारतातल्या कॉर्बेट मधला असो सगळ्या जंगलात पहायला मिळणारा वाघ हा रॉयल बंगाल टायगर या नावानेच ओळखला जातो. इतक्या वर्षाच्या जंगल प्रवासात या ठिकाणी वाघ बघायची संधी मिळाली. पण या वाघाच्या नावातच असलेल्या 'बंगाल' इथे अनेकदा जाऊन देखील या प्राण्याने कायमच हुलकावणी दिली.


 

भारताचा भौगोलिक नकाशा जर पाहिला तर बांगलादेश आणि भारत यांच्या जल सीमेवर असलेला दलदलीचा प्रदेश प्रकर्षाने दिसून येतो. जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल अशी ज्याची ओळख आहे ते म्हणजे सुंदरबन. गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना या तीन नद्यांच्या त्रिभुज प्रदेशावर आणि बंगालच्या उपसागरामुळे सदैव खाऱ्या पाण्यावर तरंगणारे सुंदरी चे बन म्हणजेच हे खऱ्या अर्थाने सुंदर असे सुंदरबन.

एका बाजूला बंगाल, बांगलादेशचा भूप्रदेश आणि एका बाजूला बंगालचा उपसागर, यांच्या मध्ये निमुळते आणि भूप्रदेशाला छेद देणारे नैसर्गिक कॅनॉल. त्यामुळे या चिंचोळ्या कॅनॉल मधून जेमतेम बोट जाईल इतक्या वाटेतून सरकत या सुंदरबनातील जीवसृष्टी न्याहाळणे हा आनंददायी अनुभव असतो. माझ्या या अनुभवांमध्ये अनेक पक्षी, प्राणी पाहून झाले पण या 'मॅन इटर' असे नाव धारण करणारा 'रॉयल बंगाल टायगर' कधीच दिसला नाही.

पुढे सरकणारी बोट, भरती ओहोटी प्रमाणे कमी अधिक असलेली जल पातळी आणि चिखलाच्या गाळामुळे तसेच गर्द झाडीमुळे जंगलाचा किती भाग दिसू शकेल याची साशंकता कायमच असते. आता या सर्व प्रकरणात हा वाघ कधी,कुठे आणि कशी भेट देईल याचा काहीच नेम नाही. पण या गेल्या ३/४ वर्षात हि पट्टेरी मांजर ना कधी आमच्या बोटीला आडवी गेली ना कधी शेजारच्या झुडपातून चालत गेली.चालत गेली देखील असेल पण मागमूस मात्र कधीच लागला नाही.

यंदाचे आमचे नशीब मात्र अशक्य जोरावर असावे. दुपारच्या वेळेला बोट जाऊही न शकणाऱ्या अतिशय चिंचोळा असा कॅनॉल निव्वळ ८-१० सेकंदात या पट्टेरी वाघाने पोहत पार केला. कॅनॉल मधून बाहेर पडल्यावर आपल्याला कोण बघतय हे पाहण्यासाठी टाकलेला एक कटाक्ष माझ्यासाठी मॅन इटर रॉयल बंगाल टायगर ची प्रतीक्षा संपवण्यासाठी पुरेसा होता.शब्दशः तो आला त्याने पहिले, त्याने जिंकले आणि तो नाहीसा झाला. निव्वळ ८ सेकंदांचा तो अवधी, पण खाऱ्या चिखलाने माखलेले ते पिवळे पट्टे इथून पुढे आयुष्यभर अविस्मरणीय राहतील एवढे नक्की.

From sailing through water all day spotting various birds and animals to hustling through land; you will find yourself constantly looking over your shoulder, breathing heavily or becoming extra alert. This is not because you are on the look-out, but you know that they are. At this point, you relive the life of the victims who were ambushed and killed by the tigers. Not for one moment can you catch a breath or heave a sigh of relief. You will realize that the idea of being in a close proximity with arguably, the most savage killers of the world is nota exciting but thrilling.

जशी ती आकृती नाहीशी होते तसे जंगल पुन्हा शांत झाल्यासारखे भासते. हेंदकळणाऱ्या पाण्याबरोबर चिखलात उमटलेले ते पंजे पुन्हा एकदा नाहीसे होतात. मनुष्य भक्षक अशी ख्याती मिरवणारा त्याच्या वाटेल केव्हाच लागलेला असतो. सुंदरबन हे मुळात रहस्यमय जंगल म्हणून ओळखले जाते आणि अशातच असे अनुभव याची रहस्यमयता अजूनच गडद करत राहतात.

दुर्गापूजा, हावडा ब्रिज, व्हिक्टोरिया मेमोरियल, ट्राम आणि रसगुल्ले यांच्या पुढे जाऊन जर कधी या दलदलीला भेट देण्याची संधी मिळाली तर या नरभक्षकाला पण नक्की शोधा खऱ्या अर्थाने वाघाची जरब काय असते याची प्रचिती येते

हृषिकेश पांडकर

२३/०३/२०२२

Man-eater of Sundarban !

Sundarbans | India | Feb 2022

Saturday, March 5, 2022

जादूगाराचा निरोप ..

 आधी उजव्या हातातून डाव्या हातात फिरणारा चेंडू दोन तीन वेळा जायचा. मग जीभ बाहेर काढून फिरवली जायची, सदैव उभे असलेले सोनेरी केस ज्याला बाहेरचे जग स्पाईक्स असं म्हणतात. पांढरा शुभ्र किव्वा पिवळा धमक रिस्ट बँड जो रिस्ट च्या कायम वरच असायचा. जेमतेम दोन पावलं चालत येऊन या माणसाने आपले जादूचे प्रयोग सर्व जगाला करून दाखवले.

कपिल देव ची बॉलिंग स्टाईल ही पोस्टर मध्ये छान दिसायची त्यामुळे बेडरूमच्या लाकडी दारावर कपिल देव चे उभं पोस्टर दिसायचं. पण रबरी आणि टेनिस बॉल वर आम्ही ज्या मॅचेस घ्यायचो त्यात टॉस करणे, स्टंप ठोकाठोकी, टीम पाडणे वगैरे कामं होईपर्यंत आणि रस्त्यातून चालत असताना काहीच कारण नसताना बेमालूम जी ऍक्शन करायचे त्यात ही जादूगाराची ऍक्शन अग्रस्थानी होती.


 

मी याला प्रत्यक्ष खेळताना कधीच पाहिलं नाही, पुण्यात एकदा संधी होती पण टीम मध्ये वॉर्न नव्हता. ती संधी हुकली ती कायमचीच. शब्दशः हातभर चेंडू वळविणे कशाला म्हणतात हे आम्हाला वॉर्न ने दाखवले. गेटिंग, गिब्स, स्ट्रॉस यांचे बोल्ड पाहिले की अजूनही या वळणाऱ्या बॉल वर विश्वास बसत नाही.

मैदानावर केलेल्या कामगिरी सोबतच मैदानाबाहेर केलेल्या धंद्यांमुळे देखील हा जादूगार कायम चर्चेत राहिला. अर्थात माझी ओळख त्या बावीस यार्डा पुरतीच.

बॉर्डर, टेलर, स्टीव्ह वॉ आणि काही अंशी पॉंटिंग यांच्या अनभिषिक्त आणि अभेद्य संघात महत्वाचं योगदान असलेला जादूगार कायमच स्मरणात राहील.

कुठल्याही टीम चा असला तरी जगभर तितकीच लोकप्रियता मिळवणारे खेळाडू अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच असतात. त्यातलाच हा. भारतीयांच्या जितक्या शिव्या पॉंटिंग, सायमंडस या मंडळींनी खाल्ल्या त्यापेक्षा जास्त प्रेम शेन वॉर्न ने भारतात मिळवलं. जेव्हा जेव्हा सचिन आणि लारा बद्दल बोललं जाईल तेव्हा तेव्हा वॉर्न च नाव आपसूक घेतलं जाईल. वॉर्न ची जादू भारतात तितकीशी चालली नाही कदाचित पण सचिन-वॉर्न द्वंद्व कायमच आठवणीत राहील.

आयपीएल च्या पहिल्या सिझन मध्ये जिथे मुंबई, कोलकता, बेंगळुरू, दिल्ली अशा मातब्बर संघांनी खेळाडूंचा 'क्रिमी लेअर' आपल्या संघात भरून घेतल्यावर उरलेल्या तरुण पोरांना हाताशी घेऊन थेट विजेतेपदला गवसणी घालणारा वॉर्न कायमचा लक्षात राहील.

संपूर्ण बालपणाच छत ज्या विविध रंगी फुग्यांनी सजले होते त्यातले एक एक फुगे निखळताना होणारी वेदना शब्दात व्यक्त करणे जरा कठीणच. समाधानाची बाब इतकीच की या जादूगाराचे प्रयोग बघायची आपल्याला संधी मिळाली.

विकेट मिळाल्यावर ऑस्ट्रेलियन बाकीचे खेळाडू बॉलर चे केस विस्कटून टाकतात मात्र शेवटपर्यंत ज्याने ते केस तसेच विस्कटलेले ठेवले तो म्हणजे शेन वॉर्न. कदाचित यशाची इतकी सवय आणि खात्री होती की पुन्हा भांग पाडून उपयोग नाही हे त्याला पक्क माहीत होतं.

ज्याने आयुष्यभर इतकी गुगली टाकली त्यालाच नियती इतक्या अनपेक्षित आणि लवकर गुगली टाकेल यावर विश्वास बसत नाही. एकाच हाताच्या पंजावर चार क्रिकेटचे बॉल धरू शकणाऱ्या फिरकीच्या जादूगाराला मनापासून श्रद्धांजली

हृषिकेश पांडकर

०५.०३.२०२२